दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
भारताच्या स्वातंत्र्यापुढील आव्हाने
१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश इंग्रजांच्या बंधनातून स्वातंत्र्य झाला. आपण स्वतंत्र्य होऊन ७७ वर्ष झालीत. ह्या ७७ वर्षात बरेच बदल व प्रगती सुद्धा झाली. स्वातंत्र्याचे मूल्य हे खुपच मोलाचे असते. ह्यासाठी बऱ्याच जणांनी बलिदान दिले आणि आपल्या प्राणांची आहुतीसुद्धा दिली.
ह्या ७७ वर्षात देशात हरितक्रांती झाली. त्यामुळे देश हा अन्नधान्याने सुजलाम सुफलाम झाला. तसेच श्वेत क्रांतीसुद्धा झाली.इंग्रजांनी जेव्हा देश मुक्त केला तेव्हा आपल्या देशाची बरीच लूट केली. बरेच मौल्यवान ऐवज आपल्या देशातून घेऊन गेले. जेव्हा आपला देश इंग्रजांनी सोडला तेव्हा देश उभारणी हे फार मोठे आव्हान होते. ह्या ७७ वर्षात देशात रोजगार निर्मिती करण्यात आली. युवकांना रोजगार मिळाले. ते आपल्या पायावर उभे राहिले. सार्वजनिक उपक्रमांची निर्मिती करण्यात आली. ह्यामुळे करोडो रोजगार युवकांना मिळाले. दळणवळणाची साधने उपलब्ध करण्यात आले. रेल्वेचा विस्तार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. आज देशात कानाकोपऱ्यात रेल्वेचे जाळे विखुरलेले आहे. बँकांचा, बी.एस.एन.एल. व शिक्षणाचा खूप मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला. शिक्षणाच्या क्षेत्रात तर खूप मोठी प्रगती झाली. सुरुवातीला सगळीकडे सरकारी शाळा आणि महाविद्यालयांचा विस्तार करण्यात आला. मोफत शिक्षण देण्यात आले. आरोग्य सेवासुद्धा सर्वांना मोफत देण्यात आली. बजेटमध्ये शिक्षण, आरोग्य व सुरक्षेसाठी विशेष प्रावधान करून प्राथामिकता देण्यात आली.
ह्या महान देशात देशात बहूधर्माचे, जातीपातीचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. सर्वांमध्ये एकोप्याची देशभावना जोपासली जात आहे. आपला देश तंत्रज्ञावर अधिक भर देऊन प्रगतीपथावर आहे. आपण सहिष्णू असल्यामुळे अजूनही एकोपा टिकून आहोत.१९९१ नंतर रिफॉर्म्स आले आणि आपल्याच नाही तर संपूर्ण जागाच चेहरा मोहरा बदलला. ह्या रिफॉर्म्समुळे सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले.आज संपूर्ण विश्वात देशात कुठेना कुठे असंतोषाची धग पेटताना दिसत आहे. १९९१ नंतर रशियाचे विघटन झाले आणि वादाची ठिणगी पेटली. बरेच वर्ष झालीत रशिया आणि युक्रेन युद्ध सुरूच आहे. ही शेवटी एकमेकांचे अस्तित्व व एकदुसऱ्यावर वरचढ होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ह्याच्या झळा जगामध्ये सर्वांनाच सोसाव्या लागत आहे. म्हणजे ह्या दोन देशात काही तरी घुसमट सुरु आहे आणि ह्यामुळे दोन्ही देशाचे जीवितहानी सोबतच इतर हानीसुद्धा मोठ्या प्रमाणात झाली आहे व होत आहे. हे कुठेतरी थांबविणे काळाची गरज आहे.
आपल्या देशाच्या शेजारच्या राष्ट्रांकडे नजर टाकली तर श्रीलंका, पाकिस्तान आणि आता बांगला देश हे सतत काही ना काही कारणांसाठी घुसमटत असतात. दोन वर्षांपूर्वीची श्रीलन्केतील घटना ही खरोखर विघटनकारी होती. जनतेने आक्रमण करून सरकारचा पाडाव केला होता व राष्ट्रप्रमुखांना पळून जावे लागले. देशाची परिस्थिती डबघाईस आली होती. तेच आज बांगला देशाचे झाले. नागरिकांनी उठाव करून देशाच्या पंतप्रधानांना पिटाळून लावले व देश आपल्या ताब्यात घेतला. ही विदारक घटनासुद्धा हितावह नाही. हे दोन्ही देश आपले शेजारी आहेत आणि ह्याकडे आपलं दुर्लक्ष करून चालणार नाही. ही घग मोठ्या प्रमाणात शेजारी राष्टांमध्ये पोहचू शकते. आज आपण रशिया-युक्रेन, श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश ह्या देशांमध्ये अशांतीचा एकसमान धागा आपणाला दिसून येतो. तो म्हणजे देशाची खालावलेली आर्थिक परिस्थिती, मोठ्या प्रमाणात बेरोजगारी, आरक्षण आणि अल्पसंख्य असलेल्या धर्मांवर अतोनात अत्याचार. ह्या चार मुद्यांवर जनतेने उठाव केला आणि बंडाचे निशाण रोवले.
आपण आपल्या देशाचा विचार केला तर हेच चार विषय सध्या धगधगत आहेत. देशात बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ह्याला वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. शिक्षणावर भर देण्याची गरज आहे. काही विद्यापीठांकडे निधी नसल्यामुळे अभ्यासक्रम बंद करण्याची शिफारस केली जाते हे हितावह नाही. आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात पेट घेतो आहे. हा मुद्दा नागरिकांना भावतो आहे. कारण की रोजगार नाही आहेत व आरक्षणामुळे रोजगार मिळेल अशी कुठेतरी वेडी अशा आहे. अगोदर रोजगार उपलब्ध झाला तरच आरक्षणाचा फायदा होऊ शकतो. दुसरीकडे खासगीकरण आणि कंत्राटीकरण जोरात आहे. कंत्राटीकरणामुळे कामगारांचे शोषण होत आहे आणि रोजगार खुंटले आहेत.
धर्म हा खुपच संवेदशील विषय आहे. राजकारणी हा विषय आपल्या सोयीने निवडणूक आल्या की हाताळत असतात. हा विषय खुपच जानतेपणाने हाताळण्याची गरज आहे. आपला देश हा संस्कृतीने, एकोप्याने व धनसंपदेने देश समृद्ध आहे. आपल्याकडे खूप संपत्ती आहे. वन संपदा आहे. मोठ्या प्रमाणात मनुष्यबळसुद्धा आहे. आपली जमीनसुद्धा सुपीक आहे. त्यामुळे जगाच्या नजरा आपल्या देशावर आहेत. म्हणून वारंवार ह्या ना त्या कारणाने आपल्या देशावर आक्रमण करण्याचा प्रयत्न होतो आहे. आपल्या देशाची राज्यघटना ही खूप मोठे बलस्थान आहे. त्यामुळे आपण आज एकसंघ आहोत ही खरोखर अभिमानाची बाब आहे. सध्या जे हे चार मुद्दे शेजारी राष्ट्रात घुसमटत आहेत, त्यावर बारकाईने चिंतन व्हायला हवे. -अरविंद मोरे