दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
‘नाही मी एकला' म्हणत फादर फ्रान्सिस दिब्रिटो सोडून गेले
मराठी साहित्याला मोलाचे योगदान दिलेले आणि जानेवारी २०२० मध्ये धाराशीवमध्ये अर्थात तत्कालीन उस्मानाबादमध्ये साजरे झलेल्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान प्राप्त झालेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे २५ जुलै २०२४ रोजी निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते. त्यांचे आत्मचरित्र ‘नाही मी एकला' म्हणता म्हणता ते आपल्याला सोडून गेले.
४ डिसेंबर १९४३ रोजी वसईमधील वटार गावात फादर फ्रान्सिस दिब्रिटो (मूळ नाव जॉन) यांचा जन्म झाला. त्यांच्या घराण्याचे मूळ आडनाव दिब्रित असे होते, त्याचेच रूपांतर नंतर दिब्रिटो असे झाले. फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या आईचे नाव सांतान आणि वडिलांचे नाव लॉरेन्स असे होते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी धर्मगुरू होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी १९६२ साली त्यांनी गोरेगाव इथल्या सेमिनरीमध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेतला. १० वर्षे विविध विषयांचं शिक्षण घेतल्यानंतर ते १९७२ साली धर्मगुरू झाले. त्यानंतर त्यांचे महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये येणं-जाणं सुरू झालं.
वेगवेगळ्या प्रदेशातील लोकांची आणि त्यांच्या प्रश्नांची त्यांना चांगली ओळख झाली. मराठी वर्तमानपत्रांमध्ये वाचकांची पत्रं आणि ललित लेख याद्वारे त्यांनी लेखनाला सुरुवात केली होती. १९७२ साली त्यांनी कॅथलिक धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली. १९७८ साली ते रोममधल्या रोस्सा इथल्या कॉलिजियो दि सान पावलो या सेमिनरीमध्ये पुढील शिक्षणासाठी गेले. रोममधल्या शिक्षणाच्या काळात त्यांच्यावर पोप जॉन पॉल यांचा मोठा प्रभाव पडला. पोप यांच्यासह मदत तेरेसा यांना भेटताही आलं. त्यांचा मानवतावादी प्रभाव त्यांच्यावर पडला.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरू असले तरी त्यांची खरी ओळख ही पर्यावरणप्रेमी आणि त्यासाठी आवाज उठवणारे कार्यकर्ते अशीच राहिली आहे.पालघर जिल्ह्यातील परिसरात त्यांनी सातत्याने पर्यावरणाच्या बाजूने भूमिका घेतली आणि सक्रिय काम केले. गेली कित्येक वर्षे वसईतून नियमितपणे प्रसिद्ध होत असलेल्या ‘सुवार्ता' मासिकाचे दीर्घकाळ संपादन केले, त्यांनी लिहिलेले ओॲससच्या शोधात हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आणि खूप गाजले. त्यांचे जेरुसलेम भेटीवरचं अभ्यासपूर्ण पुस्तक संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची, सृजनाचा मोहर, तेजाची पाऊले, परिवर्तनासाठी धर्म ही पुस्तके प्रकाशित असून वाचनीय आहेत. भारतरत्न मदर तेरेसा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन, त्यांच्याशी निवांतपणे चर्चा करून त्यानंतरच फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आनंदाचे अंतरंग हे तेरेसा यांचं चरित्र लिहिले होते.
दिब्रिटो १९८३ ते २००७ या कालावधीत ‘सुवार्ता या प्रामुख्याने मराठी कॅथलिक समाजाशी संबंधित असलेल्या मासिकाचे मुख्य संपादक होते. ‘सुवार्ता ' हे मासिक वसई, विरार मध्येच नव्हे ; तर अखिल महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. हे मासिक केवळ ख्रिस्ती धर्मियांसाठी न राहता सर्वधर्मियांसाठी होते. मराठी साहित्यात त्याचा स्वतंत्र ठसा उमटलेला होता. ज्यात ते आवर्जून नवोदितांच्या साहित्याला वाव देत असतं. दिब्रिटो गुंडशाहीविरुद्ध आवाज उठविणारे कार्यकर्ते आणि सुजाण, सजग आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व असल्याने सुवार्ता या मासिकाद्वारे त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे अनेक वेगवेगळे विषय मांडले आणि काही उपक्रमही राबवले. त्यामुळे हे मासिक केवळ ख्रिस्तीधर्मीयांसाठी न राहता मराठी साहित्यातही या मासिकाने स्वतंत्र ठसा उमटला.
पुणे विद्यापीठाची समाजशास्त्र या विषयातली बी. ए.आणि धर्मशास्त्र या विषयातली एम.ए. ही पदवी प्राप्त असलेले फ्रान्सिस दिब्रिटो हे पेशानं ख्रिस्ती धर्मोपदेशक आणि वृत्तीनं सजग समाजसेवक म्हणून ओळखले जात होते. ख्रिस्ती आणि ज्यू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. पर्यावरण चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते म्हणून ते प्रकर्षाने पुढे आले. पर्यावरण रक्षक प्रकल्प राबविण्यासाठी ते कायमच धडपडत असत. एकेकाळी हरित वसई' आंदोलनात ते अग्रस्थानी असत. ‘हरित वसई संरक्षण समितीच्या माध्यमातून फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली. वसईतील राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण यांच्या विरोधातही त्यांनी पुढाकार घेतला आणि मोठी मोहीम राबवली.
स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि न्याय या चार तत्त्वांच्या भक्कम पायावर उभ्या असलेल्या आपल्या संविधानामुळे समस्त भारतीय नागरिकांना आपल्या या खंडप्राय देशात आत्मसन्मानानं जगण्याची ग्वाही मिळाली आहे असे उद्गार त्यांनी जाहीर सभा-संमेलनात काढले होते. सुबोध बायबल - नवा करार' या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. तसेच मराठी साहित्याकरिता महाराष्ट्र राज्याचा संत ज्ञानेश्वर-तुकाराम यांच्या नावे असलेला पुरस्कार प्राप्त झालेले ते पहिले आणि बहुधा एकमात्र ख्रिस्ती मराठी साहित्यिक होते. हा पुरस्कार स्वीकारल्या नंतर माझी प्रथमतः त्यांच्याशी भेट झाली.तेव्हाच त्यांच्याशी बोलण्यातून त्यांची विद्वत्ता आणि पवित्रता याची मला जाणीव झाली.
अक्षर साहित्यातून उत्तम संस्कार होत असतात; परंतु आजची पिढी अशा साहित्यापासून दूरदूर जात असल्याबद्दल त्यांना चिंताही होती. त्यांचा स्वतःचा मराठी साहित्याचा, विशेषकरून मराठी संतसाहित्याचा गाढा अभ्यास होता. सुमारे चारशे वर्षांपूर्वी मराठी ख्रिस्ती धर्मोपदेशक फादर स्टीफन्स यांनी मराठी भाषेचा गौरव करताना म्हटले होते, जैसी पुष्पांमाजी पुष्प मोगरी, की परिमळांमाजी कस्तुरी, तैसी भाषांमाजी साजिरी, भाषा मराठी अशा या मराठी भाषेवर उत्कट प्रेम करत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आपल्या सकस लेखनाद्वारे मराठी भाषेची यथाशक्ती सेवा केली.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे रसरशीत आत्मचरित्र, नाही मी एकला या शीर्षकाने प्रकाशित झाले होते. ख्रिस्ती धर्मोपदेशक म्हणून आपली नित्याची कर्तव्ये ते करीत असत. वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे या संत तुकोबांच्या उक्तीनुसार त्यांनी तहहयात आपले आचरण केले. तसेच उत्तम मराठी साहित्य लिहून मराठी भाषेची उल्लेखनीय सेवा केली. अशा फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या स्मृतीस आपलं नवे शहर' च्या वतीने विनम्र अभिवादन ! -शिवाजी गावडे, ठाणे