दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
पर्यावरणस्नेही मूर्तींकडे भाविकांचा कल
जलप्रदूषण होवू नये म्हणून पर्यावरणाचा विचार भाविकात भिनल्याने आता त्यांचा कल पर्यावरणस्नेही गणेश मूर्तीकडे वळू लागला आहे. पर्यावरणस्नेही गणेशोत्सव ही संकल्पना शहरात रूजत असताना, आता ती ग्रामीण भागातही स्वीकारली जाऊ लागल्याचे सुखद चित्र यावेळी मोठ्या प्रमाणात दिसत आहे. मी काही गणेशमूर्ती निर्मात्यांना आणि निर्मात्या शाळांना भेटी दिल्यावर याची माहिती मिळाली. याची सुरूवात अनेक मंडळांच्या मंडपात आणि घरांमधून चकचकीत गणेशमूर्ती ऐवजी आता पारंपरिक शाडू मातीच्या किंवा कागदाच्या लगद्याच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल.
पर्यावरणाच्या हानीबद्दल, विसर्जनानंतर नदी व चौपाट्यांवर दिसणाऱ्या गणेशमूर्तींच्या अवशेषांबद्दल समाजमाध्यमांमधून चर्चा व्हायला लागल्यानंतर गणेशभक्तांनी त्याकडे अधिक डोळसपणे पहायला सुरुवात केली आहे. घरगुती गणेशमूर्तींसाठी पर्यावरणस्नेही मूर्तींचा विचार होऊ लागला आहे. तसेच थर्माकोलऐवजी कागदी मखर, कपड्यांच्या पडद्यांची सजावट, फुलांची सजावट होवू लागली आहे. मूर्तींच्या उंचीच्या स्पर्धेमुळे काही घरांतील मूर्ती मोठ्या आणण्याकडे कल असतो. शाडूच्या मूर्ती मोठ्या आकारात तयार करणे अशक्य असते. परंतु मोठी, अर्थात प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती न आणता छोटी मूर्ती आणावी लागते. त्यामुळे आपसूकच शाडू मातीच्या मूर्तीला अधिक पसंती मिळत आहे.
पूर्वी लालबाग,परळ या गिरणगावात मूर्ती साकारणारे प्रसिध्द मूर्तीकार विजय खातू, राजन खातू, दीनानाथ वेलींग, राजन झाड, मनोहर बागवे हे मूर्तीकार मंडळांसाठी मोठ्या आकाराच्या उंच मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या बनवित असत. कारण शाडू किंवा माती लवचिक असल्याने त्यांच्या मोठ्या मूर्ती बनवणे कठीण जाते. त्याचप्रमाणे मातीच्या मूर्ती बऱ्याच जड होतात.प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मोठ्या मूर्तीं विसर्जन करणे कठीण नसल्या तरी त्या पाण्यात लवकर विघटित होऊन विरघळत नाहीत. त्यामुळे त्यांचे तुटलेले विद्रूप भाग दुसऱ्या दिवशी चैपाटी व नदीच्या काठावर येऊन पडतात.ते गोळा करून त्यांचे पुन्हा विसर्जन करण्याचे काम नगरपालिकेला व स्वयंसेवी संस्थांना करावे लागते. या मूर्तींना चकचकीतपणा यावा म्हणून तैलरंग दिले जातात; ते विषारी असल्याने जलप्रदूषण होऊन माशांना आणि जैवविविधतेला धोका निर्माण होतो. म्हणून आता शाडूची माती, लाल माती, कागदाचा लगदा यांच्या मूर्तींना पसंती मिळत आहे. आता तर मोठी मंडळे सुध्दा पाण्याच्या टाक्या तयार करून आपल्या मूर्तीचे विसर्जन त्यात करतात. तर काही कॉलनीतही घरातील गणपती विसर्जनाची सोय केली जात आहे हे गौरवास्पद आहे.
पर्यावरण दक्षता मंडळाच्या ‘ग्रीन शॉपी' च्या माध्यमातून पर्यावरणस्नेही गणेशमूर्तीची विक्री केली जात आहे. दरवर्षी या मूर्तीची मागणी काही प्रमाणात वाढताना दिसते. मात्र अजूनही अनेक घरांमध्ये आकर्षक मूर्तीसाठी सोनेरी रंग, खडे याचे आकर्षण असते. त्यामुळे मूर्ती घेताना या सोनेरी रंगाची मागणी केली जाते. मात्र अशा मूळ मूर्ती पर्यावरणस्नेही असल्या तरी त्यावरील रंग, खड्यांचे दागिने यामुळे त्या पर्यावरणस्नेही राहत नाहीत. हळद आणि कुंकू यापासून बनवलेले रंग आणि त्याचा रंगकामासाठी केलेला वापर अधिक स्वीकारार्ह झाला पाहिजे, अशी अपेक्षा ‘ग्रीन शॉपी' तर्फे व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्या पाच वर्षांत पर्यावरणस्नेही मूर्तींची मागणी वाढली आहे. कारण शाडूच्या मातीची मूर्ती पाण्यात पाऊण ते एक तासात विरघळते. शाडूवर अनेकदा पाण्यात विरघळून जाणारे जलरंग वापरलेले असतात .त्यामुळे जलप्रदूषणाचा धोका नसतो.. मात्र वाढती मागणी पूर्ण करणे काहीवेळा मूर्तीकारांना अशक्य होत आहे. कारण शाडूच्या मूर्ती सुकायला जास्त वेळ लागतो. पाऊस असेल तर हा कालावधी आणखी वाढतो, असे मूर्तिकारांचे म्हणणे आहे. तरीही पर्यावरणस्नेही गणेश दर्शन स्पर्धांचा विचार करता मंडळे आणि घरगुती गणेशमूर्ती शाडूच्या व मातीच्या आणल्या जाऊन पर्यावरण रक्षणाचे काम गणेश भक्त करत आहेत. अशा शाडूच्या मूर्ती पेण व कोकणातून आता विदेशातही जाऊ लागल्या आहेत.
पूर्वीच्या काळी गिरणगावात विजय खातू यांनी कालपरत्वे शाडूच्या मूर्ती करणे पसंत केले होते. तसेच गिरगाव मधील मुगभाट मध्ये विख्यात शिल्पकार आणि मूर्तीकार गणेश पाटकर यांनी १९६० ते १९८० या दरम्यान विदेशातील नेपाळ, मेक्सिको, कंबोडिया, तिबेट, जावा, चीन, रोम, अफगाणिस्तान, बाली, जपान, इराण इत्यादी ठिकाणच्या गणेश मूर्ती शाडूच्या मातीत साकारल्या होत्या. त्या पहाण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी लोटत असे. शाडूची मोठी मूर्ती तयार करायला साधारणपणे एक महिना लागतो. प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती बनवायचा साचा तयार असेल तर मूर्ती कमी वेळात तयार करता येते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा म्हणून सरकार जनजागृतीवर कोट्यवधींचा निधी खर्च करते. पण शाडूच्या गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणारी जागा व अनुदान देताना चालढकल करते असे काही मूर्तिकारांचे म्हणणे आहे.
अलीकडे कागदाच्या लगद्यापासून गणपतीच्या सुंदर मूर्ती बनविल्या जात आहेत.. या मूर्ती वजनाने हलक्या असल्याने त्यांची वाहतूक करणे व विसर्जन करणे सोपे जाते.त्या पाण्यात अगदी सहजपणे विरघळतात. या मूर्तीना रंगविण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो. या पर्यावरणस्नेही गणपतीची मूर्ती तयार करताना कागद, टिश्यूपेपर, माती, जलरंग, भाज्यांपासून तयार केलेले नैसर्गिक रंग, डिंकापासून बनविलेला गम, कापड इत्यादी साहित्य लागते.म्हणून आता शाडूची मूर्तीही मागे पडून त्यांची जागा लगद्याच्या मूर्ती घेत आहेत. बहुतेक ठिकाणच्या या लगद्याच्या मूर्ती स्पर्धेत पारितोषिक पात्र ठरत आहेत. गत वर्षी मूर्तीकार संदीप गजाकोष यांनी कागदाच्या लगद्यापासून तयार केलेली बालमित्र कला मंडळ, विक्रोळी यांची अप्रतिम मूर्ती पहाण्यासाठी रसिकांची अफाट गर्दी लोटली होती.आता अनेक मंडळे आणि घरगुती गणपतीही लगद्याचे बसवत आहेत.
कागदाची मूर्ती करताना ती वापरात आलेल्या कागदाच्या लगद्यापासून केली जाते. यामध्ये वृत्तपत्रांच्या रद्दीच्या कागदाचे प्रमाण अधिक असते. काहीही न लिहिलेला किंवा कोरा कागद प्रदूषण निर्माण करत नाही. मात्र मूर्तीसाठी वापरण्यात येणारा कागद हा त्यावर काहीतरी छापल्यानंतर रद्दीत विकलेला असतो. या कागदावर झालेल्या रासायनिक प्रक्रियेमुळे, तसेच त्यावरील शाईमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो, असे पर्यावरणस्नेहींचे मत आहे. म्हणून वर्तमानपत्राच्या कागदाचा लगदा बनवून त्याच्या मूर्ती बनवू नयेत.
बाळ गोपाळ मित्र मंडळ, विलेपार्ले या मंडळाकरिता दिगंबर रामचंद्र मयेकर यांनी २००८ या सालापासून टिशूपेपरची भव्य मूर्ती करण्यास सुरूवात केली. सुरूवातीला ही मूर्ती बनवण्यासाठी भरपूर परिश्रम घ्ोतले. मूर्तीची उंची पाच फुटाची करता करता ती २१ फुटावर पोचली होती. या मूर्तींसाठी टिशू पेपर, जलरंग, घाटी गम डिंक हे साहित्य वापरले जाते व तारेचे तुकडे आकार देण्यासाठी वापरले जातात. आता त्यांचे मुलगे स्वतःच्या मंडळाबरोबर इतर मंडळांच्या ४० टिशूपेपरच्या मूर्ती घडवत आहेत.
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला आता गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना पर्यावरणाचेही भान राखण्यासाठी घरोघरी जिथे मूर्ती आणल्या जातात त्यात देखील कालमानाप्रमाणे बदल होणे गरजेचे आहे. मातीच्या किंवा प्लास्टर ऑफ परिसच्या मूर्तीऐवजी आता धातूच्या लहान मूर्ती बसविणे योग्य ठरणार आहे. कारण यांचे विसर्जन घरातच करून त्या पुन्हा वापरता येतात. शाडूची मूर्ती घरात परातीत विसर्जित करून ती माती पुढील वर्षाच्या मूर्तीसाठी जतन करून ठेवता येते. ही कल्पना पर्यावरणाच्या दृष्टीने फार मोलाची आहे.
गो ग्रीन बाप्पा चे पुरस्कर्ते पंकज कुमार यांनी लालमाती व शेणखत यांपासून मूर्ती तयार करून ती बाजारात आणली आहे. तिलाही आता चांगली मागणी आहे. कारण तिचे घरातच विसर्जन करून ती माती झाडांसाठी वापरता येते. कोकोपिटच्या मूर्ती बनवल्या जातात; त्यात शेण आणि माती असते. त्यात झाडांच्या बियाही घातल्या जातात. या मूर्ती जवळच विसर्जित करून ही माती इतरत्र टाकली जाते. जेणेकरून त्यातील बिया रुजून वृक्ष लागवड होइल. काही ठिकाणी तर हळद,मैदा, गव्हाचे पीठ, पालेभाज्या यापासूनही गणेशमूर्ती तयार केल्या जातात. यामुळेही पर्यावरणस्नेह जपला जातो.
आपण निसर्गाची कास धरून त्याचा आदर करायला हवा. पर्यावरणस्नेही (eco friendly) गोष्टींचा अवलंब करण्यासाठी आपल्या सवयी बदलायला पाहिजेत. त्यासाठी पर्यावरणाबाबत सकारात्मकता हवी. आता सरकारनेही मोठ्या मूर्ती न करता त्या ४ फुटापर्यंतच्या कराव्यात, मिरवणुकी न काढता गणेशमूर्तींचे विसर्जन शक्यतो कृत्रिम तलावात किंवा किंवा घरच्याघरी करावे असे सांगितले आहे. ते तंतोतंत पाळण्यासाठी छोट्या पर्यावरणस्नेही मूर्तींची स्थापना करून जलप्रदूषण आणि पर्यावरणाची हानी होणार नाही याची दक्षता गणेशोत्सव मंडळांनी आणि घरगुती भाविकांनी घ्यायला हवी. त्यामुळे निसर्गाचा समतोल राखला जाईल आणि तो निसर्ग आपल्याला जपेल. - शिवाजी गावडे