आला पाऊस

”नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा” पाऊस दरवर्षी येत असला तरी दरवर्षी आपल्याला तो हवा असतो. प्रत्येक वर्षी आपल्यासाठी तो नवा देखील असतो. पावसाळा आनंदाचे क्षण सोबत घेऊन येतो. त्याला भेटण्यासाठी त्याने फुलवलेला निसर्ग अनुभवण्यासाठी नेहमी घराबाहेर पडावेच लागते असे नाही. बऱ्याच वेळा पाऊसच घरात भेटावयाला येतो.

कोसळत्या धारातून, सुटणाऱ्या गार वाऱ्यातून, मातीच्या वासातून, पाना फुलातून, विविधरंगी फुलपाखरातून आणि सभोवतील फुललेल्या निसर्गाचा शेजार लाभतो, तो निराळाच. प्रत्येक वर्षी नवा अनुभव देणारा, नव्या रुपात येणारा पाऊस रिपरिपणारा, बरसणारा, रिमझिमणारा,कोसळणारा, धांदल उडवणारा, तारांबळ उडवणारा भासतो. पावसाला कुठे असतात रिती रिवाज, आडपडदा, निती नियमांचे तुरुंग, वर्तवलेले अंदाज हमखास चुकवण्यात याला भारीच आनंद. पाऊस आणि सात जून हे समीकरण आता दिवसागणिक मागे पडत चालले आहे. पावसाचे अनेक प्रकार असतात. जसे वळवाचा पाऊस, आषाढातला पाऊस, श्रावणातला पाऊस, भाद्रपद आणि अश्विन यांच्या दरम्यान येणारा पाऊस, प्रत्येक नक्षत्रातला पाऊस वेगळा असतो. विविध ठिकाणचा, विविध प्रांतांमधला, विविध शहरातला, विविध गावातला पाऊस वेगळा असला तरी, नाते मात्र अतूट आहे. त्याच्या प्रतिक्षेत असलेली धरणीमाता, वनश्री, चराचरातील सजीव सृष्टी, म्हणते की, ”जीवलगा कधी रे येशील तू.” पावसावर कविता सूचली नाही असा एकही कवी नाही. पावसाळा हे वसुंधरेसाठी ईश्वराने मोकळ्या हाताने दिलेले दान आहे. धरणी मातेची कूस उजवण्यासाठी दिलेले आंदणच नव्हेतर गर्भाधान संस्कारासाठी सुंदरसा नजराणा आहे. म्हणूनच वर्षा ऋतूत हिरवा शालू परिधान करुन मातीच्या सुगंधीत मारवा माळून पावसाचे दमदार स्वागत ढगांच्या डफातून होते.

पद्मश्री मधू मंगेश कर्णिक म्हणतात की, ”पावसाची एकएक सर म्हणजे कविताच जणू”. अखंड पावसाळा वर्षा ऋतू म्हणजे एक महाकाव्य. आभाळाच्या आणि धरतीच्या पारावर लिहिलेले चिरंतन महाकाव्य. अगदी कवि कालिदासापासुन बा.भ.बोरकर, पाडगांवकर, ग्रेस, महानोरांपर्यंत पसरलेले हे महाकाव्य. पावसाच्या सरी कधी सुखद अनुभव देतात तर कधी दुःखाच्या क्षणांना सामोरे जायला लावतात. पाऊस आणि मल्हार राग, पाऊस आणि चातक, पाऊस आणि मोर, पाऊस आणि पावसाळी भाज्या, पाऊस आणि कणिस, पाऊस आणि चित्रपट गीते, पाऊस आणि बालगीते अशी अनेक समीकरणे मनाला रुंजी घालतात. ‘रिमझिम गिरे सावन' या चित्रपटगीतात जुन्या मुंबईचे दर्शन घडते. उपनगरीय रेल्वे सेवा जोवर बंद पडत नाही तोवर मुंबईकरांना पाऊस झाला असे वाटत नाही. शेतकऱ्यांसाठी पाऊस म्हणजे परमेश्वर अन्नदाता. कधी कधी पाऊस आपल्याला वाट पहायला लावतो, उशीराने येतो आणि अशा पावसाला कवि अनिल यांनी तीर्थ म्हटले आहे. शेतकरी राजा, कष्टकरी वर्ग पावसाची चातकासारखी वाट बघतो. दिवसभर काबाडकष्ट करणारा बळीराजा म्हणतो की, ”डोंळ्यांनी बघतो ध्वनी परिसतो कानी, पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो मधूरही वाचे आम्ही बोलतो, हातांनी बहू साल काम करतो, विश्रांती ही घ्यावया, घेतोझोप सुखे फिरुनी उठतो, ही ईश्वराची दया.” या काव्यपंक्तीनुसार सारे काही पावसावर, निसर्गावर, ईश्वरावर सोपवून मोकळा होतो.

कविता, बालगीत, चारोळ्या, सुभाषित, विडंबन गीत येवढेच नव्हेतर लोकसाहित्यातल्या ओव्यांमधून देखील पाऊस बरसतो. हेच पहा ना, ”मेघराजाचं लगीन, आभाळ वाजं डफ, ईजबाई करवली येतीया झपाझप” खरेच, पाऊस म्हणजे कविकुलाच्या आणि लोकसंस्कृतीचा गाभारा. म्हणूनच की काय, आबालवृध्दांपासून सारेच म्हणतात,
आला पाऊस ! - सौ. चित्रा बाविस्कर 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी