दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
मुशाफिरी
चोरी हा प्रतिष्ठेने मिरवायचा विषय कधीच नव्हता. काही हिंदी, मराठी चित्रपटवाल्यांनी चोरांना ग्लॅमरस पध्दतीने रंगवले हे खरे आहे; पण ते वास्तव नव्हे! चोरांचा तिरस्कार सारेच करतात. याला अपवाद चित्तचोर मंडळींचा. दिल, चित्त चोरणाऱ्यांना एक वेगळेच वलय असते. हे दुसऱ्याचे दिल किंवा चित्त चोरणे म्हणजे येरागबाळ्याचे काम नव्हे. अलिकडे समाजमाध्यमांच्या सुळसुळाटामुळे दुसऱ्याची निर्मीती, रचना, कलाकृती आपलीच आहे असे भासवणाऱ्या वाङमयचोरट्यांचे बऱ्यापैकी फावले आहे. पण त्यांच्या चोऱ्याही बऱ्यापैकी पकडल्या जात आहेत. इतरांच्या कलाकृतीतून प्रेरणा घेणे वेगळे व त्यांची कलाकृती आपलीच आहे म्हणून दडपून नेणे वेगळे होय!
मी लिहिलेल्या ‘अनोखी व्यक्तीमत्व' या पुस्तकाची पहिली आवृत्ती जून २००४ मध्ये प्रसिध्द झाल्याला आता वीस वर्षे होऊन गेली आहेत. मला त्या काळी दै. ‘सकाळ'मधून ‘व्यक्तीमत्व' हे साप्ताहिक सदर चालवण्याची संधी मिळाली होती. पार कल्याण डोंबिवलीपासून ते नवी मुंबई, मुंबई, ठाणे, खोपोली पर्यंतच्या भागातील नामवंत, गुणवंत व्यवितमत्वांच्या मुलाखती घेऊन त्या मला या सदरातून प्रसिध्द करता आल्या होता. अशीच मुलाखतीची सदरे दै. गावकरी व दै, पुण्यनगरी याही दैनिकांतून मी लिहिली. त्यातील काही निवडक मुलाखतींचा समावेश मी या पुस्तकात केला होता व त्या पुस्तकाला दै. सकाळचे तत्कालिन संपादक श्री. संजीव लाटकर यांची प्रस्तावना लाभली होती. त्यानंतर काही वर्षांनी असेच एका व्यक्तीचे एक पुस्तक आले. पाहतो तर काय? मी घेतलेल्या अनेक मुलाखती ढापून त्या जशाच्या तशा त्या पुस्तकात सामील करण्यात आल्या होत्या. त्या माणसाची भाषाशैली निराळी, त्याला पत्रकारितेचा गंधही नाही; असे असताना त्याने प्रसिध्द केलेल्या व्यक्तींच्या माहितीपर लेखांच्या सोबतीला या ढापलेल्या मुलाखती एकदमच विसंगत वाटत होत्या. हा सरळ सरळ वाड.मय चोरीचा मामला होता. त्याचे ते पुस्तक प्रकाशित झाल्याची बातमी ज्या वर्तमानपत्रातून छापली गेली होती, त्याच्या संपादकाला पत्र लिहुन व सोबत माझ्या आधीच प्रसिध्द झालेल्या पुस्तकातील लेखांच्या झेरॉवस प्रतीही जोडुन पाठवल्या होत्या. पण त्याने माझी बाजू मांडणारे पत्र छापण्याची हिंमत दाखवली नाही.
अशा प्रकारच्या साहित्य चोरीला फार मोठा इतिहास आहे. अनेक नामांकित म्हणवणारे लेखकही बेमालूमपणे इतरांचे साहित्य चोरतात आणि खुशाल स्वतःच्या नावावर खपवतात असे अनेकदा अनुभवास येते. एखाद्याच्या साहित्यावरुन प्रेरणा घेता येते. इतर भाषांतून प्रसिध्द झालेल्या कलाकृतीला देशी अंगडे टोपडे घालून आपल्या भाषेत सजवता येते. पण त्याचा मूळ उगम काय आहे हे सांगण्याचा प्रामाणिकपणा मात्र लेखकाकडे असला पाहिजे. एका दिवंगत नामांकित लोकशाहीराने नवी मुंबईच्या एका कवीची रचना ‘मला दे, मी फेमस असल्याने ती लोकप्रिय होईल, त्याचे जे काही पैसे होतील ते मी तुला देतो' असे म्हटल्याचे त्या कवीने मला एकदा सांगितले होते. यावरुन या क्षेत्रातील चोरटेपणा, भुरटेगिरी, उचलेगिरी याचा अदमास यावा. आचार्य अत्रे यांचे ‘मोरुची मावशी' हे नाटक गाजले. त्याची प्रेरणा त्यांनी ‘सॅलिज ऑन्ट' या लेखनावरुन घेतली होती. पु.ल.देशपांडे यांच्या ‘ती फुलराणी' या नाटकामागे ‘माय फेअर लेडी' या इंग्रजी नाटकाची पार्श्वभूमी होती. ‘परिचय' हा गुलझारकृत चित्रपट खूप गाजला, ज्यातील जितेंद्र, जया भादुरी, प्राण, संजीवकुमार आणि नटखट मुलांच्या भूमिका व मुसाफिर हूँ यारो, सारे के सारे गामा को लेकर गाते चले अशी गाणी भारतीय चित्ररसिकांच्या पसंतीस उतरली. या परिचय मागील प्रेरणा इंग्रजी चित्रपट ‘दि साऊंड ऑफ म्युझिक' हा होता. ‘दे धक्का' हा मकरंद अनासपुरे, मेधा मांजरेकर, शिवाजी साटम, सिध्दार्थ जाधव अभिनित मराठी चित्रपट २००६ साली झळकलेल्या अमेरिकन चित्रपट ‘लिटल मिस सनशाईन' वर आधारीत होता. मात्र तसे सांगण्याचा प्रामाणिकपणा या मान्यवरांमध्ये होता.
हे चोरटेही याच समाजाचा भाग असतात. याच चोरट्यांवर आधारीत ‘अलिबाबा और चालीस चोर' ही कथा व त्या अनुषंगाने निघालेले चित्रपट आपण पाहिले असतील. चोर मचाए शोर, चोरी मेरा काम, चोरी चोरी, चितचोर, चोरनी, चोरी चोरी चुपके चुपके असे चोरीला जणू प्रतिष्ठा देणारेही अनेक चित्रपट हिंदीमध्ये आले आहेत. ‘देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा' हे नितांतसुंदर गाणे ज्या चित्रपटात आहे तो ‘आम्ही जातो अमुच्या गावा' (१९६८) हा चित्रपटही तीन चोरांवर आधारीत होता. पुढे त्यापासून प्रेरणा घेत विनोद मेहरा, ओम प्रकाश, आय एस जोहर, जीवन अभिनित ‘तीन चोर' (१९७३) याच नावाचा हिंदी चित्रपट आला होता. नवकल, बनावट, ड्युप्लिकेट ही गाजलेल्या, प्रसिध्द, बाजारमूल्य जास्त असणाऱ्या गोष्टींचीच होते आणि चोरीही प्रामुख्याने त्याचीच केली जाते. आपल्या महाराष्ट्रात, ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर हे अशा बनावटी, ड्युप्लिकेट मालासाठी कुप्रसिध्द आहे. पाकिस्तान्यांनी अत्याचार करुन सिंध प्रांतांतून पळवून लावलेल्या सिंधी समाजाची येथे प्रामुख्याने वस्ती आहे. या उल्हासनगरमध्ये कशाची ड्युप्लिकेट केली जाईल याचा नेम नाही. तेथील काही विद्वान त्यांनी बनवलेल्या मालावर खुशाल ‘मेड बाय यु एस ए' अशा शिवका मारीत असत. याची फोड विचारली तर ‘युएसए म्हणजे उल्हासनगर सिंधी असोसिएशन' असे सांगत असत हा किस्सा तुम्ही अनेकदा ऐकलाही असेल. ‘पारले' या नामांकित बिस्किट कंपनीचा ब्रॅण्डही त्यांनी चोरला आहे. त्याच्या स्पेलिंगमध्ये एखादे अक्षर मागे पुढे, जाडे बारीक करुन बिस्कीटाच्या पुड्यावर छापायचे आणि ग्राहकांना फसवायचे काम तेथे वर्षेनुवर्षे बिनबोभाटपणे सुरु आहे. ब्रॅण्डेड कंपनीच्या गोळ्या, बिस्किटे, चॉकलेट, पापड, लोणची, मसाले, सॉसेस, जाम्स, केवस, मिठाया, खवा, मावा, कपडे, घड्याळे, मोबाईल्स, चार्जर्स, औषधे अशा कित्येक उत्पादनांचे हातोहात ड्युप्लिकेट बनवून ते लागलीच बाजारात आणतात. ‘आपण उल्हासनगरमध्ये राहात नाही, आपल्याला त्याचा काय त्रास?' असे बोलून हा विषय संपणारा नाही. तुम्हाला प्रत्यक्ष पाहायचे असल्यास उल्हासनगर, शहाड व विठ्ठलवाडी या तीन रेल्वे स्थानकांत येणाऱ्या व जाणाऱ्या लोकल गाड्यांच्या गुड्स डब्यात असा किती माल चढवला जातो व मुंबई उपनगरे ते कर्जत, कसारा भागातील विविध ठिकाणी तो कसा उतरवला जातो ते एकदा तिथे जाऊन पाहा म्हणजे हे विष कसे सर्वदूर पसरले आहे व आपण कळत नकळत त्याचे कसे शिकार बनलो आहोत हे ध्यानात येईल.
सांप्रतकाळ हा समाजमाध्यमे अर्थात सोशल मिडियाचा आहे. त्यामुळे छापील वर्तमानपत्र जगतावर संकटाचे सावट आहे. करोना काळात ते अधिकच गहिरे झाले होते. करोना काळात अनेकांना वर्तमानपत्रे स्टॉलवरुन विकण्यास, दारोदारी पोहचवण्यास मज्जाव होता. त्या काळात वाचकांची भूक वर्तमानपत्रांच्या डिजिटल आवृत्यांनी भागवली. त्यानंतर करोना गेला; पण पूर्वीसारखे वाचक स्टॉलवर मात्र पेपर घ्यायला गेले नाहीत, त्यांच्यात प्रचंड घट झाली ती झालीच. आताच्या तंत्रस्नेही पिढीला स्टॉलवरील पेपरपेक्षा हातातल्या स्मार्टफोनवर त्या पेपरची आलेली पीडीएफ वाचायला आवडते. या समाजमाध्यमांनी चोर लोकांचे काम आणखी सोप्पे केले. समाजमाध्यमांपूर्वी अशा चोऱ्या करण्यासाठी पेपर घ्यावे लागत, ग्रंथ वाचावे लागत, वाचनालयात जाऊन विविध पुस्तकांतून उतारे चोरावे लागत. त्यांच्या झेरॉवस प्रति घेऊन ठेवाव्या लागत. पण समाजमाध्यमे, गुगल, स्मार्ट फोन यांनी हे सगळे टप्पे करण्याची गरज संपवून चोरांना मोकळे रानच करुन दिले. दोन वर्षांपूर्वी मी माझ्या फेसबुक पेजवर माझ्या दिवंगत आईविषयीचा मजकूर, फोटो टाकून अभिवादन केले होते. माझ्या भावना मी माझ्या भाषेत, माझ्या पध्दतीने व्यक्त केल्या होत्या. थोड्याच वेळात ती पोस्ट जशीच्या तशी चोरुन एका परित्यक्ता महिलेने तिच्या आईचा फोटो टाकून वापरल्याचे मला पाहायला मिळाले. मला याचा राग नाही आला...तर फार गंमत वाटली. माझी आई वेगळ्या सामाजिक, आर्थिक, पारिवारिक स्थितीतून गेली होती, तिने वेगळ्या वातावरणात आम्हाला वाढवले, आमच्यावर तिच्या पध्दतीने संस्कार केले होते. ते सारे माझ्या त्या पोस्टमध्ये उतरले होते. ते जसेच्या तसे, काना-मात्रा-वेलांटीचा फरक न करता इतर कुठली माता कसे बरे करेल?
अनेक संपादक लोकही इतरांचे अग्रलेख चोरतात आणि बऱ्याचदा जसेच्या तसे किंवा नाममात्र फेरफार करुन आपल्या वर्तमानपत्रात वापरतात. पण त्यांची ही चोरी समाजमाध्यमांमुळे पकडली जाते. मुंबईच्या एका आघाडीच्या दैनिकाच्या संपादकाने असेच एका इंग्रजी दैनिकाच्या अग्रलेखाचे मराठी भाषांतर करुन ते स्वतः संपादित करत असलेल्या दैनिकाचे संपादकीय म्हणून छापले होते. पण ही चोरी पचली नाही. एकाच वेळी शेकडो, हजारो वाचक-दर्शक समाजमाध्यमांवर सक्रीय असतात. त्यातील काहीजण तज्ञ वाचक, समीक्षक, पट्टीचे ववते, संकलक, निवृत्त संपादक, विविध पुस्तकांचे लेखकही असतात. त्यांच्या नजरेतून अशा चोऱ्या सुटणे कठीण असते. दुसऱ्याच्या पोराला आपले पोर म्हणायला गेलं की असे होणारच! त्यासाठीच चोरटे आणि भुरटे म्हणून आपला परिचय चारचौघात होण्याऐवजी आपले स्वतःचे जे काही, जसे काही, जेवढे काही असेल तेच सादर करावे किंवा ज्यापासून प्रेरणा घेऊन आपण काही केले असेल तर तसा स्पष्ट उल्लेख करण्याचा प्रामाणिकपणा दाखवावा; म्हणजे चौर्यकर्माचा आरोप तरी टाळता येईल. - राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक : दै. आपलं नवे शहर