वारी वैष्णवांची

ध्येय घेऊनि मनात माझ्या
 श्रद्धेकडे चाललो आहे
थकणे भागणे थांबणे नाही
विठ्ठल देवाशी बोललो आहे!

देव असतो कणाकणात
 दर्शन दुर्लभ झाले आहे
विशाल सागर माणसांचा
देवाने मोहित केले आहे!

भक्तीची ही वारी निघाली
भगवी पताका दिंड्याचीं
वैष्णवांचा मेळा चालला
डोही तुळस रांग हंड्यांची!

योगिनी एकादशी झाली आता आषाढी एकादशीही आली. वारी, पालखी, दिंडीतून श्री वि्ीलाचं विश्वरूप दर्शन होत आहे! वि्ील सकळ जनांचा आधार आहे! सकळ जनांचं आराध्य दैवत आहे! विठ्ठल लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे! आषाढी वारीत वैष्णवांचा मेळा एक होतो आहे! श्री क्षेत्र आळंदी अन्‌ देहूगाव वैष्णव भक्तांनी फुलून गेलं होतं! अनंत दिंड्या निघाल्या आहेत! संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने श्री विठ्ठल दर्शनास निघाल्या आहेत! पुण्य नगरीत मुक्काम करून ज्ञानेश्वर- तुकारामांच्यां गजरात, भजनात, टाळ मृदूंगात दंग झालेला वैष्णवजन श्रद्धेकडे निघाले आहेत!

भक्तीत तल्लीन झालेला वारकरी पालख्यांसोबत, दिंड्यासोबत पुण्य नागरीतून हडपसरला पोहचला! विशाल भक्तीसागर प्रवाहीत होऊन, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडकडे निघाली अन जगद्‌गुरू तुकाराम महाराजांची पालखी उरुळीकांचन मार्गे निघाली!  दोन भिन्न मार्गानी निघालेला मेळा! आषाढी एकादशीला देवभूमीत पोहचणार आहे! भक्तीचा अमृतरस चाखणारा भक्त भजनात तल्लीन होऊन विठ्ठल रूप पाहण्यास आतुर झालेला आहे!

भाव विठ्ठल देव विठ्ठल
विठ्ठल तो आप्त झाला
भक्तिवाट भरुनि गेली
देह माझा तप्त केला...!

आस मनी तूझ्या भेटीची
सार संसार त्याग केला
तुझी वाट ही पंढरपूरीचीं
वैष्णवांचा सहभाग झाला!

विठ्ठलाई म्हणती तुजला
चंदणी देव्हारा पाहिला
घेई गोतावळा अंगावरी
नामदेव पायरीवर पहिला!

आत्मा परम्यात्मा एकरूप
हा अमुचा देह  झिजवीला
भागवतीय पताका हाती
देवा शंख मुखे वाजवीला..!

अफाट, अलोट, विशाल, डोळ्यात न मावणारी भक्ती... इंद्रायणी, कृष्णा, गोदावरी, तापीचा महापूर बनून निघाली आहे! विठ्ठल भेटी निघाली आहे! हरी भेटी निघाली आहे! विठ्ठलांतरी निवासी निघाली आहे! भक्तीची तहान व्याकुळ करीत आहे! ‘जय जय रामकृष्ण हरी' हृदयी बांधून निघाली आहे!‘जय हरी विठ्ठलच्या' भाकरीची भूक लागली आहे! पालखी संगे निखळ शांत, भक्तीरस वाहात आहे! ‘ज्ञानोबा तुकाराम!' मुखी आहे! दिंड्या विठ्ठल घोष करीत पंढरपूराकडे निघाल्या आहेत! भक्तीत गुंग झालेले काही वारकरी तर असे देखील आहेत.. ज्यांच्या पायी चप्पल नाहीत! ज्यांच्या अंगावर कपडे नाहीत! कोण बोलवतोय दूरदूरवरून यांना ? कोणी सांगितलं आहे यांनाही अंतरीचा धावा आहे! पंढरपूराची ओढ भूक लागू देत नाही! तहान लागू देत नाही! हजारो मैल चालण्याची उर्मी अन जिद्द श्रीहरी प्रदान करीत असतो! लाख लाखोंच्या संखेने एक एक पाऊल पंढरपूराकडे निघालं आहे! श्रीहरी विठ्ठल बोलवतो आहे!

काय नातं आहे त्याचं? कोण आहे हा सावळा हरी? संत जनाईला दळण दळू लागतो! संत नामदेवांच्या हातचा प्रसाद खातो! संत गोरा कुंभाराचीं परीक्षा घेतो! संत चोखोबांना हृदयी घेतो! संत सावता माळी यांच्या हृदयी वसतो! भक्तीचीं ओढ व्याकुळ करीत असतें! भावविश्व हरण करीत असतं असंतं ! सात्विक, पवित्र, सौज्वळ, ममतेचं लेकूरवाळं नातं विठ्ठलाशी आहे!  हृदयाहृदयात माऊली बसली आहे! विठ्ठलाई भक्तजनांसाठी ममतेचा पान्हा फोडते आहे! विठ्ठल ‘माय' आहे! जिथं माय आहे, आई आहे, तिथं जगताचा स्वामी सावळा हरी आहे! मायेने कुरवाळण्या विठ्ठल माऊली, माय चंद्रभागा बोलावीत आहे! साऱ्या वैष्णवांनी हरीचं पंढरपूर व्यापलं आहे! माय चंद्रभागा कुशीत घेऊन लेकरांना अंघोळ घालणार आहे!

‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाला से कळस!'...संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी अध्यात्माचीं भगवी पताका हाती घेऊन भक्तीचा सरळ धोपट मार्ग दाखविला! बाराव्या शतकातील भक्तिमार्गास नवीन उजाळा देऊन जगरूं तुकोबांनी कळस चढवीला होता! हा भक्तिमार्ग गरीब-श्रीमंत, जातीपातीच्या पलीकडे जाऊन भक्तीसुगंध पसरवीत आहे! ‘माऊली' शब्दातून भेदभाव गळून पडतो! हरीभक्त मनोभावे नतमस्तक होतं असतो! पायावर डोकं ठेवत असतो! येथे अहं, ‘मी' गळून पडतो! विठ्ठल भक्तीअमृताची गोडी चाखायला देत असतो!

महाराष्ट्र दैवताच्या दर्शनास आषाढी वारी निघाली आहे! संत जगनाडे महाराज निघाले आहेत! संत नरहरी सोनार निघाले आहेत! श्री गजानन महाराज निघाले आहेत! गावागावातून पंढरपूर पायी वारी निघाली आहे! पालख्यातून अनेक दिंड्या निघाल्या आहेत! विठ्ठल भेटीची आसं उरात ठेवून भाविक भक्त निघाला आहे! सुख-दुःख बाजूला ठेवून वारकरी निघाला आहे!  योगिनी एकादशीला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचीं पालखी अन जगद्‌गुरु तुकारामांच्या पालखीचं आगमन पुण्यातल्या हडपसरमध्ये झालं होतं! पालख्या भक्तीगंध पसरवीत निघून गेल्या! टाळ, मृदंग, वीणेचं कर्णमधुर भक्तीसंगीत गुंजन करीत राहिलं! भजन-भक्तीसंगीताचं दान देऊन दिंड्या पंढरपूरकडे निघून गेल्या! पालख्या विठ्ठल मार्गांवर निघून गेल्या! वारीचं विशाल रूप अंतःकरणी ठेवून मार्गस्थ झाल्या!

भगव्या पताका फडकत होत्या! अध्यात्म श्रद्धेकडे जात होतं! भगवे झेंडे विठ्ठल नामाची प्राचीन परंपरा सांगत होते! अनेक दिंड्या एका मागोमाग एक भक्तीचा सुगंध मागे ठेवून निघून गेल्या! पायी चालणारे वैष्णव भजनात दंग होते! माऊलीं माऊलींसाठी अखंड हरिजप करीत निघून गेली! हडपसरला वैष्णवांनी भरलेला भक्ती सागर रीता झाला होता! आज रीता झालेला पालखी मार्ग पाहात होतो! पालखी गेल्या रस्त्याला ‘माऊली' म्हणत होतो! माथा टेकवून बसलो होतो! हृदयी भावभक्तीची आस ठेवून वाटेकडे पाहात होतो! वैष्णव माऊली झालें होते! माऊली.. मीही विठ्ठलचरणी ध्यान लावून बसलो आहे! पुंडलिकाच्या विठ्ठल विटेकडे डोळे लावून बसलो आहे! -नानाभाऊ माळी 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 मुलांना शिकवायचं की मुलांकडून शिकायचं?