सद्‌बुध्दी दे गणनायका...!

देश पारतंत्र्यात असताना आपल्यावर अनेक बंधने होती. प्रत्येक गोष्टीसाठी इंग्रज सरकारची परवानगी घ्यावी लागे. अशावेळी पारतंत्र्या विरोधात लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शेकडो/हजारो माणसे एकत्र करणे कठीण गोष्ट होती. अशा परिस्थितीत फक्त लग्न सोहळा अथवा धार्मिक कार्यासाठी माणसे एकत्र होण्यास बंदी नव्हती. याच गोष्टीचा फायदा द्रष्ट्या लोकमान्य टिळकांनी घेऊन लोकांना स्वातंत्र्याचे महत्त्व आणि पारतंत्र्यातील धोके समजावून सांगून त्यांच्यात जागृती करण्यासाठी एक अनोखा निर्णय घेतला आणि देवघरातील/मंदिरातील गणपतीला घराबाहेर/मंदिराबाहेर आणून सार्वजनिक गणेशोत्सवास सुरूवात केली.

गणेशोत्सवात लोकांच्या मनोरंजनासाठी तेव्हा किर्तने, नाटके, शाहीरांचे पोवाडे, व्याख्याने असे विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम केले जात असत. लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंतीमधून लोकांना स्वातंत्र्याचे महत्त्व कळेल, स्वातंत्र्य लढ्यासाठी लोक प्रेरीत होतील अशा कार्यक्रमांना प्रोत्साहन दिले. एका अर्थाने त्यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी गणपती बाप्पा आणि छत्रपती शिवरायांची मदत घेतली/आशीर्वाद घेतले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

 साऱ्यांच्याच प्रयत्नाने स्वातंत्र्य मिळाले तरी नंतर सार्वजनिक गणेशोत्सव बंद झाले नाहीत; उलट त्यांची संख्या वाढली. काही वर्षे गणेशोत्सवात होणारे मनोरंजनात्मक कार्यक्रम हे प्रबोधनात्मक आणि दर्जेदार होते.. पण त्यानंतरच्या काळात गणेशोत्सवात जनजागृती कमी आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम अधिक असे स्वरूप आले. त्याचाच भाग म्हणून नाटकांऐवजी पडद्यावरचे चित्रपटांकडे कल वाढला आणि लोकांनाही मग किर्तने, नाटके, पोवाडे, व्याख्याने यांपेक्षा पडद्यावरचे चित्रपट आवडू लागले, लोक चित्रपटांना गर्दी करू लागले नि मागणी तसा पुरवठा या न्यायाने हळूहळू गणेशोत्सवातील प्रबोधनात्मक कार्यक्रम बंद झाले. काळानुरूप गणपतीच्या मूर्तींची उंची नि सजावट वाढली. साठ सत्तर वर्षांपूर्वी वीजेच्या रोषणाईने लोक अक्षरशः वेडावले आणि ती रोषणाई पाहण्यासाठी गणपती पहायला दिवसांपेक्षा रात्री गर्दी वाढू लागली आणि नंतर शहरांमधील गणपती हे रात्रीच पहावयाचे असतात असा जणू नियम बनला. त्यात प्रत्येक वाडी गल्लीतील गणपती त्या वाडी गल्लीचा राजा झाला.

हळूहळू गर्दी वाढविण्यासाठी अमुक तमुक गणपती नवसाला पावणारा अशी ख्याती पसरवली जाऊ लागली. आणि मागील २५/३० वर्षात तर गणेशोत्सवातील मांगल्य संपले. जणू, धार्मिक, मंगलमय वातावरणापेक्षा दिखाऊपणा वाढला. प्रत्येक गणेशोत्सव मंडळात स्पर्धा वाढली. आता ॲण्ड्रॉइड मोबाईल आल्यावर तर श्रीगणेश देव कमी आणि मोबाईलवर फोटो, सेल्फी, स्टेटस ठेवण्यासाठी जास्त गरजेचा वाटू लागला. उत्सवातील गर्दी जसजशी वाढू लागली, मांगल्य हरवत गेले तसतसे मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या वागण्यातील बेफिकिरी वाढली. बाप्पाच्या मंडपात, विसर्जन मिरवणुकीत काही अशोभनीय प्रकार उघडपणे घडू लागले आणि त्यात कुणाला काही चूक आहे असे वाटेनासे झाले. मोठमोठ्या मूर्ती, अवाढव्य मंडप आणि सजावट, कर्कश्य आवाजातील नको ती गाणी.. जी सुसंस्कृत घरात कधी ऐकली जात नाहीत ती गाणी उत्सवात वाजू लागली.

...मात्र काही गणेशोत्सव मंडळे वर्षानुवर्षे समाजपयोगी अनेक उपक्रम राबवतात. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य यासाठी दरवर्षी लाखो रूपये खर्च करतात. पूर, भूकंप अशा नैसर्गिक संकटातही बऱ्याच ठिकाणी मदत करतात. खरेतर सर्वच मंडळांनी अशा मंडळांचा आदर्श घेऊन कामे केली पाहिजेत; पण त्यांना भक्तीचा बाजार मांडून, गर्दी जमवून आपला स्वार्थ साधायचा असतो अशा मंडळांच्या कार्यकर्त्यांची फळी काही चलाख नेते लागेल ती मदत करून आपल्या सोबत ठेवतात. अशांना देवापेक्षा नेते आणि सेलिब्रेटी मोठे वाटू लागतात. तेव्हा गणेशोत्सवाचा स्वातंत्र्यासाठी/स्वराज्यासाठी जनजागृती हा उद्देश होता..तर आज वाढता भ्रष्टाचार, स्वैराचार, व्यसनाधीनता, स्त्रियांवरील अत्याचार, धर्माबाबत-देशाबाबत अनास्था यांबाबत जनजागृती हा उद्देश असायला हवा; पण तेच होत नाहीये. दुर्दैवाने ज्यांच्या हाती तरूणांचे नेतृत्व होते/आहे व जे अशा उत्सव मंडळांचे सर्वोसर्वा आहेत तेही तरूणांना काही प्रबोधनात्मक कार्य सांगत नाहीत. लोकांना आवडते ते तसे आयोजन करतात, सण उत्सव इव्हेंट म्हणून साजरे करतात.

 सगळाच दिखावूपणा, धंदा झालाय उत्सवाचा. या उत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक आता या उत्सवात आलेला बाजारूपणा, थिल्लरपणा, बिभत्सपणा पहात असतील तर त्यांचा आत्माही तळमळत नसेल का? हे कधी कळणार आपल्याला? उत्सवासाठी जमणाऱ्या तरूणाईच्या शक्तीचा, प्रचंड निधीचा उपयोग समाज, देश, धर्महितासाठी आम्ही करावी अशी आम्हाला सद्‌बुध्दी दे रे बुद्धीदात्या.  - मनमोहन रो.रोगे 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

गणपतीची अनेक रूपे