मुशाफिरी

आता पवित्र श्रावण महिन्याला आणि एकामागोमाग एक अशा विविध सणांना प्रारंभ झाला आहे. ज्यांना त्या संबंधित उपासतापास, व्रतवैकल्ये करुन पुण्य पदरी बांधायचे आहे, त्यांच्याबद्दल काही म्हणणे नाही. त्यांनी ते जरुर करावे. पण ‘देव दीनाघरी धावला' हेही त्यांनी ध्यानी घ्यावे. जे भिजताहेत, त्यांच्यावर छत्र धरावे, जे उपाशीपोटी आहेत, त्यांच्या मुखातही आपल्या कष्टाचा, आपल्या कमाईतून बनवलेला घास जाऊ द्यावा. सगळेच काही ‘लाडकी बहीण'वाल्यांवर सोपवून उपयोगाचे नाही.

कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल, कोपरखैरणे-नवी मुंबई येथे फिजिशियन कन्सल्टंट असणाऱ्या डॉ. चैतन्य कुलकर्णी यांची मुलाखत घेत होतो. विषय होता..‘पावसाळ्यात होणारे विविध आजार आणि नागरिकांनी त्यापासून स्वतःचा बचाव कसा करावा' हा. अनेक प्रश्नांप्रमाणेच मी एक प्रश्न विचारला की, ‘डॉक्टर, नवी मुंबई काय किंवा उरण, पनवेल किंवा आणखी कोणता विभाग काय..जिकडे तिकडे बांधकामे सतत सुरुच असतात. तेथील कामगार, गवंडी यांना उन्हा पावसात काम करावेच लागते. त्याचप्रमाणे रस्त्यावर बसून भाज्या विकणाऱ्या अनेक गरीब भाजीवाल्या महिलांना आजूबाजूने वाहणाऱ्या पाण्याच्या आणि वरुन पडणाऱ्या पावसाच्या साक्षीने भाज्या विकाव्या लागतात. तरच त्यांचा उदरनिर्वाह शक्य असतो. अशांनी पावसाळी आजारांपासून कसे वाचावे?'

  डॉ. चैतन्य हे किल्लारीसारख्या भूकंपप्रवण व अविकसित भागातून आलेले असल्याने ते मुळातच संवेदनशील आहेत. त्यांच्या मातेला नेहमी वाटे की घरातून कुणीतरी वैद्यकीय सेवा देणाऱ्या क्षेत्रात जावे म्हणून. त्यासाठी ते डॉक्टर झाले. त्यांनी माझ्या प्रश्नाचा रोख ओळखला आणि सांगितले की ‘शक्यतो काम करत असताना भिजू नये, भिजल्यास अंग कोरडे करावे. अंग संपूर्णपणे झाकले जाईल असे कपडे अंगात असावेत.'

   हे ऐकायला अगदी ठिक. पण प्रत्यक्षात आणायला कर्मकठीण! डोक्यावर रेती-माती-खडी असलेले घमेले, विटा किंवा दगड अशा अवस्थेत गवंडी लोकांच्या हाताखाली काम करणाऱ्या पुरुष अथवा महिलांना एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर जाताना भिजण्यासाठी कितीही आच्छादन घेतले तरी भिजून जाणे अपरिहार्यच! तीच गत रस्त्यावर बसून भाजी विकणाऱ्या महिला-पुरुषांची! कसलेतरी बारदान, ज्युटच्या गोणीचे फाडलेले तुकडे अंथरुन त्यांनी त्यावर भाज्या ठेवलेल्या असतात.. त्याच बारदानाचे किंवा प्लास्टिकच्या पिशव्यांच्या तुकड्यांचे आच्छादन घेऊन हे लोक कसेबसे तेथे बसलेले असतात. पालिकेची अतिक्रमणविरोधी पथकाची गाडी कधीही येईल आणि धंदा उचलून नेईल याची कायम भिती; गिऱ्हाईकांच्या भाव करण्याला उत्तरे देत त्यांना भाज्या देणे, सुट्या पैशांचा हिशेब करणे, तेथे फिरणारी भटकी कुत्री-मांजरे-गाई-बकऱ्या यांच्यापासून मांडलेले भाजीचे वाटे वाचवणे या साऱ्यात अंग पावसापासून झाकणे, भिजल्यास ते कोरडे करणे, अंग पूर्णपणे झाकणारे कपडे अंगात असणे या साऱ्या गोष्टी प्राधान्यक्रमात पार कुठल्या कुठे तळाशी जाऊन बसतात ते त्यांचे त्यांनाही कळत नाही. गटारात, चेंबरमध्ये उतरुन साफ करणाऱ्या कामगारांची यापेक्षा दारुण स्थिती असते. मग कधीतरी ताप येतो, सर्दी, खोकला होेतो, मलेरिया-डेंग्यु, टीबीसुध्दा होतो, पालिकेच्या दवाखान्यात कुणीतरी नेऊन ॲडमिट करते. बऱ्याचदा तेथून हे रुग्ण परत येत नाहीत, येतात ते त्यांचे मृतदेहच! हातावर कमावून पानावर खाणाऱ्या या घटकांचे असणे काय, नसणे काय.. कुणाला फारसा काही फरक पडत नाही...जगरहाटी आपल्या गतीने सुरुच राहते!

   हे एक चित्र! ....आणि उन्हाळा असो, पावसाळा असो की हिवाळा असो आजूबाजूच्या वाटर पार्क्स, अम्युझमेन्ट पार्क्स, फार्म हाऊसेस येथे पैसे देऊन किंवा स्वतःची अथवा मित्रांची शेतघरे, जवळपासची तळी, नद्या, धबधबे, ओहोळ, समुद्रकिनारे येथे जाऊन आनंदाने स्वतःहून भिजणारे तुमच्याआमच्या सारखे सुखवस्तू, मध्यमवर्गीय-पांढरपेशे लोकही जिकडेतिकडे पाहायला मिळतात. ते गरीब लोक मनाविरुध्द, गरज, मजबूरी आहे म्हणून भिजतात...तर तुम्ही आम्ही हौस म्हणून, आवडते म्हणून, लगेच कोरडे होणार आहोत म्हणून, आरोग्य अबाधित ठेवण्याच्या सर्व ‘टर्म्स आणि कंडीशन्स' पाळून भिजतो हे दुसरे चित्र! ही दोन टोकं आहेत.

   मग कुणी म्हणेल ते गरीबीत राहतात, त्याला कारणे आहेत. त्यांच्याकडे दुसरा काही पर्याय नाही. पण आमच्या साऱ्या गोष्टी ठीकठाक असताना आम्ही का म्हणून मजा करु नये, का आनंद घेऊ नये? आम्ही कमावतो. आमचा पैसा कसा खर्च करावा याचे स्वातंत्र्य आम्हाला आहे. तुम्ही कोण टिकोजीराव आम्हाला सांगणारे? हात पाय साथ देतात तोवर आम्ही हिंडणार-फिरणार, जग पाहणारच की! एकदा गुडघ्यात मान गेली, हात पाय थरथरायला लागले, अंथरुण धरले की सारे आपोआप थांबणारच आहे.

    त्यामुळे हा विषय वादाचा होऊ शकतो. आपल्याला वाद घालायचा नाही तर सुसंवाद, समन्वय साधायचा आहे. मध्यममार्ग काढायचा आहे. संपत्तीचे असमान वाटप, आर्थिक विषमता, बेरोजगारी, शैक्षणिक सुविधांचा अभाव, संधीची कमतरता या साऱ्या गोष्टी आहेतच. लता मंगेशकरांना नियतीने गोड गळा दिला होता. सचिन तेंडुलकरला उत्तम क्रिकेटपटू म्हणून क्रीडाकौशल्य दिले होते. विनेश फोगटला कुस्तीपटु म्हणून उच्च दर्जाची गुणवत्ता बहाल केली आहे. त्यानुसार त्यांनी मेहनतीने अर्थिक स्थिती मजबूत बनवली. तशी सर्वांकडेच असेल असे नाही. ही विषमता निसर्गदत्त आहे. पण त्याचे चटके सोसणाऱ्यांनी आपला विकास साधण्यासाठी स्वतः काहीच करायचे नाही, त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगणाऱ्यांनीही गप्प राहावे असेही नाही. अंधाराशी भांडण्यापेक्षा एक पणती लावलेले काय वाईट? यावर मला मा. दत्ता हलसगीकर यांनी केलेली कविता सर्वांसाठी इथे द्यावीशी वाटते...

ज्यांची बाग फुलून आली,

त्यांनी दोन फुले द्यावीत..

ज्यांचे सूर जुळून आले,

त्यांनी दोन गाणी द्यावीत...

 

सूर्यकुलाशी ज्यांचे नाते

त्यांनी थोडा उजेड द्यावा..

युगायुगांचा अंधार जेथे,

पहाटेचा गाव न्यावा....

 

ज्यांच्या अंगणी ढग झुकले,

त्यांनी ओंजळ पाणी द्यावे..

आपले श्रीमंत हृदय त्यांनी,

रिते करून भरून घ्यावे....

                                   

आभाळाएवढी ज्यांची उंची

त्यांनी थोडेसे खाली यावे..

मातीत ज्यांचे जन्म मळले,

त्यांना उचलून वरती घ्यावे .....

   आपल्यासारखे खाऊन पिऊन बऱ्यापैकी समाधानी असणारे लोक अशा उपेक्षित, नियतीने अन्याय केलेल्या, विषमतेचे चटके सोसणाऱ्यांसाठी आपल्या परिघात राहुनही बरेच काही  करु शकतात. अलिकडेच शालांत व उच्च माध्यमिक परिक्षांचे निकाल लागले. अनेक आघाडीच्या दैनिकांनी स्वतःहुन पुढे येत यातील उच्च गुणवत्ताधारक मुला-मुलींच्या पुढील शिक्षणासाठी मदतीचे आवाहन करुन ती मदत त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी हात पुढे केला आहे. अनेकजण गरीब होतकरु मुलांना शैक्षणिक दत्तक घेऊ शकतात. नवी मुंबई, उरण, पनवेल, बदलापूर, कर्जत, वांगणी परिसरात अनेक वृध्दाश्रम, अनाथाश्रम आहेत. तेथील घटकांच्या सहवासात घालवून त्यांचा एखादा दिवस गोड करता येईल. बायको, मुलगा, मुलगी, जावई, सून यांचे वाढदिवस हॉटेलात जाऊन आरडाओरडा करीत केक कापत मोठ्ठे बिल बनवून साजरे नेहमीच केले जातात. अशा एखाद्या बिलाची रवकम वंचित घटकांच्या भवितव्यासाठी झटणाऱ्या संस्थेला मदत म्हणून देता येईल. आपल्याकडे घरी अनेकदा भरपूर कपडे, भरपूर पादत्राणे, ज्यादा छत्र्या, अंथरुणे, दिवाणखान्यातील शोभेच्या वस्तू, टेबल लॅम्प, विजेऱ्या, मोबाईल चार्जर, स्वेटर्स, मौजे, कानटोप्या असे काही काही अतिरिक्त स्वरुपात असते, जे वर्षानुवर्षे नुसतेच पडून असते व अनेकदा दुर्लक्ष केल्यामुळे खराब होऊन फेकून देण्याचीही वेळ येते. ते वापरण्याच्या/चालणाऱ्या स्थितीत असतानाच या गरीब, संघर्षमय जीवन जगत असलेल्यांना देता येण्यासारखे आहे. नवी मुंबईत ‘माणुसकीची भिंत' या नावाने एक प्रयोग करण्यात आला. तिथे या तुमच्या वस्तू सोडुन द्याव्यात, त्या वस्तू गरीब, गरजू लोक घेऊन जातील अशी यामागची रास्त संकल्पना होती. पण मी पाहिले की प्रत्यक्षात झाले भलतेच. या ‘माणुसकीच्या भिंती'वर सोडलेल्या वस्तू गरीबांपेक्षा भंगारवाल्या व त्यांच्या एजंटांच्या हाती आधी लागल्या व तेथून त्यांनी त्या लंपास करुन इकडे तिकडे नेऊन विकल्या.

   ..मग त्यापेक्षा आपणच त्या गरीबांकडे जाऊन त्यांना त्या वस्तू स्वहस्ते दिलेले काय वाईट? मी जवळपास गेली पंधरा वर्षे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुवयाच्या घराडी गावात असणाऱ्या यश स्नेहा ट्रस्ट संचालित स्नेह ज्योती निवासी अंधशाळेशी संबंधित आहे. तेथील मुले-मुली, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी मला जे करता येईल ते करतो. ते पाहुन अनेकजण या कामी जोडले गेले व त्यांनीही यथाशक्ती सहकार्य करणे सुरु केले. ज्यांना एवढ्या लांबवर  पोहचून मदत देता येत नाही, त्यांनी ती माझ्याकडे सोपवली आहे व पुस्तक प्रकाशन वा अन्य कामांनिमित्त माझी तिकडे फेरी झाल्यास ती मदत तेथवर मी पोहचवून त्याची संस्थेने दिलेली रीतसर पावती संबंधितांना सुपुर्द केली आहे. माझे कल्याणमधील शाळकरी मित्र-मैत्रीणी, नवी मुंबईतील अनेक अन्य परिचित या कामी नेहमीच पुढे असतात. युथ कौन्सिल, नेरूळ व पंचरत्न मित्र मंडळ, चेंबूर या संस्थाही अशा मदतकार्यात आघाडीवर राहिल्याचा अनुभव मी त्यांच्या अनेक उपक्रमात सामील होत असल्याने घेतला आहे. लायन्स, लायनेस, रोटरी, इनरव्हील अशा वलब्जचे सदस्य, पदाधिकारी असलेले माझे अनेक मित्र, परिचित वेळोवेळी समाजातील ठिकठिकाणच्या दुर्बल घटकांना वेगवेगळ्या प्रकारचे सहकार्य करुन सामाजिक बांधिलकीचा पडताळा देत असतात, हे मोठे आशादायक चित्र म्हटले पाहिजे.

   आता पवित्र श्रावण महिन्याला आणि एकामागोमाग एक अशा विविध सणांना प्रारंभ झाला आहे. ज्यांना त्या संबंधित उपासतापास, व्रतवैकल्ये करुन पुण्य पदरी बांधायचे आहे, त्यांच्याबद्दल काही म्हणणे नाही, त्यांनी ते जरुर करावे. पण ‘देव दीनाघरी धावला' हेही त्यांनी ध्यानी घ्यावे. जे भिजताहेत, त्यांच्यावर छत्र धरावे, जे उपाशीपोटी आहेत त्यांच्या मुखातही आपल्या कष्टाचा, आपल्या कमाईतून बनवलेल्या अन्नाचा घास जाऊ द्यावा. जे गरीबीपोटी शिक्षणापासून किंवा स्वतःला झालेल्या असाध्य रोगांवरील उपचारांपासून दूर राहिले आहेत..त्यांना शैक्षणिक-वैद्यकीय मदतही करावी. देवसुध्दा हे सारे पाहात असतो म्हणे!  - राजेेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 नागपंचमी : पौराणिक आणि आधुनिक