मुशाफिरी

 

   ९ जुलै रोजी अतिवृष्टी होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने ‘शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय' या संशयाला अनुसरुन ठाणे, रायगडमधील स्थानिक स्वराज्य संस्थांनी ८ जुलै रोजीच सर्व शाळा बंद ठेवण्याचे परिपत्रक काढले व दक्ष समाजमाध्यमकर्मींनी ते लगेच फिरव फिरव फिरवले. ...आणि बऱ्याचदा ‘हवामान खात्याची विकेट घेऊया' असे ऊन, वारा, पाऊस ठरवत असतातच; त्याप्रमाणे ९ जुलै रोजी पावसानेच सुट्टी घेतली व शाळकरी मुलं क्रिकेट व अन्य खेळात दंगून गेली. माणसंच लहरी बनली आहेत. मग निसर्गाने तरी का स्वाभाविक, नैसर्गिकपणे वागायचं? तोही माणसापेक्षा लहरी बनल्याचे आपण सारे पाहात आहोत.

   गेले काही दिवस अस्वस्थ, निराश, नाराज, नाऊमेद करणाऱ्या घटना सातत्याने घडत आहेत. पावसाने तर जूनमध्ये चांगलीच हुलकावणी दिली. सोबतच आनंदक्षणांनाही हुलकावणी मिळत राहिली. नाही म्हणायला भारताने २० ट्‌वेन्टीचा विश्वचषक जिंकला ही त्यातल्या त्यात खूपच आनंद देणारी गोष्ट. जिद्दीने, निकराने, खचून न जाता परदेशात, परवया वातावरणात शेवटपर्यंत लढत देण्याच्या भारतीय संघाच्या मानसिकतेचे त्याबद्दल कौतुक केलेच पाहिजे. भारताने या खेळाडूंच्या खेळाची दखल घेत १२५ कोटी रुपयांचे इनाम जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची खास भेट घेऊन प्रशंसा केली. इथपर्यंत ठीक. पण या संघात मुंबईचे चार खेळाडू खेळले त्याबद्दल विधीमंडळात त्यांचा सत्कार करुन त्यांना महाराष्ट्रातील जनतेच्या करातून जमा झालेले ११ कोटी रुपये देणे हे मात्र अतीच झाले. ‘क्रिकेटची पंढरी' म्हणून ज्या मुंबईचा उल्लेख केला जातो त्या मुंबईतील एकही ‘मराठी' खेळाडू विश्वचषक खेळणाऱ्या भारतीय संघात असू नये? हे चारही खेळाडू बिगरमराठी. शर्मा, यादव, जयस्वाल, दुबे हे नावावरुन समजण्यास सोपे आहे. खेळात जातीयवाद, प्रान्तवाद, भाषावाद नको हे बोलायला ठीक आहे. पण ज्या मुंबईत, ज्या महाराष्ट्रात हे व यासारखे अनेक बिगरमराठी खेळाडू, कलावंत, उद्योजक, राजकारणी, निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार, डॉवटर, चार्टर्ड अकाऊंटंट, संशोधक व अन्य बिगरमराठी नागरिक घडले, त्यांचे भविष्य येथे राहुन सुरक्षित झाले, जे कित्येक वर्षे मुंबई-महाराष्ट्रात राहतात..त्यांना मुंबई व महाराष्ट्र या कर्मभूमीचा किती अभिमान आहे? त्यांनी इतकी वर्षे मुंबईत राहुन मराठी भाषा शिकण्याचा कधी प्रयत्न केला आहे काय? ते मराठीला आपली आई तर सोडाच..पण मावशी तरी मानायला तयार आहेत काय? खासगीमध्ये ही मंडळी ( काही सन्माननीय अपवाद वगळता) मराठी व महाराष्ट्राबद्दल आदराने, आपुलकीने तरी बोलतात काय? मी स्वतः एक मुलाखतकार म्हणून गेली एकोणतीस वर्षे विविध प्रसारमाध्यमांसाठी हजारो लोकांच्या मुलाखती घेतल्यामुळे, घेत असल्यामुळे सांगू शकतो की या प्रश्नांची उत्तरे ही मराठी माणसांसाठी फारशी समाधानकारक नाहीत. ‘सदियोंका शहेनशाह' अमिताभ बच्चन, मुंबईत राहुन पंजाबमधील खासदारकी भूषवलेले धर्मेंद्रसिग देओल, सनी देओल, तसेच स्वप्नसुंदरी हेमा मालिनी, जया बच्चन, जयाप्रदा, रेखा, शिवाय कॉमेडी किंग कपिल शर्मा, नवज्योत सिध्दू, शाहरुख खान, आमीर खान, सलमान खान, सैफ अलि खान, फरदीन खान ही सारी खानावळ, हृतिक रोशन हे व यासारखे कितीतरी लोक मुंबईत महाराष्ट्रात प्रदीर्घ काळ राहिले, राहताहेत. यातल्या कितीजणांना मराठी बोलता येते? मग आमच्या नवी मुंबईचा शंकर महादेवन कितीक पटीने बरा! तो चांगले मराठी बोलतोही आणि मराठी गाणी तितवयाच तन्मयतेने गातोही! जम्पिंग जॅक अभिनेता जीतेंद्र, कॉमेडीचा बादशहा जॉनी लिव्हर खूप चांगले मराठी बोलतात. जन्माने गुजराती..पण काही पिढ्या महाराष्ट्रात गेलेले कलावंत मनोज जोशी, जन्माने राजस्थानी असलेला कलाकार जीतेंद्र जोशी यांचे मराठी अस्खलित असते. हे लोक महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानतात. दिवंगत देवेन वर्मा हा हास्य अभिनेता खूप चांगले मराठी बोलत असे. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दीडशहाणे कथाकार, पटकथाकार, निर्माते, दिग्दर्शक, हिंदी दूरचित्रवाणी मालिका तयार करणारे काही महाभाग मात्र आजही मराठी माणसाला घरगडी व मराठी महिलेला कामवाली बाई म्हणून विकृत चित्रण करण्यात धन्यता मानत असतात. म्हणजे बघा, हे लोक पोटं भरायला स्वतःचे राज्य सोडून आमच्या महाराष्ट्रात येणार आणि जिथे दाणापाणी मिळते त्या भागाची, राज्याची, भाषेची, लोकांची मात्र आपल्या कलाकृती मधून टिंगल टवाळी करणार ! यासारखी दुसरी कृतघ्नता कोणती?

  या महिन्याच्या ४ तारखेला उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एकेकाळचा हवालदार आणि नंतर स्वयंघोषित धार्मिक गुरु बनलेल्या भोले बाबा उर्फ नारायण साकार उर्फ सूरजपाल जाटवच्या दर्शनार्थ व त्याच्या पायाखालची माती, चिखल हा प्रसाद म्हणून सेवन करायला जाताना चेंगराचेंगरी होऊन १२३ हुन अधिक लोकांना जागच्या जागीच मोक्ष मिळून त्यांनी स्वर्गच गाठला असे म्हणावे लागेल. आपल्याकडील तथाकथित भक्तांना अशी अधूनमधून भक्तीप्रदर्शनाची उबळ येत असते. चामुंडा देवी (राजस्थान), मांढरदेवी, नाशिक कुंभमेळा, रत्नागिरी मंदिर (मध्य प्रदेश), शबरीमाला (केरळ), प्रतापगढ (उत्तरप्रदेश), नैनादेवी मंदिर (हिमाचल प्रदेश) वैष्णौदेवी या व अशा कित्येक घटनांमधून आपण याचा पडताळा सातत्याने घेत आलो आहोत, पण त्यातून धडा शिकायला मात्र हे आंधळे अनुयायी तयार नाहीत, हेच दिसून येते. आपला बाबा कितीही गुन्हेगार, कुकर्म करणारा, त्यासाठी सजा भोगणारा असला तरीही हे आंधळे अनुयायी सुधारत नाहीत हे आपण बाबा गुरमित राम रहिम, आसाराम बापू यांच्या उदाहरणांवरुन पाहिले आहे. तरीही त्यांच्या आरत्या ओवाळणारे, तस्विरी देवघरात लावणारे, त्यांची लॉकेट्‌स गळ्यात परिधान करणारे शेकडो नव्हे, हजाराेंनी आहेत. आणि हे केवळ हिंदूधर्मियांबद्दलच घडते या भ्रमात कुणी राहु नये. ख्रिस्ती, मुस्लिम लोकांच्या धर्मस्थळीही अशा प्रकारच्या प्रसंगांना अनियंत्रित गर्दी जमल्याने शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागण्याच्या घटना घडल्या आहेत. काय कारणे असतात यामागची? मानसशास्त्रीय अंगाने याचा विचार केल्यास हाताशी असे लागते की अशा ठिकाणी मरणारे अनेक लोक हे प्रापंचिक व्यापांनी गांजलेले असतात. सरकार, प्रशासन, राजकीय नेते, व्यवस्था, न्यायालय अशा यंत्रणांकडून त्यांना अपेक्षित दिलासा मिळत नाही. काहींना आजारपणाने त्रस्त केलेले असते. उपचारांचा खर्च पेलवत नाही, काहींना नोकऱ्या मिळालेल्या नसतात, काहींना नोकऱ्या मिळूनही तेथे ‘जॉब सॅटिस्फॅवशन' लाभत नसते. काहींचे सारे ठीक असून विवाह जमत नसतात; तर काहींचे विवाह जमूनही कौटुंबिक सुखाला ते पारखे झालेले असतात. काहींना मुलेबाळे होत नसतात. मग यातील अनेक लोक आध्यात्म, परमार्थ, दैववाद हे मार्ग स्विकारतात. पण ते स्विकारताना मधले दलाल, मध्यस्थ यांचा ताबा घेतात आणि मग हे लोक अलगद कुठल्यातरी बाबा-बुवा-बापू-संन्यासिनी-साध्वी यांच्या दरबारात दाखल केले जातात. हा मार्ग त्यांना स्वस्त, दिलासादायक वाटतो. बाबा/संन्यासिनीच आपले भले वगैरे काय ते करतील यावर त्यांचा दृढ विश्वास बसतो. आणि तेथील मध्यस्थ, दलाल यांचे जाळे त्यांना या बाबा-संन्यासिनीच्या दैवी चमत्कारांची कथानके रंगवून सांगते, काही खोटी खोटी कथानके विश्वास जिंकण्यासाठी घडवून आणली जातात आणि भोळे लोक यात हळुहळु गळ्यापर्यंत रुतत जातात आणि असे मरतात. ज्या घरात लहान मुले आहेत..त्या घरातील कर्ते पुरुष, सर्वांचे संगोपन करणाऱ्या महिला दगावल्या असतील त्या घरांत यामुळे काय कहर माजला असेल?

   मिहिर शहा या मुजोर, बेमुर्वतखोर, पळपुट्या माणसाला अखेर पोलीसांनी चतुर्भुज केले. मुंबईत वरळी येथे प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा या स्कूटीवरुन जाणाऱ्या दाम्पत्याला मिहिरने दारु प्राशन करत वाहन चालवताना ठोकरुन बोनेटमध्ये अडकलेल्या कावेरी यांना बेदरकारपणे गाडी चालवत बऱ्याच अंतरापर्यंत फरफटत नेले, ज्यात त्यांचा मृत्यु ओढवला. नेहमीप्रमाणे पैसेवाले लोक पैशाच्या मस्तीत असतात आणि त्यामुळे आपल्यावरील आरोप दुसऱ्या कुणी स्वतःवर घ्यावा याची तजवीज करु पाहतात, तसे याहीवेळी मिहीरचा ड्रायव्हर राजर्षी बिदावत याच्यावर हा आरोप ढकलून स्वतः नामानिराळे राहण्याचा मिहिरचा प्रयत्न होता. राजकीय पक्षाचा उपनेता असलेल्या राजेश शहाचा तो मुलगा असल्याने राजेशने मुलाला वाचवण्याचा बराच खटाटोप केला. आता गुन्हा कबूल करुन मिहिर शहा जामीनावर बाहेर आला आहे. पण आपल्याकडे राजकारणाचा, त्यातही सत्ताधारी लोकांचा पोलीस यंत्रणेवर कशा प्रकारे प्रभाव, दबाव असतो हे साऱ्यांना माहित आहे. आता हे उपरे लोक मुळ मुंबईकर, या महानगरी मुंबापुरीचे मूलनिवासी कोळी लोकांच्या जीवावर उठले आहेत. त्यांना योग्य तो धडा शिकवला पाहिजे.  लुंग्यासुंग्यांची गर्दी मुंबईकरांसाठी जीवघेणी ठरते आहे. कल्याण ते छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यानच्या रेल्वे डब्यांतील प्रचंड प्रवासी वाहतूकीमुळे गेल्या काही महिन्यांत बऱ्याच प्रवाशांना चालत्या डब्यातून पडल्याने जीव गमावण्याची वेळ आली होती. आता ८ जुलै रोजी सीबीडी-बेलापूर रेल्वे स्थानकात रोहिणी राजेश बोटे या महिलेला लोकलमध्ये चढताना रेल्वे रुळावर पडल्याने पायावरुन रेल्वेगाडीची चाके जाऊन दोन्ही पाय गमावण्याची वेळ आली. एखादा हात, एखादा डोळा, एखादा कान नसेल किंवा अपघातामुळे तसे दिव्यांगत्व आले असेल तरी व्यक्ती पुढे जाऊ शकेल. पण दोन्ही पाय गमावणे म्हणजे सारे चलनवलन थांबण्याचाच प्रकार! रोहिणीताईला या अपघातामुळे काय यातना झाल्या असतील; तिच्या परिवाराची, मुलाबाळांची, अन्य नातेवाईकांची यामुळे काय मनःस्थिती झाली असेल याची केवळ आपण कल्पनाच करु शकतो. घरातील कर्ती बाई जायबंदी झाली म्हणजे सारे घरच जायबंदी होण्याचा हा प्रकार आहे. असे दुःख, अशा यातना कुणाच्याही वाट्याला कधीही येऊ नयेत हीच प्रार्थना! - राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

‘हलाल प्रमाणपत्र'ला मात  देण्यासाठी ‘ओम प्रमाणपत्र' !