शिकता शिकवता नवे सदर

पालकांनो, मुलगा हा काहीतरी सांगतोय, खुणावतोय की मला हे बनायचे आहे, ते नाही बनवायचं आणि आपण मात्र मुलांना कागदाचे विमान समजून हवे तसे उडवतोय..असं कृपया करु नका. मुलांना वेडं बनू द्या, त्यांच्यात वेडा ठरवलेला आइन्स्टाइन असेल, त्यास नापास होऊ दे, त्यात दहावी नापास झालेला सचिन तेंडुलकर असेल, त्याला वाटा चुकू द्या, त्यात कदाचित स्टीव्ह जॉब्स असू शकतो. चला तर...,शिकू द्या आनंदे.. म्हणत स्वतः शिक्षित आहोत, सुशिक्षीत होऊ या!

 निरंतर अंतर हे समांतर करून माणसाच्या जीवनात आणि जेवणात एक महत्वपूर्ण स्थित्यंतर घडविण्यात शिक्षण खूप काही करू शकते. मुळात पालक यांच्या कडून अपेक्षा खूप असताना, पालकच आज बालक बनून नको ते ओझे लेकरांच्या पाठीवर लादून त्यांना खेचरं बनवत, राष्ट्र उपेक्षा करत आहेत. मुलं आपली अश्व आहेत, त्यांना खेचर आणि गाढव करण्यात आपण, राष्ट्र संपती आपल्या अपत्य रुपात वाया घालून, देशावर आपत्ती आणत आहोत, हे जर त्यांच्या बापाला कळले नाही तर हे दुर्दैव आहे. मुलगा हा काहीतरी सांगतोय, खुणावतोय की मला हे बनायचे आहे, ते नाही बनवायचं आणि आपण मात्र मुलांना कागदाचे विमान समजून हवे तसे उडवतोय; कारण हेवे दावे खूप डोक्यात घुसत, धुमसत आहेत, अवास्तव अपेक्षा पालक मुलांकडून ठेवत त्यांना, बालकांना, ना घरका न घाटका करत आहेत.

     पालकहो! मुलांना गिनिपिंग समजून मोल्ड करून बोल्ड निर्णय नका घेऊ. वास्तविक एका इसाप नितीतील गोष्टी मध्ये, एका प्राण्यांच्या शाळेत, जो कासव पोहण्याच्या शर्यतीत पहिला येईल, त्यास तू धावण्यात प्रगती कर, फक्त पोहणे या एकाच विषयात मेरिट नको, म्हणून त्या कासवास धावण्याच्या सरावामुळे त्याच्या पायाच्या दोन बोटात असलेला पातळ पडदा जो पोहण्यास उपयुक्त..तोही फाटला, मग ते कासव, ना हवे तसे पोहू शकले, ना धावू शकले, ते एक सर्वसामान्य मुल म्हणून वर्गात वावरू लागले. असेच ससा हा पोहण्यात, खारू ताईला..., बिळ बनवण्यास, उंदीर मामास झाडावर चढउतार करण्यास, तर बेडूक यास उंच दोरी उड्या सराव, तर जिराफ यास.., स्लो वॉक स्किल विकसित करण्याच्या नादात..., सर्व वर्ग आणि शाळेचा फियास्को झाला.

     हीच अवस्था आज घरादारात होत आहे. पालक हट्टापोटी बालक हट्ट पांगुळगाडा झाला असून  लहान मुलं आज मोठ्याकडून शिकार होत आहेत. एक मुख्याध्यापक म्हणून, मला या गोष्टींचा खूप अनुभव येत आहे. इंग्रजी माध्यम, मराठी माध्यम, सेमी मराठी माध्यम यातून बालक हा जात्यात भरडला जात आहे. मुलास मुक्तपणाने शिकू न देता, विभक्त राहत असलेले पालक विरक्त न होता, भुरळ आणि लॉलीपॉपच्या युगात स्वतः एक दिशा नसलेला फलक झाले आहेत. विद्यार्थी हा खूप सजग, तरल असतो, मित्र, शेजार, नात्यात असणारी सुप्त स्पर्धा त्यांचा बळी घेत आहे. मुलांचे देखील एक मानसशास्त्र आहे, हे समाजशास्त्रदेखील मानत असताना, प्रा.श्री.अशोक बागवे म्हणतात, त्या प्रमाणे,मुलांचे पाय पाळण्यात नाही तर पळण्यात देखील दिसतात, हे समजून घ्या.

         बदल घडवणे गरजेचं आहे; मात्र बदल हा अभिरुचीसंपन्न असावा, अभिव्यक्तीयुक्त असावा; तरच अभिसंधान हे साधलं जाऊ शकते. पालक आज ‘ब' तुकडी नको म्हणून ‘अ' तुकडीसाठी भांडत आहेत, एका आई पालकाने तर मुलास मराठी माध्यमातून सेमीस नाही प्रवेश दिला तर शाळेतच आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचे माझ्या रोजनिशित रेकॉर्डवर आहे.  मुलगा म्हणतो..मला मी बनू दे, तू हवं ते बनू शकली  नाही, म्हणून तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काही जन्मास आलो नाही! ही आर्त साद, किंकाळी आई, बाबा यांनी ऐकून घेतली पाहिजे.

     एकूणच मुलांना वेडं बनू द्या, त्यांच्यात वेडा ठरवलेला आइन्स्टाइन असेल, त्यास नापास होऊ दे, त्यात दहावी नापास झालेला सचिन तेंडुलकर असेल, त्याला वाटा चुकू द्या, त्यात कदाचित स्टीव्ह जॉब्स असू शकतो. चला तर...,शिकू द्या आनंदे.. म्हणत स्वतः शिक्षित आहोत, सुशिक्षीत होऊ या! -प्रा.रवींद्र पाटील 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

रंगांची अभिव्यक्ती