दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
राखी
सूर्यनारायणाने धरणी मातेचा निरोप घेतला आणि हळूहळू सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले. आईसाठी औषधे आणायला नेहा दुतर्फा दाट झाडी असलेल्या निर्मनुष्य शॅार्टकटने जात होती. एक तरुण तिचा पाठलाग करत होता, तिथेच थांब, पुढे जाऊ नकोस म्हणून ओरडून सांगत होता. नेहा खुप घाबरली होती, शक्य तितक्या वेगाने पळत होती. नेहाला धाप लागली होती. पाय मुरगळल्याने तीचा वेग मंदावला.
पाठलाग करणाऱ्याने वेग वाढवला आणि झडप घालून नेहाला घट्ट पकडले. नेहाने स्वतःची सुटका करून घ्यायचा निष्फळ प्रयत्न केला आणि पुढच्याच क्षणी भयानक मोठा आवाज झाला, संपूर्ण धरती हादरली. घाबरून नेहा त्या तरुणाला बिलगली. पाठलाग नेहाचा गैरफायदा घेण्यासाठी नव्हता; तर पेरलेल्या सुरुंगांपासुन नेहाचा जीव वाचवण्यासाठी होता. नेहा मनोमनी शरमली.
‘ताई, इतक्या रात्री या निर्मनुष्य रस्त्यावरून तू एकटी कुठे निघालीस?' त्या तरुणाने विचारले. ‘आईसाठी औषधे आणायची आहेत. मुख्य रस्ता क्रॉस केला की समोरच मेडिकल स्टोअर्स आहे म्हणून मी या शॉर्टकटने निघाले,' नेहाने सांगितले. ‘तू मला प्रिस्क्रीप्शन दे मी पटकन औषधे घेऊन येतो आणि मी येईपर्यंत इथेच थांब.' त्या तरुणाने हुकुमतीच्या सुरात सांगितले. ‘दादा डॉक्टरांनी पाच दिवसांची औषधे सांगितली आहेत; परंतु माझ्याकडे फक्त तीनशे रुपये आहेत; कदाचित यात फक्त दोन किंवा तीन दिवसांचीच औषधे मिळतील. ३०० रूपयांत जेवढी औषधे मिळतील तेवढीच प्लीज आण.' नेहाने सांगितले.
साधारणतः दहा मिनिटांत तो तरुण औषधे घेऊन आला. ‘दादा किती दिवसांची औषधे मिळालीत?' नेहाने आतुरतेने विचारले. ‘सर्व औषधे मिळालीत आणि काही टॉनिकदेखील मी आणले आहे ते देखील आईंना दे म्हणजे त्यांना लवकर बरे वाटेल,' त्या तरुणांने सांगितले.
‘ताई, मी तुला घरी सोडतो, चल' असे म्हणत तो तरुण नेहाबरोबर तीच्या घरी पोहोचला. नेहाने स्वयंपाक खोलीत जाऊन औषधांची किंमत बघितली. जवळजवळ ११०० रुपयांची औषधे होती. ‘दादा मी पुढच्या महिन्यात तुझे ८०० रूपये परत करीन, चालेल का?' नेहाने विचारले. ‘ताई बहिणीकडून का कोणी पैसे घेतो,' तो तरूण उत्तरला.
‘दादा तू मला इतकी मदत केलीस मी तुला तुझे नांव देखील विचारले नाही.' ‘ताई आधी तुझे नांव सांग.' नेहा हे नांव ऐकून तो पटकन म्हणाला ‘किती गोड नांव आहे. त्याने नेहाला स्वतःचे कार्ड दिले त्यावर लिहिले होते कॅप्टन राज, इंडियन आर्मी.
‘राज माझी इच्छा आहे तू उद्या माझ्या घरी जेवायला, ये. मला आणि आईला खूप बरे वाटेल.' ‘नेहा ताई, मला उद्या सकाळीच बॉर्डरवर जायला निघायचे आहे; पण एक कर माझ्यासाठी छानसा चहा कर.' घरात दूध आणि साखर नव्हते, नेहाला काय करावे ते सुचत नव्हते. ‘बिन साखरेचा, बिन दुधाचा आणि अगदी कमी पावडर टाकलेला चहा कर ताई,' राजने सांगितले. नेहाने केलेला चहा राज मोठ्या आवडीने प्यायला.
‘राज, मला समजत नाही तुझे उपकार मी कसे परत फेडू?' ‘नेहा ताई, एक काम कर, दरवर्षी मला राखी पाठवत जा. साधारणतः राखी पौर्णिमेच्या आधी पंधरा दिवस. आमचे पोस्टिंग बदलले तरी या कार्डवरील पत्त्यावर पाठवलेली राखी आमच्या नवीन ॲड्रेसवर पाठवली जाते.' ‘नक्की पाठविन,' नेहा गहिवरून म्हणाली.
‘तुझी राखी मला मिळाली किंवा मिळाली नाही तरी राखी पौर्णिमेच्या पुढच्या आठवड्यात मी तुला पत्र पाठवत जाईन. ज्या वर्षी तुला माझे पत्र येणार नाही त्या वर्षी समज तुझा हा दादा या जगात नाही.' नेहाच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्यात. नेहाला जवळ घेत राज म्हणाला, ‘नेहा ताई, आम्हा आर्मीच्या लोकांचे असेच असते.'
‘नेहा ताई मी जातो,' म्हणत राज जायला निघाला. तेवढ्यात नेहाने राजला आवाज दिला. ‘दादा, अरे जातो म्हणू नकोस ना, येतो असे म्हण. राज तुला खूप उदंड आयुष्य लाभो आणि परमेश्वर माझे आयुष्यदेखील...' राजने नेहाच्या ओठांवर बोट ठेवून नेहाला पुढचे शब्द बोलू दिले नाहीत. ‘नेहा ताई येतो मी' असे म्हणत राज झपझप निघून गेला मागे किंचितही वळून न पाहता.
स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता तुम्हा आम्हा सर्वांचे डोळ्यात तेल घालून रक्षण करणाऱ्या इंडियन आर्मीला शतशः प्रणाम. -दिलीप कजगांवकर