रसिकांना हसवता हसवता...!

आपले चार क्षण आनंदाने व्यतीत होतील अशा रीतीने मन रिझवणाऱ्या विनोदवीरांचे स्थान उंचावर राहिले आहे. अवतीभवती जे गळेकापू स्पर्धेचे, परस्पर द्वेषाचे, एकमेकांबद्दल अढी ठेवण्याचे वातावरण साचून राहिलेले आहे, त्यावर हे विनोदवीर त्यांच्या कलेने, सादरीकरणाने चार घटका करमणूक करुन दिलासा देतात. इतरांना सतत हसरे ठेवायच्या प्रयत्नात असणाऱ्या कलावंत, लेखक, निर्माते, दिग्दर्शक अशासारख्यांच्या नशिबी कॅन्सर वा अन्य तापदायक व्याधींमुळे शारिरीक यातना सहन करायला लावणारे अनुभव येतात, त्यावेळी सच्चा, संवेदनशील, सहृदयी, कलेवर निस्सीम प्रेम करणाऱ्या रसिकांनाही त्याच्या वेदना जाणवतातच.

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे

अकस्मात तोही पुढे जात आहे

जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस हे जग सोडून अनंताच्या वाटेवर निघून जायचेच आहे. मात्र या जगात अवतरल्यावर आपल्या पूर्ण आयुष्यात त्याने काय केले, तो इतरांच्या किती उपयोगी पडला, किती सत्कर्मे केली, आपल्या सहकारी-सोबत्यांच्या किती कामी आला, किती जणांच्या चेहऱ्यांवर त्याने हास्य फुलवले, अडी-अडचणीला तो किती लोकांच्या हाकेसरशी धावून गेला, समाज-राज्य-देशाप्रति त्याचे योगदान काय आदि बाबींमुळे तो त्याच्या निधनानंतरही लोकांमध्ये त्याच्या कार्यामुळे जणू ‘अस्तित्वा'त राहतो, लोकांच्या मनात जागा बनवतो. त्यासोबतच आपल्या अवतीभवती असेही अनेक लोक असतात की ते त्यांच्या जीवंतपणीच लोकांवर भार बनून राहतात. त्यांच्या घरच्यांनाही त्यांच्याबद्दल आदरभाव, स्नेह, जवळीक उरत नाही. कुकर्म, दारुबाजी, व्यसनाधीनता, कर्जबाजारीपणा, चोऱ्यामाऱ्या, अप्रामाणिकपणा, गैरकृत्ये, अनैतिक वर्तन या व अशा कारणांमुळे हे लोक अनेकांना नकोसेच वाटत असतात. अनेकजण त्यांना यथाशक्ती टाळण्याचा प्रयत्न करतात.

आपल्याला यातील ज्ञानी, विचारी, संवेदनशील परोपकारी, सहृदयी, हसतमुख, ज्यांच्या सहवासात आपलेही चार क्षण आनंदाने व्यतीत होतील असे लोक कायम आवडत असतात. यामध्ये विनोदवीरांचे स्थान उंचावर राहिले आहे. कारण अवतीभवती जे गळेकापू स्पर्धेचे, परस्परद्वेषाचे, संघर्षाचे, एकमेकांबद्दल अढी ठेवण्याचे, दुसरा पुढे जात असेल तर त्याला पाण्यात पाहण्याचे वातावरण साचून राहिलेले आहे, त्यावर हे विनोदवीर त्यांच्या कलेने, सादरीकरणाने, वर्तनाने चार घटका करमणूक करुन आपल्याला दिलासा देतात. तणावमुवतीचे समाधान देतात. आपल्या हृदयावरील सदोदित वाढत जात असणारा ताण काही काळ का होईना, घालवण्याचा, कमी करण्याचा यशस्वी प्रयत्न करतात. हिंदी चित्रपट-मालिका सृष्टीतील ओम प्रकाश, जॉनी वाकर, मेहमूद, आय एस जोहर, मुकरी, मोहन चोटी, भगवानदादा पालव, आसित सेन, किशोरकुमार, राजेंद्र नाथ, बिरबल, केश्तो मुखर्जी, जगदीप, असरानी, कादर खान,  देवेन वर्मा, अनुपम खेर, जॉनी लिव्हर, दिनेश हिंगू, रवि वासवानी, रघूवीर यादव, शैल चतुर्वेदी, जसपाल भट्टी तसेच महिला वर्गाबद्दल बोलायचे झाल्यास टुणटुण, मनोरमा, शोभा खोटे, उपासना सिंग, गुड्डी मारुती त्यानंतरच्या पिढीतील राजपाल यादव, सतिश कौशिक, सतिश शहा, टिकू तलसानिया अशी नावे घेता येतील. ‘स्टॅण्ड अप कॉमेडी'ने यात आणखी भर घातली. जॉनी लिव्हर, राजू श्रीवास्तव, राजू निगम, सुनिल पाल यांनी जमाना गाजवला. मग दूरचित्रवाणी वाहिन्यांवर खास ‘कॉमेडी टॉक शो' चे पर्वच अवतरले. यात सुनिल ग्रोव्हर, सुदेश लाहिरी, कृष्णा, कपिल शर्मा यांनी आपली छाप सोडली आहे. कॉमेडी करणे, इतरांच्या दुःखी, तणावग्रस्त, कोऱ्या चेहऱ्यांवर हास्य फुलवणे खचितच  सोपे काम नाही. अंमली पदार्थ तस्करीने बदनाम व रसायनयुवत किटकनाशके यांच्या अतिवापराने कॅन्सरला पोषक वातावरण वाढत असलेल्या (उडता?) पंजाब या राज्याचे मुख्यमंत्रीपद भगवंत मान या विनोदी कलाकाराकडेच आहे. ‘मेरा नाम जोकर' या राजकपूर निर्मित चित्रपटाने विदूषकाच्या वास्तव जीवनातील दारुण परिस्थितीवर झगझगीत प्रकाश टाकला होता.

मराठी साहित्य, मराठी नाट्य-चित्रपट-दूरचित्रवाणी मालिका जगत विनोदाने पूर्वीपासूनच समृध्द आहे. राम गणेश गडकरी, चिं. वि. जोशी, आचार्य प्र.के अत्रे, पु.ल.देशपांडे, रमेश मंत्री, वि.आ. बुवा, द.मा. मिरासदार, जयवंत दळवी, गंगाराम गवाणकर, वसंत सबनीस हे व असे दर्जेदार साहित्यिक मराठी रसिकांना लाभले. या साहित्यिकांच्या विनोदरचना रसिकांपर्यंत पोहचवणारे पट्टीचे कलाकारही होते, आहेत. धुमाळ, राजा गोसावी, शरद तळवलकर, दादा काेंडके, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन, सतिश तारे, दिलिप प्रभावळकर, विजय चव्हाण, सुधीर जोशी, अजय वढावकर, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सचिन पिळगावकर, सिध्दार्थ जाधव, संजय नार्वेकर, अतुल परचुरे यांच्या जोडीला समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, डॉ. निलेश साबळे, भालचंद्र (भाऊ ) कदम, अंशुमन विचारे, गौरव मोरे, अरुण कदम, दत्तू मोरे, पंढरीनाथ कांबळे, श्याम राजपूत, प्रभाकर मोरे, पृथ्विक प्रताप, ओंकार भोजने, ओंकार राऊत, निखिल बने, भूषण कडू, नंदकिशोर चौगुले, अभिजित चव्हाण, आनंदा कारेकर, योगेश शिरसाट, आशिष पवार, जयवंत भालेकर, प्रियदर्शन जाधव, पुष्कर श्रोत्री, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रीके, श्रमेश बेटकर, प्रथमेश शिवलकर, निमिष कुलकर्णी अशी मोठी फौज आहे. यातही पूर्वीपेक्षा विनोदी कलावतींचा भरणा हल्ली अधिक दिसून येतो. जाडेपणा हे काही वैगुण्य नव्हे, ते एखाद्या कलावतीचं सामर्थ्यही असू शकतं याचा पडताळा संजीवनी जाधव, निर्मिती सावंत, विशाखा सुभेदार, वनिता खरात, सुप्रिया पाठारे, स्नेहल शिदम, इशा डे आदि कलावंत महिलांनी पुरेपुर दिला आहे. श्रेया बुगडे, नम्रता संभेराव, प्रियदर्शिनी इंदुलकर, रसिका वेंगुर्लेकर, शिवाली परब, चेतना भट, प्राजक्ता हनमधर या व अशा कित्येक महिला कलावतींनी मराठी रसिकांना मनमुराद हसवून काही काळ का होईना, तणावमुक्तीचे सुख दिले आहे.

या प्रभावळीत विजय दत्ताराम कदम हे एक उठून दिसणारे नाव होते. त्यांनी या जगाच्या रंगमंचावरुन १० ऑगस्ट २०२४ या दिवशी एविझट घेतली. त्यांना कॅन्सरने त्रस्त केले होते. तुमच्या आमच्यातला एक वाटावा असा साधा चेहरा लाभलेले विजय कदम हे पट्टीचे विनोदवीर होते. दादा काेंडके यांनी साकारलेले व प्रचंड लोकप्रियता लाभलेले ‘विच्छा माझी पुरी करा  हे लोकनाट्य  मला काही पाहता आले नव्हते. पण मी विजय कदम यांना ‘टूरटूर' मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे सोबत पाहिले व ‘विच्छा माझी पुरी करा' च्या संचातही पाहिले होते. ‘विच्छा'चे प्रयोग सुरु असतानाच कलावती पद्मश्री जोशी यांच्यासोबत त्यांचे प्रेम जुळुन विवाह ठरल्याने ‘विच्छा'च्या जाहिरातीत ‘विजय कदमना पद्मश्री मिळणार' अशा पंक्ती झळकल्याचे मी वाचले आहे. पद्मश्री जोशी म्हणजे अभिनेत्री व कश्मीर फाईल्सची निर्माती पल्लवी जोशी-अग्निहोत्री, तत्कालिन बाल कलाकार मास्टर अलंकार जोशी यांची बहीण होय. कालांतराने ‘विच्छा'मधील खूप लांबीची भूमिका व भरपूर संवाद यामुळे थकायला होत असल्याचे नमूद करत विजय कदम यांनी ‘विच्छा' सोडले. तेव्हा ती भूमिका जनार्दन लवंगारे यांच्याकडे गेली; पण त्यानंतर मात्र ‘विच्छा'चे फार प्रयोग काही झाले नाहीत हा इतिहास आहे. ‘हळद रुसली कुंकू हसलं' मध्ये विजय कदमांच्या नायिकेची भूमिका अश्विनी भावे यांनी केली होती; तर खलनायक बनले होते सतीश पुळेकर. एसआरजीएम प्रॉडवशनच्या ‘आता तरी खरं सांग' या नाटकाच्या एका महोत्सवी प्रयोगाला विजय कदम पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते; त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी  मला  मिळाली होती.  वाशी येथील साहित्य मंदिरात विजय कदम आले असता नवी मुंबईतही त्यांना भेटण्याचा योग आला होता. ‘विजयश्री' या त्यांच्या संस्थेने निर्मिलेल्या खुमखुमी या एकपात्री सादरीकरणाचे प्रयोग परदेशातही झाले होते. त्यामुळे त्यांना मराठी रसिक प्रेक्षक जिथे जिथे आहेत, त्या देशांतही चांगली लोकमान्यता लाभली होती.

इतरांना सतत हसरे ठेवायच्या प्रयत्नात असणाऱ्या कलावंत, लेखक, निर्माते, दिग्दर्शक अशासारख्यांच्या नशिबी कॅन्सर वा अन्य तापदायक व्याधींमुळे शारिरीक यातना सहन करायला लावणारे अनुभव येतात, त्यावेळी सच्चा, संवेदनशील, सहृदयी, कलेवर निस्सीम प्रेम करणाऱ्या रसिकांनाही त्याच्या वेदना जाणवतातच. ३ जुलै २०१३ रोजी अशाच पावसाळ्याच्या दिवसात विनोदवीर सतिश तारे यांनी या जगाचा निरोप घेतला तेंव्हा त्यांचं आयुष्य होतं केवळ ४८ वर्षे. पायाला झालेल्या दुखापतीनंतरही त्यांनी वाशीच्या विष्णूदास भावे नाटकात प्रयोग केला व त्यानंतर तो पाय कापावा लागला आणि त्यांनी मग देहच ठेवून ते अनंताच्या वाटेवर निघून गेले. आता विजय कदम या पट्टीच्या विनोदवीराने  तुम्हा आम्हाला हसवता हसवता रंगभूमीसह सर्वांना अलविदा केला आहे. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली ! - राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक दै. आपलं नवे शहर

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 कर्जात बुडालेले स्वातंत्र्य