दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
लाडक्या बहिणींना सुरक्षाही द्या !
श्रद्धा वालकर, यशश्री शिंदे या केवळ हिमनगाचे टोक आहेत. लव्ह जिहाद आज महाराष्ट्रातील गावागावांत पसरला आहे का ? लव्ह जिहाद हा केवळ ठराविक राज्यांचा, गावांचा किंवा मुस्लिमबहुल वस्त्यांचा प्रश्न राहिला नसून ज्या ज्या ठिकाणी हिंदू आहेत त्या त्या ठिकाणी लव्ह जिहाद घडतो आहे का? राज्याचे गृह खाते आता तरी जागे होणार आहे की नाही ? लव्ह जिहादचा विळखा ज्या प्रमाणात महिलांवर्गाला लक्ष करत आहे ते पाहता गृह विभागाने याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. राज्यातील बेपत्ता होणाऱ्या महिलांची आकडेवारी पाहता लाडक्या बहिणींना महिन्याला १५०० रुपयांपेक्षा लव्ह जिहादरुपी राक्षसापासून सुरक्षा देणे अधिक आवश्यक आहे. या समस्येवर आज उपाययोजना केली नाहीतर भविष्यात ही समस्या रौद्ररूप धारण करू शकते.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' राबवण्याची जोरदार सिद्धता चालू असतानाच उरण येथील एका हत्येमुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. २७ जुलैला यशश्री शिंदे हत्येचा प्रकार घडला. ही हत्या दाऊद शेख नावाच्या मुस्लिम युवकाने प्रेमप्रकरणातून केली असल्याने यामागे लव्ह जिहाद असल्याचे आता उघड झाले आहे.
श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर राज्यातील लव्ह जिहादविरोधातील तापलेले वातावरण शांत होत असतानाच उरण येथील या घटनेने महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. त्यातच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०१९ ते २०२१ या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यातील १ लाख ८८२ मुली आणि महिला बेपत्ता असल्याची माहिती देत मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. सरकारच्या कोषागार विभागात काम करणारे माजी सैनिक शहाजी जगताप यांनी अधिवक्ता मंजिरी पारसनीस यांच्या माध्यमातून एक याचिका प्रविष्ट केली असून न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांच्या खंडपीठासमोर लवकरच याबाबतची सुनावणी होण्याची शक्यता आहे. शहाजी जगताप यांची मुलगीदेखील २०२१ पासून बेपत्ता आहे. सांगलीमध्ये बीएससीला शिकत असताना मुलगी बेपत्ता झाल्याचे कळताच त्यांनी सांगलीतील संजयनगर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली. मुलीचा शोध सुरू असताना मुलीने इस्लाम धर्म स्वीकारून निकाह केल्याची माहिती जगतापांना मिळाली. बेपत्ता झालेल्या मुलीची केवळ दोन मिनिटांसाठी भेट झाली आणि त्यानंतर मुलगी कोठे आहे याचा थांगपत्ता आजतागायत लागलेला नाही. मुलगी सज्ञान असून तिने स्वतःच्या सहमतीने निकाह केल्याचे सांगत पोलिसही मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. जगताप हे आपल्या मुलीचा शोध घेत असतानाच केंद्रीय गृह विभागाने महाराष्ट्रातून बेपत्ता झालेल्या मुली आणि महिला यांची आकडेवारीच एका अहवालाच्या माध्यमातून संसदेत जारी केली. त्यानुसार महाराष्ट्रात २०१९ मध्ये ३५९०० तसेच २०२० मध्ये ३००८९ आणि २०२१ मध्ये ३४६६३ मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत.
या अहवालाचा उल्लेख जगताप यांनी याचिकेत केला आहे. याशिवाय २०१९ मध्ये २८२ तर २०२० मध्ये १८४ आणि २०२१ मध्ये ३२० प्रकरणे उघडकीस आल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे. महिला बेपत्ता होण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने २००२ मध्ये काही आदेश दिले होते, तरीही पोलीस अधिकारी बेपत्ता महिलांचा शोध घेण्यामध्ये ढिलाई दाखवत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. ज्या मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत, त्यांचा वापर चुकीच्या कामांसाठी केला जात आहे याकडेही जगताप यांनी लक्ष वेधले आहे. राज्यातील बेपत्ता मुली आणि महिला यांची केंद्राच्या गृहविभागाने जाहीर केलेली आकडेवारी ही केवळ पोलीस ठाण्यांत अधिकृत नोंदणी झालेल्या प्रकरणांची आहे. ग्रामीण भागात कुटुंबाच्या बदनामीच्या भयाने अनेक जण पोलीस ठाण्यांत तक्रारही दाखल करत नाहीत, त्यामुळे प्रत्यक्ष आकडेवारी याहून अधिक भयावह असू शकते.
जानेवारी ते मे २०२३ या पाच महिन्याच्या कालावधीत राज्यात ५६१० महिला आणि मुली बेपत्ता झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी गेल्या वर्षी जुलै मासात विधानसभेत सादर केली होती. यावर उत्तर देताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न केवळ महाराष्ट्र राज्याचा नसून देशस्तरावरील असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. राज्यात आणि केंद्रात त्यांच्याच पक्षाची सत्ता असताना अशा प्रकारचे विधान करणे म्हणजे नाकर्तेपणाची स्पष्ट कबुली देण्यासारखेच नव्हे काय? गेल्यावर्षी ‘दि केरला स्टोरी' नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. केरळ राज्यातून ३२ हजारहुन अधिक मुली बेपत्ता झाल्या आणि त्यामागे एक मोठे षडयंत्र कार्यरत असल्याचे या चित्रपटातून उघड करण्यात आले होते. या वास्तवदर्शी चित्रपटाच्या निर्मात्याने संशोधन करून माध्यमांसमोर पुरावे सादर केले आणि ३२ हजाराचा आकडा हा बनाव नसल्याचे दाखवून दिले. महाराष्ट्र राज्यातही अशा प्रकारचे काही षडयंत्र सुरु आहे का ?
राज्यात दरवर्षी बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांची आकडेवारी पाहता ती केरळमधील बेपत्ता महिलांच्या आकडेवारीशी मिळतीजुळती आहे. केरळ राज्यातून मोठ्या प्रमाणात मुली बेपत्ता होतात आणि या मुली लव्ह जिहादच्या शिकार होत असल्याचे लक्षात आल्यावर केरळ उच्च न्यायालयाने राज्यातील वाढत्या लव्ह जिहादची स्वतंत्रपणे चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या गृहखात्याला दिले होते. महाराष्ट्रातही आज अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे का ? श्रद्धा वालकर, यशश्री शिंदे या केवळ हिमनगाचे टोक आहेत. लव्ह जिहाद आज महाराष्ट्रातील गावागावांत पसरला आहे का ? यशश्री शिंदे हिच्या हत्येविषयी प्रतिक्रिया देणारा अभिनेत्री केतकी चितळे हीचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे, त्यामध्ये ती ‘लव्ह जिहाद हा केवळ ठराविक राज्यांचा, गावांचा किंवा मुस्लिम बहुल वस्त्यांचा प्रश्न राहिला नसून ज्या ज्या ठिकाणी हिंदू आहेत त्या त्या ठिकाणी लव्ह जिहाद घडतो आहे' असे म्हणताना दिसत आहे. त्यामुळे राज्याचे गृह खाते आता तरी जागे होणार आहे का ? मुली आणि महिला घरातून बेपत्ता होण्यामागे इतरही अनेक करणे असू शकतात, मात्र लव्ह जिहादचा विळखा ज्या प्रमाणात महिलांवर्गाला लक्ष करत आहे ते पाहता गृह विभागाने याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. राज्यातील बेपत्ता होणाऱ्या महिलांची आकडेवारी पाहता राज्यातील लाडक्या बहिणींना महिन्याला १५०० रुपयांपेक्षा लव्ह जिहादरुपी राक्षसापासून सुरक्षा देणे अधिक आवश्यक आहे. या समस्येवर आज उपाययोजना केली नाहीतर भविष्यात ही समस्या रौद्ररूप धारण करू शकते.
श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या कायद्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. यशश्री शिंदे हिच्या हत्येनंतर राज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा अमलात आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यासाठी आंदोलने केली जात आहेत. सोशल मीडियावरही तरुण वर्ग राज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याची एकमुखाने मागणी करत आहे. आज वेळ आली आहे हा कायदा संमत करून घेण्याची.
राज्यातील जनतेचा उद्रेक पाहता राज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा करणे विद्यमान सरकारला येत्या निवडणुकीसाठी लाभदायक ठरू शकते. येणाऱ्या काळात राज्याचे मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. - सौ. मोक्षदा घाणेकर, काळाचौकी