थेंबभर पाणी अनंत आकाश

‘जोहड'कार सुरेखा शहा यांनी लिहिलेल्या थेंबभर पाणी अनंत आकाश या चरित्रात्मक कादंबरीमधून नवयुवकांना उद्योगधंद्याकडे वळवून आपण जीवनात कसे यशस्वी होऊ शकतो, याची प्रेरणा मिळते. उद्योजक भवरलालजी जैन यांच्या जीवनातील चढउतारांचा आढावा येथे घेण्यात आला आहे. जैनउद्योग समूह, जैन गुरुकुल, जैन इरिगेशन जी जगात आज दुसऱ्या क्रमांकावर आहे तिथपर्यंत पोहचण्यासाठी त्यांच्यात असलेला आत्मविश्वास, चिकाटी, प्रामाणिकपणा, सामर्थ्य, ध्येयाची आस, कठोर परिश्रम, भव्य कल्पकता, स्वप्नवेडी वृत्ती, अपार जिद्द, अचूक निर्णयक्षमता आदी गुणांमुळे त्यांनी आपल्या व्यवसायाचं शिखर गाठलं आहे.

जहाँ न जाऐ बैलगाडी वहाँ पहुँचे मारवाडी या उक्तीप्रमाणे भवरलालजींचे पणजोबा राजस्थानमधील आगोळाईहून जळगावच्या वाघोर नदीच्या काठावर असलेल्या वाकोद या खेड्यात स्थानिक झाले. त्यांच्या जन्माची कहाणी लक्षात रहाण्यासारखी आहे. गौराबाई आणि हिरालाल या दाम्पत्याला होणारी अपत्ये जगत नव्हती. ९ वेळच्या प्रसव वेदनेनंतर झालेलं दहावं अपत्य जगावं म्हणून आजी जमनाबाईंनी गावकुसाबाहेर राहणाऱ्या सोनाबाईंच्या ओटीत झालेल्या मुलाला घातलं. मूल माझं आहे असं तिच्याकडून वदवून घेऊन मापटंभर मीठ देऊन, त्या बाळाला विकत घेतलं. तेच बालक म्हणजे भवरलाल जैन. त्यांच्या लहानपणीच्या काही घटना लेखिकेने नोंदविलेल्या आहेत.

लहानपणी भोवरा चोरल्यामुळे आई गौराबाईंनी फुंकणी तुटेपर्यंत भवरला चोपले होते. गावात चौथीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना पुढील शिक्षणासाठी जळगावात ठेवले. मॅट्रिकनंतर मुंबईला कॉमर्स ग्रॅज्युएट होऊन एल.एल.बी. पूर्ण केले. नंतर एम.पी.एस.सी. परीक्षा पास झाले, तरी वकिली अथवा सरकारी उच्चपदस्थ नोकरी न स्वीकारता जिल्हाधिकारी होण्याची संधी सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मनाचा कल व्ययसायाकडे बदलवण्यामध्ये आई गौराबाई व भिकमचंद जैन यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. जे भारतीय भूमीपुत्रासाठी वरदान ठरले म्हणावे लागेल. भिकमचंद जैन यांना त्याचं जीवन बदलणारा सल्ला दिला. वकिली काय किंवा कलेक्टर काय दुसऱ्याची गुलामगिरीच, त्यापेक्षा मारवाड्याचा बच्चा आहात-व्यवसाय, धंदा करा. या सल्ल्यानुसार तीन पिढ्यांची असणारी सात हजार रुपयांची पुंजी धंद्यासाठी लावली. रॉकेलची एजन्सी घेतली. प्रत्येकाच्या जीवनात कलाटणी मिळते, ती विवाहामुळे. त्यांनी नाशिकच्या सुंदर मुलीला नाकारुन विजापूरच्या कांताबाईंशी हुंडा न घेता लग्न केलं. नंतर एकदा मुलांच्या तब्येतीमुळे स्वयंपाकाला उशीर झाला. म्हणून दीर रागावले. तेव्हा कुटुंब विभक्त होऊ शकले असते. तेव्हा भवरलाल आपल्या पत्नीला आदरार्थी संबोधन तुम्ही मोठे व कर्त्या आहात, त्यांना तुम्ही मनातून क्षमा करा अशी समजूत घालून त्यांना शांतवलं. अशा बऱ्याच प्रसंगांचं वर्णन वाचायला मिळतं. त्यांनी नंतर खते, बी-बियाणे, पाईप्स, शेती उत्पादने, ट्रॅक्टर्स, स्पेअरपार्टस अशा एजन्सीज घेतल्या. जैन ब्रदर्स प्रख्यात झाले. औद्योगिक विकास साधत असताना, त्यांच्यावर आलेल्या बऱ्याच प्रसंगांची नोंद लेखिकेनी घेतली आहे. जगात प्रत्येक पाचवा माणूस खोटा असतो असं सांगणाऱ्या जॅकहाईम स्पष्टवक्तेला त्यांनी निर्भयपणे उत्तर देऊन, पपईपासून बनवलेल्या पपेनची निर्यात गुणवत्तेने प्रामाणिकपणे केली. अमेरिकेच्या त्या दौऱ्यात थंडीपासून बचाव व्हावा, म्हणून अजाणतेने मिंक चा कोट विकत घेतला. निःष्पाप मुक्या प्राण्याची निर्दय हत्या करुन कोट बनवल्याचं कळलं, तेव्हा त्यांनी अहिंसा परमो धर्म न्यायाने वापरायचं सोडून दिलं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वर्षातून दोन-तीन पिके घ्यायला हवीत म्हणून मरुभूमी असलेल्या इस्त्रायलमध्ये जाऊन ठिबक सिंचन पध्दतीचा अभ्यास करुन त्यांनी जलक्रांती घडवून आणली. प्रत्येकांनी श्रमप्रतिष्ठा जपली पाहिजे. याचं उदाहरण लेखिकेने चांगल्या पध्दतीने दिले आहे. सायकलसुध्दा नसताना गिऱ्हाईकाला देण्यासाठी भर उन्हात हातात रॉकेलचे कॅन घेऊन ते चालत जात असतं. जैन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, साहित्यिक, धार्मिक, प्रयोगशील, प्रतिभावंतांना त्यांनी मदत केली. आकाशाएवढे उत्तुंग यश मिळवून त्यांचे पाय मात्र शेतात भिजलेल्या मातीवरच राहिले. प्रा. कमलाताई ठकार यांच्या विनंतीने त्यांनी औसा येथील अंध, अपंग आधार केंद्रात वनौषधी उद्यानात ठिबक सिंचन संच घालून दिला. कविवर्य ना.धों. महानोर हे त्यांचे बालपणीचे मित्र. त्यांच्या घरोबाच्या संबंधाच्या आठवणी लेखिकेने विस्ताराने कथन केल्या आहेत. भवरलालजींनी ३ नि चा मंत्र जपला. निर्व्यसनीपणा, नियमितपणा आणि त्यांनी जळगावातील हजार शालेय विद्यार्थ्यांची राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची भेट घडवून आणली.

सुरुवातीच्या दिवसात एस्सो रॉकेल डेपोचे व्यवस्थापक नूर मोहम्मद शेख यांचे सहकार्य लाभले. त्यांची स्मृती जपण्यासाठी त्यांनी जळगावात त्यांच्या नावाने उर्दू ज्युनिअर कॉलेज काढले. आत्मकथेतील काही भाग जैन, चोरडिया परिवारातील व्यक्तिरेखेभोवती फिरत राहतो, घुटमळत रहातो. काही गोष्टीची दुरुक्ती, पुनरावृत्ती झालेली आहे. चहापानालासुध्दा विषपान समजणाऱ्या भवरलालजी जैन यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. कॉफर्ड ग्रीड, पद्मश्री पुरस्कार आदिंनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. लाख तर होतच रहातील, पण लाखांचा पोशिंदा होण्याची ताकद, हिंमत ठेवावी असा संदेश देण्यात लेखिका यशस्वी झालेल्या आहेत.

 थेंबभर पाणी अनंत आकाश लेखिका - सुरेखा शहा
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस आवृत्ती : २ प्रकाशन वर्ष : जून २०१० पृष्ठे : ३१२ मुल्य -  २८०.००
- सौ. मनिषा राजन कडव 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

शहरी पावसाळा