दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
सगुण निर्गुण एक गोविंदु रे
दाशरथी श्रीराम हे समर्थांचे सद्गुरू. परंतु त्यांच्या निर्गुण अनंतरुपाचा साक्षात्कार झाल्यानंतरही समर्थांनी धनुर्धारी रामरुपाची उपासना सोडली नाही. स्वतःही नित्यश्रीरामांचे भजन केले तसेच लोकांनाही त्याच शस्त्रसज्जरुपाचे अधिष्ठान देऊन भक्ती आणि शक्तीची उपासना करायला प्रवृत्त केले. राम आणि हनुमंत देहाने वेगळे असले तरी आत्मरुपाने एकच आहेत याची संपूर्ण खात्री असुनही लोकांना त्यांनी रामासह हनुमंताचीही उपासना करायला लावली.
सदा बोलण्यासारिखे चालताहे।
अनेकी सदा एक देवासी पाहे।
सगूणी भजे लेश नाही भ्रमाचा।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा । श्रीराम ४९।
सर्वोत्तम भगवंताचा धन्य दास कोणाला म्हणता येईल याची काही लक्षणे सांगत असताना समर्थ म्हणतात, हा भक्त जसा बोलतो तसाच वागतो. तेही ‘सदा. म्हणजे नेहमीच. ठराविक प्रसंगापुरते आदर्श वर्तन व इतर वेळी मनमानी किंवा ठराविक लोकांशी सद्वर्तन व इतर लोकांशी दुर्वर्तन असा त्याचा दुटप्पी कारभार नसतो. सत्पुरुषांच्या, सदभक्तांच्या मनात जसे सद्विचार नित्य असतात ते नेहमीच त्यांच्या बोलण्यातून व वागण्यातून सहज प्रकट होतात. त्यासाठी त्यांना विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. कारण त्यांच्या विचार, उच्चार आणि आचरणात एकवाक्यता असते आणि ती नित्य असते. त्यांच्या विचारात जी स्पष्टता असतेतीच त्यांच्या बोलण्यात असते व तीच त्यांच्या कृतीतही असते. ही स्पष्टता आणि सुसंगतीतेव्हाच शक्य होते जेव्हा मनात कोणताही भ्रम नसतो, दंभ नसतो. कोणत्याही प्रकारची असत्यता नसते. जगाच्या व्यवहारात वागण्या बोलण्याचा ताळमेळ जेवढा आवश्यक आहे तेवढाच, किंबहुना जास्तच परमार्थात आवश्यक आहे.
जगामध्ये अनेक प्रकारचे देव-देवता मानले जातात, पूजले जातात. पण जो खरा भक्त आहे तो सर्व देवतांच्या विविध रूपांमध्ये एकच परमात्मा पाहतो. त्याला पूर्ण जाणीव असते की सृष्टीमध्ये सर्वत्र, सर्वांमध्ये एकच ब्रह्मतत्त्व भरून आहे. भक्ताची अढळ श्रद्धा असते की नावे-रुपे वेगळी असली तरी अंतिम सत्य एकच आहे. त्यामुळेच खरा भक्त कोणत्याही देवतेचा,कोणत्याही पंथाचा, संप्रदायाचा उपमर्द करत नाही. कोणालाही तुच्छ किंवा कमी लेखत नाही. ज्ञानी भक्त जाणतो की निर्गुण ब्रह्म हेच एकमेव सत्य आहे. तरीही तो सगुणाची भक्ती सोडत नाही. सगुणाची उपासना सोडत नाही. निराकार निर्गुण भगवंताच्या सगुण साकार रूपाचे पूजन, भजन करताना सगुणाच्या मिथ्यत्वाबद्दल आणि निर्गुणाच्या नित्यत्वाबद्दल त्याच्या मनात कोणताही संभ्रम नसतो.अनन्य भक्ताच्या मनात जी श्रद्धा निर्गुण परमात्म्याच्या सगुणरूपाप्रती असते तीच श्रद्धासाक्षात परब्रह्मस्वरूप असलेल्या..पण मानव देहात वावरणाऱ्या सद्गुरूंबद्दलही असते. आपल्या मनातील सद्भाव, कृतज्ञता, प्रेम व्यक्त करण्यासाठी भक्त सगुण रूपाचा आधार घेतो. ज्या ज्ञानी भक्ताला लोकसंग्रहाचे, लोककल्याणाचे कार्य करायचे आहे तो लोकांना सगुण उपासनेला लावतो. सर्वसामान्य लोकांचे निर्गुणापर्यंत पोहोचण्यासाठी सगुण हेच साधन आहे.
दाशरथी श्रीराम हे समर्थांचे सद्गुरू. परंतु त्यांच्या निर्गुण, अनंत रूपाचा साक्षात्कार झाल्यानंतरही समर्थांनी धनुर्धारी रामरूपाची उपासना सोडली नाही. स्वतःही नित्य श्रीरामाचे भजन केले तसेच लोकांनाही त्याच शस्त्रसज्ज रूपाचे अधिष्ठान देऊन भक्ती आणि शक्तीची उपासना करायला प्रवृत्त केले. राम आणि हनुमंत देहाने वेगळे असले तरी आत्मरूपाने एकच आहेत याची संपूर्ण खात्री असुनही लोकांना त्यांनी रामासह हनुमंताची उपासना करायला लावली. स्वतः समर्थांच्या वागण्यात आणि बोलण्यात कुठलाही विरोधाभास नव्हता. ते स्वतः आदर्श भक्त तर आहेतच पण साक्षात्कारी सद्गुरूही आहेत. ज्या तत्वाचा त्यांनी साक्षात अनुभव घेतला त्याच तत्त्वाचे त्यांनी नंतर प्रतिपादन केले. सर्वच संत हे सर्वोत्तम भगवंताचे सर्वोत्तम भक्त असतात. म्हणून तर ज्ञानाचा सागर असलेली ज्ञानेश्वर माऊली पंढरपूरची वारी चुकवत नाहीत. नेमाने पांडुरंगाच्या भेटीला जातात. नित्य त्याचे गुणगान करतात. संत निवृत्तीनाथ, संत तुकाराम, संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, ही सर्व आत्मज्ञानी, आत्मसाक्षात्कारी अनन्य भक्तमंडळी. सर्वांचा अधिकार मोठा. पण पांडुरंगापुढे सर्वजण लीन आहेत. शरण आहेत. त्यांना चराचरात सर्वत्र पांडुरंगाचा अनुभव येतो. तोच विलक्षण अनुभव ते आपल्या अभंगातून लोकांपुढे मांडतात. त्याचबरोबर निर्गुण हेच अंतिम सत्य आहे हेही सांगायला विसरत नाहीत.
ज्ञानेश्वर माऊली म्हणते, ”तुज सगुण म्हणू की निर्गुण रे। सगुण निर्गुण एक गोविंदु रे”
तुकाराम महाराज म्हणतात, ”सगुण की साकार। निर्गुण की निराकार। न कळे हा पार वेदां
श्रुती तो आम्ही भावे केलासी लहान। ठेवूनिया नावे पाचारितो
जो परमात्मा आपल्याला बोलवतो, चालवतो, सर्व शक्ती देतो, त्याच्याबद्दल आपला प्रेमभाव व्यक्त करण्यासाठी त्या अनंत परमात्म्याला भक्त सगुणमुर्तीमध्ये मय्राादित रूपात आणतो. आणि त्या नामरूपातीत असलेल्या अनाम तत्वाला वेगवेगळी नावे देऊन साद घालतो. त्याच्याशी संवाद करतो.म्हणूनच निर्गुण निर्विवादपणे सत्य असले तरीही सगुणाला पर्याय नाही, हेही सत्यच आहे. येणा-या आषाढी एकादशीच्या निमित्ताने या सर्व संतांचे, सर्वोत्तम भक्तांचे स्मरण करूया,त्यांना वंदन करूया. त्या भक्तांना भेटण्यासाठी निर्गुणातून सगुण साकार झालेल्या विठूमाऊलीला प्रणाम करूया.तसेच सगुण-निर्गुणाच्या विषयातला भ्रम समूळ नाहीसा करणा-या सर्व सद्गुरूंना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सादर वंदन करूया. जय जय रघुवीर समर्थ - सौ.आसावरी भोईर