संघटन आणि घोळका

राजकारण्यांचा स्वार्थ, मतलब प्रभावी झाला की आभासी काम सुरु होते. संगठन संपते आणि घोळकावाद किंवा इंग्रजीत त्याला  Mob play   तयार होतो आणि हाच घोळका फक्त विध्वंस करत सुटतो.  म्हणुनच कोणतीही पिढी सुसंस्कृत आणि शैक्षणिक दृष्ट्या सक्षम असावी लागते. ज्याची आज सम्पूर्ण जगाला आहे. सत्तलोलूप राजकारणी हेच नेमकं ओळखतात. जनता जेवढी मागास राहील तेवढी यांची खुर्ची भक्कम राहील असा गोड गैरसमज करून घेतात. मग काही योजना तोंडावर फेकतात आणि जनतेचा खरा आवाज तात्पुरता का होईना बंद करतात आणि घोळका शांत होतो.

  या लेखाच्या निमित्ताने सुरवातीलाच मी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कोणत्याही वेळेस लागु पडणारे एक वाक्य सांगू इच्छितो की समाजाचे प्रबोधन व्हावे आणि त्यातूनच जेव्हा नविन विचारांची निर्मिती होण्यासाठी जी प्रक्रिया निर्माण व्हावी लगते तेव्हा संघटन होणे गरजेचे असते. म्हणुनच संगठित व्हा आणि संघर्ष करा असे म्हटले आहे. त्यामुळे एकंदरीतच सध्याच्या भारतीय लोकशाहीची व्यवस्था आणि अवस्था पाहता लोकांना फक्त आपल्या काहीतरी पदरात पाडून घेण्याची वृत्तीची वाढ होत चालली आहे. समाज कार्यक्षम होण्यापेक्षा असेल माझा हरी तर देई खाटल्यावरी ही मनोवृत्ती वाढत चालली आहे. राज्यकर्त्यांना आता ही गोष्ट चांगलीच उमगली आहे की दररोज नवनवीन योजना जाहिर करायच्या आणि लोकांच्या तोंडावर फेकुन फुकट पदरात पाडून घेण्यासाठी लोकांना फक्त धावत ठेवायचे, मनुष्यबळ फक्त आपल्या अस्तित्वासाठी पळत ठेवायचे आणि त्याचा उपयोग फक्त सत्तेचा अमर्याद उपभोग घ्यायचा असा फक्त आटापिटा चालू आहे. आज या गर्दीला सामाजिक अधिष्ठान कोणतेच नाही की वैचारिक प्रगती नाही आणि या सगळ्या योजना फक्त लोकांना केवळ ऐतखाऊ बनवण्यापुरत्या उपयोगी पडतात.

आज देशपातळीवर विचार केला तर असे लक्षात येईल की देश सुरक्षा हा विषय बाजूला ठेवला तर अंतर्गत समाजाची प्रगती ही शिक्षणावर अवलंबून असते. आज भौगोलिक परिस्थिती आणि पर्यावरणाचा समतोल या विषयावर कोणीच लक्ष देत नाही.उत्तराखंड, हिमाचल, वायनाड येथील भूस्खलन कोणी विचारात घेतले आहे काय? आपल्या महाराष्ट्रात देखील काही वेगळी परिस्थीती नाही. अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्लोबल वॉर्मिग हा फक्त शब्द वापरतो पृथ्वीच्या पोटात नेमका काय बदल होत आहे याचा कधीतरी देशपातळीवरचा एकतरी नेता सामाजिक कार्यकर्त्या जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे काय? सध्या फक्त राज्यकर्ते एखाद्या चित्रकाराने एक पेपरवर सुंदरसे चित्र काढावे आणि आभासी जग निर्माण करावे असा फक्त आभास निर्माण करत आहे. एकंदरीतच सगळेच पक्ष फक्त राजकीय अस्तिव जपण्याचा प्रयत्न करत आहे आणि दुसरीकडे समाज मानसिकदृष्ट्या वैफल्यग्रस्त होत आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मग कधीतरी धर्मावरून कधी जातीवरून कधी प्रादेशिक भौगोलिक विभाजनावरून माणसां माणसात वितुष्ट निर्माण करायचे आणि उगाचच दंगली घडवून आणायच्या असा सध्याचा समाजाचा भेसूर चेहरा पुढे येत आहे.

एखाद्या विशिष्ट मुद्यावरून जेव्हा आंदोलन उभे रहाते तेव्हा प्रथम त्या आंदोलनाचे दूरगामी परिणाम काय होणार आहेत याचे भान हे आंदोलनकर्त्यानी ठेवणे गरजेचे आहे. कारण मुळातच सुजाण नागरिकानी आपण त्या आंदोलनात सहभागी होताना त्यातील एक गोष्ट स्पष्ट होणे गरजेचे आहे की जर आंदोलन हे जर सुरवातीलाच हिंसक मार्गाने सुरुवात झाली तर त्यात समाज विभाजनाचे राजकारण निर्माण होते त्यातील गरज संपते आणि उरतो फक्त जीवघेणा दहशतवाद ! त्यातून शांतताप्रिय सुसंस्कृत मनं दुभंगली जातात आणि बराच काळ त्याचे चटके समाजाला भोगावे लागतात. मग यातील संगठन संपते आणि घोळकावाद किंवा इंग्रजीत त्याला Mob play तयार होतो आणि हाच घोळका फक्त विध्वंस करत सुटतो. इकडे संघठन संपते. म्हणुनच कोणतीही पिढी सुसंस्कृत आणि शैक्षणिक दृष्ट्या सक्षम असावी लागते. ज्याची आज सम्पूर्ण जगाला आहे. सत्तालोलूप राजकारणी हेच नेमकं ओळखतात. जनता जेवढी मागास राहील तेवढी यांची खुर्ची भक्कम राहील असा गोड गैरसमज करून घेतात. मग काही योजना तोंडावर फेकतात आणि जनतेचा खरा आवाज तात्पुरता का होईना, बंद करतात आणि घोळका शांत होतो. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान सरकारच अंगावर घेते. काही विकाऊ कार्यकर्ते खेचले जातात आणि नुकसानग्रस्त जनतेला दिलासा म्हणुन चार दोन लाखाची मदत करून तोंड बंद करतात. संघटनेचे नेते राजकीय झेंडे आणि खादी कपडे घालून आपली बेरोजगारी संपवतात. कुठल्याही आंदोलनाची दिशा आणि दशा अशा प्रकारे तयार केली जाते.

...म्हणुन जनतेला आपला आवाज आपले जीवन सुसंस्कृत करायचे असेल तर तो सुशिक्षित होणे गरजेचे आहे, घटनेने दिलेले अधिकार काय आहेत हे त्याला कळले की तो घोळक्यातून बाजूला होतो आणि सद्‌सदविवेक बुद्धी वापरून मगच आंदोलनात सहभागी होतो. आज आपल्या शेजारील देश नेमके हेच विसरले आहेत आणि धर्माचे अवडंबर लावलेले चुकीचे अर्थ यामुळे देशाचा सर्वांगीण विकास खुंटला आहे आणि जनप्रक्षोभाला बळी पडत आहे. जनप्रक्षोभ आणि आंदोलन हे दोन्ही वेगळे शब्द आहेत. कारण राजकीय अंधश्रध्दा आणि धार्मिक अंधश्रध्दा हे वैयक्तीक आणि समाजाचे अधःपतन करतात. म्हणुनच आंदोलन हे घोळक्यांचे न होता समाज कार्यक्षम होण्यासाठी व्हावे केवळ राजकीय आकर्षित करण्यासाठी योजनांच्या बळी न पडता दूरगामी विचारातून दीर्घकालीन समाजाला सुसंस्कृत बनवणारे असले पाहिजे. संघटन हे वैचारिक मंथन असते आणि घोळका फक्त विध्वंसक असतो, - राजन वसंत देसाई 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी