मुलांना शिकवायचं की मुलांकडून शिकायचं?

एका उत्तरपत्रिकेतील पहिलेच वाक्य वाचले, मुले टीव्ही बघत आहेत, सगळे एकत्र आहेत पण कोणीच कोणाशी बोलत नाही. माझा माझ्या डोळ्यांवर आणि विचारशक्तीवर विश्वास बसत नव्हता. मी पुन्हा वाक्य वाचलं, कोणीच कोणाशी बोलत नाही. आधुनिक कुटुंबातील सर्व सुख सोयी, सर्व माणसं उपभोगत असतानाही त्याला दुःखाची एक किनार आहे याची जाणीव झाली. सगळे एकत्र आहेत पण कोणीच कोणाशी बोलत नाही. सुखी कुटुंबाचे बेगड तिसरीतल्या विद्यार्थ्याने एका वाक्यात उकलून बाजूला काढले आणि त्याला काय ‘वाटते', याचे वास्तव परीक्षेतील प्रश्नाच्या उत्तराच्या माध्यमातून व्यक्त केले.

नुकतीच शासकीय आणि अनुदानित शाळांमधील तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी पार पडली. ही चाचणी गेल्या वर्षीच्या अभ्यासक्रमावर आधारित असते. त्यातील इयत्ता तिसरीच्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न विचारला होता. खालील चित्र पहा, चित्रामध्ये तुला काय दिसते व त्याबद्दल तुला काय वाटते या संदर्भात चार- पाच वाक्य लिही. चित्रामध्ये एका कुटुंबातील आशय रेखाटला होता. दोन लहान मुलं सोपयावर बसून टीव्ही पाहत आहेत. मुलांची आई वर्तमानपत्र वाचत आहे. तर मुलांचे बाबा मोबाईलवर कोणाशी तरी बोलत आहेत. एका भिंतीवर घड्याळ आहे, छतावर पंखा फिरत आहे. टीव्ही शेजारी असलेल्या छोट्याशा कपाटावर एक पलॉवर पॉट आहे. तर बाबांच्या पुढे असलेल्या छोट्याशा टेबलवर कप बशी ठेवली आहे. थोडक्यात या चित्रात कोणत्याही सामान्य कुटुंबात जे चित्र असतं तेच चित्र उभं केलं आहे. तिसरीतील मुलांनी हे चित्र बघायचं आहे आणि त्याबद्दल काय वाटतं ते लिहायचं आहे.

म्हटलं तर सोपं आणि म्हटलं तर अवघड असं हे काम आहे. मराठीचा पेपर संपल्यानंतर दहा-बारा शाळांमधील अंदाजे  साठ-सत्तर  विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका पाहिल्या व तिसरीतील विद्यार्थ्यांना या चित्राबद्दल काय वाटत आहे याचा अंदाज घेतला. सर्व विद्यार्थ्यांनी चित्रात काय दिसत आहे याचेच अगदी सविस्तर वर्णन केलेले आढळले. प्रत्येक सूक्ष्म गोष्टीचे मुलांनी वर्णन केलेले आढळले. पण चित्राबद्दल काय वाटते आहे हे कोणत्याच विद्यार्थ्यांनी लिहिलेले आढळले नाही. मुलांच्या उत्तरपत्रिका पाहत असताना अंदाज येत होता की मुलांना प्रश्नाचा दुसरा भाग व्यवस्थित समजला नाही. सर्वांनीच चित्रात काय दिसत आहे, तेच लिहिलं होतं. पण जे दिसतंय त्याबद्दल काय वाटतं आहे हे मात्र कोणी लिहीलंच नव्हते. एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जाताना इथल्या मुलांना तरी चित्राबद्दल काहीतरी वाटत असेल आणि त्यांनी ते लिहिलं असेल अशी आशा घेऊन शाळेत जात होतो. पण प्रत्येक ठिकाणी चित्राचे वर्णनच वाचायला मिळत होते. शेवटी शेवटी माझ्या मनात विचार आला, कदाचित प्रश्नच चुकला असावा. तिसरीतील सात-आठ वर्ष वय असलेल्या मुलाला,  स्वतःला काय वाटतं हे ठामपणे  सांगता येणारच नाही याची मला खात्री पटली.

अनेक मुलांच्या उत्तर पत्रिका पाहिल्यानंतर मला स्वतःला चित्राबद्दल काय वाटत आहे याचा मी विचार करू लागलो. पण विचारांना गती येत नव्हती आणि मुलांचे विचार चक्र समजून घेता येत नव्हते. फक्त अस्वस्थता वाढत होती. अशा काहीशा निराश मानसिक अवस्थेत एका शाळेत गेलो. आता तिसरीच्या उत्तर पत्रिका पाहण्याची ही शेवटची शाळा असं ठरवलं आणि मराठीच्या उत्तरपत्रिकांचा गठ्ठा हातात घेतला. पहिल्या दोन-तीन उत्तर पत्रिकांमध्ये चित्राचे वर्णन आढळले. मन अजून निराश झाले. आता यापुढे अजून उत्तर पत्रिका बघायलाच नकोत. मुलांना काय वाटतं ते बहुतेक त्यांना सांगता येत नाही. असा विचार मनात पक्का झाला आणि कळत नकळत दुसरी उत्तरपत्रिका हातात घेतली. वर नाव वाचले- ‘समृद्धी'. पटपट उत्तरपत्रिकेची पृष्ठे उलटली आणि चित्र वर्णनाचा प्रश्न वाचायला घेतला. पहिलेच वाक्य वाचले, मुले टीव्ही बघत आहेत, सगळे एकत्र आहेत पण कोणीच कोणाशी बोलत नाही. माझा माझ्या डोळ्यांवर आणि विचारशक्तीवर विश्वास बसत नव्हता. मी पुन्हा वाक्य वाचलं, कोणीच कोणाशी बोलत नाही. आधुनिक कुटुंबातील सर्व सुख सोयी, सर्व माणसं उपभोगत असतानाही त्याला दुःखाची एक किनार आहे याची जाणीव झाली. सगळे एकत्र आहेत पण कोणीच कोणाशी बोलत नाही. सुखी कुटुंबाचे बेगड तिसरीतल्या विद्यार्थ्याने एका वाक्यात उकलून बाजूला काढले आणि त्याला काय ‘वाटते', याचे वास्तव परीक्षेतील प्रश्नाच्या उत्तराच्या माध्यमातून व्यक्त केले.

मुलांना पण वाटत असावे, कुटुंबातील माणसांनी एकमेकांशी बोलावं. त्यासाठीच तर आपण एकत्र राहतो ना? कुटुंब सुखी होण्यासाठी आपण सगळेच खूप कष्ट करतो. पण एवढे कष्ट करण्याची गरज नाही. हे तिसरीतल्या विद्यार्थ्यांनी मला शिकवलं. फक्त आपण एकत्र राहून उपयोग नाही तर आपण एकमेकांशी बोलायला हवं. खूप खूप बोलायला हवं. दोन दिवस मी काय शोधत होतो, हेच मी विसरलो आणि तिसरीतली मुले एवढं कुठे शिकली असावीत याचा शोध घेऊ लागलो. सुखी कुटुंब म्हणजे काय? याची नवीन व्याख्या नव्याने मला समजली.. ‘बोलायला हवं'. त्याच क्षणी मनामध्ये विचार आला, खरंच आपण मुलांना शिकवत आहोत की मुलांच्याकडून आपण शिकायला हवं?

चौथीच्या मराठीच्या प्रश्नपत्रिकेत  एक कथा दिली आहे. अगदी साधी चार ओळींची कथा. एक जंगल होतं. जंगलात एक कोकरू फिरत होते. तेवढ्यात समोर लांडगा आला. लांडगा कोकराला म्हणाला, आता मी तुला खाणार. तेवढ्यात कोकरू म्हणाले, मी आत्ताच गवत खाल्ले आहे, थोडं पोट हलवतो म्हणजे गवत जिरेल आणि मग तू मला खा. कोकराने पोट हलवायला सुरुवात केली. त्यामुळे त्याच्या गळ्यातील कंठ वाजू लागला. कंठाचा आवाज ऐकून कोकराची आई तिथे आली. मग लांडगा पळून गेला. कथा संपली. कथेखाली प्रश्न विचारला होता, कथेतील कोकराच्या जागी तू असता तर तू काय केले असते?  सात-आठ शाळांमधील उत्तरपत्रिका पाहिल्या. अनेक मुलांनी लिहिलं होतं, मी मोठ्याने ओरडेन, मी लपून बसेल, मी दगडाने लांडग्याला मारेल, मी आईकडे धावत जाईलठ. बहुतांश उत्तरांमध्ये याची पुनरावृत्ती आढळून आली. पण ईश्वरी या विद्यार्थिनीची उत्तर पत्रिका पहिली आणि संवेदनशीलता म्हणजे काय याचा पाठ मला मिळाला. ईश्वरीने उत्तर लिहिले होते, लांडगे दादा, माझे आजोबा आजारी आहेत, त्यांना मी औषध देऊन येते मग तू मला खा. आजी-आजोबांना वृद्धाश्रमात ठेवण्याची संस्कृती बोकाळत असताना, ईश्वरी मात्र शाळेतील प्रश्नपत्रिका सोडवताना सुद्धा आजोबांच्या औषधांचा विचार करते. ईश्वरीसाठी तिच्या अस्तित्वापेक्षा तिच्या आजोबांचे अस्तित्व महत्त्वाचे आहे. कुठे शिकली असेल ईश्वरी हे सार तत्वज्ञान?

ईश्वरी, समृद्धी अशीच मुले उद्या माणुसकी जपून ठेवतील. तेव्हा आपण त्यांना शिकवायला नको, त्यांच्याकडूनच शिकायला हवं हेच मी तरी मुलांनी लिहिलेल्या उत्तरांमधून शिकलो आहे. - अमर घाटगे 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

समृद्ध अर्थव्यवस्थेसाठी बँकांचे राष्ट्रीयीकरण आवश्यकच १९ जुलै बँक राष्ट्रीयकरण दिन