नवयुवकांच्या व्यथा      

 आज महाराष्ट्रात बघितले तर अठरापगड जातीचे लोक राहतात. या महाराष्ट्राची लोकसंख्या दिवसागणिक वाढत आहे. परंतु, त्या तुलनेत आज लोकांना रोजगाराच्या संधी कमीच उपलब्ध होताना दिसत आहेत. त्याच लोकांमध्ये सुशिक्षित व अशिक्षित अशा दोन गटात वर्गीकरण पूर्वीपासून झालेले आपण बघतो. आजच्या घडीला मात्र पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना सुशिक्षित असून बेरोजगारीला सामोरे जाणे भाग पडते आहे. या सगळ्यात युवकांची संख्या अधिक प्रमाणावर आहे.

जे आधीपासूनच कारखान्यात काम करणारे कामगार, विट भट्टीवर विटा वाहून नेणारे कामगार, घरे बांधण्यासाठी काम करणारे मजदुर जे भर उन्हातान्हात घाम गाळून कष्ट करत असतात त्यांना मिळणारा भत्ता वाढताना कधी दिसत नाही. ते पूर्वीही आठ हजार, पंधरा हजार पगारावर काम करत होते, आजही ते तेवढ्याच पगारावर काम करताना दिसत आहेत. तहान भुकेची पर्वा न करता हे कामगार महिन्याच्या मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारावर आपल्या मुलामुलींचे शिक्षण करतात, घर चालवतात स्वतःची भूक मारून मुलांची पोटे भरतात. आपल्याच घराचे काम करणारे कामगार किंवा घराला रंग मारण्यासाठी आलेला रंगारी यांना कधी आपल्यातील एक भाकरीचा तुकडा किंवा एक ग्लास पाणी देण्याचे पुण्य आपल्याकडून करवले जात नाही. एवढ्याशा पगारात ते त्यांचे घर कसे चालवत असतील, हाही प्रश्न कधी आपल्या मनाला भेडसावत नाही.

दुसरीकडे स्थिती आहे मॅकेनिकल इंजिनिअर, सिव्हील इंजिनिअर, फार्मसी, एम बी ए, एम टेक, एम एस सी असे कितीतरी पदवी उत्तीर्ण होऊन वर्षाला हजारो विद्यार्थी नोकरी मिळवण्यासाठी बाहेर पडत असतात. परंतु मुलांचे चांगले शिक्षण असूनही त्यांना त्यांच्या शिक्षणाच्या ऐपतीप्रमाणे पगार मिळत नाही. चांगले चांगले शिक्षण घेऊन चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन कंपन्यांचे कितीही इंटरव्ह्यू दिले तरी पाहिजे तशी नोकरी मिळत नाही आणि नोकरी मिळाली तरी पाहिजे तसे वेतन मिळत नाही. आजच्या घडीला सी ए, एम बी ए, केलेले विद्यार्थीसुद्धा गेल्या चार पाच वर्षांपासून दहा बारा हजार पगारावर बाहेर अकाउंटंट, असिस्टंट म्हणून काम करत आहे. त्या दहा-बारा हजार पगारासाठी न परवडणारे गाडीचे पेट्रोल, भाडे खर्च करून वीस पंचवीस किलोमीटर रोजचा प्रवास करत आहेत. फ्रेशर्स असेल तरी तीच गत आहे आणि अनुभव असला तरी तीच गत आहे. आजच्या घडीला मिळणाऱ्या कमी पगारामुळे मुलांना लग्नाला मुली मिळणे अवघड होत चालले आहे. त्यात मुलींच्या मुलांकडून असणाऱ्या अपेक्षाही सर्रास वाढताना दिसत आहे. किती दिवस हे काळचक्र असेच सुरू राहणार कोणास ठाऊक?

आजच्या काळात शिक्षणाला महत्त्व राहिलेलेच नाही. विद्यार्थी कितीही शिकून नोकरीसाठी चांगल्या कंपनीत गेला तरीही त्याला मिळणारी पहिली नोकरी ही खालच्या दर्जाची आणि कमी पगाराचीच मिळते. पुढे येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी आज महाराष्ट्रातील प्रत्येक युवक मिळेल ते काम करण्यास तयार आहे. तरीही त्या कामाचा मोबदला त्या युवकाच्या खिशाला न परवडणारा च आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्वीचे कामाचे स्वरूप, कामाचे तास १२ तासांवरून ८ तासांवर आणले, आठवड्याची एक सुट्टी सक्तीची, नोकरदारांना पी एफ मिळवून दिला हे जरी खरे असले तरी ते फक्त सरकारी नोकरीत लागू आहे. खाजगी नोकरीत बघायला गेलं तर तीच परिस्थिती आज आपल्याला बघावयास मिळते. मोठ्या मोठ्या एम एन सी कंपन्यामध्ये आठवड्याच्या सुट्टीची दिरंगाई असते. विद्यार्थ्यांना १२ ते १५ तास रात्रीच्या सत्रात नोकरी करावी लागत आहे. आणि त्याच १२ ते १५ तासांच्या कामासाठी त्यांना मिळणारा मोबदला हा फक्त १० ते १५ हजार असतो. जर महाराष्ट्रात असणारी परिस्थिती अशी आहे तर सुशिक्षित आणि अशिक्षित लोकांमध्ये फरक तो काय? बाहेर कारखान्यातील कामगार, विट भट्टीत काम करणारे कामगार यांची जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती आज चांगले शिक्षण घेऊन पुढे येणाऱ्या युवकांची झालेली आहे.

 समाजात आपण बघतो मुलांकडे एम बी ए, सी ए, फार्मसी, एम टेक, अशा चांगल्या चांगल्या पदव्या असतात, पण तरीही ते विद्यार्थी कुठेतरी किराणा दुकानात, डी मार्ट, सिटी सेंटर मॉल, अशा ठिकाणी मिळेल त्या पगारावर मिळेल ते काम करण्यास केवळ चांगल्या कंपनीत नोकरी मिळत नाही म्हणून रुजू झालेले असतात. जर चांगले शिक्षण घेऊनही नोकरी मिळण्यासाठी अशी अवस्था असेल तर महागडे शिक्षण घेतल्याचा उपयोग तरी काय? आज चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी नक्की गरज कशाची तेच समजेनासे झाले आहे. कारण नोकरीसाठी मुलाखतीला गेल्यानंतर शिक्षण काय हे कोणी विचारण्याच्या सर्वात आधी पहिला प्रश्न हाच असतो या आधी कुठे काम केले आहे का? किंवा तुम्हाला कामाचा अनुभव किती? मग जर असे असेल तर महाराष्ट्रातील युवकांनी का उगाच आई वडिलांचा पैसा घालवून १०-१५ वर्षे शिक्षणात खर्च करायची? त्यापेक्षा कुठेतरी काम करून अनुभव मिळवणे चांगले नाही का? लग्नाला स्थळ बघताना सुद्धा मुलीकडचे आधी कमवतो किती? महिन्याचे उत्पन्न किती हे विचारतात त्यावरून त्या संबंधित मुलाचे शिक्षण ठरवतात. मग शिक्षणाला महत्त्व आहे की नाही हा गंभीर प्रश्न उपस्थित होतो.

आज महाराष्ट्रातील बहुतांश प्रश्न सोडवले जात आहेत. कुठेतरी महाराष्ट्राचा विकास होताना दिसतो आहे, परंतु या सगळ्यात बेरोजगारीचा तसेच उच्च शिक्षित तरुणांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचा प्रश्न सोडवण्यास कोणीही पुढे सरसावताना दिसत नाही. आजचा तरुण या काळचक्रात अक्षरशः भरडला जातो आहे. हे कोणाला दिसत नाही. सरकारी नोकरीत संधी आहे असे सगळे म्हणतात. अभ्यास केला तरी परीक्षा पास होऊन सरकारी नोकरीत निवड होते असं सगळेच म्हणतात; पण त्या सरकारी नोकरीकडे फिरणाऱ्या तरुणांची संख्या त्यातील वाढलेली स्पर्धा कोणाला दिसत नाही. या एवढ्या मोठ्या स्पर्धेत महाराष्ट्रातील तमाम युवक मंडळींचा कसा काय निभाव लागायचा? आजच्या घडीला महाराष्ट्र सरकार बरेच प्रश्न मार्गी लावताना दिसत आहे; परंतु, तरुणांच्या व्यथेकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे आणि म्हणूनच आज मतदानाचा हक्क बजावणारा तरुण वर्ग कमी दिसत आहे. हे महाराष्ट्र सरकार आज प्रत्येक ठिकाणी स्त्रियांना आरक्षण द्यायला तयार आहे. मुलींसाठी, वयोवृद्धांसाठी आरक्षण देण्यास सक्षम आहे. लहान मुलांसाठी नवीन योजना आणण्यास सक्षम आहे. पण तरुणांचं काय? जर तरुणांच्या मागण्या पूर्ण होऊ शकत नसतील, तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न वर्षानुवर्ष सुटत नसेल तर कोणत्या तोंडाने आजच्या तरुणांनी मतदानाचा हक्क मिळवायचा, कोणाला मत द्यायचे? कोणत्या पक्षाला मत द्यायचे? आणि तरुणांचे प्रश्न कोण मार्गी लावण्यास हातभार लावेल हे आता येणारा काळच ठरवेल. - नयन धारणकर, नाशिक 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

वाढते धर्मांतर : एक गंभीर समस्या !