परकीय नावे बदलण्याचा स्वागतार्ह निर्णय !

  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला; मात्र मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकांना इंग्रजांच्या काळात देण्यात आलेली काही नावे बदलंली गेली नव्हती. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतील या पारतंत्र्याच्या खुणा पुसल्या जाण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून अनेक संघटना, संस्था, पक्ष यांनी सरकार दरबारी निवेदने देऊन या स्थानकांना मराठमोळी नावे देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला अखेर यश आले.

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गातील सात स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव नुकताच विधानसभेत एकमताने मंजूर झाला. हा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी जाणार असून केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यावर या स्थानकांची नावे अधिकृतपणे बदलली जातील. मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार करी रोडचे नाव लालबाग, सँडहर्स्ट रोडचे नाव डोंगरी, मरीन लाईन्सचे मुंबादेवी, चर्नीरोडचे गिरगाव, कॉटन ग्रीनचे काळाचौकी, डॉकयार्डचे माझगाव आणि किंग्ज सर्कलचे स्थानकाचे नाव तीर्थंकर पार्श्वनाथ असे पालटण्यात येणार आहे. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात रशियाने जेव्हा पोलंड जिंकला तेव्हा त्यांनी पोलंडवरील विजयाचे स्मारक म्हणून वॉर्सा शहराच्या मधोमध एक रशियन ऑर्थाडॉक्स चर्च उभे केले. पहिल्या महायुध्दानंतर जेव्हा पोलंड स्वतंत्र झाला तेव्हा पहिले काम कुठले केले असेल, तर रशियाने बांधलेले ते चर्च पाडले आणि रशियन वर्चस्वाचे चिन्ह नष्ट केले. कारण पोलंडवासीयांना ते चर्च आपल्या अपमानाची सतत आठवण करुन देत होते. हे केवळ एक उदाहरण असून पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त होणाऱ्या प्रत्येक देशाने स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातील पारतंत्र्याच्या, जुलमी राजवटीच्या खुणा नष्ट करण्याचे काम सर्वात आधी केले आहे. भारतात मात्र मोगल, इंग्रज, पोर्तुगीज यांच्या राजवटीतील खुणा आपण अद्यापही जतन करून ठेवल्या आहेत. या धर्तीवर राज्यातील सरकारने मुंबईतील ७ स्थानकांना असलेली परकीय नावे पालटून स्वदेशी नावे देण्याचा घेतलेला निर्णय अभिनंदनीय आहे.

  ज्यावेळी योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबादचे नामकरण प्रयागराज असे केले, तेव्हा अनेकांनी ‘नावात काय आहे' म्हणून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले होते, तेव्हा योगी आदित्यनाथ यांनी ‘कोणी आपल्या मुलांचे नाव रावण किंवा दुर्योधन असे ठेवत नाही' असे म्हणत टीकाकारांची तोंडे बंद केली होती. ज्या पात्रांना इतिहासाने खलनायक ठरवले आहे, त्या पात्रांची नावे कोणी आपल्या मुलाबाळांना दिल्याचे आतापर्यंत ऐकिवात नाही. कंस, जरासंध, रावण, दुर्योधन, दुःशासन हे सर्व पराक्रमी आणि कर्तृत्ववान होते; मात्र त्यांनी अधर्माची बाजू घेतली आणि ते खलनायक ठरले. परिणामी त्यांची नावे पुढे कोणी आपल्या पुढच्या पिढीला दिली नाहीत. असे म्हटले जाते कि हजारो वर्षांपूर्वी भारतात सोन्याचा धूर निघत असे. भारताला ‘सुवर्णनगरी' असेही म्हटले जात असे. भारतावर चालून आलेल्या यवनी आक्रमकांनी आणि त्यानंतर आलेल्या ब्रिटिशांनी भारताचे सारे वैभव लुटले. येथील इतिहासाच्या खुणा पुसल्या. पुरातन मंदिरांची आणि कलाकृतींची नासधूस केली. तलवारीच्या बळावर भारतीयांवर अत्याचार केले, अनेकांचे धर्मांतर केले. येथील शहरांची आणि गावांची नावे पालटली. देश स्वतंत्र होऊन आता ७७ वर्षे  होतील; मात्र आक्रमकांच्या स्मृतींना आपण अद्याप जपून ठेवले आहे. आजही हिंदुस्थानातील शेकडो गावांना बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब यांची आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांची नावे आहेत. महाराष्ट्रातही काही भागात अशी नावे आजही पाहायला मिळतील. ही नावे भारतमातेने सहन केलेल्या अपरिमित वेदनांची आठवण करून देणारी आहेत. त्यामुळे ती लवकरात लवकर बदलली जाणे आवश्यक आहे. महाराष्ट्रभूमी ही जशी साधू-संतांची आणि समाजसुधारकांची भूमी आहे तशी ती अधर्माच्या नाशासाठी पृथ्वीतलावर जन्म घेणाऱ्या अवतारांचा पदस्पर्श लाभलेली, जनतेच्या कल्याणासाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावून लढणाऱ्या वीरपुरुषांची आणि भारतमातेला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी बलीवेदीवर हसतमुखाने चढणाऱ्या क्रांतिकारकांचीही आहे. ज्या भूमीला अशा उत्तुंग पराक्रमाचा दैदिप्यमान इतिहास लाभला आहे, तिने जुलमी आक्रमकांच्या नावाचा वारसा का म्हणून चालवावा ? मुंबईतील ७ स्थानकांची नावे बदलण्याचा सरकारने घेतलेला निर्णय ही सुरुवात आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागांना, गावांना, संग्रहालयांना, मार्गांना आणि उद्यानांना आजही विदेशी आक्रमकांची नावे दिलेली पाहायला मिळतात. येणाऱ्या काळात ही नावेही बदलण्यात यावीत ! -जगन घाणेकर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

पाळा शिस्त, राहा मस्त! भोंदू बाबा करतील फस्त