दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
इंद्रियांचा स्वामी व्हावे!
आपल्या प्रत्येक कृतीतून भगवंताची उपासना करणे हेच ध्येय असल्यामुळे भक्त ख-या अर्थाने ब्रह्मचारी असतो. सर्व विषयांपासून परावृत्त होऊन तो भगवंताशी एकरूप होतो. सर्व इंद्रियांवर स्वामित्व गाजवतो. त्यांना केवळ भगवंताच्या कार्यासाठीच वापरतो.
नसे अंतरी कामकारी विकारी।
उदासीन जो तापसी ब्रह्मचारी।
निवाला मनी लेश नाही तमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा । श्रीराम ५०।
सर्वोत्तम भगवंताचा अनन्य भक्त त्याच्या सदगुणांमुळे, तपश्चर्येमुळे, ज्ञानामुळे धन्य होतो. त्याच्या जीवनाचे सार्थक होते. माणसाच्या अनंत कामना त्याला जन्ममरणाच्या चक्रात बांधून ठेवतात कामनांमध्ये कामवासना ही मनुष्याचे अधःपतन घडवण्यास प्रामुख्याने कारणीभूत ठरते. कामवासनेमुळे बुद्धी बलहीन होते. मन क्षुब्ध होते. विचार-विवेक पांगळे होतात. विवेक हा मनाला आवरणारा पहारेकरी. तोच शक्तीहीन झाल्यावर मनात नानाविकारांचा शिरकाव होतो. अपवित्र कल्पना निर्माण होतात आणि मनुष्य करू नये ते करतो. जाऊ नये तिथे जातो. अनैतिक, स्वैर वर्तन करतो. अधर्माने वागतो. वेदशास्त्राच्या विरोधात जातो. पण जो भगवंताला धरून राहतो, ज्याच्या जीवनात भगवंताचे स्थान अनन्य असते, भगवंताचे स्मरण नित्य जागृत असते, तो अशा कामनांपासून दूर राहतो. मनात विकृती, विकल्प उत्पन्न करणाऱ्या, मन अस्वस्थ करणाऱ्या कामवासनेला त्याच्या अंतरात थारा नसतो. जगातील सर्व विषयांपासून तो अनासक्त असतो. उदासीन असतो. उदासीन याचा अर्थ निराश किंवा निरिच्छ नव्हे. जो देह-मनाच्या पातळीपासून वरच्या स्तरावर स्थिर झाला असून निर्विकारपणे आपल्या देह-मनोव्यापाराकडे पाहतो त्याला उदासीन म्हणतात. जीवननिर्वाहासाठी आवश्यक ते विषय तो आवश्यक मर्यादेनेमात्र अलिप्तपणे सेवन करतो. त्यात रंगून किंवा रमून जात नाही. त्यात त्याची आवड किंवा नावड नसते. केवळ कर्तव्य भावना असते. त्याच्या जीवनात उपभोगाला महत्त्व नसते. तपश्चर्येला प्राधान्य असते. शरीराला फार सुखलोलूप न करता तो विरक्तपणे राहतो. कष्टाला कंटाळत नाही. संयमाने राहतो. जीवनातली अनुकूलता-प्रतिकूलता सारख्याच संयमाने सोसतो. त्यालाच तापसी म्हणतात. प्रारब्धाने जे विषय पुढे येतील त्याबद्दल तो सुखदुःख मानत नाही. हे हवे, ते नको, असे असावे, तसे नसावे असा त्याचा आग्रह नसतो. आपल्या देहाकडे तो एकूणच त्रयस्थपणे पाहतो. कारण ”मी देह नाही” याविषयी त्याला निःसंशय खात्री असते. ”सगळे भोग देहाचे आहेत, माझ्याशी त्यांचा काही संबंध नाही” या विचारावर त्याची बुद्धी स्थिर झाल्यामुळे अत्यंत शांतचित्त झालेला असतो. ”मी ब्रह्म आहे, म्हणूनच मी अजरामर आहे, मी संपूर्ण आहे, मी आनंदस्वरूप आहे” हे ज्ञान त्याने आत्मसात केल्यामुळे त्याच्या मनात अज्ञान अंधःकाराचा लवलेशही नसतो. भगवंताशी अनन्यता साधल्याने त्याच्या वृत्ती सात्विक झालेल्या असतात. रज किंवा तमोगुणाचे प्राबल्य त्याच्या अंतरात नसते.
काम क्रोध इत्यादी षड्रिपूंवर त्याने विजय मिळवलेला असतो. ज्ञानाच्या अनुभवाने संपूर्ण शांत, निवांत झालेल्या भक्ताच्या मनात आता कोणत्याही कारणाने खळबळ होत नाही. क्षोभ होत नाही. आपल्या प्रत्येक कृतीतून भगवंताची उपासना करणे हेच ध्येय असल्यामुळे भक्त खऱ्या अर्थाने ब्रह्मचारी असतो. सर्व विषयांपासून परावृत्त होऊन तो भगवंताशी एकरूप होतो. सर्व इंद्रियांवर स्वामित्व गाजवतो. त्यांना केवळ भगवंताच्याच कार्यासाठी वापरतो. संयम, सोशिकता, क्षमाशीलता हे सद्गुण अनन्य भक्ताकडे असतात. पण याचा अर्थ तो दुर्बल असतो असा नाही. आपल्या तपश्चर्येने आणि व्रतस्थ, सात्विक आचरणाने तो शरीर आणि मनाने अत्यंत सामर्थ्यवान झालेला असतो. कोणत्याही परिस्थितीत प्रसन्नचित्त राहतो. आत्मशांती, अक्षुभ्दता हे अनन्य भक्ताचे प्रमुख लक्षण आहे. जो स्वतः भ्रमातून सुटला आहे, स्वधर्माने चालणारा आहे, दृश्य जगापासून अलिप्त आहे आणि अंतर्बाह्य शांत आहे, ज्याच्या सर्व वृत्ती भगवद्चरणाशी लीन आहेत, असा ज्ञानी भक्त जगात धन्य होतो. तो स्वतःचे जीवन तर धन्य करतोच पण समाजात दीपस्तंभ होऊन राहतो. अज्ञान अंधारात हरवलेल्या, भ्रमित होऊन चाचपडत, ठेचकाळत चालणा-या सामान्य जनांना कल्याणाचा मार्ग दाखवून त्यांचेही जीवन धन्य करतो. त्यालाच सर्वोत्तम भगवंताचा कृतार्थ भक्त म्हणतात.
जय जय रघुवीर समर्थ
-सौ. आसावरी भोईर