मोकाट सुटलेल्या विकृती

देशात दररोज महिला, मुलींवर अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत, निष्पाप चिमुकल्या विकृत लोकांच्या शिकार बनत आहेत. बदलापूर येथे घडलेली घटना ह्या विकृतीचा अक्षरशः कळस आहे. चार पाच वर्षांच्या मुलीही ह्या विकृतींच्या अत्याचाराला बळी पडणार असतील तर समाज मुलींसाठी सुरक्षित राहिला नाही असेच म्हणावे लागेल. महिला, किशोरवयीन मुली अत्याचाराला प्रतिकार करू शकतील मात्र चिमुकल्यांचे काय?

 समाजात अशा विकृती ओळखणेही कठीण आहे. कुणाच्या मनात काय भावना चाळवल्या जातील याचा अंदाज बांधणे ओळखीच्या, बाजूच्या, कुटुंबातील, सहकारी लोकांनाही शक्य नाही. त्यामुळे बरीचशी प्रकरणे ओळखीतल्या लोकांकडूनच झाली असल्याचे समोर आले आहे. वास्तविक या विकृतीचा अंत मुळापासून केला गेला पाहीजे. एकतर व्यापक प्रबोधन आवश्यक आहे अन्यथा कायद्याच्या धाकाने तरी ह्या विकृतांवर वचक ठेवणे बऱ्याच अंशी शक्य होईल. वासनांधतेपुढे सामाजिक संवेदनशीलता नष्ट होऊ पाहत आहे. ती प्रत्येकाच्या मनात जागवण्यासाठी मोठे सामाजिक प्रबोधन व परिवर्तन आवश्यक आहे. यासाठी विचारवंत, लोकप्रतिनिधी, कीर्तनकार, प्रवचनकार, सामाजिक संस्था कार्यकर्ते व प्रसारमाध्यमे मोठा हातभार लावू शकतात. जागोजागी, सार्वजनीक ठिकाणांवर ह्या विषयावर लोकांना जागृत केले तर एकतर असे कृत्य करणाऱ्या प्रवृत्ती नामोहरम होतील व आजूबाजूला अशा घटना निदर्शनास आल्यास त्याचा मोठा प्रतिकार होईल.

कायद्याचा धाकच राहिलेला नसल्यानेदेखील ह्या विकृतींची हिंमत बळावत आहे. महिलांशी छेडछाड, असभ्य वर्तन, अत्याचार, अनैतिक कृत्ये केल्याने होणाऱ्या परिणामांची जाणीवच नसल्याने ह्या विकृती मोकाट सुटल्यात. यासाठी कायदेविषयक प्रबोधन समाजात आवश्यक आहे. दाखल होणारे गुन्हे, कडक शिक्षा, गुन्ह्यांमुळे तरुणांचे करिअर व आयुष्य उध्वस्त होणे याबाबत समाजात जागृती केली तर कायद्याचा वचक काही प्रमाणात राहील. अशा प्रकरणांत गुन्हेगारांना तातडीने देहदंडाची शिक्षा ठोठावायला हवी. मात्र अशी शिक्षा सूनावण्यासाठी अनेक महिने व वर्षे लागतात आणि त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य व पाठपुरावादेखील कमी होऊन प्रसंगी आरोपी सहीसलामत सुटण्याची शक्यताही बळावते. यासाठी महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपींना काही दिवसांतच शिक्षा बजावणे अशक्य नाही. यासाठी सरकार व न्यायालयाने पुढाकार घ्यायला हवा.

 सामाजिक चीड व तेढ निर्माण करणाऱ्या ह्या घटना वारंवार का घडतात याचा विचार कुणी गांभीर्याने करताना दिसत नाही. दोन चार घटनांमधील शिक्षेमुळे ह्या घटनांमधील विकृत ठेचले जातील मात्र समाजात वाढत चाललेल्या विकृतीचे काय असाही प्रश्न उपस्थित होतो. शाळा, कार्यालये, सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी आजही महिला असुरक्षित आहेत. या ठिकाणांवर महिलांच्या सुरक्षेची योग्य दखल घ्ोतली जात नाही. याउलट परदेशांमध्ये अशा घटना सातत्याने घडत असल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे स्त्री सन्मानाच्या बाबतीत इतर देश पुढारलेले असताना भारतात मात्र दररोज ह्या घटना घडताना दिसतात. विकसनशीलतेकडून विकसित राष्ट्राकडे वाटचाल करत असताना जोवर महिला सुरक्षिततेची हमी दिली जात नाही व अत्याचाराच्या घटना पूर्णतः थांबत नाहीत तोवर देशाला विकसित तरी कसे म्हणायचे? त्यामुळे विकसित राष्ट्रात स्त्रियांना मिळणारे सुरक्षित वातावरण आपल्या देशात निर्माण होण्यासाठी मोठा पल्ला गाठावा लागणार आहे जो सध्यातरी दृष्टीक्षेपात नाही. याचा पहिला टप्पा म्हणून महिलांना उपभोगाची वस्तू, दुबळी, कमजोर समजणाऱ्या वासनांध विकृती जागेवरच ठेचायला हव्यात. - वैभव मोहन पाटील 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी