कोकणच्या नैसर्गिक परंपरेचे प्रतीक : माटी

कोकणातला घरगुती गणेशोत्सव अत्यंत देखणा आणि शिस्तबध्द असतो, तो पर्यावरणस्नेही असतो कारण गणपतीच्या छतावर अग्रभागी माटी सजवलेली असते. या माटीला खूप पर्यायी शब्द आहेत. ते म्हणजे  मंडपिका, माटवी, माटोळी, मंडपी आणि अस्सल मालवणी बोलीतील ‘माटी' पर्यंत अनेक शब्द वापरले जातात. या माटवीतील झाडपेड स्वतःहून फुलून येते, देठापासून तुटूनही अकरा दिवस एका ऊर्जेवर ती जिवंत राहते, हे सगळं तर त्या गणेशाच्या कृपेने होते अशी कोकणातील भक्तांची श्रद्धा आहे.

माटी हे कोकणच्या समृद्ध नैसर्गिक आणि  सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. गणपतीच्या आसनाच्या वर माटी बांधण्यात येते. यामध्ये वेगवेगळ्या रानातील वनस्पती, फळे, पाने, फुले बांधली जातात. हे बांधण्यासाठी लाकडाची खास तयार करून घेतलेली पारंपरिक माटी वापरली जाते. जी साधारण आयताकृती असते आणि त्यात उभ्या-आडव्या पट्ट्या असतात.

      कोकणासह गोमंतकात ‘माटवी' हा प्रकार दिसतो. कोकणात केवळ गणपतीच्या मूर्तीच्यावर ही सजावट करण्यात येते. एक लाकडी चौकट आणि त्याला क्रॉस रचना असणारी लाकडी रचना अशी झाली याची प्राथमिक आखणी.. आणि त्याला रानातून मिळणाऱ्या फळाफुलापानांची असणारी आकर्षक रचना या संपूर्ण रचनेच्या सजावटीला माटी म्हणतात.. थोडेसे गोव्यात गेलं की केवळ गणपतीपुरते न मय्राादित राहता संपूर्ण गणपतीच्या खोलीलाच ही सजावट करण्यात येते आणि त्याला माटोळी' म्हणतात. त्यामुळे संपूर्ण खोलीत  सुगंधी  घमघमाट सुटतो.  मुळात कोकण गणेशोत्सवप्रिय आणि गोमांतक म्हणजे उत्सवप्रिय प्रांत. त्यामुळे निसर्गाच्या राजाचा हा सोहळा माटीमुळे खुलतो.

     कोकण हे विविध वनस्पतींनी नटलेले आहे आणि त्यात श्रावण-भाद्रपद महिन्यात येणाऱ्या बहाराने ते अजून नटून थटून जाते. माटी बांधण्याचा धार्मिक उद्देश म्हणजे, ही पृथ्वी म्हणजे साक्षात श्री देवी पार्वतीचे रूप आहे आणि ती गणेशाच्या आगमनासाठी विविध वनस्पतींच्या रुपांनी साजली आहे. त्यामुळे याच काळात बहरणाऱ्या वनस्पतींचा वापर माटीमध्ये केला जातो.

      माटीमधील विशेषतः म्हणजे आंब्याचे टाळ, किवनीचे दोर, उतरलेला नारळ, शिप्टा आणि तवसा. यांचा वापर केला जातो. तसेच इतर रानातील फुले आणि फळे वापरली जातात.

     आंब्याचे टाळ : आंबा (Mangifera indica (Anacardiaca) माटीमधील सर्वात महत्वाचे म्हणजे आंब्याचा टाळ, कोकणात बऱ्याच पवित्र कार्यात आंब्याचे टाळ म्हणजे फांद्यांची डहाळे वापरली जाते. हे टाळ फक्त आंबोलीचेच म्हणजे रायवळ आंब्याचे असले पाहिजेत असा कटाक्ष असतो. त्यात कलमी आंब्याच्या टाळांचा वापर सहसा होत नाही.

     केवणीचे दोर (किवनीचे दोर)  : केवण/मुरडशेंग ( Helicteris isora (Malvaca) आंब्याचे टाळ  किंवा इतर गोष्टी माटीला बांधण्यासाठी केवणीच्या झाडाच्या सालीचे दोर वापरतात. ही साल खूप मजबूत असते. त्यामुळे तीचा वापर केला जातो. केवण हे एक झुडूप आहे. त्याला लाल फुले आणि  पिळसर शेंगा येतात. केवणीच्या शेंगांना मुरडशेंग असेही म्हटले जाते. मुरडशेंग ही लहान मुलांच्या बाळऔषधीत वापरली जाते. ते सानशीतील एक महत्वाचे औषध आहे.

       उतरलेला नारळ : नारळ / माड ( Cocos nucifera (Aercaca) माडाला कल्पवृक्ष म्हटले जाते. त्याच्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग केला जातो. म्हणून माटीमधील महत्वाचे फळ म्हणजे नारळ. खास माटीसाठी झाडावरून न पाडलेला म्हणजेच झाडावरून उतरलेला नारळ त्यात वापरला जातो.

       शिप्टा (कातरो) : सुपारी/फोफळ (Areca catechu (Arecaca) शिप्टा' म्हणजे सुपारीच्या फळांचे घोस. यांचाही वापर माटीत प्रामुख्याने होतो. हा घोस माटीचे सौंदर्य वाढवतो.

       तवसा (काकडी) : काकडी (Cucumis sativus (Cucurbitaca)  काकडी ही पावसाळ्यात उगवणाऱ्या भाजांपैकी एक असल्याने माटीत मोठी काकडी (तवसा) चा समावेश असतो. तसेच याशिवाय प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार आणि उपलब्धतेनुसार विविध इतर फळेही माटीला बांधतात. गणेश विसर्जनावेळी नारळ व काकडी कापून प्रसाद म्हणून वाटली जाते. कोकणातला गणेशोत्सवाएवढा देखणा असतो, कारण गणपतीच्या छतावर माटी असते, दरवर्षी सजणारी ! या माटवीतील झाडपेड स्वतःहून फुलून येते तेव्हा ते आणखी आकर्षक दिसते, हा नैसर्गिक ऐवज अकरा दिवस एका ऊर्जेवर जिवंत राहतो, त्यावर पाणी न मारताही आणि हे सगळं तर गणेशाच्या कृपेने होते अशी कोकणातल्या लोकांची भावना असते.

    यांशिवाय माटी रंगीत आणि आकर्षक दिसावी म्हणून आजुबाजुला उपलब्ध असलेल्या इतर जंगली वनस्पतीही माटीत वापरल्या जातात. यात हरण, कवंडळ, कांगणे, सरवड, आयना, तेरडा, वाघनखी, नरमाची फळे व नागकुड्याची फळे यांचा समावेश होतो.

       हरण (हराण) : सोनकी ( Senecio bombayensis (Asteraca) सोनकी हे एक लहान रोपट असते. त्याला आकर्षण पिवळी फुले येतात. पावसाळ्यात कोकणातील सडे हरणाने भरून जातात. माटीमध्ये हरण प्रामुख्याने बांधले जाते.

       कवंडळ (कौंडाळ) : कवंडळ (Terichosanthestericuspidata (Cus uerbitaca) कवंडळ ही एक वेल असते. त्याला पावसाळ्यात पांढरी फुले आणि लाल गोलाकार फळे येतात. ही कवंडळ फळे माटीत वापरली जातात. त्यामुळे माटी अजून रंगीत बनते.

       कांगणे (कांगले) : कांगुणी (Celasterus paniculatus (Celasteraca) कांगुणी ही एक वेल असते. त्याला गोलाकार पिवळी-केसरी फळे येतात. कांगणीच्या फळांचे घोस माटीत बांधले जातात.

        सरवड (शेरवाड) : सरवड ( Mussaenda glaberata (Rubiaca) सरवड हे एक झाडांच्या आधाराने वाढणारे रोप आहे. याला भगवी फुले येतात;  तर याची नवीन पाने पांढरी असतात. त्यामुळे ही पाने माटीत वापरतात.

        ऐन : आयना /असन (Terminalia elliptica (Combertaca) ऐन हे इमारती लाकडाचे झाड. त्याला कोकणात आयना असे म्हणतात . ऐनाची फळे (आयना) पाच पदराची असून जरा विचित्रच आकाराची असतात. त्यांचे घोस माटीला बांधले जातात.

        तेरडा (तिरडा) :तेरडा (Impatiens balsamina (Balsaminaca) पावसाळ्यात बहरणाऱ्या रोपांपैकी तेरडा हे रोप बहुतांश लोकांच्या परिचयाचे आहे. तेरड्याची गुलाबी फुले माटीला सुंदर दिसतात.

        वाघनखी : कळलावी/वाघनखी (Gloeriosa superba (Colchicaca) वाघनखी ही वेलवर्गीय कंदमुळ वनस्पती आहे. याची आगीसारखी दिसणारी लाल-भगवी-पिवळी फुले माटीत अजून रंगत आणतात.

        नरमाची फळे : नरम/बोंडारा (Lagersteromia parviflora (Lytheraca) नरम म्हणजे बोंडारा हे एक मध्यम आकाराचे झाड. याची फळे काही ठिकाणी माटीला वापरली जातात.

        नागकुड्याची फळे : नागकुडा (Tabernamontana alternifolia (Apocynaca) नागकुडा हे एक मध्यम झाड. याला तगरीसारखी पांढरी फुले येतात. तर याची पिवळसर केसरी वाकडी फळे माटीत वेगळी दिसतात. काही ठिकाणी यांना वाघनखं असे म्हटले जाते.

 माटी ही कोकणची एक वेगळीच संस्कृती आहे. हिरवागार समृध्द सुंदर निसर्ग ही कोकणची देणं आहे. अश्याच निसर्गातच आढळणाऱ्या वनस्पती, पाने, फुले यांची आरास करून माटी सुंदर सजवली जाते. यातील बहुतांश वस्तूंची माहिती आपल्याला नसते. यात काही रानटी रोपे असली तरी काहीअंशी औषधी वनस्पतीसुद्धा आहेत. गणपती या देवतेबरोबरच यातील काही उपेक्षित झाडांची, रोपांची आणि निसर्गाचीही पूजा होते. म्हणून आपण ही ‘माटी' ची कोकणातील संस्कृतिक परंपरा जपायला हवी. -शिवाजी गावडे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी