‘वृत्ती' म्हणजे काय हो?  

वृत्ती म्हणजे ‘दृष्टिकोन', जो स्वतः चा असतो, जो खूप अनुभवानंतर तयार झालेला असतो. जो कोणाचा विकत घेता येत नाही, आपला कोणाला उसनाही देता येत नाही. एकवेळेस नियम शिकता येतील; पण दृष्टिकोन नाही. तो आपल्यालाच कमवावा लागतो आणि ते गमाविणे म्हणजे गोठलेले दूध पाणी करण्यासारखे होईल.

आपण नेहमी म्हणतो या जगात असे घडते, या जगात तसे घडते. घरी राहून गोष्टी जगाच्या करतो. आपली मजल काहीच माहिती नसताना दरमजल करायचा स्वभाव मात्र कोणी सहसा चुकू देत नाही. काहीजण त्यातले शहाणे असतात. तर काहीजण मोजकेच (शहाणे) असतात. शेवटी, सुरुवात जगापासून होवून अंत घराजवळ येवून थांबतो. मग पुन्हा नवीन दिवस नवीन सुरुवात असते. ‘जग' नावाचे हे मोठे अडंबर आहे ज्यात आपला समावेश हीच खरी सुरुवात आहे. त्यात आपल्यासारखे बरेच असतात. स्वभाव भिन्नता आणि मन भिन्नता असली तरी माणूस म्हणून आपण भिन्न नाही आणि भिन्न नाही म्हणून एकत्र आहोत. तरीसुद्धा बऱ्याच जणांना भिन्न व्हायची फार फडफड असते जी त्यांच्या गडबडीत आणि व्यर्थ बडबडीत आपसुक दिसून येते, तीच असते आपली ‘वृत्ती' जी तुम्हाला इतरांपासून वेगळे होण्यास भाग पाडते. त्यात प्रामुख्याने दोन प्रकार पाडता येतील. जन्मजात मिळणारी वृत्ती जी जनुके पारेषित असते. ज्याला बदलणे थोडे कठीण आहे. सोप्या भाषेत त्याला ‘इन बिल्ट' म्हणुयात. दुसरी असते समाज/परिसर पारेषित. जी मुळातच स्वभाव बदलून बदलनू तयार झालेली असते. ह्या वृत्तीला बदलणे शक्य आहे; पण तितके सोपेही नाही. स्वभावापेक्षा वृत्ती फार पक्की असते. आपण म्हणतो ना.. स्वभाव बदलत नाही; तिथे ही घासूनघासून तयार झालेली वृत्ती बदलणे अवघडच असेल. मुळात वृत्ती म्हणजे ‘ॲटीट्युड,' ज्याला स्व-वाले घमंडाने सांगतात, दाखवतात तर दुसऱ्याकडे बोट दाखवणारे नकारार्थीच मांडतात. त्यातला नकारात्मकपणा आपल्याला सोडता आला पाहिजे, त्यातली भीती नष्ट केली पाहिजे आणि त्याला शक्ती म्हणून पाहिली पाहिजे; ना की निव्वळ दाखवायचीच म्हणून फालतू झगमगाट नको.

   उपरोक्त थोडे अवघड होत असेल, वाटत असेल, समजतही नसेल. वृत्तीवर लिहिण्यासारखे व बोलण्यासारखे भरपूर आहे. त्यातले समजते किती व अंगिकारता किती येते हे महत्वाचे आहे. वृत्तीला शक्ती बनवायची म्हणून ती अंगिकारावी लागेल; त्यासाठी ती आधी ओळखावी लागेल, नंतर समजावी लागेल. वृत्तीचा आणखी एक भाग आहे; तो काम फक्त एकच करतो जो तुमचे इतरांसोबत वागणे कसे आहे हे ठरवतो. जसे तुम्हाला चांगल्यातले चांगलेच दिसत असेल तर तुमची वृत्ती डोळस व स्वच्छ आहे; आणि जर इतरांचे चांगले असताना ज्याला चारचौघे शिक्कामोर्तब करूनही तुम्हालाच वाईट दिसत असेल तर तुमच्या वृत्तीला एक फिल्टर आहे जे स्वतःच काळे पडले आहे. त्या फिल्टरला आधी साफ केले पाहिजे; कारण ते तुमच्या वृत्तीला स्वतः साठीच आत्मघातकी करत आहे; जे आपली शक्ती कमकुवत करत आहे. सकारात्मकता ही गोष्ट वृत्तीमध्ये सर्वात महत्वाची आहे. तसाच प्रांजळपणा स्वतः च्या स्वभावात असावा लागतो. या दोन गोष्टीचा समावेश आपल्यात नसेल तर वृत्ती असूनही ती निरुपयोगी आहे. जसे शरीरात ‘अपेंडिक्स' आहे नेमके तसेच काही.

 समाजात रहायचे म्हणजे निरनिराळी माणसे असतात. ती असतातही निराळीच. कुठेच काही न जुळणारी. दर हजार माणसानंतर एखादा आपल्याशी जुळणार भेटतो, तोही काही टक्क्यांपर्यंतच. बाकी सगळी जुळवाजुळव असते. हीच जुळवाजुळव जर तुम्ही शिकलात तर वृत्ती तयार करण्यातला सर्वात पहिला टप्पा जिंकलात. दुसरी महत्वाची बाब, आता ही वृत्ती विकसित होत असताना तिला पक्के करायचे म्हणजे आधी तिला सांभाळण्यासाठी तुम्ही पक्के असावे लागते. खूप प्रयत्नानंतर तुमचे जे मत बनले आहे ते कोणाच्याही दबावात येवून घाबरून बदललेले चालत नाही. जर तुम्ही असे करत असाल तर तुम्ही आपल्याच वृत्तीला अपयशी करत आहात. त्यामुळे आपल्या मतांवर ठाम रहायला शिका. त्यालाच आपण प्रवृत्ती म्हणतो. प्रवृत्ती खूप जास्त घमंडी असताना त्याला कोणीच नकाराने पाहत नाही. कारण त्यावेळेस वृत्तीने आतापर्यंत सर्वांच्या वृत्तीला पुरते दाबलेले असते. तेव्हा बरेचजण याला ‘ॲटीट्युड' म्हणत असतील तर त्याला नाईलाज आहे. कदाचित त्यांचा चष्मा धूसर झाला असेल; पण तुम्ही आता पक्के स्वच्छ दृष्टीवाले होत आहात हे नक्की.

   मी सदैव लोकांबद्दल चांगलेच बोलतो आणि चांगलेच सांगतो. याचा अर्थ चांगली वृत्ती म्हणूनच पुढच्याने स्वीकार करावा हे जरी पक्के असले तरी आतला हेतू अजून तरी कोणाला कळलेला नाही. कदाचित आतून त्याला बरे पाहवतही नसेल. आपले संबंध बिघडतील म्हणून तो तसे चांगले वागतो. याचा अर्थ लोकांना तुमची वृत्ती चांगली वाटावी म्हणून तुम्ही तिच्यात ठिगळ लावून बदल करताहेत. हा बदल म्हणजे वृत्ती कमजोर करणेच होय. बोला ना! तुम्हाला जे पटले नाही ते पटले नाही म्हणून. पुढच्याचा विचार करून आपले व्यक्तिमत्त्व का कमजोर करत आहात? नाही बोलावं वाटले तर शांत बसा. शांततेत सर्व काही अर्थ दडलेले असतात. कळणाऱ्याला ते बरोबर कळते. तुम्ही जास्तीचे बदलून, माघार घेवून स्वतःचे दुश्मन स्वतःच होवू नका.

  वृत्ती म्हणजे ‘दृष्टिकोन', जो स्वतः चा असतो, जो खूप अनुभवानंतर तयार झालेला असतो. जो कोणाचा विकत घेता येत नाही, आपला कोणाला उसनाही देता येत नाही. एकवेळेस नियम शिकता येतील; पण दृष्टिकोन नाही. तो आपल्यालाच कमवावा लागतो आणि ते गमाविणे म्हणजे गोठलेले दूध पाणी करण्यासारखे होईल.

  शरीराची प्रवृत्ती जशी कर्बोदके खायचीच आहे तशी वृत्ती असते. तुम्ही आपल्या शरीराला ९० टक्के प्रथिने व १० % कर्बोदके देवून पहा. शरीर आधी स्वीकार कर्बोदकांचाच करते. का? कारण ती त्याची बनलेली प्रवृती होय. त्यामुळे स्वतःची वृत्ती ओळखा, नंतर तिला प्रवृती करा; पण बेरीज-वजाबाकी करण्याच्या नादात तिला बार-बार हमेशा बदलून चिंधड्या करू नका.

कितीही करतो म्हणले गुणाकार
तर त्याला अंत आहे
स्वतःची एक सीमा आहे
म्हणून शरीर नाशवंत आहे
तिथे काय घेवून बसले
उडत्या, फिरत्या, भुरट्या मनाला
आपले असून ते..
कायम परप्रांत आहे.
-अमोल चंद्रशेखर भारती 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

माझ्या देशावर माझे प्रेम आहे....