दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
माझ्या देशावर माझे प्रेम आहे....
आपण प्रतिज्ञा करतो..भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. मग ती फक्त काय बोलण्यासाठी आहे का ? अरे! तसे वागा. आई मुलांवर प्रेम करते. त्यांच्यावर संस्कार करते, ते कुठे जाते? मोठी होऊन तीच मुले आया बहिणींना नासवतात. आता कुठेतरी हे थांबले पाहिजे. तेव्हा स्वतंत्र झाल्यासारखे वाटेल. स्त्रीने शिक्षण घेतले, उच्च पदावर आहे, पगारपण चांगला आहे, मान प्रतिष्ठापण आहे. पण, समोरच्या व्यक्ती जर डोळ्यांनी अब्रू लुटत असेल तर त्या स्त्रीने घराबाहेर कसे जायचे?
खरंच माझ्या देशावर माझे प्रेम आहे का? हा प्रश्न मला इयत्ता आठवीचा मराठीच्या पुस्तकातील दुसरा धडा वाचतांना पडला, कारण या धड्यांमध्ये शिक्षक त्या विद्यार्थ्यांना हाच प्रश्न विचारत होते आणि त्यावर मुलांनी उत्तर दिले की अलबत! आपल्या देशावर प्रेम न करणारे आम्ही करंटे थोडेच आहोत! हे उत्तर मुलांनी सहज दिले. पण मला मात्र या प्रश्नाचे उत्तर देताना एक प्रश्न पडला खरंच माझे प्रेम आहे या माझ्या देशावर? पण हा प्रश्न का पडला असावा ?
हा पाठ यदुनाथ थत्ते यांनी प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातील' या पुस्तकातून घेतला आहे. प्रतिज्ञा म्हणजे काया-वाचा-मनाने केलेला संकल्प. प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दामागे संकल्पाचे बळ असते. आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करायचे आहे, असा दृढ विश्वास या शब्दांमधून व्यक्त होतो. असे या पाठात सांगितले आहे. पण आपण आपल्या खऱ्या आयुष्यात खरेच तसे वागतो का? असा प्रश्न प्रत्येकाला पडायला पाहिजे, कारण धडे, कविता हे शालेय अवस्थेत असताना शिकवले जातात आणि तेव्हा आपण त्याप्रमाणे अनुकरण करतो. पण काय माहित दहावी किंवा शालेय म्हणजे किशोर अवस्था संपली की काय होते?
प्रत्येक जण स्वतंत्रपणे वागतो आणि बोलतो की आम्ही स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत. पण आत्ताची पिढी पण तशी राहिली नाही. १५ ऑगस्टला ध्वजारोहण केल्यानंतर सर्वांनी टाळ्या वाजवल्या. आपण स्वतंत्र होऊन ७८ वर्ष झाली या भ्रमामध्ये सर्वजण आनंदी देखील झाले.
पण वर्तमानपत्र वाचले किंवा सोशल मीडियावर न्यूज बघितल्या की तळपायाची आग मस्तकात जाते आणि असे वाटते की खरंच आम्ही स्वतंत्र आहोत का? आता आम्ही म्हणजे कोण ? तर नक्कीच स्त्रिया! असं बोलायला काही हरकत नाही.
निर्भया झाली..त्यानंतर अशा घटना वारंवार ऐकायला येऊ लागल्या. स्त्रियांवर होणारे अत्याचार वाढू लागले आहे आणि त्यांना कारणीभूत कोण ? तर ती स्त्री स्वतः. का ? तर ती नीट अंगभर वस्त्र परिधान करत नाही असे म्हटले जाते. ठीक आहे, तरी पण नराधम जर तीन वर्षाच्या मुलीला सोडत नाही किंवा ८० वर्षाच्या आजीला सोडत नाही, तर मग कोणते आणि कसले कपडे परिधान करायला पाहिजेत ? पूर्ण शरीर झाकून घेतले तरीपण उघड्या डोळ्यांनी रोज एका तरी स्त्रीचे वस्त्रहरण होत आहे आणि हे वस्त्रहरण होताना कोणी मदत करायला येत नाही आणि येतात ते फक्त ती गेली की मेणबत्त्या लावायला किंवा सहानुभूती दाखवायला. स्त्रियांना सहानुभूती किंवा मेणबत्ती लावण्याची गरज नाही. त्यांना स्वातंत्र्य पाहिजे, मनमोकळेपणाने जगण्याचे, समाजात हसत वावरण्याचे अधिकार पाहिजे, कारण तीला माहित आहे, मला वाचवण्यासाठी कोणी श्रीकृष्ण येणार नाही किंवा श्री छत्रपती शिवाजी महाराज पण येणार नाहीत. तिला स्वतःचे रक्षण स्वतःच करायचे आहे, पण ते करण्यासाठी तिला स्वतंत्रता हवी आहे. आज जर माझे श्री छत्रपती शिवाजी महाराज असते तर मला या प्रसंगाला तोंड द्यावे लागले नसते, असे प्रत्येक स्त्रीला वाटत आहे. कारण अशीच आमची आई असती, तर आम्हीही सुंदर झालो असतो, असे वदले शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांची अशी ताकद आणि ताकीद होती की तिथे समोरच्या स्त्रीला आई आणि बहीण याशिवाय दुसऱ्या नावाने हाक मारतच नव्हते. त्यामुळे त्या काळात मुघल कितीही त्रास देत असतील किंवा कितीही वाईट प्रसंग असेल तरी ती स्त्री सुरक्षित होती. तीच काय? मुघलांच्या स्त्रियादेखील महाराजांसमोर बुरखा काढून उभ्या राहायच्या, कारण की त्यांना माहीत होते की ये महाराज ऐसे है की इनसे डरनेकी कोई बात नही है. ये सबको मा-बहन बुलाते है और कैसे आदर भी करते है!
मग आता ही भावना आजच्या स्त्रीमध्ये राहिली नाही. महाराज! या कलियुगात वेगळेच तुफान आले आहे प्रत्येक जण नुसते बोलते की, आम्ही शिवबाचे मावळे आहोत. आमच्या रोमा-रोमा मध्ये शुभ संस्कार आहेत, पण तसे काहीच प्रत्यक्ष दिसत नाही. रोज आया बहिणींची अब्रू जात आहे आणि प्रत्येक जण फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. पण यावर कायदा, सुव्यवस्था आणि सुरक्षितता काहीच राहिलेली नाही. शिवाजी महाराजांच्या काळात जर कोणी वाईट नजरेने परस्त्री कडे कधी बघितले तरी त्यांना अस्मान दाखवले जायचे नाहीतर त्यांचे डोळे फोडले जायचे आणि ती शिक्षापण तात्काळ होत असे. पण आता तसे काहीच राहिले नाही. त्यामुळे हे नराधम निर्भीडपणे समाजात वागत वावरत आहेत आणि स्त्रियांचे स्वातंत्र्य हिरावून घेत आहेत.
या नराधमांना शिक्षा देण्यासाठी कायद्याला पुरावे लागतात; पण हे पुरावे हे नराधम नष्ट करतात किंवा नवीन खोटे भास निर्माण करतात आणि आम्ही त्यातले नाहीत असे नामानिराळे होतात. आणि या सर्व घटनांमध्ये स्त्री कशी दोषी आहे, हे तिला दाखवले जाते. तिच्यावर अत्याचार होतो तेव्हा ती जेवढी लज्जित होत नाही, तेवढे या आरोप आणि प्रत्यारोपाने निश्चित होत असते. मरण यातना सोसत असते. त्यावेळी तिला वाटते की तिथेच मला मरण आले असते तर बरे झाले असते.
खरंच स्त्रीचा जन्म नको असे म्हणण्याची वेळ एका स्त्रीवर येते किंवा माझ्या पोटी स्त्रीने जन्म नको घ्यायला असे तिला वाटू लागते. असे जेव्हा किळसवाणे कृत्य तिच्यासोबत होत असते तेव्हा ती फक्त हतबल झालेली असते. ना श्रीकृष्णाचा धावा करू शकते, ना महाराजांना बोलवू शकते. ना झाशीची राणी बनू शकत. का? तर तुझे हातपाय कायद्याने बांधले आहेत. जर त्या वेळेला शासनाने किंवा कायद्याने स्त्रीला अधिकार दिले की कोणताही अतिप्रसंग आला किंवा प्रतिकार करण्याची वेळ आली, तर तू त्या नराधमाला धडा शिकवू शकतेस. असे जर तिला सांगितले तर नक्कीच तिला झाशीची राणी बनायला वेळ लागणार नाही. ती स्वतःच स्वतःच्या अस्तित्वाच्या अधिकारासाठी लढू शकते. ती स्वतःची सुरक्षा करू शकते.
आपल्या समाजामध्ये चोर चोरी करून जातो आणि शिक्षा मात्र संन्यासाला होते हे पुरातन काळापासून होत आलेले आहे आणि अजून देखील होत आहे. पण कधीतरी असे वाटते की आता हे सगळं कुठेतरी थांबावं, बस झालं! आता या रोजच्या बातम्या पाहून किंवा वाचून घरातून बाहेर पडताना असुरक्षिततेची भावना निर्माण होते. स्त्री ही डॉक्टर असो, पोलीस असो, शिक्षिका असो किंवा कोणत्याही उच्चपदावर असो, त्या पदाचा किंवा त्या अधिकाराचा काही उपयोग होत नाही. जुन्या काळी जेव्हा स्त्रीवर मुघल अत्याचार करायचे तेव्हा त्यांना धडा शिकवण्यासाठी महाराज स्वतः आणि त्यांचे मावळे असत. पण आता या वासनारुपी मुघलांना धडा शिकवण्यासाठी महाराज तुम्ही आम्हाला ताकत द्या, शक्ती द्या. कायदा हातात घेण्याची काहीतरी तरतूद करा. तिथल्या तिथे त्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे. आज होईल, उद्या होईल, म्हणत नकली पुराव्यानिशी ते नराधम सुटतात आणि त्यांची विकृती वृत्ती वाढत जाते आणि दर वेळेला एक अबला स्त्री बळी पडते. तेव्हा त्या स्त्रीला तू कशी दोषी आहेस, असे बोलले जाते आणि तिलाच अपराधी ठरवून मोकळे केले जाते. या रोज अशा बातम्या ऐकून स्त्रीत्वाचा राग यायला लागला आहे. प्रत्येक स्त्री सुरक्षित नाही राहिली आहे. नराधम बाहेर आहेतच, पण आता घरातपण घुसले आहेत. झाशीची राणी राहिली नाही. आता सर्व स्त्रिया अबला नारी झाल्या आहेत, कारण सर्व स्त्रियांचे हात पाय बांधून तिला कायदा या नावाखाली जखडून ठेवले आहे. बरं हा कायदा फक्त स्त्रीलाच आहे. असे का ?
आपण प्रतिज्ञा करतो, भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. मग ती फक्त काय बोलण्यासाठी आहे का ? अरे! तसे वागा. आई मुलांवर प्रेम करते. त्यांच्यावर संस्कार करते, ते कुठे जाते? मोठी होऊन तीच मुले आया बहिणींना नासवतात. आता कुठेतरी हे थांबले पाहिजे. तेव्हा स्वतंत्र झाल्यासारखे वाटेल. स्त्रीने शिक्षण घेतले, उच्च पदावर आहे, पगारपण चांगला आहे, मान प्रतिष्ठा पण आहे. पण, समोरच्या व्यक्ती जर डोळ्यांनी अब्रू लुटत असेल तर त्या स्त्रीने घराबाहेर कसे जायचे? मग हे कुठेतरी थांबले पाहिजे. दुर्गाष्टमी, घटस्थापना त्यावेळी देवीची पूजा केली जाते. तिची आरती केली जाते. हे सगळे थांबले पाहिजे. रक्षाबंधनला बहीण भावासाठी राखी बांधते हे देखील मग थांबले पाहिजे. खोटे दिखावे, मुखवटे कशाला ? नाहीतर कायदा तरी स्त्रियांच्या हाती द्या. प्रतिकार करण्यासाठी तिला बळ द्या. कायदा असा करा की, तो नराधम सापडला की लगेच विकृतीनुसर शिक्षा किंवा फाशी दिली गेली पाहिजे. म्हणजे कोणी परत असे कृत्य करण्याचा विचार पण करणार नाही. स्त्रिया पिंजऱ्यातून जोखडातून बंधनातून बाहेर पडून मोकळा श्वास घेतील आणि तेव्हा त्यांना स्वतंत्र झाल्याचे भासेल.
माझ्या देशावर प्रेम करणे म्हणजे माझ्या घरापासून सुरु करायला पाहिजे. घरातून सुरू झाले तरच ते समाजापर्यंत येऊन पोहोचेल. प्रतिज्ञा करतो तर ती निभवायची ताकद पण येईल. शिवाजी महाराजांचे मावळे जी प्रतिज्ञा घ्यायचे आणि ती पूर्ण करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुतीपण देत असत. आता नुसता बोलाचा भात आणि बोलाचीच कढी झाली आहे. तरीपण असे कुठेतरी वाटते की हे सर्व थांबावे. स्वतंत्र देशाचे नागरिक प्रत्येक स्त्रीला पण बनण्याचा अधिकार आहे आणि तो तिला मिळालाच पाहिजे. तेव्हाच ती आनंदाने जगेल आणि बोलेन देखील की, माझे माझ्या देशावर खूप प्रेम आहे, तेपण खऱ्या अर्थाने!
जय हिंद. वंदे मातरम! - निवेदिता सचिन बनकर-नेवसे