सार्वजनिक गणेशोत्सवामागील उद्देश लोप पावत आहे का ?

‘धर्मजागृती, राष्ट्रजागृती आणि पाश्चिमात्य संस्कृतीच्या आक्रमणाचा विरोध, हे सार्वजनिक गणेशोत्सव चालू करण्यामागील मुख्य उद्देश होत.' असे लोकमान्य टिळकांनी नमूद केले होते. आता मनात प्रश्न येतो की, हे उद्देश आज कालबाह्य झाले आहेत का ? सध्या किती जणांमध्ये या उद्देशांचेे भान आहे ? सध्या किती ठिकाणी या उद्देशांना अनुरूप ठरेल, अशा प्रकारे हा उत्सव साजरा केला जात आहे ? ज्या प्रकारे तो साजरा केला जात आहे, त्यात काही चुकत आहे का ? जे चुकत आहे, त्यामागील कारणे कोणती आणि त्यात सुधारणा कशी करता येईल ? हे आजचे ज्वलंत प्रश्न आहेत. आज अनेक ठिकाणी गणेशोत्सवासाठी वर्गणी काढताना जबरदस्ती केली जाते.

सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे केवळ श्री गणेशाची मूर्ती आणून ती एखाद्या सार्वजनिक स्थळी स्थापन करणे, एवढेच डोळ्यांसमोर न येता त्या समवेत त्याची सजावट, त्या निमित्ताने होणारे सार्वजनिक कार्यक्रम आदी अनेक गोष्टी आपसूकच नजरेसमोर येतात. आजमितीला सार्वजनिक गणेशोत्सव केवळ मुंबई, ठाणे आणि पुणेपुरता मय्राादित राहिला नसून राज्यातील सर्वात मोठा उत्सव बनला आहे. देशातील अनेक राज्यांतही तो उत्साहाने साजरा होऊ लागला आहे. यानिमित्ताने राज्याच्या अर्थकारणात दरवर्षी मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. शहरासारख्या ठिकाणी या दिवसांत एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविकांची वर्दळ असते की कधी रात्र सुरु झाली आणि कधी संपली याचा पत्ताही लागत नाही. शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाची मजा लुटण्यासाठी देश विदेशातून भाविक आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात शहरांत दाखल होतात. देशाच्या सीमा ओलांडून साता समुद्रापार ज्या ज्या ठिकाणी मराठी माणूस वसला आहे त्या त्या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव आज साजरा होऊ लागला  आहे. मुळात ‘कुटुंबातील मंडळींनी एकत्र येऊन साजरा करायचा एक सण असलेली श्री गणेशचतुर्थी सार्वजनिक उत्सव कशी बनली, हे समजून घेऊया.

सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते म्हणून लोकमान्य टिळक यांना ओळखले जाते. एकदा लोकमान्य टिळकांनी ह.भ.प. श्रीपतीबुवा भिंगारकर यांना विचारले, ‘मी स्वराज्यप्राप्तीसाठी प्रयत्न करीत आहे; पण ईश्वरी साहाय्यावाचून कोणतेही कार्य शेवटास जात नाही. तेव्हा या स्वराज्याच्या कार्याचा राष्ट्रभर प्रसार होण्यासाठी कोणाची आराधना करावी?' बुवा म्हणाले, ‘तुम्ही श्री गणपतीची पार्थिव पूजा चालू करा, म्हणजे तुमचे सर्व हेतू सिद्धीस जातील.' त्यावर लोकमान्य टिळक म्हणाले, ‘मी एकट्याने अशी पूजा करून भागणार नाही. राष्ट्रभर ती सर्वांनी केली पाहिजे. आपल्याकडे भाद्रपद शुद्ध चतुर्थीस घरोघर पार्थिव गणपतीची पूजा करायचा पूर्वीचा प्रघात आहेच. तो आता राष्ट्रभर चालू करूया.' तेव्हापासून लोकमान्यांच्या प्रेरणेने सार्वजनिक गणेशोत्सव चालू झाला ! यावरून आपल्याला ‘सार्वजनिक गणेशोत्सव' चालू होण्यामागील मूळ प्रेरणा राष्ट्रहित आणि ईश्वरभक्ती ही आहे, हे स्पष्ट होते.

 ‘सार्वजनिक गणेशोत्सव चालू करण्यामागील आपले उद्देश कोणते आहेत, हे लोकमान्य टिळकांनी तेव्हाच एका भाषणात स्पष्ट केले. वर्ष १८९४ मध्ये झालेल्या त्यांच्या भाषणाचा सार म्हणजे ‘धर्मजागृती, राष्ट्रजागृती आणि पाश्चिमात्य संस्कृतीच्या आक्रमणाचा विरोध, हे सार्वजनिक गणेशोत्सव चालू करण्यामागील मुख्य उद्देश होत.'  आता मनात प्रश्न येतो की, हे उद्देश आज कालबाह्य झाले आहेत का ? सध्या किती जणांमध्ये या उद्देशांचेे भान आहे ? सध्या किती ठिकाणी या उद्देशांना अनुरूप ठरेल, अशा प्रकारे हा उत्सव साजरा केला जात आहे ? ज्या प्रकारे तो साजरा केला जात आहे, त्यात काही चुकत आहे का ? जे चुकत आहे, त्यामागील कारणे कोणती आणि त्यात सुधारणा कशी करता येईल ? हे आजचे ज्वलंत प्रश्न आहेत. आज अनेक ठिकाणी गणेशोत्सवासाठी वर्गणी काढताना जबरदस्ती केली जाते. काहींची आर्थिक क्षमता नसताना समाजात इतरांसोबत राहायचे म्हणून त्यांना पदरमोड करून वर्गणी द्यावी लागते. काही ठिकाणी मंडळातील कार्यकर्ते हा समजूतदारपणा दाखवतात; मात्र काही ठिकाणी नागरिकांना वर्गणी देण्यासाठी त्रास दिला जातो हे नाकारता येणार नाही. मुळात हिंदूंमध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मूळ उद्देशालाच आज हरताळ फासला जात आहे. वर्षागणिक निरनिराळी मंडळे स्थापन होऊ लागली आहे. शहरांत १००मीटरच्या परिसरातही २-३ मंडळे स्थापन झालेली पाहायला मिळतात.

 जवळजवळच्या मंडळांमध्ये सजावट, गणेशमूर्तीची उंची, उत्सवानिमित्त ठेवण्यात आलेले कार्यक्रम, आगमन-विसर्जन मिरवणूका अशा वेगवेगळ्या कारणांमुळे भांडणे होताना पाहायला मिळतात. ज्या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमते अशा मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सवादरम्यान भलताच उत्साह संचारलेला असतो. या उत्साहाच्या भरात आलेल्या भाविकांशी वाद घालणे, त्यांना शिवीगाळ करणे असले प्रकार या काळात हल्ली बातम्यांमध्येही पाहायला मिळू लागले आहेत. भाविकांना आकर्षित करण्यासाठी मंडपात उंच गणेशमूर्ती बसवली जाते; मात्र अनंत चतुर्दशीला तिचे पूर्ण विसर्जन न करताच कार्यकर्त्यांकडून पळ काढला जातो. ज्या गणेशमूर्तीची १० दिवस मनोभावे पूजा केली जाते, त्याच मूर्तीची पुढे अवहेलना होते. सजावट, विद्युत रोषणाई यांवर अमर्याद खर्च केला जातो. मिरवणुकांमध्ये मंगलवाद्ये वाजवण्याऐवजी अथवा सात्विक गाणी किंवा भजने लावण्याऐवजी जीवघेणा डीजे लावून त्यावर चित्रविचित्र अंगविक्षेप करत नृत्य केले जाते. आगमन विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्यांकडून काही ठिकाणी मद्यपान केले जाते. सार्वजनिक गणेशोत्सवाचे निमित्त करून काही ठिकाणी गणेश मंडपातच रात्री जुगाराचा डाव बसतो. या दिवसांत विधायक आणि समाजोपयोगी प्रबोधनात्मक कार्यक्रम ठेवण्याऐवजी काही ठिकाणी लावणी अथवा चित्रपट संगीताचे कार्यक्रम ठेवले जातात. या कालावधीत गणेश मंडपातील वातावरण सात्विक राहण्यासाठी सुमधुर भजने अथवा गणरायाची गाणी, स्तोत्र लावण्याऐवजी कर्णकर्कश आवाजात चित्रपट गीते लावली जातात. आरत्या म्हणताना त्या मंजुळ आवाजात न म्हणतात आरडाओरड करत म्हटल्या जातात. श्रीच्या मंडपात स्वच्छता ठेवली जात नाही.

श्री गणेशाच्या हा उत्सव सार्वजनिक असला तरी तो धार्मिक उत्सव आहे. राष्ट्रकार्याला धार्मिक अधिष्ठान असावे आणि त्यातून राष्ट्रजागृतीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी हा उत्सव सुरु केला. आजमितीला हा उद्देश लोप पावून उत्सवात अपप्रवृत्ती शिरल्या आहेत. अर्थात वर नमूद केलेले प्रकार हे काही ठिकाणीच पाहायला मिळत असले तरी ते आपल्या धार्मिक उत्सवाला गालबोट लावणारे असल्याने ते थांबायला हवेत. आज हिंदूंमध्ये धर्मशिक्षणाचा अभाव असल्याने उत्साहाच्या भरात ते काय करत आहेत हे त्यांच्याच लक्षात येत नाही. आपल्या उत्सवात शिरलेल्या या चुकीच्या प्रथांना उखडून उत्सव सात्विक आणि लोकहिताचा व्हावा यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आज नितांत आवश्यकता आहे. - जगन घाणेकर 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

कोकणच्या नैसर्गिक परंपरेचे प्रतीक : माटी