दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
मुशाफिरी
आयुष्य हे अनेक गुढ, विस्मयकारी, धक्कादायक घटनांनी भरलेले असते हेच खरे. पुढच्या क्षणी काय घडेल याची शाश्वती नाही, कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल याचा नेम नाही इतके बेभरवशाचे तुमचे आमचे जीवन होऊन बसले आहे, ही गोष्ट कितीही नकोशी वाटली तरी तेच वास्तव आहे, हे स्विकारावे लागतेच.
याच आठवड्याच्या प्रारंभाची गोष्ट. आदल्याच दिवशी वांगणी येथील देशमुख उद्यान कृषी पर्यटन केंद्राला भेट देताना तिथे मित्र मंडळींसोबत मौज मस्ती करुन दमून आल्याने सकाळी उठायला उशिर झाला. उठून बाथरुम मध्ये जात तोंडात टूथपेस्ट, टूथब्रश काेंबल्यावर मोबाईलवर बेल वाजली. स्क्रीनवर नाव झळकल्याने फोन कल्याणहुन एका मैत्रीणीचा होता ते लक्षात येत होते. ही फार ऑकवर्ड वेळ असते. ‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही' च्या चालीवर ‘टाळता येत नाही आणि बोलताही येत नाही' अशी ही घडी. मी फोन कट केला. म्हटलं.. ती समजून जाईल आणि नंतर काही वेळाने फोन करील. पण लगेच दुसऱ्यांदाही तिचाच कॉल आला. आठ दहा वेळा मी बेल वाजू दिली. वाटले आपोआप कट होईल. पण तसे झाले नाही. शेवटी मीच कॉल कट केला. आता काय करायचे? मग म्हटले स्मार्ट फोन हातात असताना तोंडाची काय गरज? मी तिच्या व्हाट्स अपवर मेसेज पाठवला..‘बाथरुम मध्ये आहे. थोड्या वेळाने कॉल करतो.' पण तिने तो मेसेज वाचल्याची निळी टिक मार्क काही येईना. पुन्हा तिचा कॉल आलाच. यावेळी मात्र मी सरळ तोंड मोकळे केले आणि तो कॉल घेतलाच. ती म्हणाली.. ‘अरे राजेंद्रा, आपल्या मैत्रिणीचा मुलगा शिर्डीहुन येताना ट्रेनमधून पडल्याने त्याचा मृत्यु झाला आहे. त्याची बॉडी कल्याणला दुपारपर्यंत येईल. तू जरा आपल्या साऱ्या वर्गमित्रांच्या माहितीसाठी आपल्या व्हाटस् अप ग्रुपवर तसा मेसेज पाठव आणि काहीजणांशी बोलून त्यांना त्या मैत्रीणीच्या घरी जायला सांग.' हे ऐकून मी हादरुन गेलो. दिवसाच्या आणि आठवड्याच्या सुरुवातीलाच इतकी दुःखद बातमी? तीही मी आदल्याच दिवशी मौजमस्ती करुन आल्याचा फील माझ्या अंगभर असतानाच! या बातमीने क्षणभर सुन्न व्हायला झाले.
खरे तर आम्ही मित्र मैत्रीणी आता वयाच्या अशा टप्प्यावर आहोत की आमच्यासोबत एस एस सी झालेले अनेकजण या पूर्वीच देवाघरी गेले आहेत. अनेकांच्या आई-वडिलांचेही निधन झाले आहे. काहीजणांचे आयुष्याचे जोडीदार, भाऊ-बहिणी यांनीही हे जग सोडले आहे. अनेकजण आजी-आजोबा झाले आहेत. बरेच जण विहीत शासकीय वयोमर्यादेनुसार सेवानिवृत्त होऊन निवांतपणे जीवनाचा उत्तरार्ध व्यतित करीत आहेत. काहींची मुले परदेशात शिकायला गेली आहेत. पण तरीही कुणाच्याही आयुष्यातून घरातले कुणी असे कायमचे निघून देवाघरी जाणे म्हणजे काय व्यथा असते ही ज्याची त्यालाच ठाऊक! त्यातही ज्याला/जिला आपण जन्म दिला, प्रेमाने न्हाऊ माखू घातले, लाडाने वाढवले तो/ती जर असे अपघाती, आकस्मिक, दुर्घटनेत आपले प्राण गमावीत असेल तर त्या जन्मदात्यांच्या वेदना काय असतात, ते शब्दांत मांडणे कठीण. फोन करणाऱ्या मैत्रीणीने सांगितल्याप्रमाणे मी झटपट तसे केले. काही मित्रांशी बोलून त्यांना त्या माऊलीकडे जायचे सुचवले.
रात्री अकरा-बारा नंतर किंवा पहाटे पाच, सहा, सात वाजण्याच्या सुमारास (आधी घरच्या लॅण्ड लाईनची आणि आता) मोबाईलची बेल वाजली की मला धडकीच भरते. याला कारणही तसेच आहे. अशा अवेळी येणारे कॉल्स हे हमखास मृत्यूची खबर देणारे असतात असा माझा अनुभव आहे. जेंव्हा मी कल्याण पूर्वेच्या खेड्यात राहात होतो, आमच्याकडे लॅण्डलाईनही नव्हता त्या काळात अशी दुःखद बातमी कळवण्यासाठी गावोगावी माणसे सायकलवरुन धाडली जात असत. ही माणसे दारातूनच अशी शोकाची, दुःखाची, मन विदीर्ण करणारी खबर देऊन पुढच्या प्रवासाला निघत. कारण अनेक ठिकाणी कळवण्याची त्यांच्यावर जबाबदारी असे. १९८६ सालच्या ऑगस्ट महिन्यात माझ्या मोठ्या बहीणीच्या यजमानांचे उल्हास नदीच्या पुरात वाहून गेल्याने निधन झाले त्याहीवेळी अशीच एक व्यक्ती सकाळी सकाळी दारात निरोप देऊन गेली असल्याचे मला स्पष्टपणे स्मरते. २०१० साली मी वैष्णौदेवी येथून दर्शन घेऊन तो पर्वत उतरत असताना मोबाईलवर कॉल आला की माझ्या एका आतेभावाचे हृदयविकाराच्या धववयाने अकाली निधन झाले आहे म्हणून. हा प्रकारच काेंडी करणारा असतो. आपण तेवढ्या लांबून अंत्यविधीसाठी पोहचू शकत नसल्याची रुखरुख मनाला कुरतडून टाकते. अलिकडच्या काळात असे झाले आहे की काका, मामा, मावशी, आत्या अशी नाती विरळ होत चालली आहेत. अनेक घरांमध्ये ‘वी टू अवर्स टू' किंवा ‘वी टू अवर्स वन' किंवा ‘डिंक' म्हणजे ‘डबल इन्कम नो किड' (म्हणजे दोघेही कमावते..पण मूलबाळ नको) अशा मानसिकतेचे लोक वाढत आहेत. त्यामुळे बऱ्याचदा भावाला बहीण नसते आणि बहीणीला भाऊ नसतो. चुलत, मावस, आत्ये, मामे भावांशी-बहिणींशी अनेकांचे संबंध नीट असतातच असे नाही. ठाणे, भिवंडी, नवी मुंबई, उरण, पनवेल, पेण, अलिबाग भागातील महाप्रकल्प, त्यासाठी संपादित केल्या गेलेल्या जमिनी, साडेबारा टक्के अथवा त्यासारखे लाभ यामुळे अनेक सख्ख्या भावाबहिणींत वितुष्ट आल्याचे वातावरण आहे. त्यामुळे लग्न,साखरपुडे, मुत्यू सारखे प्रसंग सोडल्यास कुणी कुणाकडे फारसे जात-येत नाहीत. त्या नात्यांची जागा आता मोबाईलने व मित्रपरिवाराने घेतली असावी.
२०१३ साली फेब्रुवारी महिन्यात माझे वडील आजारी होते. मी बाथरूममध्ये असतानाच पत्नीने बाथरुमच्या दरवाजावर थाप मारत ‘अहो लवकर बाहेर या..बाबा बघा कसे करताहेत' म्हणून आवाज दिला. मी बाहेर येईपर्यंत माझ्या वडीलांनी त्यांच्या सूनेच्या हातावरच मान टाकून प्राण सोडला होता. तेंव्हापासून मी बाथरुममध्ये असताना दारावर थाप पडली की मला धडकीच भरते. २०२० च्या सुमारास माझ्या पत्नीचा मोठा भाऊ नवी मुंबईत महापे येथे एका रस्ता अपघातात जखमी झाला. त्याच्यावर फोर्टीज इस्पितळात बरेच दिवस उपचार सुरु होते. पण शेवटी काळाने झडप घातलीच आणि त्याने एका भल्या पहाटे प्राण सोडला. त्याचीही खबर माझ्या मोबाईलवर पहाटेच कॉल करुन दिली गेली आणि शेजारीच पत्नी असल्याने तिनेही ती ऐकली. आपला भाऊ अकाली गेल्याचे दुःख तिला आवरणे जड गेले आणि तिला सावरणे मला जड गेले. अशी घडी आपल्या मनःशांतीची कसोटी पाहणारी असते. पत्रकारिता क्षेत्रात असल्याने आम्हा माध्यमकर्मींना अशा अनेक कडू गोड अनुभवांना सामोरे जात वृत्तांकन करावे लागत असते. एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या निधनाची बातमी करताना माध्यमकर्मी निर्लेप राहु शकतील कदाचित; पण तीच व्यक्ती पत्रकाराची नातेवाईक, परिचित, मित्रपरिवारातील असल्यास त्या गोष्टीचे वार्तांकन करताना मनावर एक वेगळे दडपण असते, ताण असतो. गेली एकोणतीस वर्षे पत्रकारिता क्षेत्रात व्यस्त असताना मी स्वतः अशा अनेक घटनांना सामोरे गेलो आहे. पत्रकार संघटनेचा कार्यक्रम वाशीच्या साहित्य मंदिर येथे सुरु असतानाच प्रकाश गोळे या पत्रकाराला आकडी आली, हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचे प्राणोत्क्रमण झाले. ही गोष्ट १९९६ सालची. रमजान सय्यद व प्रशांत बोले या नवी मुंबईतील पत्रकारांचा बेलापूर येथे अपघाती मृत्यू झाला, भाई भोसले या पत्रकाराचे ऐन पन्नाशीत हृदयविकाराने निधन झाले. ज्येष्ठ पत्रकार अशोक जालनावाला यांचे आजारान्ती व वयोमानपरत्वे निधन झाले. तर बालाजी सोनार, गोपीचंद मढवी, दिलीप सोनकांबळे हे पत्रकार जीवनाची अर्धी वाटचाल टाकून निघून गेले. यंदाच जीतूभाई पाढ या ज्येष्ठ पत्रकाराने आमचा निरोप घेतला. मुंबईत पत्रकार जयराम सावंत, प्रेमचंद शर्मा, जगदीश औरंगाबादकर, दीनानाथ घारपुरे, आदिंनी असाच आमचा हात अर्ध्या वाटेतच सोडला. अलिकडे अशा वेळी आपल्याला वैयक्तीक निरोप मिळतोच असे नाही. फेसबुक किंवा व्हाट्सअपवर पोस्टवरुन अशी धक्कादायक वार्ता वाचायला/पाहायला मिळते.
याच ऑगस्ट महिन्यात नवी मुंबईतील एक प्रायव्हेट डिटेक्टीव्ह असलेले व वरिष्ठ शिवसैनिक, सावरकरभक्त श्री विष्णू गवळी यांच्याच फेसबुक पेजवर त्यांचेच दुःखद निधन झाल्याची पोस्ट वाचून मी चक्रावलो. काहींनी चटाचट भावपूर्ण श्रध्दांजली वगैरे वाहुन टाकली. काहींनी आश्चर्य वाटल्याच्या भावना त्याच पोस्टखाली कमेंट बॉक्समध्ये व्यवत केल्या. पनवेलच्या खांदा कॉलनी येथे वास्तव्य करणारे विष्णू गवळी हे विविध नागरी प्रश्नांवर प्रशासनाकडे पत्रव्यवहार करुन पाठपुरावा करीत असत. खासगी गुप्तहेर असलेल्या विष्णू गवळी यांना त्यांच्याच पत्नीने आपल्या प्रियकराच्या आधारे मारले अशा आशयाच्या बातम्या त्यानंतरच्या काळात झळकल्या. गवळी यांना पत्नीबाबत काही माहिती झाली होती, त्यातून त्यांच्यात खटके उडत वगैरे वगैरे तपशील नंतर बाहेर आला. पण एका खासगी गुप्तहेराचा मृत्युही अशा प्रकारे एका कारस्थानामार्फत घडवून आणला जाऊ शकतो हे वाचून मात्र धडकीच भरली. आयुष्य हे अशा अनेक गुढ, विस्मयकारी, धक्कादायक घटनांनी भरलेले असते हेच खरे. पुढच्या क्षणी काय घडेल याची शाश्वती नाही, कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल याचा नेम नाही इतके बेभरवशाचे तुमचे आमचे जीवन होऊन बसले आहे, ही गोष्ट कितीही नकोशी वाटली तरी तेच वास्तव आहे, हे स्विकारावे लागतेच. -राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर