मुशाफिरी

गेली अनेक वर्षे मी पावसाळ्यांचा व पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटतो आहे, सोबत परिवार, मित्रपरिवारालाही घेऊन जात आहे. पण सेफ्टी फर्स्ट. पाऊस दरवर्षी कोसळणार आहे. पण आयुष्य, हा मानवी देह एकदाच लाभला आहे. त्याला जपतच पावसाळी, हिवाळी, उन्हाळी पर्यटनाचा आनंद घ्यायला हवा..कारण जान है तो जहान है!

   पावसाळी पर्यटन कुणाला आवडत नाही? धो धो कोसळणाऱ्या पावसात भिजायला कोण नकार देतात? सर्दी होईल, खोकला त्रास देईल, पाय सटकून पडलो तर? भिजल्याने डोके दुखले तर? ताप आला तर? वगैरे वगैरे प्रश्न ज्यांना हैराण करत असतात त्यांना पाऊस आवडत नाही. आणि हो! पाऊस न आवडणारे आणखीही काही लोक आहेत. ज्यांचे धंदे फुटपाथवर मांडलेले असतात. त्यांना पावसामुळे गिऱ्हाईकं मिळत नाहीत, त्यांचे ठेले भिजतात, विकायला आणलेला माल भिजतो, तसेच ज्या महिलांना आपल्या चेहऱ्यावर थापलेला मेक अप पावसात भिजल्यामुळे पुसला जाईल याची भिती वाटते, त्यांना पाऊस किंवा पावसात भिजायला आवडत नाही. पण खरे तर हे निसर्गाच्या, प्रकृतीच्या, स्वाभाविकतेच्या अगदीच विरुध्द म्हटले पाहिजे. पाऊस म्हणजे जीवन, जीवन म्हणजे पाणी. पाणीच या सृष्टीला मिळाले नाही तर? पावसाळ्यात आकाशातून पडणाऱ्या या पाण्याकडे म्हणजेच जीवनाकडेच पाठ फिरवणे, त्याचा आस्वाद घेणे नाकारणे, त्याच्या जलधारा खिडकीतून पाहण्याचाही आनंद न घेणे, पाऊस धो धो कोसळायला लागला की तो थांबण्यासाठी देवाचा धावा करणाऱ्यांना करंटेच म्हटले पाहिजे.

   हा लेख लिहायला घेताना माझ्या सभोवताली पावसाने शानदार फेर धरला आहे. त्याचा आवाज मला बेभान करुन सोडतो आहे. घरभर ओल्या कपड्यांचा विशिष्ट वास दरवळतो आहे. माझ्याकडून या पावसात हमखास घरी केल्या जाणाऱ्या भजी, बटाटेवडे यांची फर्माईश केली जात आहे. त्याचवेळी माझ्यासमोर याच पावसात हिरोगिरी, चमकोगिरी करायला गेलेले, फाजील शौर्य दाखवून मुलींवर इंप्रेशन मारायला गेलेले किंवा ‘जाऊ नका' असे पोलीस, अन्य शासकीय यंत्रणा तसेच स्थानिक ग्रामस्थ यांनी सांगूनही तिकडे डोळेझाक  करुन स्वतःच्या व सोबत्यांच्या जिविताशी खेळणाऱ्या लोकांच्या जिवावर कसे बेतले, अंगावरचे दूधपिते मुल व त्याची आई आणि अन्य कूटुंबिय लोणावळ्याच्या भुशी डॅम भागात कसे डोळ्यादेखत वाहुन गेले याच्या बातम्या, चित्रफिती आहेत. माळशेज घाटात रस्ते अडवून टारगट, दारुडे पर्यटक कसे इतर प्रवाशांची अडवणूक करताहेत, खोपोली, खंडाळा परिसरात बेवड्यांनी सोबत नेलेल्या दारुचे प्राशन करुन त्या काचेच्या बाटल्या कशा रस्त्यात फेकून दिल्या आहेत, सीबीडी-खारघर, पनवेल परिसरातील प्रतिबंधित भागात धबधब्याकडे गेल्यावर पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर अडकून पडलेल्यांना सोडवण्याचा ताण कसा स्थानिक यंत्रणांवर पडला, कुंभे येथे रील बनवायला गेलेली अन्वी कामदार ही चार्टर्ड अकाऊण्टण्ट कशी जीवाला मुकली याचे वृत्त माझ्यासमोर आहे. हे सारे अपघात आहेत, हे कबूल! पण हे सर्व टाळता येण्याजोगे होते हेही वास्तव आहेच की! तसे करण्याची सवती कुणी कुणावर केली नव्हती. हे ‘पराक्रम' केले नसते तर कुणी कुणाचा पगार कापणार नव्हते की दंडही आकारणार नव्हते. मग या गोष्टी कराच का?

   गेली अनेक वर्षे मी पावसाळ्यांचा व पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटतो आहे, सोबत परिवार, मित्रपरिवारालाही घेऊन जात आहे. पण सेफ्टी फर्स्ट. पाऊस दरवर्षी कोसळणार आहे. पण आयुष्य, हा मानवी देह एकदाच लाभला आहे. त्याला जपतच पावसाळी, हिवाळी, उन्हाळी पर्यटनाचा आनंद घ्यायला हवा..कारण जान है तो जहान है! खंडाळा, लोणावळा, भुशी, माळशेज, खोपोली, माथेरान, कास पठार, काेंडेश्वर, शहापाडा धरण, रानसई धरण, सवतकडा धबधबा, तुंगारेश्वर, मंडणगड, नेरे, कर्जत-नेरळ-वांगणी परिसरातील विविध धबधबे या व अशा विविध ठिकाणांना मी सहपरिवार भेटी देऊन पावसाळी पर्यटनाचा आनंद घेतला आहे. आपण पावसाच्या, धबधब्यांच्या मोहक रुपावर पटकन भाळतो..पण अशावेळी सांभाळणे महत्वाचे असते, नाहीतर आयुष्यभर पस्तावण्याची वेळ ही निश्चित. मला वाटते वयोमानानुसार पर्यटकांनी स्वतःमध्ये बदल करवून घ्यायला हवेत. पावसाळ्यातील सुरक्षित पर्यटनासाठी अलिकडे विविध फार्म हाऊस, रिसॉर्ट, ॲम्युझनेण्ट पार्क, वॉटर पार्कस्‌ पुढे सरसावली आहेत. प्रतिदिन प्रतिमाणशी पाचशे-सहाशे ते हजार-दिड हजार रुपये आकारुन सुरक्षितपणे अशा ठिकाणी सहकुटुंब पावसाळी पर्यटनाची लज्जत घेता येते. तेथे ज्यांना तलावात उतरायचे ते तेथे उतरतील, ज्यांना धबधब्याखाली भिजायचे ते भिजतील, ज्यांना बोटींगची मजा लुटायची आहे ते बोटींग करतील. ज्यांना नुसत्याच खुल्या आभाळाखाली उभे राहुन जलधारा अंगावर घ्यायच्या आहेत, ते तसे करतील. येथे आपण धोक्याची पातळी जवळपास शून्यावर आणून ठेवू शकतो.  

   आमच्या एस एस सी १९७८ च्या तुकडीतील अनेकांना माझ्या मावसभावाच्या पेण येथील शेतघरात जाऊन पावसाळ्यात दोन दिवस मुवकाम ठोकणे आवडते. १९७२ साली आम्ही इयत्ता पाचवीला एकत्र आलो, त्याला यंदा जूनमध्ये ५२ वर्षे होऊन गेली. आमच्यातले बहुतेक सारेजण-जणी आता आजी-आजोबा झाले आहेत. आमच्या त्यावेळच्या त्या ५० विद्यार्थ्यांच्या वर्गातील अनेकांनी या जगाचा निरोप घेतला आहे, काहींना असाध्य आजारांनी सतावले आहे. न जाणो उद्या कुणाचा नंबर असेल...म्हणून आता तर आमच्यातील अनेकांमधले मैत्रीबंध आणखी घनदाट झाले आहेत. आजचा दिवस पाहिला, उद्याची सकाळ पाहायला कोण असेल, नसेल! माझ्यासोबत शरद ननावरे, मीनल कर्णिक, पद्मिनी गुंजाळ, किशोर मार्कंडे, नितिन सावंत, निवृत्ती झनकर असे आमचे सहा-सात जणांचे एका मोठ्या कारमधून फिरता येईल असे भ्रमण मंडळ आहे. मग अजिंठा वेरुळ असो, जम्मू-काश्मिर असो, हिमाचल प्रदेश असो की केरळ असो..आज इतक्या वर्षांनंतरही यातील अनेकजण (काही तर आपल्या मुलांनाही घेऊन!) सोबतीने आणि विश्वासाने प्रवासाला निघतात.  

   आमच्या या भ्रमण मंडळाची अन्नपूर्णा आहे आमची मैत्रीण सौ. मीनल सुबोध कर्णिक (पूर्वाश्रमीची मंगला गुप्ते!) माझ्या मावसभावाच्या फार्म हाऊसवर जातानाच्या मार्गावर उरणमधील दिघोडा, खारपाडा किंवा पनवेल अथवा पेणमधील कोळणींसमोर आमचा गराडा पडतो. मग तेथे वाम, जिताडा, चिंबोऱ्या, फंटूश मासे, हलवा, सुरमाई, रावस, कोळंबी अथवा असेच मिळणारे ताजे मासे निवडले जातात. बाजूलाच मटणवाल्याकडे मग शरद ननावरे बोट दाखवतो. तेथून भेजा, कलेजी, मुंडी, चाप असा विविधांगी ऐवज खरीदला जातो. शेजारच्याच दुकानातून तेल, मीठ, कांदे, बटाटे, लसूण, दुध, श्रीखंड (आमच्यातील किशोर या बामणासाठी!) ब्रेड, अंडी, कॉर्न पलॉवर, काबुली चणे, चण्याचे पीठ, पाण्याच्या बाटल्या असा ऐवज घेण्याची सूचना नितिन किंवा अन्य कुणी करते. कर्णिकबाई सीकेपी व स्वतः जेवण रांधण्यात वाकबगार असल्याने एकापेक्षा एक चविष्ट सीकेपी पाककृती बनवून आमच्या जिभेची तृप्ती करण्यात तिचा हातखंडा आहे. ती घरातूनच काही शाकाहारी काही मांसाहारी पदार्थ बनवून घेतानाच वाटण, मसालेही साथीला घेते. सोबतीला पद्मिनीची सार्थ मदत असतेच. पेणमधील कोळीवाड्याजवळ तांदळाच्या मऊसुत भाकरी तयार मिळतात. तेथेच काकड्या, बीट, गाजर, मुळा, विविध प्रकारच्या आंब्यांच्या जाती, केळी, फणस, पेरु, चिकू,  करटोलीसारख्या हंगामी भाज्या घेता येतात. मिठाई, फरसाणची दुकाने खुणावत असतात; पण त्याहीपेक्षा कर्णिकबाईंच्या हातची चव भारीच असल्याने आम्ही तो मोह टाळतो. एव्हाना पेणमधील मासेवाले, भाजीवाल्या, दुकानवाले यांना आम्हा भ्रमणमंडळवाल्यांचे चेहरे पाहुन पाठ झाले असतील. हातात भरपूर पिशव्या, पिशव्यांमधील दुध, मासे, मटण, भाज्या, फळे भाकऱ्या यांचा संमिश्र वास  आणि त्या घेऊन आम्ही पेणच्या बाजारातून फिरतोय हे चित्र अनेक पेणकरांनी पाहिले असेल. पेण हे माझे आजोळ. माझ्या आईच्या आई-वडीलांना मी कधीच पाहू शकलो नाही. कारण माझ्या जन्मापूर्वीच ते गेले. पण त्यांचे आत्मे मात्र त्या परिसरात मला भटकताना नवकीच पाहात असतील. अनेकदा पेणमधील त्या फार्म हाऊसचा धनी आमचा बंधू बजरंग आम्ही सहपरिवार तेथे गेल्यावर पेणमधील त्याच्या घरूनच रांधून आणलेले भरपूर काही सोबत आणत असतो आणि आम्हा कुटुंबिय आणि मित्रपरिवाराच्या रसनेची तृप्ती करीत असतो. तेथल्या पाण्यातच अनोखी चव असल्याने कोणत्याही वेळी भरपेट जेवण जाते आणि कितीही हादडले तरी अपचन होत नाही हे विशेष! हे आम्ही तेथील पोपटी हादडताना नेहमीच अनुभवतो.

   मित्रवर्य शरद ननावरे याने सोबत नेलेली साऊंड सिस्टीम, लॅपटॉप आणि कराओकेच्या साथीने तो तेथे म्हणत असलेली गाणी हा आमच्या भ्रमणमंडळाचा ‘युएसपी' आहे. त्यावर कर्णिकबाईंच्या नृत्याचा तडका म्हणजे क्या कहने!  गाणे कोणतेही असो; बाईंच्या नाचायच्या स्टेप्स ठरलेल्या! जसे गीत कुठलेही असले तरी काही लोक ते ‘सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची' याच चालीवर म्हणतात ना..अगदी तसेच..! त्या फार्म हाऊसच्या प्रवेशद्वाराजवळच पाण्याचा मोठा प्रवाह आहे. डोंगरातून येणारे पाणी मोठ्या वेगाने तेथून वाहते. ज्यांना तेथे भिजायचेय ते तेथे डुंबतात. सोबतीला आम्ही क्रिकेट खेळण्याचेही साहित्य घेऊन जातो. येथे वावरणे एकदम सुरक्षित. प्रदूषणमुवत, कोणत्याही शहरी गोंगाटापासून दूर आणि कुणीही डिस्टर्ब करायला येणार नाही अशा या परिसरातील पावसाळी सहल नेहमीच आनंद देणारीच ठरते. बघाना..! आमची मैत्रीण मीनल कर्णिक तिकडे स्वयंपाकघरात तळलेल्या माशांच्या तुकड्या, अंड्यांच्या बलकात तळलेले ब्रेड्‌स, कॉर्न फ्लॉवर-लसणाचा तडका दिलेले काबुली चणे, तळलेला भेजा आणून समोर डिश मांडतेय, काकड्या, गाजर, मुळ्याचे काप आणि टोपभर उकडलेली अंडी सोलून समोर पद्मिनी ठेवतेय, शरद कराओके वर ‘भिगी भिगी रातोमे..मिठी मिठी बातोंमे' गाणे गातोय, किशोर मार्कंडेने त्यावर फेर धरलाय, तो प्रसंग मी कॅमेऱ्यात चित्रित करतोय, बाकीचे हे सारे डोळ्यात साठवताहेत आणि या साऱ्याला बाहेर संततधार पडणाऱ्या पावसाची साक्ष आहे.. सुख सुख म्हणजे आणखी तरी काय असतं हो आमच्यासारख्या साठीपुढच्या निर्व्यसनी पर्यटनप्रेमी खादाडपंथीयांसाठी?  

-राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

घोषणांचा सुळसुळाट - तिजोरीत खळखळाट टॅवस वसुलीची वेगळी वाट!