दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
वृत्तपत्र लेखक दिन
दैनिक नवशक्ती वृत्तपत्राच्या वतीने वृत्तपत्र लेखक चळवळ अमृत महोत्सव वर्ष सांगता निमित्त वृत्तपत्र लेखकांचे संमेलन शनिवार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी, सायंकाळी ३ः३० वाजता, फ्री प्रेस हाऊस, नरिमन पॉइंट, मुंबई येथे बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी, ज्येष्ठ लेखक, पत्रकार, समीक्षक, शिक्षक श्री विनय हर्डीकर या मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानिमित्त खास लेख
वृतपत्र लेखन एक कला एक छंद
पत्रलेखनाशी प्रत्येकाचा संबंध शालेय जीवनापासूनच येतो. आईला पत्र, बाबांना पत्र इत्यादी विषयांवर पत्रलेखनाची सुरवात होते. त्यानंतर प्रियकर, प्रेयसी यांना पत्रं लिहिली जातात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी अर्ज लिहिले जातात, तोसुध्दा पत्राचाच एक प्रकार आहे. यावरून पत्रलेखनाचा आपल्या जीवनाशी किती घनिष्ठ संबंध आहे हे दिसून येते. पत्रलेखन सर्वानाच जमते असे नाही. कारण ती एक जशी कला आहे तसेच शास्त्र आहे.
अनेक जागृत वाचक आपली मतं , आपले विचार निरनिराळ्या दैनिकांत मांडत असतात. त्यांना वृतपत्रलेखक म्हणतात. बातमीदार अथवा पत्रकार बनणे सर्वांनाच शक्य नाही; परंतु पत्रलेखनाद्वारे आपली मतं वृतपत्रात मांडणे सर्वांनाच शक्य आहे.
जवळजवळ सर्व वृतपत्रात संपादकीयाच्या बाजूला वाचकांच्या पत्रव्यवहारासाठी खास जागा राखून ठेवलेली असते.त्यात वाचक आपली मते मांडू शकतात.
पत्राचे स्वरूप
१ ) स्थानिक तक्रारी - काही वृतपत्रलेखक कचऱ्याचे ढीग, तुंबलेली गटारे, एस.टी. संदर्भातील तक्रारी इत्यादी तक्रारींबाबत सातत्याने पत्रलेखन करत असतात.
२ ) सूचना करणारी - काही वृत्तपत्र लेखक धोकादायक वळणे, धोकादायक इमारती, स्पीड ब्रेकर इत्यादी बाबत सूचना करणारी पत्रं पाठवतात.
३ ) संपादकांची खुशामत करणारी पत्र - काही पत्रलेखक संपादकांच्या अग्रलेखाबाबत स्तुती करणारी पत्र लिहितात; अर्थात सर्व संपादकांना अशी पत्रं आवडत नाहीत. वाचकही अशी पत्रं वाचत नाहीत.
४ ) प्रतिक्रियात्मक पत्र - आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय अथवा स्थानिक धोरणाबाबत जागृत वृतपत्रलेखक त्वरित आपली प्रतिक्रिया देतात. त्याचप्रमाणे शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक, शासकीय प्रश्नांबाबत अनेक अभ्यासू वृतपत्रलेखक आपल्या प्रतिक्रिया पत्राद्वारे देत असतात.
वृत्तपत्र लेखकांसाठी आचारसंहिता
सध्या पत्र पोस्टाने पाठवण्यापेक्षा ईमेलद्वारे पाठवले जाते. हे कमी खर्चाचे तर आहेच; परंतु काही सेकंदात पोहोचते. सध्या अनेकांकडे अत्याधुनिक मोबाईल असल्याने अनेक जण मोबाईलद्वारे पत्र टाईप करून पाठवत आहेत. त्यामुळे पूर्वीपेक्षा सध्या दैनिकांकडे पत्रांचा ओघ वाढला आहे. मय्राादित जागेत जास्तीत जास्त पत्र प्रकाशित करायची असतील तर संबंधित संपादक खालील मुद्यांवर पत्राची निवड करतात.
१ ) पत्र कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय देणारे असावे. शब्दांचा फापटपसारा टाळावा.
२ ) मेल करताना विषय या ओळीत वाचकांचा पत्रव्यवहार अथवा त्या दैनिकाने ठरवलेले नांव टाकावे. उदा.जनमनाचा कानोसा, लोकमानस, वृत्तमानस इत्यादी. असे केल्याने पत्र योग्य त्या विभागाकडे जाते.
३ ) पत्राला सुयोग्य शिर्षक द्यावे. उदाहरणार्थ अयोग्य अथवा धोकादायक स्पीडब्रेकर बद्दल पत्र असेल तर त्याला स्पीडब्रेकर की बोनब्रेकर.
४ ) पत्राच्या शेवटी आपला पत्ता व मोबाईल नंबर द्यावा. पत्र निनावी पाठवू नये.
५ ) पत्र योग्य की अयोग्य आहे हे ठरवण्याचा तसेच छापण्याचा अधिकार संपादकांचा असतो. त्यामुळे पत्र छापून न आल्यास त्यांना फोन करू नये अथवा स्मरणपत्र पाठवू नये.
६ ) काही जण एका दैनिकातील पत्र दुसऱ्या दैनिकांत स्वतःच्या नावाने पाठवतात हे पत्रचौर्य आहे. ते योग्य नाही.
७ ) नुसत्या तक्रारी करण्यापेक्षा पर्याय सुचवावेत. रेल्वेच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत पूर्वी भाजीपाला पिकवला जात असे; परंतु तो बाजूला असलेल्या सांडपाण्याने धुतला जात असे. त्यामुळे तो आरोग्यास अपायकारक आहे. त्याऐवजी फूलबाग करा अशी सूचना आल्यामुळे रेल्वेने त्वरित त्याची दखल घेतली.
८ ) पत्र छापून आल्यानंतर ती सूचना अथवा तक्रार संबंधित खात्याकडे पाठवावी. प्रत्येक जिल्ह्यात माहिती अधिकारी असतात ते शक्यतो अशा बातम्या अथवा पत्र संबंधित खात्याकडे पाठवतात. जर पत्रलेखकांनी एक प्रत त्यांना पाठवली तर त्यांचे काम सोपे होईल.
वृतपत्र लेखकांनी अखंड वाचन केले व मुद्देसूद लेखन केले तर त्यांची जास्तीत जास्त पत्र प्रकाशित होतील. तसेच त्यांनी केलेल्या सुचना व तक्रारी यांचा पाठपुरावा केला तर त्यांना मानसन्मान प्राप्त होईल. हा छंद कोणत्याही वेळात सुरू करता येईल. शक्यतो ज्येष्ठ नागरिकांनी या छंदाद्वारे समाजसेवा करावी ही अपेक्षा. -दिलीप प्रभाकर गडकरी