दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
कौतुक प्रत्येकाला आवडते
एखाद्याला दुषणे देणे सोपे आहे, माघारी किंवा समोरची टीका, लावालावी सोपी आहे; पण एखाद्याचे थेट तोंडावर त्याहून त्याच्या माघारी कौतुक करणे फारच कठीण. कठीण या अर्थाने की इतक्यात कोणाचे चांगले कोणाला दिसेनासे झाले. ज्यांना दिसले ते सांगायला तयार नाहीत. मुळात चांगली माणसे कमी, वाईट वृत्तीची जास्त वाढत आहेत. टोमॅटोचे बी टाकल्यावर टोमॅटो नक्कीच येईल; पण मिरचीचे बी टाकल्यावर टोमॅटो थोडे येणार आहे, नेमके तसेच चांगुलपणा वाढविण्यासाठी चांगल्यांनाच सामोरे यावे लागेल. वाईटांचे थोडे ते काम आहे?
आज माझ्या सहकाऱ्याला सहकारी म्हणून सहकार्य केले. (अरे वा! अनुप्रास....) काम फत्ते झाल्यावर दोघांनाही आनंद झाला; पण मला त्याहून जास्त झाला. कारण काम झाल्यानंतर प्रतिसाद म्हणून धन्यवादापेक्षा ‘आपण हे खूप चांगल्या प्रकारे केले! हा प्रतिसाद खूप आनंद देवून गेला. अर्थात ते आपले कौतुक होते. मनात होणाऱ्या गुदगुल्या मला काही आवरता आल्या नाहीत. मुळात ते काम सुरू करण्यापूर्वी माझी अजिबात इच्छा नव्हती. आधीच पुष्कळ काम करून शरीर - मन दोन्हीही पुरते वैतागून गेले होते. पण कोणाचे मन मोडणे व पुन्हा जोडणे मला जमत नाही म्हणून होकार दिला गेला. सरतेशेवटी सहकाऱ्याच्या त्या मनमोकळ्या कौतुक वर्षावाने सर्वच मरगळ दूर झाली आणि एक नवी ऊर्जा नवीन काम करण्यासाठी अंगात भरली.
कौतुक ही एक अशी गोष्ट आहे जे प्रत्येकालाच आवडते. कोणी ते दाखवते, तर कोणी दाखवत नाही पण आवडण्याचा भाव हा आतमध्ये सारखाच असतो. कोणी कौतुक करावे म्हणून काम करते, तर कोणी आपले ते काम आहे म्हणून करते तर कोणी ते करावे लागते म्हणून करते. पण सरतेशेवटी जो कौतुकाचा वर्षाव असतो ते आवडणार नाही आणि पुन्हा कामासाठी ते प्रेरक ठरणार नाही असे बहुदा कोणी नसते. राव, रंक, लहान, थोर सर्व यात सारखेच गुंफले आहेत. कोणाला मोठ्याकडून त्या कौतुकाची अपेक्षा असते तर कधी लहानगेही नकळत खरे बोलून जातात जे आपले मन खुलविण्यासाठी पुरेसे असते.
कौतुक म्हणजे एक शाब्दिक बक्षीस आहे. जिथे पैसा खर्च करण्याची गरज नाही, जिथे आपल्याकडून अधिकचे कष्ट उपसण्याची गरज नाही. फक्त कौतुकाला स्पर्श करणारे चार गोड शब्द तेवढे बोलावे लागतील. ते गोड शब्द असे काही जादू करतात की खिन्न पडलेला चेहराही खुलून जातो. आनंद कितीही दाखवू नाही म्हटले तरी चेहऱ्यावरची लाली काही लपता लपत नाही.
प्रत्येक गोष्टीचा एक शोध असतो जो कोणी न कोणी कधीतरी घेतलेला असतो; आणि प्रत्येक शोध हा गरजेतूनच निर्माण झालेला आहे. (काही बाबतीत जिज्ञासा पण असते.) पण ‘कौतुक ही बाब मुळात शोधली गेली ती आपले काम काढून घेण्यासाठी; ज्यात कौतुक अगोदर केले गेले आणि काम नंतर. जिथे कौतुक आधी व काम नंतर करायचे असते तिथे स्वार्थ दाटलेला असतो. कारण काहीतरी कोणाकडून काढून घ्यायचे असते. तर ज्याठिकाणी काम आधी व कौतुक नंतर असते तिथे खऱ्या अर्थाने शाब्दिक वंदन केले जाते. जे तुमच्यातल्या गुणांची खरीखुरी पोचपावती/पारख असते. सारखे कौतुक करत राहणे हे एखाद्या माणसाचा चांगुलपणा सांगून जाते तर कधी भविष्याचे नियोजन म्हणूनही पाहता येईल ज्यात एखाद्याची दूरदृष्टीही असू शकते. सगळ्यात महत्वाचे सांगायचे म्हणजे एखाद्याला दुषणे देणे सोपे आहे, माघारी किंवा समोरची टीका, लावालावी सर्वच सोपी आहे; पण एखाद्याचे थेट तोंडावर त्याहून त्याच्या माघारी कौतुक करणे फारच कठीण. कठीण या अर्थाने की इतक्यात कोणाचे चांगले कोणाला दिसेनासे झाले. ज्यांना दिसले ते सांगायला तयार नाहीत. मुळात चांगली माणसे कमी, वाईट वृत्तीची जास्त वाढत आहेत. यामागे कारण हे की हीच चांगली म्हणवली गेलेली माणसे स्वतः चे कौतुक ऐकायला आसुसलेली आहेत; पण दुसऱ्यांसाठी कधी अवाक उच्चारत नाहीत. जिथे चांगल्यांचा परीघ वाढू पाहतोय तिथे हेच चांगले अडसर ठरत आहेत. टोमॅटोचे बी टाकल्यावर टोमॅटो नक्कीच येईल; पण मिरचीचे बी टाकल्यावर टोमॅटो थोडे येणार आहे, नेमके तसेच चांगुलपणा वाढविण्यासाठी चांगल्यांनाच सामोरे यावे लागेल. वाईटांचे थोडे ते काम आहे.
गुणग्राहकता नावाची एक गोष्ट आहे ज्यात लोकांतले गुण पाहून ते अंगी बाणावे लागतात. तसे वागताना कधी तोंडातून गोड निघत असेल तर ते आपसूक जावू द्यावे लागते. दुसऱ्यांचे कौतुक केल्यावर पण एक समाधान लाभते; ते समाधान आपण दूर ठेवून ह्या निरामय जगाचा निरोप घेणे उचित नाही.
अगोदर सांगितल्याप्रमाणे कौतुक करण्यापेक्षा ऐकणे हे प्रत्येकाला आवडते. तिथे तुमच्या या अधिक बखान स्वभावाचा लोकं गैरफायदापण घेवू शकतात. जी आधीच मी स्वार्थी गटात उलगडलेली आहेत, त्यांपासून आपण सावध राहणे आवश्यक आहे. आपण कोणाच्या कामी येत असू तर ते आपले सद्भाग्यच आहे. कोणाची मदत केल्याने आपले हात बळकटच होत असतात. जसे ज्ञान दिल्याने वाढते तसेच काही. स्वार्थ साधणारे स्वार्थ साधत असतील तरी काही हरकत नाही. आपण एखाद्याच्या कामी उतरलो ही गोष्ट काय कमी मोठी आहे? पण समोरची व्यक्ती जर आपली मुर्खात तुलना करून स्वार्थ साधत असेल आणि आपल्याला ते कळत नसेल तर आपण मूर्खच होवूत; आणि त्याच प्रवर्गात रमण्यात आपण वेळ घालत असू तर वेळ वाया तर गेलाच; पण एका चुकीच्या व्यक्तीसाठी गेला ही बाब खूप मोठी व त्याहून जास्त वेदनादायी आहे.
मुळात हे लिहिण्यामागे आपण लोकांचे कौतुक ‘नेहमीच करावे हा हेतू नाही. कौतुक असायला हवे पण योग्य व्यक्तीचे योग्य वेळी. कौतुक करावे पण जे खरे असेल तिथे. आपला स्वार्थ साधण्यासाठी कौतुक कधीच करू नये. आपल्याला कोणी चांगले म्हणावे म्हणून आपणही काम करून तो वर्षाव घेवू नये. तुम्हाला ते आवडते म्हणून करावे. वर्षाव तर आपोआपच होईल. मनाचे समाधान महत्वाचे आहे. त्यासाठी कौतुकाचा बुस्टरच लागावा हे जरुरी नाही, ते जरुरी करूही नाही. आपल्याला काही नाही जमले तर शांत बसावे. तुम्ही कौतुक करणारे असो की ते ऐकणारे असो ओढून ताणून त्यात गुंफून ऊर्जा वाया घालवणे व्यर्थ आहे.
शेवटी तुकोबारायाच्या काही ओवी लिहाव्याशा वाटतात...
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ
आइका जी तुम्ही भक्त भागवत। कराल ते हित सत्य करा
कोणाही जीवाचा न घडावा मत्सर। वर्म सर्वेश्वरपूजनाचे
तुका म्हणे एका देहाचे अवयव। सुखदुःख जीव भोग पावे
- अमोल चंद्रशेखर भारती