द्रष्टा समाजसुधारक

सुधारक मधून गोपाळ गणेश आगरकर यांनी आपली भूमिका ठामपणे आणि जिद्दीनं मांडत अनिष्ट रूढी आणि परंपरांविरुद्ध सडकून टीका केली. स्त्रीयांचे सामाजिक स्थान, त्यांच्या समस्यांना वाचा फोडून स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह ह्यांचा पुरस्कार केला. विधवा स्त्रियांची समाजाकडून होणारी विटंबना म्हणजे हिंदू समाजाला लागलेला कलंक आहे, हे त्यांचे शब्द होते. त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार अनेक वेळा झाला. ज्या समाजासाठी ते लढा देत होते त्या समाजाकडूनच अनेक वेळा मनःस्ताप सहन करावा लागला.  आर्थिक ओढाताण तर कायमच राहिली. म्हणून त्यांना अनेक वेळा नैराश्य आले. त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राच्या नावातच ह्या सगळ्याचं प्रतिबिंबीत्व दिसतं. त्या चरित्राचं नाव आहे; फुटके नशीब!

१९व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २०व्या शतकाच्या पूर्वार्धात देशानं एक अभूतपूर्व द्वंद्व पाहिलं. एकीकडे स्वातंत्र्य लढा निर्णायक अवस्थेत येत होता आणि त्याच वेळी देशातील काही नेत्यांंमध्ये हे द्वंद्व सुरू होतं. देशाला आधी स्वातंत्र्याची गरज आहे की आधी सामाजिक सुधारणा आवश्यक आहेत, ह्या दोन मतांमध्ये हे नेते दुभंगले गेले आणि देशानं त्यांचं द्वंद्व पाहिलं. अर्थातच सामाजिक सुधारणेविषयी आपली मतं ठामपणे मांडत होते ते गोपाळ गणेश आगरकर.

अत्यंत गरीब कुटुंबातून आलेले आणि तरीही जिद्दीनं उच्च शिक्षण घेतलेले आगरकर. कराड तालुक्यातलं टेंभू हे गाव आगरकरांचा जन्म झाला नसता तर कदाचित आजही अज्ञातच राहिलं असतं. शिक्षणाच्या सुविधांचा अभाव असलेला तो १९व्या शतकाचा काळ. त्याही परिस्थितीत आधी मॅट्रिक आणि नंतर डेक्कन कॉलेजमधून ते बीए झाले. ते साल होतं १८७८. त्याच वर्षी त्यांची ओळख ही अशा एका नेत्याशी झाली जो पुढे जावून अखंड हिंदुस्थानचा नेता ठरला; लोकमान्य टिळक! त्यांच्याच आग्रहावरून आगरकरांनी पुढे एमए पूर्ण केलं; विषय होते इतिहास आणि तत्वज्ञान. एकीकडे लोकमान्यांनी कायद्याची पदवी पूर्ण केली आणि त्याच वेळी आगरकर एमए झाले. एमए झाल्यावर आगरकरांनी त्यांच्या आईला एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात ते म्हणतात, एमए झाल्यावर मी कुठेतरी सरकारी नोकरी करावी आणि घरातील दारिद्रय दूर करावं असं तुला वाटणं स्वाभाविक आहे. पण मी सरकारी नोकरी करणार नाही, मला अधिक संपत्तीची हाव नाही. माझा सगळा वेळ हा समाजासाठी देण्याचा माझा मानस आहे.

आगरकरांचं हे पत्र इतिहासात अजरामर आहे. एकीकडे देशात स्वातंत्र्य लढा निर्णायक वळणावर येत होता आणि त्याच वेळी देशातील युवक शिकला पाहिजे, त्यासाठी त्याला राष्ट्रीय शिक्षण दिलं पाहिजे ही गरज ओळखणाऱ्यांमध्ये एक प्रमुख नाव होतं गोपाळ गणेश आगरकर. त्यांना अर्थातच पाठिंबा होता तो लोकमान्यांचा आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा. त्यातून १८८० साली न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. राष्ट्रीय शिक्षण असलं तरी ते इंग्रजीतून झालं पाहिजे असं मत असल्यामुळे ह्या इंग्रजी शाळेची स्थापना टिळक, आगरकर आणि चिपळूणकर यांनी केली. त्यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून त्यांनी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. शिक्षण घेण्याची सोय तर केली. पण राष्ट्रीय शिक्षणाची गरज लोकांपर्यंत पोचणं गरजेचं होतं. इंग्रजांचा जुलूम देश सहन करत होताच; पण त्यातून सुटका व्हायची असेल तर केवळ स्वातंत्र्य लढा पुरेसा नाही तर समाज सुशिक्षित झाला पाहिजे हे त्यांचे विचार होते. पण शाळेत आणि त्यातून इंग्रजी माध्यमातून शिक्षण घ्यायला येणारे किती असणार याची कल्पना टिळक आणि आगरकर यांना होती. त्यामुळेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचं तर हातात तसच सशक्त माध्यम हवं, ह्या विचारातून शाळा सुरू झाल्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे १८८१ साली वृत्तपत्र सुरू करण्याचा निर्णय टिळक आणि आगरकर यांनी घ्ोतला आणि केसरी आणि मराठा ह्या दोन वृत्तपत्रांचा जन्म झाला. केसरीचे संपादन सुरू केलं ते आगरकरांनी आणि मराठाची धुरा सांभाळली ती लोकमान्यांनी. १८८८ पर्यंत आगरकरांनी केसरीचं संपादन केलं...आणि त्याच काळात दोघांमध्ये वैचारिक मतभेद समोर येत गेले. देशाला स्वातंत्र्य लवकरातलवकर मिळायला हवं असं मत लोकमान्यांचं होतं तर स्वातंत्र्य आता लांब नाही पण हिंदुस्तान स्वतंत्र झाल्यावर जुन्या रूढी परंपरेनं चालवणं म्हणजे अराजकाला आणि वैचारिक मागासलेपणाला आमंत्रण देणं आहे असं मत आगरकरांचं होतं. त्यामुळे स्वातंत्र्यापूर्वी कायदेकरून अनिष्ट रूढी परंपरांना पायबंध घालणे गरजेचं आहे जेणेकरून स्वतंत्र राष्ट्रात समाजविघातक परंपरा असणार नाहीत आणि एक सशक्त राष्ट्र उभं राहील, असं ते म्हणत असत.

लोकमान्यांचा नेमका ह्याच गोष्टीला विरोध होता. देशातून अनिष्ट रूढी परंपरा नष्ट व्हायला हव्यात हे मत लोकमान्यांचंही होतं; पण त्यासाठी लागणारे कायदे आपण करू आणि ते करण्यासाठी अधिकार हातात हवेत आणि म्हणूनच आधी स्वातंत्र्य हवं असं मत लोकमान्यांचं होतं. ह्या देशाला आवश्यक असलेले सामाजिक कायदे इंग्रज करू शकणार नाहीत असं ठाम मत लोकमान्यांचं होतं. दोघांनाही स्वातंत्र्य आणि सामाजिक बदल अपेक्षित होता पण फरक होता तो अग्रक्रमात.त्याचा परिणाम असा झाला की केसरी आणि मराठा ह्या दोघांच्या संपादकीयातून परस्पर विरोधी भूमिका प्रसिद्ध व्हायला लागल्या. त्यातून जनतेत गोंधळाचं वातावरण व्हायला सुरुवात झाली. टिळक आणि आगरकर यांच्यातले मतभेद विकोपाला गेले आणि आगरकरांनी केसरीच्या संपादकत्वाचा राजीनामा दिला आणि टिळक डेक्कन एज्युकेशन सोसायटीतून बाहेर पडले. तोपर्यंत न्यू इंग्लिश स्कूलप्रमाणेच फर्ग्युसन कॉलेजचीही स्थापना झाली होती. त्याचं प्राचार्यपद आगरकरांनी स्वीकारलं आणि आपलं स्वतःचं सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलं.

सुधारक मधून त्यांनी आपली भूमिका ठामपणे आणि जिद्दीनं मांडायला सुरुवात केली. अनिष्ट रूढी आणि परंपरांविरुद्ध सडकून टीका त्यांनी केली. स्त्रीयांचे सामाजिक स्थान, त्यांचे प्रश्न मांडायला सुरुवात केली. स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह ह्यांचा पुरस्कार केला. विधवा स्त्रियांची समाजाकडून होणारी विटंबना म्हणजे हिंदू समाजाला लागलेला कलंक आहे, हे आगरकरांचे संपादकीयातील शब्द होते. सामाजिक कार्य करत असताना त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार अनेक वेळा झाला. ज्या समाजासाठी ते लढा देत होते त्या समाजाकडूनच अनेक वेळा मनःस्ताप सहन करावा लागला.अनेक वेळा समाजाचाच पाठिंबा त्यांना मिळाला नाही. आर्थिक ओढाताण तर कायमच राहिली. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून त्यांना अनेक वेळा नैराश्य आलं. त्यांनी आत्मचरित्र लिहिलं. त्याच्या नावातच ह्या सगळ्याचं प्रतिबिंबीत्व दिसतं. त्या चरित्राचं नाव आहे; फुटके नशीब!
आगरकरांना एकूण आयुष्य मिळालं ते अवघ ३८ वर्षांचं. पण ह्या काळात सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीची सुरुवात त्यांनी करून दिलं. विधवा पुनर्विवाह आता नवीन राहिलेला नाही. केशवपन ही संकल्पना तर आता निव्वळ कल्पनाच राहिली आहे. स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळून कित्येक दशकं झाली आहेत. फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून अखेरपर्यंत राहिले. आजचा फर्ग्युसनचा व्याप पहाता आगरकरांचे शैक्षणिक विचारही समाजात चांगलेच रुजले आहेत असं मानायला हरकत नाही. - अमित पंडित 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

सगुण निर्गुण एक गोविंदु रे