आरोग्यम धनसंपदा - शिका शरीरावर प्रेम करायला..

सर्वेऽपि सुखिनः सन्तु। सर्वे सन्तु निरामयाः
सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्चिद्‌दुःखभाग्भवेत्‌

आपल्या ऋषीमुनींनी, पूर्वजांनी सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करतानाच सगळ्यांना निरामय म्हणजेच आरोग्यपूर्ण जीवन लाभावे याचाही उल्लेख केलेला आहे. आरोग्य म्हणजे धनसंपत्ती. प्रत्येक जण आयुष्यात संपदा मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. पण हीच जर संपदा आरोग्याच्या स्वरूपात प्रत्येकाला मिळाली तर मात्र ‘सोने पे सुहागा'च होईल.

उत्तम आरोग्य या शब्दांमध्ये केवळ शारीरिक आरोग्य अभिप्रेत नाही. तर शारीरिक, मानसिक आरोग्य आणि सत्संगती या त्रिगुणांचा सुरेख संगम यात दडलेला आहे. प्रत्येकाने आपले शारीरिक आरोग्य सुदृढ ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. शारीरिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपल्या जीवनात शिस्तपालन, नियमितपणा आणि वक्तशीरपणा हे दिनचर्येचा अविभाज्य भाग झाले पाहिजेत. आरोग्य चांगले राखण्यासाठी माझ्या मते प्रत्येकाला आपल्या शरीररचनेचं ढोबळ ज्ञान असणे अतिशय गरजेचे आहे. शरीरामधील अवयवांचे कार्य कसं चालतं? स्नायू म्हणजे काय? त्यांचे शारीरिक हालचालीत कोणते महत्त्व आहे? हाडे किती आहेत व ती कशी बनतात? अन्नपचन म्हणजे काय ? ते कुठे आणि कसं होतं? त्यात कुठले पाचक रस कुठे मिसळले जातात? पेशींचे कार्य कोणते? डोळ्यांचे काम कसे चालते? रक्तवाहिन्या व केशवाहिन्यांचे सुसंगतीकरण कसे आहे? हृदय आणि फुप्फुसे शरीरात अत्यंत महत्त्वाचे का मानले जातात? मेंदू आपल्या पूर्ण शरीरावर कसे नियंत्रण ठेवतो? ग्रंथी आकाराने लहान असल्या तरी त्यांचे शरीराच्या संपूर्ण रचनेमध्ये किती अनन्यसाधारण महत्त्व आहे? दात आणि नखे काय काम करतात? या अशा शरीरातील प्रत्येक अवयवाचा, त्यांच्या कार्याचा, त्यांच्या परस्पर समन्वयाचा जर आपण बारकाईने विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की विधात्याने आपले हे सुंदर शरीर कलात्मकरित्या निर्माण करताना खूप मेहनत घेतली आहे. आपले शरीर म्हणजे एक चमत्कारच आहे. कोट्यावधी पेशी आपल्या शरीरात असतात. त्यांचा ऱ्हास होतो, नवनिर्मिती होते आणि हे चक्र अव्याहतपणे चालू असते. त्यांचा एकमेकांशी समन्वय एखाद्या विद्वान शास्त्रज्ञालाही अचंबित करेल असाच असतो. असे आपले शरीर आपल्याला होणाऱ्या रोगांची पूर्वसूचना वेळोवेळी त्याच्या बिघडलेल्या कार्यातून देत असते. ते आपल्याला सावध करत असते. पण आपण मात्र त्याकडे सर्रास दुर्लक्ष करतो आणि रोगाने आपल्यावर झडप घातली की पश्चाताप करतो.

शारीरिक आरोग्य चांगले राखण्यासाठी योग्य आहार आणि विहाराची खूप आवश्यकता आहे. आपले रोजचे जेवण परिपूर्ण व संतुलित असावे. कुठेतरी काहीतरी वाचून, ऐकून चुकीचा आहार घेऊन रोगाला निमंत्रण देऊ नये. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक ठेवण आणि त्याला लागणाऱ्या अन्नघटकांची गरज भिन्न आहे आणि म्हणूनच एकाच प्रकारचे अन्न सर्वांनाच योग्य ठरेल असे नाही. रात्री उशिरा भरपूर जेवू नये. आहारात योग्य तेवढ्या पाण्याचाही समावेश असावा. आजकालच्या सोशल मीडियाच्या जमान्यात सर्व माहितीचा आपल्यावर भडिमार चालू असतो आणि त्या सर्व माहिती परस्परविरोधी असतात. या माहितीच्या कोलाहलात सर्वसामान्य माणसाचा नेहमीच गोंधळ उडतो. आपण आजपर्यंत जे अन्नसेवन करत आलो ते बरोबर की चूक हा संभ्रम त्याला पडतो. काही सोशल मीडियावर तर आपल्याला ‘स्वतःच स्वतःचे डॉक्टर बना' असाही सल्ला देतात जो सर्वस्वी अयोग्य आहे. म्हणूनच आपल्याला जे अन्न पचते तेच ग्रहण करावे. उगाचच खूप वेगवेगळ्या प्रकारचे लेख वाचून आपल्या अन्नपदार्थांचे सेवन करण्याच्या पध्दतीत विनाकारण अकस्मात बदल करून शरीर स्वास्थ्य बिघडवू नये.

सुदृढ शरीर राखण्यासाठी व्यायामालाही खूप महत्त्व आहे. प्रत्येकाने रोज ठराविक वेळी काहीतरी शारीरिक हालचालींचा व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायाम वयानुसार आणि आपल्याला झेपेल तेवढाच करावा. सर्वसाधारणपणे चालण्याचा व्यायाम सर्व प्रकारच्या वयोमानाला योग्य ठरतो. व्यायामातही नियमितता असावी. योग्य व नियमित व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते. मन आनंदी राहते. स्नायू बळकट होतात आणि शरीराला आकर्षक आकार येऊन व्यक्तिमत्व उमदे बनते. प्रतिकारशक्तीही वाढते आणि त्यामुळे एकंदरच शरीरयष्टीला वेगळाच तजेला प्राप्त होतो.

शारीरिक आरोग्यात वैयक्तिक, शारीरिक स्वच्छता, घराची आणि परिसराची स्वच्छताही समाविष्ट आहे. आहार व्यायामाबरोबरच आवश्यक विश्रांतीही गरजेची आहे. नेहमीच शांत गाढ सहा-सात तासांची झोप शरीराची झीज भरून काढण्यास मदत करते. शांत झोपेमुळे मेंदू अधिक कार्यक्षम बनतो. योग्य आहार, विहार, स्वच्छता आणि विश्रांती घेऊनही जर आपले मन आनंदी नसेल तर आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते. आपले मन हे अगम्य आहे. अदृश्यपणे ते आपल्या शरीरावर चांगला किंवा वाईट परिणाम करत असते. शरीर सुदृढ ठेवण्याबरोबरच मन सुदृढ ठेवणे हेही अत्यंत गरजेचे आहे. बर्हिमन आणि अंतर्मन हे मनाचे दोन भाग असून बर्हिमनाचे काम निर्णय घेणे आणि अंतर्मनाचे काम आज्ञांचे तंतोतंत पालन करणे हे असते. नेहमी सकारात्मक विचार करावा. चांगले विचार केल्यामुळे त्याचा अंतर्मनावर खूप योग्य परिणाम होतो आणि त्यामुळे आपले मन निरोगी राहण्यास मदत होते.हल्लीच्या शास्त्रीय संशोधनाअंती हे सिद्ध झाले आहे की ७० % आजार हे मानसिक असतात. म्हणूनच मानसिक आरोग्य प्रत्येकाने सांभाळणे गरजेचे आहे. निरोगी मन राखण्यासाठी मन शांत असणे जरुरी आहे.मन शांत ठेवण्यासाठी सामान्य माणसाने खालील गोष्टी अमलात आणाव्यात...

* सुख मिळवण्याचा प्रयत्न जरूर करावा पण सुखाच्या मागे ऊर फुटेपर्यंत धावू नये. * विकारांचे नियमन करावे. प्रेम करणे हे विकारांवर काबू राखण्याचे उत्तम साधन आहे. प्रेमाप्रमाणेच सद्‌सद्विवेकबुद्धी विकारांवर नियमन करण्यास मदत करते. * ध्यानधारणा करावी. ध्यान करतांना मन एकाग्र करून श्वासाच्या लयीवर लक्ष केंद्रित करावे. 

* फक्त आजचा विचार करावा. भूतकाळातील घटनांचा उहापोह आणि भविष्याची नाहक चिंता करून आजचा दिवस वाया घालवू नये. प्रत्येक गोष्टीत फार गुंतून रहायची सवय सोडावी. अगदी अलिप्तपणे वागावे. ज्ञानेश्वरीत सांगितल्याप्रमाणे ..चिकुच्या बी सारखं. दळदार गरात राहूनही स्वतः मात्र कोरडं..

 स्वतःवर प्रेम करावे : आज अनेक मानसिक समस्यांचं मूळ स्वतःकडे दुर्लक्ष होण्यात सापडते असं अभ्यास सांगतो. त्यामुळेच तज्ज्ञ अनेक समस्यांवरचा एक उपाय म्हणून स्वतःवर प्रेम करण्याचा सल्ला देतात. वरकरणी सोपा वाटणारा हा उपाय सहजासहजी शक्य होत नाही. दुसऱ्याची काळजी कशी घ्यायची ते माहित असतं. जेव्हा स्वतःच स्वतःवर प्रेम करण्याची वेळ येते तेव्हा अनेकांना आपण स्वार्थी तर नाही ना, आपण चूक तर करत नाही ना अशा अपराधीपणाच्या शंका येतात. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आदर करावा. सकाळी उठल्यावर आपला चेहरा आरशात निरखावा. डोळे आणि जीभ हे शारीरिक स्वास्थ्याचा आरसा आहे. दिवसातील एक तास तरी स्वतःसाठी राखून ठेवावा आणि त्यावेळी फक्त आपले स्वतःचे छंद जोपासावेत. त्यामुळे आपले मन शांत होऊन आनंदी रहाते आणि साहजिकच शरीराच्या अनेक तक्रारी आपोआपच दूर होतात.

स्वतःवर प्रेम करण्यासाठी..आपल्याला काय आवडतं ते ओळखा इतरांची काळजी घेणं, कोणाला काय हवं नको ते बघणं, हा गुण महिलांची ताकद आहे. पण हे करत असताना त्या स्वतःकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. स्वतःवर प्रेम करण्यासाठी आपल्याला काय आवडतं ते ओळखणं, त्यासाठी वेळ काढणं, वेळ देणं हे जमलं तरच स्वतःवर प्रेम करणं जमू शकतं. आपल्याला जे आवडतं ते ओळखता येणं जितकं महत्त्वाचं तितकंच आपल्याला काय आवडत नाही हे ओळखून ते बळजबरीनं करावं लागत असल्यास त्याला रोखणं यामुळेही स्वतःवरचं प्रेम वाढू शकतं.

‘नाही' म्हणण्यास शिकणंः माझ्या मते आनंदी आयुष्याचे गुपित म्हणजे योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी ‘नाही' म्हणायला शिकणं! कारण कोणत्याही गोष्टीला हो किंवा नाही म्हणायचा अधिकार आपल्याला नक्कीच आहे! मन ‘नाही' म्हणत असेल, तर ‘हा' म्हणू नका. विश्वातील टॉप यूनिवर्सिटी (University of California in San Francisco) मधे झालेल्या संशोधनावरून असे लक्षात आले आहे की ज्या लोकांना नकार देताना फार कठीण जाते त्यांना तणाव, निष्क्रियता आणि डिप्रेशन यांचा सामना करावा लागतो. आणि त्यामुळे त्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास खुंटतो. नाही म्हणणे अनेक लोकांसाठी मोठे आव्हान असते. नाही हा अत्यंत प्रभावशाली आणि शक्तिशाली शब्द आहे आणि आपण त्याचा योग्य उपयोग करताना मागेपुढे पाहण्याची आवश्यकता नाही.  कुठल्याच नात्यामध्ये ‘नाही' म्हणण्यासाठी आपली जीभ रेटत नाही. समोरच्या व्यक्तीला काय वाटेल, याच विचारात आपण सगळा वेळ घालवतो आणि ‘नाही'  म्हणण्याची संधी गमावून आपल्या पायावर धोंडा मारून बसतो. आपण एखाद्याला नकार देतो तेव्हा त्याला वाईटच वाटणार आहे असं गृहित धरलं जातं. नाही म्हणणं हा वैयक्तिक निर्णय आहे. आणि प्रत्येकजण त्यासाठी स्वतंत्र आहे. अनेकदा आपण दुसऱ्यांचं मन राखण्यासाठी कुठलं तरी काम करण्यास तयार होतो, पण त्यात आपलंच नुकसान होतं.ह्याचा प्रत्यय बहुतेक वेळा ऑफिसच्या कामात येतो. आपण सगळ्यांनीच एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवणं गरजेचं आहे ती म्हणजे चांगल्या  रिलेशनशीपमध्येसुध्दा कधीकधी नाही म्हणणं देखील जरुरी आहे. उदा. मुलांच्या अवाजवी मागण्या मान्य न करणं. ‘नाही'  म्हणणं याचा अर्थ जबाबदारी झटकणं किंवा कर्तव्य पार पाडण्यात कसूर करणं असा नाही;  तर सारासार विचार करून आपलं स्वत्व जपण्यासाठी सुयोग्य पध्दतीने न पटलेल्या गोष्टीला नाही म्हणणं असा मला अभिप्रेत आहे. मन हलकं फुलकं ठेवण्यासाठी,आनंदी जगण्यासाठी सतत ‘हो' म्हणण्याचं दडपण झुगारुन ‘नाही' म्हणता येणं ही आवश्यक बाब आहे.

इतरांशी तुलना करु नका : आपल्याकडे जे आहे ते न बघता सतत इतरांकडे किती जास्त, किती छान आहे, हे बघण्याची सवय असल्यास मन स्वतःबद्दल कायम असमाधानी राहातं. आपली आणि इतरांची तुलना करणं थांबवणं सुदृढ राहण्यासाठी अतिशय आवश्यक आहे.

स्वतःची ताकद ओळखा : प्रत्येक व्यक्ती नियंत्याने वेगळी बनवलेली आहे. स्वतःतल्या ताकदीचा, गुणांचा आदर करता आला तर आपल्यातली नकारात्मकता कमी होवून इतरांकडे बघताना दोष टाळून गुणांचा, त्यांच्यातील ताकदीचा विचार करता येणं शक्य होतं.स्वतःमधल्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन दुसऱ्याशी तुलना केल्यामुळे आपण सतत स्वतःच्या चुका, दोष शोधत राहातो. यामुळे आपलं आपल्यावरचं प्रेम कमी होतं. सुखाचा मार्ग समाधानात असतो. हे समाधान तेव्हाच लाभतं जेव्हा आपण आपल्याकडे काय आहे ते बघतो.

स्वतःला माफ करा :  इतरांच्या चुका आपण सहजासहजी माफ करु शकतो. पण स्वतःला माफ करण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपण हात आखडता घेतो. छोटीशी चूक झाली तरी स्वतःला दोष देत रहाण्याच्या सवयीमुळे प्रचंड अपराधीपणाची भावना आपण सतत मनात बाळगतो आणि त्यामुळे आपलं आपल्यावरचं प्रेम कमी होतं. या साऱ्या गोष्टींच्या सरावामुळे आपले मन निरोगी राहण्यास आणि आपल्या निरामय जीवनाची वाटचाल सुकर होण्यास नक्कीच मदत होईल. निरामय जीवनासाठी सत्संगतीचेही अनन्यसाधारण महत्त्व आहे. चांगल्या माणसांची संगत, चांगल्या ग्रंथांचे वाचन, चांगले संगीत ऐकणे, उत्तम स्थलदर्शन आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध बनवते. उपजिविका की जिविका ह्यावर गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. जिविकेला नेहमीच प्राधान्य दिले पाहिजे. आपले छंद जोपासणं, निसर्गसान्निध्यात वेळ घालवणं, आप्तांसाठी वेळ काढून संवाद साधणं अतिशय आवश्यक आहे. उत्तम शरीरयष्टी आणि संतुलित स्वस्थ मन असेल तरच आपण कष्टांने मिळवलेल्या संपत्तीचा उपभोग घेऊ शकतो, हे कधीच विसरता कामा नये.

शरीरावर प्रेम करायला शिका याचाच अर्थ स्वतःचे आरोग्य जपा आणि ते जपण्यासाठी  सुदृढ शरीर, निरोगी मन, नियमित माफक व्यायाम, स्वच्छता आणि सत्संगती या पंचकाची आवश्यकता आहे. कारण आपल्याला माहित आहेच ‘सर सलामत तो पगडी पचास.' -सौ.संध्या यादवाडकर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 सणांचा - व्रत वैकल्याचा श्रावण महिना