रंगांची अभिव्यक्ती

कृतिकाने  सर्व शब्द अगदी बरोबर लिहिले होते आणि प्रत्येक शब्दापुढे त्या वस्तूच्या रंगाचे नाव लिहिण्याऐवजी त्या रंगाच्या तेल खडूने रंगवले होते. म्हणजे ‘पेरू', शब्द लिहून पेरू शब्दाच्या पुढे हिरव्या तेल खडूने रंगवले होते. ‘कावळा', शब्द लिहून काळ्या खडूने  रंगवले होते. असे दहा शब्दांच्या पुढे दहा योग्य रंगाने रंगवले होते. कृतिकाची ही कृती बघून मी थक्क झालो. माझ्या मनातसुद्धा विचार आला नव्हता की दुसरीतील मुल एवढ्या उच्च प्रतीची कल्पकता दाखवेल. तेही अगदी शांतपणे.

१५ जून २०२४, यावर्षीचा शाळेचा पहिला दिवस. पावसाळा नुकताच सुरू झाला होता. उन्हामुळे तापलेल्या मातीचा जलधारांच्या अभिषेकामुळे सुगंध पसरला होता. सृष्टी आता हळूहळू हिरवे पांघरून घेऊ लागली होती. शाळेतसुद्धा नवीन मुले, नव्या उत्साहात दाखल झाली होती. जुन्या मुलांच्या चेहऱ्यावर शाळा सुरू झाल्याचा आनंद दिसत होता. बाहेरचा रिमझिम पाऊस आणि वर्गा-वर्गातला मुलांचा रूनझुन आवाज मनावर वेगळीच मोहिनी घालत होता. शाळेतील मुलांचे आनंदी चेहरे पाहणे याशिवाय दुसरं सुख असू शकत नाही याची जाणीव यावेळी शाळा भेटीच्या दरम्यान होत होती. या उत्साही वातावरणात पहिले चार दिवस शाळांना भेटी देऊन पहिलीच्या वर्गात नव्याने दाखल झालेल्या मुलांची ओळख करून घेतली. पहिलीतील मुलांना शाळा आवडली आहे याची खात्री करून झाली. १९ जूनपासून इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत एक प्रयोग करायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांच्या ‘श्रुत लेखन आणि स्व लेखन कौशल्यांचा विकास', कितपत झाला आहे याचा मागोवा घ्यायचे ठरवले. पहिलीच्या वर्गात वर्षभर अभ्यास केल्यावर मुलं छान पैकी लिहायला, वाचायला, सोप्या  वाक्यात स्वतःचे मत मांडायला, परिसराचे निरीक्षण करायला, अभिव्यक्त व्हायला शिकतात. मुलांच्या या शिक्षणाची पातळी नेमकी कोणत्या टप्प्यावर आहे हे पाहण्यासाठी माझा प्रयोग मला मदत करणार होता.

त्या दिवशी पावसाचा जोर वाढला होता. गोष्टीतल्याप्रमाणे शाळेच्या छोट्याशा अंगणात छोटसं तळं साचलं होतं. त्या तळ्यात शाळेभोवती असलेल्या झाडांचे सुंदर प्रतिबिंब दिसत होते. मध्येच कधीतरी वाऱ्याची झुळूक आली की ते प्रतिबिंब हालायचे. क्षणभर ते सुंदर दृश्य डोळ्यात साठवलं आणि शाळेमध्ये पाऊल टाकलं. शाळेच्या बाहेरील मातीचा सुगंध सोबत घेऊन शाळेतील दुसरीच्या वर्गात प्रवेश केला. मातीच्या सुगंधापेक्षा दुसरीच्या वर्गातील मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद जास्त हवाहवासा वाटला. मुलांशी गप्पा मारत प्रयोगाला सुरुवात केली. मुलांना त्यांच्या वह्या उघडायला सांगितल्या. मुलांनी विजेच्या वेगाने त्यांच्या दप्तरातून मराठीच्या दुरेघी वह्या बाहेर काढल्या. मी मुलांना सूचना दिली, ‘आता मी तुम्हाला दहा शब्द लिहायला सांगणार आहे. तुम्ही एकाखाली एक सुंदर अक्षरात शब्द लिहा.' मी शब्द कधी सांगणार याची उत्सुकता मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होती. मी शब्द सांगायला सुरुवात केली. ‘पाणी, पेरू, रस्ता, कावळा, समुद्र, फुले, आंबा, पोपट, फुगा, गुलाब.' सर्व मुलांनी शब्द लिहिले. शब्द लिहिल्यानंतर मी दुसरी सूचना केली, ‘तुम्ही लिहिलेल्या दहा शब्दांतील प्रत्येक शब्दापुढे त्या- त्या वस्तूचा रंग लिहा.' मुलांना नेमकं काय करायचं आहे, हे कळावे म्हणून मी एक उदाहरण त्यांना स्पष्ट करून दिले. मुलांना विचारलं, ‘पेरूचा रंग कोणता?'  वर्गातील सर्व मुलांच्या तोंडून एकच आवाज आला ‘हिरवा.' मग तुम्ही पेरू शब्दाच्या पुढे ‘हिरवा', हा शब्द लिहा आणि अशा प्रकारे उरलेल्या सर्व शब्दांचे रंग लिहा. मुलांनी क्षणात माना खाली घातल्या आणि त्यांची लेखणी सुरू झाली. प्रत्येक मूल त्याच्या विश्वात रमले. त्याने पहिलीत शिकलेले रंग आणि लिहिलेले शब्द यांची सांगड घालून शब्दांची रंगसंगती मुले वहीवर जुळवू लागली.

अवघ्या पाच मिनिटांत मुलांनी शब्द आणि त्यांचे रंग लिहून पूर्ण केले. लिहून पूर्ण झाल्यानंतर ते मला दाखवायला येण्याची मुलांची स्पर्धा सुरू झाली. त्या स्पर्धेचा एक वेगळाच रंग होता. बाहेर पडणाऱ्या रिमझिम पावसासारखा, अगदी गोड! अनेक मुलांनी वस्तू आणि त्यांचे रंग अगदी अचूक लिहिले होते. याचाच अर्थ पहिलीमध्ये असताना त्यांचे शिक्षण चांगल्या प्रकारे झाले होते. थोड्यावेळात वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या रंगांसंबंधीच्या वह्या मला दाखवल्या. सगळ्यांचे शब्द आणि त्यांचे रंग बरोबर आल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरची रंगत अजून वाढली होती. पण शेवटच्या बाकावरील एका मुलीने अजून मला वही दाखवली नव्हती. तिच्यासाठी मी वाट बघत होतो. बाकीची मुलं इकडे तिकडे नाचत होती. बाहेरचा पाऊस बघत होती. ‘एकच मुलगी मागे का?' असा विचार मी मनात करू लागलो. मग मी मुलांना, ‘तिचं नाव काय आहे?'  असं विचारलं. मुलं म्हणाली, ‘कृतिका.' बाकीची मुलं नाचत होती. माझ्याशी बोलत होती; पण कृतिका अजूनही खाली मान घालून वहीमध्ये काहीतरी लिहीत होती. दहा मिनिटे होऊन गेली. आता मात्र माझ्या मनात थोडीशी निराशा दाटून आली. कृतिकाला रंगांची माहिती नसावी का? की तीने शब्दच लिहिले नाहीत? की तिला काय करायचे आहे हेच कळाले नाही? अशा प्रश्नांची मालिका मनामध्ये निर्माण झाली. बाहेरच्या पावसाकडे माझे दुर्लक्ष झाले. तेवढ्यात वही घेऊन कृतिका माझ्यासमोर आली. ती माझ्याशी काहीच बोलली नाही. शांतपणे तिने तिची वही माझ्या हातात दिली. आता पाऊस थांबला होता. कृतिका खाली मान घालून माझ्यासमोर उभी होती. माझ्या हातात तिची वही होती. मी तिच्या वहीत पाहिले. कृतिकाने  सर्व शब्द अगदी बरोबर लिहिले होते आणि प्रत्येक शब्दापुढे त्या वस्तूच्या रंगाचे नाव लिहिण्याऐवजी त्या रंगाच्या तेल खडूने रंगवले होते. म्हणजे ‘पेरू', शब्द लिहून पेरू शब्दाच्या पुढे हिरव्या तेल खडूने रंगवले होते. ‘कावळा', शब्द लिहून काळ्या खडूने  रंगवले होते. असे दहा शब्दांच्या पुढे दहा योग्य रंगाने रंगवले होते. कृतिकाची ही कृती बघून मी थक्क झालो. माझ्या मनातसुद्धा विचार आला नव्हता की दुसरीतील मुल एवढ्या उच्च प्रतीची कल्पकता दाखवेल. तेही अगदी शांतपणे. क्षणभर मला काय बोलावे ते सुचेना. कदाचित कृतिकाने केलेली कृती लाखात एखादेच मूल करेल. कृतिकाच्या कल्पक विचारांना मी सलाम केला आणि शाबासकीची थाप तिच्या पाठीवर दिली. अवघे सात वर्षाचे बाळ आणि कमालीची कल्पकता! त्याचवेळी दुसरा विचार मनामध्ये आला. पहिली मध्ये कृतिकाला शिकविणाऱ्या बाईंनी रंगांची कल्पना किती खोलवर जाऊन स्पष्ट केली असेल. कृतिकाच्या मनात रंगाचे नाव लिहिण्याऐवजी प्रत्यक्ष रंग लावावे हा विचार कसा आला याचा विचार मी करू लागलो. मला कृतिकाच्या वेगळ्या कृतीचा खूप आनंद झाला. म्हणून कृतिकाच्या बाईंना तिची वही दाखवली आणि म्हटलं, ‘कृतिकाने खूप कल्पक पद्धतीने रंगांची नावे लिहिली आहेत.' बाईंनी  कृतिकाची वही पाहिली आणि बाई म्हणाल्या, ‘ती लेखनाचा कंटाळा करते.' माझ्या मनात विचार आला, कदाचित बाईंचे विधान त्यांच्या निरीक्षणातून आलेले असेल आणि ते बरोबरही असेल. पण वर्गातील सर्व मुले रंगांची नावे लिहितात आणि कृतिका रंगांची नावे लिहिण्याऐवजी प्रत्यक्ष रंगाने रंगवते या कृतीकडे, कल्पक विचार या दृष्टिकोनातून बघायला काय हरकत आहे? ‘आऊट ऑफ बॉक्स थिंकिंग म्हणजे अजूनतरी वेगळे काय असते'? शिव खेरा यांनी म्हटलंच आहे, ‘यशस्वी माणसं वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात.' कृतिकाची वेगळी पद्धत खूप भावली. कृतिकाचे रंग मनात घेऊन, शाळेच्या बाहेर पडलो. शाळेच्या बाहेरील तळ्यात निसर्गाचे जे प्रतिबिंब उमटले  आहे त्याचा रंग कृतिकाने कसा व्यक्त केला असता? हा विचार करून अंगात रेनकोट घातला आणि कृतिकाचे शब्द आणि तिचे रंगाचे फटकारे यांची प्रतिमा मनात वेगळ्या रंगाने जपून ठेवली. त्यानंतर हा प्रयोग मी अजून वेगवेगळ्या पंचवीस शाळांमध्ये १२७ विद्यार्थ्यांच्या सोबत केला. पण कृतिकासारखी कृती मला पुन्हा आढळली नाही.

प्रयोग जसजसा पुढे जात होता तसतसे दोन प्रश्न निर्माण झाले. त्यातील पहिला प्रश्न म्हणजे, मुलांना ‘रंगहीन', ही संकल्पना का माहीत नसावी? कारण प्रत्येक शाळेतील मुलांनी पाण्याचा वेगवेगळा रंग लिहिला होता जसे की- पांढरा, निळा, पानेरी, काचेरी. म्हणजे पाण्याचा रंग ही संकल्पना विद्यार्थ्यांना स्पष्ट झाली नव्हती. दुसरा प्रश्न असा निर्माण झाला फुगा आणि फुले या शब्दांसाठी विद्यार्थ्यांनी कोणत्यातरी एकाच रंगाचे नाव का लिहिले होते? खरंतर फुलांच्या नावापुढे मुलांनी त्यांना माहीत असलेल्या आणि त्यांनी पाहिलेल्या सर्व फुलांच्या रंगांची नावे लिहायला हवी होती आणि फुग्याच्या नावापुढेसुद्धा. पण असे कुठे आढळले नाही. एका शाळेत मात्र एका विद्यार्थ्याने फुगा आणि फुले या शब्दांपुढे ‘रंगीबेरंगी', हा शब्द लिहिला होता. ज्या विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी हा शब्द लिहिला होता, त्याच्या रंगांसंदर्भाच्या आणि अभिव्यक्ती संदर्भातील बऱ्याच कल्पना स्पष्ट झाल्या होत्या. जीवनातील सगळे रंग जाणून घेण्याची त्याची पूर्वतयारी चांगली झालेली आहे. त्याने फुलपाखराचे बडबड गीत मनापासून गायले आहे. फुलांकडे मनापासून पाहिले आहे. अर्थात हे सारं श्रेय शिक्षकांच्या शिकवण्याच्या रंगांचे आहे. माझ्या दुसरीतील विद्यार्थ्यांची लेखनाची आणि अभिव्यक्तीची क्षमता चांगल्या पद्धतीने साध्य झाली आहे ही भावना माझ्यासाठी माझ्या आनंदाचा रंग अधिक गडद करणारी आहे. -अमर घाटगे  

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!