दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
राष्ट्रध्वजाचा सन्मान आपले राष्ट्रीय कर्तव्यच !
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कागदी आणि कापडी राष्ट्रध्वज सर्वत्र विक्रीसाठी आले आहेत. ५-१० रुपयांत मिळणारा राष्ट्रध्वज खरेदी करणे सोपे आहे; मात्र त्याचा योग्य तो सन्मान राखण्याची भावना आपल्यात निर्माण झाली आहे का हे अभ्यासनेही आज गरजेचे बनले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या एका पिढीने अपरिमित हालअपेष्टा सहन केल्या; मात्र त्यानंतरच्या पिढीने पुढच्या पिढीवर जे देशप्रेमाचे संस्कार करायला हवे होते ते न केल्याने स्वातंत्र्याचे मोल आजच्या पिढीला तितकेसे उरलेले नाही.
जगातील सर्वात प्राचीन संस्कृती लाभलेल्या भारत देशावर आजतागायत असंख्य आक्रमणे झाली, वैभवसंपन्न भारताची लुटारू आक्रमकांनी अपरिमित लूट केली. व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेल्या मूठभर इंग्रजांनी देशातील जातीपातीत भेद निर्माण करून भारतावर दीडशेहून अधिक वर्षे राज्य केले. भारतमातेला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी असंख्य क्रांतिकारकांनी प्राणांची आहुती दिली; तर कित्येकांनी आपले संपूर्ण आयुष्य तुरुंगात काढून इंग्रजांनी केलेले अनन्वित अत्याचार सहन केले. त्यांच्या त्यागातून प्राप्त झालेल्या स्वातंत्र्याचे महत्व आजच्या तरुणवर्गामध्ये तितकेसे राहिलेले नाही. खेळांचे सामने आणि राष्टीय सण या दिवशी मात्र भारतीयांमधील देशप्रेम मोठ्या प्रमाणात उफाळून येते. राष्ट्रध्वजातील तीन रंगाचा कल्पकतेने वापर करून वेगवेगळ्या डिझाइन्सचे लहान मुलांसह मोठ्यांचेही टीशर्ट बाजारात विक्रीसाठी आली आहेत. तिरंग्याची छटा दिसणारे टीशर्ट्स, शर्ट्स, सदरे, स्त्रियांचे सूट, साड्या १५ दिवस आधीपासूनच ऑनलाईन विक्री करणाऱ्या संकेतस्थळांवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. व्यापारी वर्गाने आपल्या दुकानांच्या दर्शनी भागावर तिरंग्याच्या रंगाची सजावट, स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणारे संदेश रंगवण्यास सुरुवात केली आहे. सामाजिक संकेतस्थळांवरसुद्धा देशभक्तीपर संदेश, टेम्प्लेट्स, प्रोफाइल फ्रेम्स उपलब्ध होऊ लागल्या आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक मंडळे, संस्था, शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यासाठीचा सरावसुद्धा युद्धपातळीवर सुरु आहे. बच्चे कंपनी शाळेतील ध्वजवंदनाच्या निमित्ताने द्यायच्या भाषणांचा सराव करताना दिसू लागली आहेत. शहरातील नाक्यांवर, सिग्नलवर कागदी आणि कापडी राष्ट्रध्वज, बॅज विकणारी मुले दिसू लागली आहेत. दूरदर्शन वाहिन्यांवरील रिॲलिटी शोजमधूनही देशप्रेमाची गाणी, नृत्य यांचे सादरीकरण केले जाऊ लागले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने वाहिन्यांवर देशभक्तीवर आधारित चित्रपट दाखवण्यात येतात.
राष्ट्रीय सणांच्या निमित्ताने रस्त्यावर पडलेले ध्वज आणि ध्वजांचे अवशेष गोळा करून त्यांची ध्वजसंहितेनुसार योग्य ती विल्हेवाट लावण्याचे काम काही स्वयंसेवी संघटना दरवर्षी करत असतात. मात्र त्यांच्यावर ही वेळ येऊच न देण्याची जबाबदारी आपली नव्हे काय? स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपले राष्ट्रप्रेम दाखवण्यासाठी राष्ट्रध्वजाचे बॅज आपण छातीवर लावून मिरवतो. गाड्यांवर, घरांवर, दुकानांवर ध्वज फडकावतो, कागदी ध्वज विकत घेऊन ते पाल्यांना देतो; मात्र ते फाटतात, हरवतात तेव्हा ‘जाऊ दे, ५ रुपयांचा तर झेंडा होता' असे विचार आपल्या मनात येतात आणि आपण ते शोधायचा प्रयत्नही करत नाही. या दिवशी रस्त्यावरून जाताना एखादा ध्वज रस्त्यावर पडलेला दिसला तर तो उचलून खिशात ठेवण्याचा विचार तर येतो; मात्र आजूबाजूचे लोक काय म्हणतील या विचाराने आपण तसे करण्याचे टाळतो. खरेदी केलेले ध्वज पुढील राष्ट्रीय सणासाठी जपून ठेवतो का किंवा ते फाटले असतील तर ध्वजसंहितेनुसार त्या ध्वजांची विल्हेवाट लावतो का? राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासंदर्भात शासनाच्या वतीने प्रतिवर्षी ध्वजसंहिता प्रकाशित करण्यात येते मात्र ती वाचण्याची तसदी आपण कधी घेत नाही.
राष्ट्रध्वज हे देशाच्या सन्मानाचे प्रतीक असते त्यामुळे त्याचा योग्य तो मान राखणे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. देशप्रेमापोटी आपल्या एका पिढीतील शेकडो क्रांतिकारकांनी प्राणांची आहुती दिली, छातीवर गोळ्या झेलल्या, घरादाराची राखरांगोळी केली, आयुष्यभर कारावास भोगला. त्यांच्याच बलिदानामुळे आज आपण स्वातंत्र्यात सुखाने जगत आहोत. लोकशाही व्यवस्थेच्या सुख सुविधा उपभोगत आहोत. राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी आजही आपले सैनिक सीमेवर ऊन, वारा, पाऊस कशाचीच तमा न बाळगता खंबीरपणे उभे असतात त्या राष्ट्रध्वजाचे उचित मूल्य आपल्या अंतर्मनात बिंबायला हवे. राष्ट्रीय सणांच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा एकही राष्ट्रध्वज रस्त्यावर इतस्ततः पडलेला दिसणार नाही तेव्हाच आपल्यातील राष्ट्रध्वजाविषयीची अस्मिता जागृत झाली असे म्हणता येईल. - जगन घाणेकर