टिव्ही, व्हिसीआर आणि पिक्चरचं वेड

त्या काळातील पिक्चरने आमच्या सर्वांचे जगणं सुसह्य केले होते. काही क्षण का होईना दुःख, त्रास, त्राण विसरून लोक त्या पिक्चरशी समरस होऊन जात असतं. आपल्या गावा व्यतिरिक्त ही एक वेगळं जग आहे आणि त्या जगात खूप काही नवीन गोष्टी घडतात हे लोकांना पिक्चरने शिकवलं. मुंबई, पुणे, कोल्हापूर या स्वप्नवत शहरांविषयीची माहिती सर्वांना कळू लागली. एकंदरीत ग्रामीण भागातील लोक मनावर पिक्चरचा प्रभाव मोठ्या प्रमाणात होत होता.

आमच्या लहानपणीचा असा एक मंतरलेला काळ (१९९०-९९) होता की कोणाच्या घराची वास्तुशांती असो, कोणाच्या लग्नाची पुजा असो, शिवजयंती असो, की घरगुती गणपतीचा उत्सव, की बारशाचा कार्यक्रम असो... एका टीव्हीवाल्याकडून  TV-VCR - कॅसेट भाड्याने आणून पिक्चर गावात लोकांना दाखविण्यात येत असे. आणि तेव्हाची TV-VCR वर पिक्चर बघण्याची मज्जा आताच्या मल्टिप्लेक्स थिएटरपेक्षा नक्की वेगळी होती.

सकाळी सकाळी गावात लाऊड स्पीकर वर गाणी लागली की लोक अंदाज घ्यायचे की आज कोणाच्या घरी स्पिकर वाजतोय. कारण लोकांना खात्री असायची की आज पिक्चर मात्र नक्की असणार...

तेव्हा गावातील महिला, पुरूष माणसं शेतातील कामे लवकर आटपून घरी यायचे, गुरांकडे जाणारी लोक वेळेआधी घरी यायचे, लहान मुलंही लवकर अभ्यास करून मोकळे व्हायचे, महिला मंडळी घाईघाईने घरातील जेवणाची तयारी करून काम आटोपून घ्यायची.

अख्खा गाव पिक्चर बघण्यासाठी न चुकता लहान, थोर मंडळी सहित सर्व एकत्र बसून पिक्चर बघत असत. मग काय होते, याची उत्सुकता असायची... पिक्चरमध्ये पुढे कोण कोणाला मारतोय आणि काय होतेय, काय होणार नाय याचीही चर्चा करत... कधी हसत तर कधी रडत सर्व काही पिक्चर मधील खरंच आहे असं मनाला लावून घेत असतं... हिरो किंवा हिरोईनला गुंडानी मारलं तर वाईट वाटून इतकं घ्यायचे की अक्षरशः त्या गुंडाना शिव्याही देत असत. पिक्चर लोक इतकं मनाला लावून घेत असत की तो आपल्या जीवनाचा एक भाग आहे असे स्वतःची समजूत करून घेत असतं.

लक्ष्या, अशोक सराफ, सचिन यांचे अशी ही बनवाबनवी, गंमत जंमत, बाळाचा बाप ब्रह्मचारी, सगळीकडे बोंबाबोंब असे विनोदी चित्रपट पाहून मनसोक्त हसणारे लोक, माहेरची साडी, लेक चालली सासरला असे इमोशनल चित्रपट पाहून ओक्साबोक्शी रडत ही असतं...

त्याचसोबत गोविंदा आणि मिथुन यांचे फायटिंगचे पिक्चर (आज त्या चित्रपटांची नाव जरी पाहिली तरी हसायला येते!) मनोरंजन करणारे असायचे. तसही दोन पिक्चर ठेवताना एक मराठी आणि एक हिंदी असा अलिखित नियम गावातील सर्वच लोक पाळत असतं.

दुसऱ्या दिवशी तळीवर, पारावर, खळ्यात, शाळेत त्या पिक्चरची चर्चा होत असे. प्रत्येकजण काही ना काही तरी पिक्चर बद्दल आपलं मत ठोकून देत असत..काही तरुण लोक तर त्या पिक्चर मधील हिरोच्या हेअर स्टाईलची किंवा डायलॉगची स्टाईल कॉपी करण्याचा प्रयत्न करायचे. मी पाहिलेला पहिला हिंदी चित्रपट जॅकी श्रॉफ आणि कुत्रा यांचा तेरी मेहरबानीया' तोही  दारुबाई रामेश्वर मंदिरात.. सुभाषच्या व्हिडिओवर... तेव्हा आमच्या पूर्ण गावात फक्त मंदिरातच लाईट होती, आणि तीही डिम लाईट... तेव्हा ही पिक्चर चालू असताना तीन वेळा लाईट गेली होती. मी पडद्यावर पाहिलेला पहिला मराठी चित्रपट जोतीबाचा नवस' तोही शिमग्याला होळीच्या मांडावर...

मे महिन्याच्या सुट्टीत, मुंबईत असताना आमचा भाऊ रमेश पाटील याने सांताक्रूझ येथे थिएटरमध्ये ज्युरासिक पार्क पिक्चर दाखवला होता आणि त्यांच्या मराठा कॉलनीत अजिंक्य देव यांचा सर्जा' आणि संजय दत्त याचा सडक' सिनेमा व्हिडिओवर पाहिला होता आणि मग गावी आल्यावर मी, माझ्या सर्व मित्रांना त्याच्या गोष्टी ही रंगवून रंगवून सांगितल्या होत्या.

नंतर आमच्या मधलीवाडीत व्हिडिओ आला.. सायकलवर पाय टाकून मारुती भाई वैभववाडीला कॅसेट भाड्याने आणायला चालले की समजायचं आज कुठे तरी पिक्चरची ऑर्डर आहे. गावात कुठेही पिक्चर असला तरी आम्हाला पहिलं कळायचं.. आणि मग आम्ही आगंतुकपणे रात्री तेथे पोहचायचो.. आमचं पिक्चरचं वेड जिथे जिथे पिक्चर असेल तिथे आम्हाला घेऊन जायचं...


त्या काळातील पिक्चरने आमच्या सर्वांचे जगणं सुसह्य केले होते. काही क्षण का होईना दुःख, त्रास, त्राण विसरून लोक त्या पिक्चरशी समरस होऊन जात असतं. आपल्या गावा व्यतिरिक्त ही एक वेगळं जग आहे आणि त्या जगात खूप काही नवीन गोष्टी घडतात हे लोकांना पिक्चरने शिकवलं. मुंबई, पुणे, कोल्हापूर या स्वप्नवत शहरांविषयीची माहिती सर्वांना कळू लागली. एकंदरीत ग्रामीण भागातील लोक मनावर पिक्चरचा प्रभाव मोठ्या प्रमाणात होत होता.

आभासी पिक्चरच्या सहवासात गेलेले ते सुंदर दिवस परत कधीच येणार नाहीत, एवढं मात्र नक्की.. -सुरेश भिवाजी सत्यवती पाटील 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

आरोग्यम धनसंपदा - शिका शरीरावर प्रेम करायला..