मायेचा ओलावा

कधीच न विसरणारी मी, चक्क आईचा वाढदिवस किती सहजतेने विसरली ! काहीही कारण नाही. पण मी विसरली. मन अपराधी झाले. माझी बेचैनी वाढली. कामातून लक्ष पार उडालं. एकतर मी फोन करायचा तो केला नाही. तिने केला तेव्हातरी आठवावं, ते आठवलं नाही. उद्या मी अशीच वयस्कर झाल्यावर अशी वेळ माझ्यावर येऊ शकते. लेक सासरी गेल्यावर जर माझा वाढदिवस विसरली तर.? आपण आपले मन शांत, आनंदी ठेवायचे. तिला तिच्या धावपळीच्या परिस्थितीत समजून घेतलं पाहिजे.बोलायला, विचार करायला छान जमतं. पण त्या' वयात प्रत्यक्ष जमेल..?

आज मला काही तरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय. का बरं ? रोजच्या प्रमाणे हात रूटीन कामासाठी गुंतले. सकाळचा चहा, पेपर, नाश्ता, मुलीचा डबा, शाळा सगळं ठीक चाललंय. घरकाम करणारी मावशीही वेळेवर आली. घर आवरणं, रोजची औषधं सगळं काही ठीक आहे, मग...?

मग, असं का? चुकल्या चुकल्यासारखं का वाटतंय ? अश्यातच ऑफिसची बॅग काखेत अडकवली व धावत पळत बस स्टॉप. अरे वा ! बस पण वेळेवर, बसायला जागा, ठीक आहे. ऑफिसला वेळेवर पोहचली. टेबलावरचा पी. सी. ऑन केला आणि की बोर्ड वर बोटं फिरायला लागली. हात कामात गुंतले. अर्धा एक तासानंतर परत मनात काहीतरी चुकतंय. का ? असं का ? विचार केला. अरे हो ! आज आईचा नेहमीप्रमाणे फोन नाही आला.

माझी आई माझ्या घरापासून पंधरा वीस मिनीटाच्या अंतरावर राहते. एकटीच राहते. स्वतःचे घर. मी तिची एकुलती एक लेक. एकमेकींना फोन केल्याशिवाय एक दिवस जात नाही. चार आठ दिवसांत भेट होतेच. कधी डॉक्टरकडे जायचे असेल तर किंवा छोटी मोठी खरेदी असेल तर अगदी नाहीतर लायब्ररीत मासिकं बदलायची असताना एकत्रच असतो. कधी मधी एखाद महिन्याला नाटक, सिनेमा चालूच असतो. पण आज का नाही केला फोन आईने. तब्येत वगैरे ठीक असेल ना, मीच करते ना फोन. फोन करणार तेवढ्यात मातोश्रीचाच फोन आला.

आई : बेटा फोन का नाही केला आज..?
मी : अग तू करते ना नेहमी.
आई : ते जाऊ दे. जावईबापू कसे आहेत ? पिंकीची चित्रकला स्पर्धा कशी झाली ? तिचा ताप उतरला का? थंड पाणी आणि तेलकट देऊ नको तिला. वेळेवर औषध दे.
आईचे रोजचेच प्रश्न रोजचीच उत्तरे, पण ? रोज फोन हवाच. जुजबी बोलणे झाले. फोन ठेवला.
असाच थोडा वेळ गेला. विचार आला. आई शक्यतो ऑफिसमध्ये फोन करत नाही. ठीक आहे. राहवलं नसेल म्हणून केला असेल. असाच थोडावेळ गेला. तरीही काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं. सहजच समोरच्या मोठ्या कॅलेंडरकडे लक्ष गेलं कॅलेडंरची पानं उडत होती, जसं काही माझं लक्ष ती वेधून घेत होती.
ओ ! हो ! कधीच न विसरणारी मी, चक्क आईचा वाढदिवस किती सहजतेने विसरली ! काहीही कारण नाही. पण मी विसरले. मन अपराधी झाले. माझी बेचैनी वाढली. कामातून लक्ष पार उडालं. एकतर मी फोन करायचा तो केला नाही. तिने केला तेव्हातरी आठवावं, ते आठवलं नाही. छे, काय हे विसरणं. या रोजच्या रूटीनमध्ये दिवस रात्रीचा मेळ घालताना सहजच विसरलो तिचा वाढदिवस. आईच ती. रागावणार नाही पण मन खट्टू झालं असेलच.

बाबा अचानक गेल्यावर आईने मला वाढवताना किती खस्ता काढल्या. बाबांची उणीव भासू नाही दिली. शालेय जीवन, कॉलेजची फी, पुस्तकं, कपडे, हौस मौज कशातच कमी नाही केले. नोकरीत मला स्थिरस्थावर केलं. लग्न लावून दिलं. वाढवताना ते दिवस आठवले. माझ्या बाळंतपणात पहिली कोण होती तर ती आई. माझं सर्वस्व तीच असताना मी चक्क आईचा वाढदिवस विसरली. बरं विसरली तर विसरली पण तिने केला तेव्हा तरी.. छे !

लगेच करू का फोन. काय वाटेल ? वाईट नाही वाटणार पण नाराज नक्कीच झाली असेल. का नाही होणार, आईची ही अपेक्षा मुलीकडून तर असायलाच हवी.
लगेच लेकीला (पिंकीला) फोन केला.
लेक : अगं, आज आजीचा वाढदिवस आहे. लवकर ये ना.
मी : अगं आपण संध्याकाळी केक घेऊन जाऊ या
लेक : अगं आई, सगळं तयार आहे. पप्पांनी कधीच केक आणून फ्रिजमध्ये ठेवलाय.
मी : पण.. अगं तू आजीला विश केलं का.?
लेक : नाही, मला मस्त सरप्राईज करायचं आहे. मी सुंदर मोठ्ठं चित्र काढून शुभेच्छा पत्र तयार केलं आहे. तू, ये, तूझी आम्ही वाट पाहतोय. पप्पापण लवकर येणार आहेत.
माझं मन भरून आलं. डोळे कुठल्याशा भावनेने एकदम ओले झाले. ऑफिसचे काम करतांना डोळे पाणावत होतें. काम आटोपले व लगेच निघाले. निघताना लेकीबद्दल आनंद, यजमानांबद्दल आदर, आणि माझ्या मनात अपार अपराधी भावना.

एका दुकानात गेली सुदंर मोठासा मराठी हिन्दी गाण्यांचा ‘कारवा' रेडिओ घेतला. मग धावत पळतच घरी पोहोचले. पूर्वी माझी लेक एकदम तयारच होती.
लेक : आई, मी आजीसाठी आंबावडी, बाकरवडी, बिस्किटाचा पुडा घेतला. मागे पुढे नाचत दाखवत होती. तिचा उत्साह तर ओसडंत होता. मला तिने वाढदिवसाच्या तयारीचा पत्ता लागू दिला नाही मी लगेच फ्रेश झाले, कपडे बदलले. नुकतीच नविन गाडी घेतली होती, मिस्टरांनी मलाच चालवायला दिली. नवीन गाडी आपली लेक  स्वतःच ड्राईव्ह करत आणते याचा आईला काय आनंद झाला. दारातच वाट पाहत आई उभी होती. मी गाडी चालवतेचा, आईला काय अभिमान खुश झाली. माझे डोळे मिश्र भावनांनी आणि  आनंदाश्रूंनी भरले.

आई म्हणालीच. तरीच माझं मन म्हणतच होतं की माझा वाढदिवस माझी लेक कशी विसरेल. मला खात्री होतीच तुम्ही येणारच.
मला ‘हुंदका यायचा बाकी होता. मी औक्षणासाठी देवघरातील दिवा लावला आणि तिला मनापासून डोळेभरून ओवाळले. आम्ही तिघांनी अगदी वाकून नमस्कार करत आईचा आशीर्वाद घेतला.

लेकीच्या उत्साहाला बहार आला, काय आणि किती गोष्टी आजीला दाखवू असे झाले होते. शुभेच्छा कार्ड बघण्यात व दाखवण्यात दोघी गुंतल्या.
सहजच मी स्वयंपाक घरात डोकावलं नातीसाठी रगडा पॅटीस, माझ्यासाठी सँडविच, मिस्टरांसाठी इडली चटणी, प्रत्येकासाठी आवडीची डिश. मला काही सुचेना. मनात विचार छळू लागले. मी किती सहजतेने विसरली आईचा वाढदिवस. ऑफिसमधून घरी आल्यावर कळलेच असते आम्ही गेलोच असतो तो भाग वेगळा. आपल्या रोजच्या कामापुढे, कर्तव्याच्या जबाबदारीमुळे, विसरलो पण ‘चक्क विसरणं' हे चांगलं नव्हे.

उद्या मी अशीच वयस्कर झाल्यावर अशी वेळ माझ्यावर येऊ शकते. लेक सासरी गेल्यावर जर माझा वाढदिवस विसरली तर.? आपण आपले मन शांत, आनंदी ठेवायचे. तिला तिच्या धावपळीच्या परिस्थितीत समजून घेतलं पाहिजे. हे मनाला शिकवले पाहिजे. सकाळी सकाळी आपणच लेकीला फोन करायचा नी तिला सांगायचं की बघ हं ! आज माझा वाढदिवस आहे; पण तू तूझ्या धावपळीत दगदग करत भेटायला येशील. तर तू तूझ्या सोयीने ये व भेटू. आपल्या मुलांना आपण समजून घेतलं पाहिजे.
पिढी पिढीतला फरक समजून घ्यायला पाहिजे. आपल्या मुलांना कामाच्या व्यापात अपराधी भावना वाटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपल्याला मनाला बांध घालून तटस्थ होता येईल. मुलांना वाढवताना आपण निरपेक्ष भावनेने वाढवतो.

पण.....? वाढदिवसाला...
हे काय, कुठला विचार करतेय मी, मी माझ्या मनालाच समज देते आहे, या माझ्या मनातले भाव लपवते आहे का? या पळवाटा तर नाही ना.!!! बोलायला, विचार करायला छान जमतं. पण ‘त्या' वयात प्रत्यक्ष जमेल..?
ही अपेक्षा अपेक्षित असावी का?
मन मानेल?

-सौ पूर्णिमा आनंद शेंडे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

उद्यमशील भारतवर्षाला निष्क्रिय बनवण्याचा प्रयत्न होतोय का ?