दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
साध्या मातीचा बाप्पाच पर्यावरणपूरक
बाजारात मिळणारी शाडूची माती ही चिकट व सिमेंटसारखी बारीक असते. तिची मूर्ती विसर्जित केल्यानंतर झाडांना किंवा कुंडीला टाकली तर मातीचा भुसभुशीतपणा संपतो, जमिनीवर घट्ट असा थर निर्माण झाल्यामुळे पाणी जमिनीत जिरण्याची प्रक्रिया थांबते. झाडांच्या मुळांना पाणी नीट मिळत नाही, मुळांशी हवा खेळत राहत नाही. झाडांची वाढ खुंटते. जमिनीखालची पाण्याची पातळी कमी होते. या मातीची मूर्ती विहिरीत/तलावात विसर्जित केल्यास घट्ट गाळ बसून पाणी वाहून आणणाऱ्या झऱ्यांच्या तोंडाशी ही माती बसून तोंडे बंद होतात; तर कागद्याच्या लगद्यासाठी लागणारा कागद शेवटी झाडांपासूनच बनतो..म्हणजे झाडांवर गंडांतर! त्यापेक्षा मूर्तीसाठी आपली चिकण मातीच उत्तम होय.
फार पूर्वी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणपती मूर्ती ही घरच्या घरी बनवली जायची. यासाठी नदीकाठून माती आणून बाप्पा हाताने घडवला जायचा. गणपती उत्सव संपल्यानंतर अनंत चतुर्दशीला बाप्पा नदीतच विसर्जित केला जायचा. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नव्हते. काळ बदलत गेला आणि त्याचे स्वरूप वेगळेच होत गेले. मुर्त्या बाजारात विकायला आल्यात. मूर्तीचा आकार वाढला, मागणी वाढली त्यामुळे आणि मूर्ती जास्त मजबूत, हाताळायला सोपी; त्यामुळे पीओपीचा वापर सुरू झाला. परंतु पीओपीचे दुष्परिणाम आपण गेले काही वर्ष झाले पाहत आहोत. त्याला पर्याय म्हणून शाडू मातीचे गणपती जे पाण्यात विरघळतात असे गणपती बसवण्यात प्रदूषण कमी होते म्हणून शाडू मातीपासून मूर्ती बसवली व बनविली जाऊ लागली. बाजारात मिळणारी शाडू ही पांढरट करडय़ा रंगाची असून या मातीमध्ये सूक्ष्म कणांचे प्रमाण सर्वात जास्त असते. पाण्याच्या संपर्कात येताच तिची आकार्यता वाढते. म्हणूनच या मातीस आपण हवा तसा आकार देऊ शकतो. विविध भौमितिक कोनांमध्ये वळवू शकतो. यासाठी मातीमध्ये योग्य प्रमाणात आर्द्रता असणे गरजेचे असते. या मातीचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे योग्य आकार दिल्यानंतर आर्द्रता कमी झाली तरी तिच्यामधील सूक्ष्म कण समूहाच्या रूपात एकामेकांस घट्ट चिटकून राहतात आणि दिलेला आकार एकसंध राहतो. त्यामुळे मूर्तीला तडा जात नाही. याचमुळे शाडू मातीचा वापर करून मूर्ती बनवून पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यात सर्वांचा कल निर्माण झाला. अशा तऱ्हेने गणेशोत्सव साजरा करताना प्रत्येकाला आपण पर्यावरणपूरक मूर्ती बसवून निसर्गातला वाचवण्याचे काम करत आहोत याचा भ्रम निर्माण झाला. भ्रम यासाठी कारण शाडू मातीचा जर पुनर्वापर झाला तरच ती पर्यावरणपूरक आहे, अथवा ती पर्यावरणाला घातक आहे.
शाडू मातीपासून बनवलेल्या बाप्पा जरी पाण्यात विसर्जित केल्यावर काही दिवसात विरघळत असेल, तरीही ती माती पर्यावरणाला पूरक नाही. बाजारात मिळणारी शाडू नावाची माती ही फार चिकट असते. ही माती फार सिमेंटसारखी बारीक असते. याच गुणधर्मामुळे जेव्हा या मातीपासून बनवलेली मूर्ती विसर्जित केल्यानंतर झाडांना किंवा कुंडीला टाकली तर मातीचा भुसभुशीतपणा संपून जातो. जमिनीवर घट्ट असा एक थर निर्माण होतो; ज्यामुळे पाणी जमिनीत जिरण्याची प्रक्रिया थांबते. त्यामुळे झाडांच्या मुळांना पाणी व्यवस्थित मिळत नाही. मुळांशी हवा खेळत राहत नाही. परिणामी झाडांची वाढ खुंटते झाडे मरुही शकतात. परिणामी जमिनीखालची पाण्याची पातळीसुद्धा कमी होते. तसेच या मातीची मूर्ती विहिरीत तलावात जर विसर्जित केली तर याचा घट्ट गाळ बसून आतील पाणी वाहून आणणारे झऱ्यांच्या तोंडाशी बसून तोंडे बंद होतील इतकी ताकद या मातीत असते. त्यामुळे अशा मातीचे विसर्जन होणे घातक आहे. ही माती पुनर्वापर झाला तरच याला पर्यावरणपूरक म्हणता येते.
शाडू मातीचा पुनर्वापर म्हणजे घरच्या घरी बादलीत विसर्जित केल्यानंतर बाप्पा जेव्हा विरघळेल तेव्हा वरवरचे पाणी फेकून देऊन माती ही सुकवून एका फडक्यात बांधून ठेवावी. जेणेकरून पुढल्या वर्षी त्याला थोडी बारीक करून पाणी शिंपडून पुन्हा त्याचा गोळा बनवून बाप्पा बनवायचा. ज्यांनी ज्यांनी शाडू मातीचे बाप्पा बनवले आहेत किंवा स्थापित केले आहे त्यांनी बाप्पा घरच्या घरी विसर्जित करून त्याची माती पुनर्वापरच केला जाईल यावर लक्ष देणे गरजेचे आहे. या पुढील काळात त्याचा वापरच होणार नाही असे करावे.
अनेक ठिकाणी कागदाच्या लगद्यापासून बाप्पाची मूर्ती घडविण्यात येते. जेणेकरून ही मूर्ती पटकन विसर्जित होऊन याचे कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम दिसत नाहीत याचे खतसुद्धा होते आणि झाडांनासुद्धा कुठल्याच प्रकारचा नुकसान होत नाही. असे जरी असले तरी कागद हा झाडांपासून येतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपले झाडांचे प्रमाण बघितले तर खूपच कमी झाले असून. राष्ट्रीय वननीती नुसार राज्याच्या कमीत कमी ३३ टक्के भूभाग वनाच्छादनाखाली असणे अभिप्रेत आहे. भारतीय सर्वेक्षण संस्था, डेहराडून यांनी प्रकाशित केलेल्या अहवालानुसार आपल्या राज्यात केवळ १६ टक्के क्षेत्र वनाच्छादाखाली आहे. त्यातही चांगले आणि मध्यम दर्जाचे वनाच्छादन फक्त ९.६ टक्के क्षेत्रापर्यंत मर्यादित आहे. सततची चाललेली झाडांची कत्तल आणि वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे प्रयत्न बघता. आज प्रत्येक झाड हे खूप महत्त्वाचे आहे. त्याला जगवणे महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत कागद हा झाडापासूनच येत असल्यामुळे प्रत्येक कागदाच्या तुकड्याचं पुन्हा पुनर्वापर झालाच पाहिजे. त्यामुळे जर बाप्पाची मूर्ती कागदाची बनवली आणि त्याचे विसर्जन केल्यानंतर खत केले तर तेवढ्या कागदांचा पुनर्वापर होणार नाही. त्यामुळे कागदाच्या लगद्याचा सुद्धा बाप्पा निसर्गाचा विचार केला तर स्थापन करणे योग्य नाही.
संपूर्णपणे पर्यावरणपूरक ही फक्त मातीच आहे म्हणूनच बाप्पा हा चिकण मातीचाच बनला पाहिजे. म्हणजे लाल, काळी माती वापरून बाप्पा बनविला पाहिजे. असा बनविला बाप्पा तुम्ही विसर्जित केल्यानंतर झाडांना टाकू शकतात किंवा कुंडीत या मातीवर झाडसुद्धा लावू शकता. यात कुठल्याही प्रकारे शंभर टक्के प्रदूषण होणार नाही. संपूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. मूर्ती बनवण्यासाठी माती अगदी घरातील कुंडीतील किंवा परिसरातील माती घेऊन बनविता येते. फक्त त्यावर प्रक्रिया व्यवस्थित होणे गरजेचे आहे. एकदा बनवली असता दरवर्षी कष्ट जर घ्यायचे नसतील तर तीच माती दरवर्षी आपण वापर करू शकतो. त्यामुळे फक्त एकदाच कष्ट घेतले की कायम या मातीचा वापर होऊ शकतो. यासाठी बाप्पा विसर्जित केल्यावर माती जपून ठेवणे. तसे माती बनवणे अगदी सोपं आहे. पूर्वी नदीकाठाहुन माती आणायचे, बाप्पा घडवायचे आणि नदीमध्येच विसर्जित व्हायचे. आतापण कुंडीतून माती घेणार, बाप्पा बसविणार आणि कुंडीतच विसर्जित होणार.
बाजारात मूर्ती बनविण्यासाठी लागणारी साधी लाल माती सहज उपलब्ध आहे. परंतु हीच माती आपण तीन ते चार दिवसांमध्ये बनवू शकतो. अगदी कुंडीतली आजूबाजूची परिसरातली माती घेऊन मोठे भांडे भरून कुठलीही माती घेतली की ती माती अर्धी पाण्याच्या बादलीत टाकून पाण्यात ढवळून काढायची. वर आलेला काडीकचरा काढून टाकला की हे मातीचे मिश्रण पिठाच्या चाळणीतून गाळून घ्यायचे. चाळणीतला वरचा कचरा फेकून दिला खालचे पाणी एका बादलीत जमा होऊ द्यायचे ते पाणी ६ तास राहू द्यायचे नंतर वरवरचे पाणी फेकून द्यायचे आणि खालची माती ताटामध्ये पसरवून सुकवायची. हळूहळू माती सुकून एक दोन दिवसांमध्ये पोळीच्या कणकेसारखी होईल. जी माती हाताला चिटकतही नाही आणि सहज वळते. आता ही तयार झालेली माती एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत बंद करून किंवा डब्यात बंद करून ठेवा; जेणेकरून हे सुकत नाही. या पद्धतीमुळे मातीतील कचरा व बारीक रेती निघून जाते व मऊ अशी माती मिळते या मातीमध्ये लवचिकपणा असल्यामुळे सुबक मूर्ती घडविता येते. मूर्तीतील बारकावेसुद्धा करता येतात तसेच सुकल्यावर या मूर्तीला तडा सुद्धा जात नाही. मजबूत ही इतकी होते की हार घालताना थोडा धक्का लागला तरी मूर्तीला काही होत नाही. तसेच विसर्जित केली तर कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही.
आमच्या संस्थेने अशा पद्धतीने चार वर्षे झाले लोकांपर्यंत जनजागृती केलेली आहे. आणि अनेक जण याचा स्वीकार करून अशा पद्धतीने मातीचाच गणपती घडवत आहे. अगदी छोटे छोटे मुलं शाळेत आपापल्या घरातून अशी माती तयार करून घेऊन येतात आणि बाप्पा घडवितात. फक्त गरज आहे तर मनावर घेण्याची मनावर घेतलं की सगळं काही होतं. म्हणूनच नक्कीच प्रत्येकाने बाप्पा बसवितांना आपल्याच घरी माती बनवून किंवा लाल माती उपलब्ध करून, या मातीचा आपल्याच हाताने बाप्पा घडविला तर मोठ्या प्रमाणावरील प्रदूषणाला आटोवयात आणता येईल. स्वनिर्मित अश्या बाप्पाला आपल्या घरी बसून जो आनंद मिळतो तो अवर्णनीय आहे. आनंदचा आनंदही मिळेल आणि निसर्ग संवर्धन करण्याचे पुण्यही लाभेल. हा लेख वाचून कुठल्याही प्रकारचा प्रश्न मनात आल्यास आम्हाला तुम्ही विचारू शकता. तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले जाईल.
- सौ. मनिषा चौधरी भ्रमणध्वनी : ७०२१२१५८७१