मुशाफिरी

 कोळीगीतांची, कोळी नृत्याची, कोळी समाजजीवनाची भुरळ भल्याभल्यांना पडली आहे. कै. शांता शेळके यांनी वादल वारं सुटलं गं, माझ्या सारंगा राजा सारंगा, मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा अशी गाणी लिहिली. ती लता मंगेशकर, हेमंतकुमार यांनी गायिली, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबध्द केली. एवढेच काय, ‘अगं पोरी संभाल दर्याला तुफान आयलंय भारी' हे गाणं मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पिताश्री संगीतकार स्व.श्रीकांत ठाकरे यांनी ते स्वरबध्द केलं आणि चक्क मोहम्मद रफी यांनी ते कोळीगीत गायलं.

   नुकताच नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन अशा जोडसणांचा अनुभव आपण घेऊन आता श्रावण महिन्याच्या उत्तरार्धाकडे आपला प्रवास सुरु झाला आहे. संपूर्ण वर्षातील एक आल्हाददायक, नेत्रसुखद, उत्साही, आनंदी, उर्जेने भारलेला असा हा श्रावण महिना असून विविध भाषांमधील साहित्यिक, कलावंत, संगीतकार, नाटककार, सादरकर्ते यांना या महिन्याचे कायम आकर्षण राहिले आहे. ‘श्रावणात घननिळा बरसला' हे अजरामर गीत असो की ‘सावन का महिना पवन करे शोर' हे हिंदी चित्रपटातील युगुल गीत असो या महिन्याच्या वातावरणाची मोहिनी ही साऱ्यांवरच कायम असते. आपला देश कृषीप्रधान आहे, त्यावर अजूनही कृषी संस्कृतीची बऱ्यापैकी छाप दिसून येते.

   कोळी समाज आणि सण साजरे करण्याची त्यांची पूर्वापार परंपरेने चालत आलेली उत्साही, आनंदी, दिलदार, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची, मेहमान नवाजीने युक्त अशी जीवनशैली यांचे अतूट नाते आहे. साऱ्या समुद्राचा सातबारा या कोळी समाजाच्या नावावर लावून टाकावा इतके हे लोक समुद्रासह नद्या, खाजणे, खाड्या यांच्याशी एकरुप झालेले असल्याचे पाहायला मिळते. नारळी पौणिमा, होळी आणि गौरी गणपती हे कोळी समाजाचे ‘राष्ट्रीय सण' म्हटले तरी चालतील. कोळी, आगरी आणि नाचगाणी यांचा ‘फेव्हिकॉलपेक्षा मजबूत जोड' आहे. नृत्य हे या लोकांच्या डीएनए मध्येच असते. आगरी आणि कोळी या दोन समाजांमध्ये मोठे साम्य आहे. दोन्ही समाजाच्या पूज्य देवता म्हणजे एकविरा आई व जेजूरीचा खंडोबाराया. दोन्ही समाजातील महिलांच्या साडी नेसण्याच्या पद्धतीत इतरांना समजणार नाही इतका सुक्ष्म भेद आहे. कोळ्यांची उपजिविका प्रामुख्याने मासेमारी, मीठ पिकवण्यावर तर आगरी समाज भातशेती, मीठागरे, विटभट्टी मालकी यावर चरितार्थ चालवणारा. काळाच्या ओघात एकमेकांच्या उद्योग व्यवसायांची चांगलीच सरमिसळ झाली असून आगरी समाजही मासेमारी करतो; तर कोळी लोकांची शेतीही विपुल प्रमाणात असते. मीठागरात दोन्ही समाज राबले आहेत. वाहतूक व्यवसाय (ट्रान्सपोर्ट), इमारती बांधणे (कन्स्ट्रवशन) विटभट्टी, बांधकाम साहित्य पुरवठादार, वखार मालक, फार्म हाऊस मालक येथपासून ते थेट तारांकित हॉटेलांचे मालक, नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार, मंत्री, केंद्र सरकारमध्ये मंत्री, देशाचे राष्ट्रपती (महामहिम रामनाथ कोविद) येथपर्यंत या  समाजांच्या सदस्यांनी मजल मारली आहे. उच्च व व्यावसायिक शिक्षणाची वाट चोखाळल्याने आगरी आणि कोळ्यांची मुले-मुली वकील, डॉक्टर, इंजिनियर, चार्टर्ड अकाउन्टन्ट, पायलट, आकाशवाणी-दूरचित्रवाणी निवेदक, तसेच गायक, संगीत संयोजक, जाहिरातींचे मॉडेल्स, विश्वविक्रमी क्रीडापटू अशा विविध आघाड्यांवर नाव कमावून आहेत.

   एवढे सारे होऊनही दोन्ही समाज सदस्यांची गाण्यांची, नाचण्याची आवड मोठ्या प्रमाणावर कायम राहिली आहे. एवढेच काय, तर सर्वशक्तीमान समजल्या जाणाऱ्या अमेरिकेचा तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्याची बायको मिशेल ओबामा मुंबईत बांद्रे येथे एका शाळेच्या कार्यक्रमात आले असता त्यांनी तेथील मुलामुलींसोबत ताल धरला तो कोणत्या गाण्यावर? तर ‘मी हाय कोली सोरिल्या डोली नि मुंबयच्या किनारी' या कोळीगीतावर. जिज्ञासूंना पाहण्यासाठी तो व्हिडिओ गुगलवर उपलब्ध आहे. बराक आणि मिशेल हे दोघेही जणू अनेक महिन्यांची प्रॅवटीस केल्यासारखे या गाण्यावर थिरकले आहेत. भारत देश स्वतंत्र झाल्यापासून गेल्या ७७ वर्षांच्या इतिहासात अमेरिकी राष्ट्राध्यक्ष मुंबईत सपत्नीक आला आणि कोळीगीतावर नाचला असे पहिल्यांदाच घडले. हे गाणे १९९० साली ध्वनीबध्द झाले व श्रीकांत नारायण या बिगर कोळी गायकाने गाऊन त्यात गहिरे रंग भरले. महाराष्ट्रात वाद्यवृंदांना एकेकाळी प्रचंड डिमांड असे. त्यातही गणेशोत्सव म्हटले की ऑर्केस्ट्रा हा हवाच. शिवाय नाट्यगृहात जाऊन महागडे तिकीट काढून या कलेला उदार आश्रय देणारा रसिकवर्ग महाराष्ट्रात होता; आजही आहे. पण अलिकडे तो घराबाहेर न पडता आपल्या हातातील मोबाईलच्या पडद्यावरच हे बघण्यात धन्यता मानू लागला आहे.

   नुकताच वाशीच्या विष्णूदास भावे नाट्यगृहात ‘दर्याचा राजा' हा कोळी नृत्यगीतांचा बहारदार कार्यक्रम पाहण्याचा योग आला. या कार्यक्रमाचे निर्माते, कलावंत अरुण पेदे वेसावकर यांची मागील महिन्यातच मुलाखत घेतली होती. त्याहीवेळी विविध प्रश्नांवर चर्चा करता आली. पण तोवर मी त्यांचा कार्यक्रम पाहिला नव्हता. ६४ कलाकार, नृत्यात एकवटलेला जोश, कलावंतांची अफाट ऊर्जा, खूप चांगले टीमवर्क आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे गायक आणि वादक मंडळींचे अथकपणे केले जाणारे अफलातून सादरीकरण यामुळे तबियत खुश झाली. या कार्यक्रमाचे निवेदक श्री. भगवान दांडेकर यांनी अत्यंत अभ्यासूपणाने गाण्यांच्या मधल्या जागा भरुन काढताना आगरी-कोळी समाज, आग्रीपाडे, कोळीवाडे, त्यांच्या देवता, त्यामागचा इतिहास, कार्यकारणभाव, सणांच्या साजरे करण्यामागची पूर्वपिठीका खूप छानपणे समजावून सांगितली आहे. ती कोळी-आगरी समाज, त्यांच्या देवता, त्यांचा पूर्वेतिहास, या समाजांतील सणांचे महत्व यावर पी एच डी करणाऱ्यांसाठी मौलिक ठरावी. या कार्यक्रमाचे नेपथ्य समुद्रात मासे पकडताना वापरात येणारी जाळी, बोटी यांनी सजलेले आहे, जे पाहणाऱ्याला पार मोहवून जाते.

    दर्यावर्दी लोकांच्या जीवनात तीन नंबरच्या बावट्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. अरुण पेदे यांच्या ‘ओंकार स्वरुपा'वरील नृत्यानंतर ‘तीन नंबरचा बावटा' हेच गाणे गाणे सादर केले जाते. मग चैत्र सप्तमी, एकविरा आई तू डोंगरावरी, आई भरोसा ठेव, चैता पाखाच्या म्हैन्यामधी, टिमवयाची चोली, बाबा मी नवा नाखवा, नारळी पुनवेचे पारु दरयाचे सणाला, सण आयलाय गो, वेसावची पारु, हिंगलाय देवी, हिंगलाय आदि माता आदि माता शिवशवती, आम्ही कोली दर्याचे राजे हाव, सात दिसाचा, गौरी गणपती सनाला उद जळे उदराशी, मी हाय कोली, वल्हव रे नाखवा, ये दादा आवर ये, आमचे दाराशी हाय शिमगा, हावलीचा सन आयले गावाला, हीच काय गो, पोरी येरा केलास, आई तुजं देऊल देऊल, या कोलीवाऱ्याची शान, चांदनं चांदनं झाली रात, पारु गं पारु, नवरीचे मांडवान नवरा आयला अशी एकापाठोपाठ एक गाणी ‘दर्याचा राजा' मध्ये सादर होतात. इतके छान टीम वर्क, नर्तिका-नर्तकांचा जोश, गायक-वादकांची समर्थ साथ, सोबतीला गणेश गावडे याच्या प्रहसनाची फोडणी यामुळे प्रेक्षकांना इकडे तिकडे मान हलवायला सुध्दा फुरसत मिळत नाही, इतका हा कार्यक्रम रंगतो. एकापाठोपाठ एक गाणी, नृत्ये सादर होत असल्याने लोकांच्या टाळ्यांचे आवाजही पुढील सादरीकरणात विरुन कधी जातात ते कळतही नाही. या वाद्यवृंदातील नर्तकींना साड्या नेसवायचे-वेषभूषेचे काम अरुण पेदे वेसावकर यांच्या भगिनी सौ. लता सौदी यांनी केले आहे. तर त्यांचे पती श्री. केसरी सौदी हेही गाणे गाताना दिसतात. ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर प्रेमसिंग राजपूत हेही या कार्यक्रमात एक सहकलाकार म्हणून सफाईने वावरताना दिसतात. स्वाती कदम, तेजस्विनी महाडिक व अन्य नर्तकी-नर्तकांचा उर्जादायी सहभाग ‘दर्याचा राजा'च्या आकर्षणात भर घालतो.

   कोळीगीतांची, कोळी नृत्याची, कोळी समाजजीवनाची भुरळ भल्याभल्यांना पडली आहे. विख्यात कवयित्री कै.शांता शेळके यांनी वादल वारं सुटलं गं, माझ्या सारंगा राजा सारंगा, मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा (हेच नाव मग पेदे यांनी आपल्या ऑर्केस्ट्राला दिले) ही गाणी लिहिली. ती लता मंगेशकर,  हेमंतकुमार यांनी गायिली, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबध्द केली. एवढेच काय, ‘अगं पोरी संभाल दर्याला तुफान आयलंय भारी' हे गाणं तर वंदना विटणकर यांनी लिहिलं. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पिताश्री संगीतकार स्व.श्रीकांत ठाकरे यांनी ते स्वरबध्द केलं आणि चक्क मोहम्मद रफी यांनी हे कोळीगीत गायलं व त्यांना साथ केली होती कोळी समाजातील विख्यात गायिका पुष्पा पागधरे यांनी. सलग नऊ रौप्यमहोत्सवी चित्रपटांचा विक्रम करणारे लोकशाहीर कृष्णा उर्फ दादा काेंडके हे तर कोळी समाजाचेच होते. त्यांनी त्यांच्या एका चित्रपटात ‘दर्याची दौलत आनली तरीला  सोन्याचा दिस आज उगवला' हे गाणंसुध्दा सामील केलं आहे.  

     महाविद्यालयीन जीवनात विटावा गावचे शाहीर कै.दामोदर पाटील विटावकर (ज्यांचे ‘घेऊनशी जा रं ताजा ताजा' हे गाणं गाजलं होतं) हे  एम ए ला असताना माझे साथीदार होते. मी नवी मुंबईत राहायला आल्यावर मला येथील कोळी समाजाकडूनही स्नेह लाभला. विधानपरिषद आमदार रमेश पाटील, माजी सिडको संचालक व माजी नगरसेवक नामदेव भगत, माजी नगरसेवक जी.एस.पाटील, भजनसम्राट महादेवबुवा शहाबाजकर, त्यांची सुकन्या रांगोळीकार माधुरी सुतार, तेनझिंग नोर्गे हा क्रीडा पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींकडून स्विकारणारे विक्रमी जलतरणपटु शुभम धनंजय वनमाळी व प्रभात राजू कोळी अशा कित्येक नामवंत कोळी मान्यवरांच्या मुलाखती घ्यायची संधी मला मिळाली. त्यांच्यासोबत वावरता आले. अशा या कष्टाळू, दर्यावर्दी, संघर्षातही समाधान मानणाऱ्या व नाचून गाऊन आनंद व्यक्त करणाऱ्या, आनंद इतरांमध्ये वाटून साजरा करणाऱ्या कोळी समाजाला आता नारळी पौर्णिमेनंतर चांगली मासळी सापडू दे व गौरी गणपतीचा सणही त्यांचा व सर्वांचाच आनंदात, उत्साहात पार पडावा यासाठी हार्दिक शुभेच्छा..

-राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक : दै. आपलं नवे शहर

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

पर्यावरणस्नेही मूर्तींकडे भाविकांचा कल