दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
उद्यमशील भारतवर्षाला निष्क्रिय बनवण्याचा प्रयत्न होतोय का ?
नजीकच्या भूतकाळापासून राजकीय लाभापोटी एकामागून एक फ्रीबीजचे भूत काही आपली पाठ सोडत नाहीए. (एखाद वेळेचा आपद्धर्म वेगळा..) पण हल्ली हे सरसकट झालंय. ऑक्टोपसप्रमाणे दिवसेंदिवस हा विळखा घट्ट होतोय.. परिणामी ‘दे रे हरी खाटल्यावरी' ची निष्क्रिय मानसिकता बळवलीय. माणूस अकार्यक्षम होतोय आणि म्हणुनच ऐदी बनत चाललाय... आता तर बहुतांश ग्रामीण जनता निवडणूका आणि नवनवीन स्कीम्स कडे डोळे लावून बसलेली दिसते.
वेदोक्त भारतवर्षाच्या आधी आदीम संस्कृतीपासून हिंदुस्थानचा भूभाग नेहमीच उद्यमशील राहिलेला आहे. अगदी अलिकडील म्हणजे इ.स. पूर्व २७०० ते १५०० पर्यंत अस्तित्वात असलेली हडप्पा संस्कृती असो किंवा त्याच्याच समकालीन इ.स. पूर्व २६०० मधे सिंधु नदी काठावरील मोहंजोदडो सभ्यता असो, आपल्या अर्वाचीन पूर्वजांच्या उद्यमशीलतेच्या खूणा आजही ताज्या आहेत.
पुढे गावपातळीवर बाराबलूतेदारीचे उद्योग व्यवसाय बहरले आणि मधल्या यवनी आक्रमकांच्या दीर्घ कालखंडात पावसाळ्याचे चार महिने शेती करणाऱ्या शेतकऱ्याने दसऱ्याला घोडेस्वार बनुन सीमोल्लंघनातून कमरेच्या शेल्यातील समशेरी गाजवल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळ असो की स्वातंत्र्योत्तर उद्योगधंदे असो, मुंबईच्या गिरणी व्यापाराने झालेली भरभराट असो की गिरणी कामगारांना खानावळ घालणारी मायमाऊली असो, घामाच्या धारांमधे कष्ट केलेत त्यांनी...
सीमेवर जागता पहारा देणारा जवान असो, इस्पितळात डॉक्टरांचे राबणारे कौशल्य असो की विद्युत, पाणी आदी सेवा पुरवणारे अधिकारी कर्मचारी असोत, निढळाचा घाम गाळणारा अन्नदाता शेतकरी असो, त्यांची कष्ट उपसायची तयारी असते. आणि ‘दे रे हरी खाटल्यावरी' च्या तुच्छतादर्शक वागण्यापेक्षा स्वकमाईला महत्व प्राप्त झाले होते. माणूस उद्यमशील होता. सुरवातीला ऐंशीच्या दशकात सुरु झालेला सेलचा फंडा पुढे एकावर एक फ्री करत करत या डिस्काउंटचा राक्षस आपल्या मानगुटीवर कधी बसला आणि आपण त्यात अडकून आपल्या कष्टाचे मौलिक सत्व केव्हा हरवून बसलो, हे कळलेच नाही.
नजीकच्या भूतकाळापासून राजकीय लाभापोटी एकामागून एक फ्रीबीजचे भूत काही आपली पाठ सोडत नाहीए. (एखाद वेळेचा अपाद्धर्म वेगळा..) पण हल्ली हे सरसकट झालंय. ऑक्टोपसप्रमाणे दिवसेंदिवस हा विळखा घट्ट होतोय.. परिणामी ‘दे रे हरी खाटल्यावरी' ची निष्क्रिय मानसिकता बळवलीय. माणूस अकार्यक्षम होतोय आणि म्हणुनच ऐदी बनत चाललाय... आता तर बहुतांश ग्रामीण जनता निवडणूका आणि नवनवीन स्कीम्स कडे डोळे लावून बसलेली दिसते...उद्यमशीलता हवरत चाललीय.
एकवेळ अशी येईल की तुम्ही कमावता किती ? यापेक्षा तुमच्या घरात विविध सरकारी योजनेचे कीती लाभार्थी आहेत आणि त्यांची एकंदर फुकटची आमदनी किती आहे ? यावर लग्न जुळवली जातील, अशी शक्यता नाकारता येत नाही... इतका हा निष्क्रिय चलन फुगवटा वाढतोय !
माणूस निष्क्रिय होतोय, हे खरं..पहा पटतंय का ?
- घनश्याम परकाळे