दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
पूल आणि आर्थिक धूळ
आत्ताच, म्हणजे जुलै महिन्यात ढगफुटी आपण सर्वांनी अनुभवली आहे. म्हणूनच पुलावरुन जातांना साशंक असावे, डागडुजीकडे नजीकच्या ग्रामपंचायतीने व अन्य शासकीय यंत्रणांनी दळणवळण खात्याकडे लिखित अहवाल सादर करावा. सुविधा माणसांकडूनच निर्माण केल्या जातात, त्याचा क्रॅश कोर्स कुठेच नसतो. स्वतःवर अंकुश असावा, शासन-प्रशासन म्हणजे इतर कुणी नसून ते आपल्याच अवतीभवती राहणारे लोक आहेत. केवळ त्यांना दोष देऊन नाही चालणार. आपले निरीक्षण हे प्रथम सर्व्हेक्षण होय. तज्ञ नंतर येतात.गोरगरीब, सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीने आपण सर्वांनी जागृत राहणे, आवश्यक आहे.
काही वर्षांपूर्वीची ती पावसाळी काळोखी रात्री आठवली. अचानक चहुदिशांनी वादळी वारे सुटले, ढगफुटी झाली. रात्रीच्या पॅसेंजर गाड्या मुंबई गोवा हायवेवरुन नेहमी जा-ये करतात तशाच सुरू होत्या. त्यांतील एक यष्टी निघाली आणि रायगड जिल्ह्यातील महाड येथे सावित्री नदीवरील एका पुलावरुन खाली पुराच्या लोटात जाऊन पडली. अतिवृष्टीमुळे तसेंच काळोख्या रात्रीत चालकाचा अंदाज चुकल्याने पॅसेंजरसहित ती दुर्दैवी गाडी पुलाखाली पडून त्यांस जलसमाधी मिळाली. सर्वच्या सर्व प्रवासी मृत्युमुखी पडले. सर्वत्र दुःखाचा आक्रोश पसरला. नैराश्य पसरले.
अलीकडे-पलिकडे येजा करणारी गाड्यांची वर्दळ बघता-बघता थांबली. दर्या भरतीमुळे पुराचे पाणी जास्त वाढले. काहींची प्रेतं नजीकच्या किनारी लागली तर काहीं दूरवरच्या समुद्र किनारी लागली. संपूर्ण महाराष्ट्र हादरला. ते दुःख आजही विसरू शकत नाही. मेल्याशिवाय स्वर्ग नाही, तसे दुर्घटना झाल्याशिवाय त्यावर शासकीय यंत्रणेला जाग येत नाही. उपाय सुचत नाही. आंग्लकालीन पूल वाहून गेला आणि त्या नंतर शासनास आलेली जाग, तोवर अनेकांचे संसार उध्वस्त झाले. प्रतिकारशक्ती एकवटली आणि शासनास जबाबदार केले. त्यांनंतर लगेचच तज्ञ मंडळीकडून पनवेल-गोवा मार्गावरील सर्व लहान मोठया पुलांचे सर्वेक्षण करून घेतले गेले व लिखित ऑडिट रिपार्ट्स येतांच गरजेनुसार सर्व पुलांची गरजेनुसार डागडुजीचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले. आता नियमित अनेक नद्यावरील पुलांचे सर्वेक्षण करण्यांत येते. असे अधुनमधून वाचनात येते. काम चालू... रस्ता बंद! रस्ते जोडणाऱ्या प्रत्येक पुलाचे मेंटेनन्स वेळेत झालेच पाहिजे. त्यांस पर्याय नाही.
मी स्वतः असे अनेक पावसाळे आयुष्यात अनुभवले आहेत ज्यांचे कथन या आधी केले आहे, तरीही नवीन पिढीने समजून घ्यावे, की सुविधा माणसांकडूनच निर्माण केल्या जातात, त्याचा क्रॅश कोर्स कुठेच नसतो. स्वतःवर अंकुश असावा, शासन-प्रशासन म्हणजे इतर कुणी नसून ते आपल्याच अवतीभवती राहणारे लोक आहेत. केवळ त्यांना दोष देऊन नाही चालणार. अवतीभवती राहणारे संबधीत रहिवासी तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी अशावेळी जागृत राहणे आवश्यक आहे. आपले निरीक्षण हे प्रथम सर्व्हेक्षण होय. तज्ञ नंतर येतात.
पंचनदी या नदीवर आम्ही शाळकरी होतो तरीही पूल नव्हता. पावसाळी चार महिने कोळथर-पंचनदी या दोन पंचक्रोशीतील नागरिकांचे जगणे जैसे थे असायचे. रात्री अपरात्री जर का डॉक्टर गाठायचा असल्यास तत्कालीन लाकडी डोलीशिवाय पर्याय नव्हता. नदीलगत असलेला ओवळीचा पऱ्या देखील आऊर (पूर) आल्याने फुगलेला असायचा! सुपारीच्या ओंडक्यांचा साकव ग्रामपंचायत चार महिन्यासाठी दरवर्षी तयार करत असे. ज्यावरून हळूहळू पाय घट्ट टाकत पलिकडे जायचे व पलिकडे उभ्या असलेल्या निळ्या यष्टीगाडीत बसून दाभोळ गाठायचे. तेथे जिल्ह्य पातळीचे रुग्णालय असायचे. सरकारी डॉक्टर म्हणून शासनाकडून डॉ. एम. बी. लुकतुके यांची त्याकाळी नुकतीच नेमणूक झाली होती. यष्टी दाभोळला येतांच माझ्या मनाची धुगधुगी वाढायची. कारण डॉक्टर सुई टोचतात. ते टेंशन अलाहिदा! ही वस्तुस्थिती आता इतिहास जमा झाली आहे. नदीवर पूल बांधून झाल्यावर त्याकाळी शाळकरी मुलांची सहल जात असे, पूल म्हणजे काय? शिवाय ओवळीच्या पऱ्यावर छोटीशी ओतकामी फडशीदेखील पूर्ण करण्यात आली. चाय पेक्षा किटली गरम...काहीवेळा मुख्य नदीला पूर एव्हढा नसायचा; पण ओवळीच्या पऱ्यास मात्र मस्ती जास्त असायची. म्हणूनच आता दोन्ही नद्यांवरील पुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या धरणाचा उपसा कायम होत राहतो, त्यामुळे पूर्वीगत परिसरात येणाऱ्या आऊराचे पाणी आता गावातील वस्तीत न येता थेट लकडतर मार्गे अरबी समुद्रात जाऊन मिळते व कोळथर-पंचनदी या दोन स्वतंत्र गावांना पुराचा धोका टळतो. अजुनपर्यंत तरी नागरिक सुरक्षित आहेत.
दापोली ते नवी मुंबई हा प्रवास आता बऱ्यापैकी सुखरूप झाला आहे. अर्थातच अतिवृष्टीमुळे काही ठिकाणचे रस्ते खड्डेमय झाले असणार, ज्याचे यथावकाश पुनः डांबरीकरण होईल. आतां यापुढे महाराष्ट्र राज्यातील सर्वांत मोठा सण म्हणजे श्री गणपती बाप्पाचे आगमन आणि विसर्जन. अशा दोन्ही वेळा कोकणातील मुबंई येथे राहणारे चाकरमानी निश्चितच कुटुंब सदस्यांसहित गावी जाणार. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासन जागृत आहेच; त्यांनी रस्ते दुरुस्तीची कामे गतिमान होतील याकडे त्वरित लक्ष द्यावे आणि त्याशिवाय उर्वारित जे जुने पूल हायवेवर आहेत त्यांचे मॉन्सूननंतरचे सर्व्हेक्षण तज्ञांकडून करून ऑडिटप्रमाणे दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. हे अत्यावश्यक आहे. कारण पनवेल ते सिंधुदुर्ग या महामार्गावर २४ तास ट्रॅफिक सुरु असते. सणासुदीला त्यांत वाढ होते. म्हणूनच अशा जागी नदीवरील पुलांचे मेंटेनन्स अत्यावश्यक आहे.
नजर हटी दुर्घटना घटी... असे रस्त्याच्या कडेला लिहीलेले वाक्य, त्यावर विश्वास तुमचाच प्रथम असावा. दळणवळणाची एकमेव खात्री म्हणजे रस्ते जोडणारे पूल व त्याची कायम होत राहणारी डागडुजी, हे होय.
आमच्या पिढीने नो ब्रिज ते येस ब्रिज, हा प्रवास पाहिला आहे. केरोसीनचे दिवे ते विजेवर चकाकणारे आजचे दिवे हे युग देखील पाहिले आहे. आजची पिढी नवे तंत्रज्ञान, नवा जोम घेऊन जगत आहे. आम्हांला म्हणजेच कोकणस्थ लोकांना खुश्की आणि जलमार्ग प्रवास दोन्ही आठवतात. काही झाले तरीही माणूस वैयक्तिक हेवेदावे करतो; पण ग्राम विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे अत्यावश्यक आहे. असेच का? अन तसे का नाही? अशी आग्रही भूमिका नसावी. जलमार्गावरील पॅसेंजर वाहतूक अचानकपणे बंद करण्यात आल्याने कोकणी लोकांची गैरसोय होऊ लागली. त्यावेळी जलमार्गाने मुंबईस जाणे जास्त खर्चिक नसायचे. वाशी खाडीवरील पूल अस्तित्वात नव्हता. यष्टीने मुंबईस ठाणेंमार्गे जावे लागत असे. वेळ आणि पैसे ज्यास्त लागत असत. म्हणून अब्दुल रेहमान अंतुले साहेबांनी शासनास ‘नो बोट, नो व्होट'... असे धमकावले होते.
नंतर कोकणात रेल्वे मार्ग सुरू झाला. पूर्वी कोकण रेल्वे नव्हती. आतां अनेकांना त्या सुविधेचा लाभ सहज घेता येतो. कोकण हळूहळू प्रगत होत आहे. मात्र पनवेल ते रत्नागिरी ते सिंधुदुर्ग असा रस्त्यावरील प्रवास कष्टमय नसावा, घातक वळणावर वाहन चालवताना चालकांनी जबाबदारीने वाहन चालविले पाहिजे. प्रथम स्वतःचा जीव, नंतर गाडी आणि त्यांत बसलेले सहप्रवासी, याकडे चालकांनी विशेष लक्ष द्यावे. हे त्याना कळत नाही असे नव्हे, पण मोबाईलचा वापर वाहन चालवताना खरंच आवश्यक आहे का? ड्रायव्हिंग इज अ फुलटाईम जॉब, अशी ख्याती असलेल्यानेच स्टेअरिंग सांभाळावे! प्रवास आनंद देणारा असावा. घातक नसावा.
आत्ताच, म्हणजे जुलै महिन्यात ढगफुटी आपण सर्वांनी अनुभवली आहे. म्हणूनच पुलावरुन जातांना साशंक असावे, डागडुजीकडे नजीकच्या ग्रामपंचायतीने व अन्य शासकीय यंत्रणांनी दळणवळण खात्याकडे लिखित अहवाल सादर करावा. गोरगरीब, सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीने आपण सर्वांनी जागृत राहणे, आवश्यक आहे.
आता पावसाळा त्याच्या पूर्ण बहरात असल्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. कोकणात सर्वांनी या, इथल्या निसर्गाचा, भटकंतीचा आनंद घ्या. मात्र कोकण झकास आणि कोकणी भकास असे होऊ नये, याकडे स्थानिकांनी जागृत रहावे. जय महाराष्ट्र. - इक्बाल शर्फ मुकादम