दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
मुशाफिरी
साहित्य विश्वात महाकवी कालिदासांना मोठे स्थान आहे. संस्कृत हा विषय घेणे सक्तीचे नसल्याने त्या भाषेचा व्हायला हवा तसा प्रचार, प्रसार झाला नाही. पण अनेकांनी आपापल्या बोलीभाषेत, मातृभाषेत लिखाण केले. त्या सर्वांसाठी हा दिवस मोलाचा. लिखाण तसे अनेकजण करतात..पण ते सारेच ‘साहित्य' या संज्ञेत बसतेच असे नाही.
हा लेख वाचकांच्या हाती जाईल तेंव्हा आषाढ या माझ्या आवडत्या महिन्याला कदाचित प्रारंभही झाला असेल. यंदा ज्येष्ठ महिन्यातही ‘वैशाख वणव्या'चा अनुभव आपण घेतला. अजूनही जमिनीने नीटसे पाणी शोषून न घेतल्याने पडलेल्या पावसाची वाफच होत आहे आणि त्यामुळे आणखी उष्ण भासू लागले आहे. काही ठिकाणी इतका पाऊस झाला की धबधबे, नद्या, तलाव, विहीरी भरल्या; रस्त्यात तळी साचली. लोणावळ्याच्या भुशी धरणाच्या व ठिकठिकाणच्या प्रवाहात फाजील शौर्य दाखवायला गेलेली (कुणीही त्यांना तिथे जायला, प्रवाहाच्या मध्ये बसायला, उभे राहायला सांगितलेले नसतानाही गेलेली अतिउत्साही) मंडळी बघ्यांच्या डोळ्यांदेखत वाहुन गेल्याचेही वृत्त आहे.
यंदा ६ जुलै रोजी आषाढ महिन्यास प्रारंभ होत आहे. हाच दिवस कविकुळातील ज्येष्ठ संस्कृत साहित्यिक ‘महाकवी कालिदास दिन' म्हणून साजरा करण्याचा प्रघात आहे. कालिदासांच्या जन्मस्थळाबद्दल वाद आहेत. बंगाल, उज्जैन, रुद्रप्रयाग, काश्मिर अशी ठिकाणे त्यांचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. रघुवंश, कुमारसंभवम ही महाकाव्ये, मेघदूत हे खंडकाव्य तसेच अभिज्ञान शाकुंतलम हे नाटक लिहुन कालिदासांना दिगंत किर्ती मिळाली. हे सारे संस्कृतमधून झालेले लिखाण. नंतर त्यांचे भावानुवाद उपलब्ध झाल्यामुळे जगभर गेले. साहित्य विश्वात कालिदासांना मोठे स्थान आहे. संस्कृत हा विषय घेणे सवतीचे नसल्याने त्या भाषेचा व्हायला हवा तसा प्रचार, प्रसार झाला नाही. पण अनेकांनी आपापल्या बोलीभाषेत, मातृभाषेत लिखाण केले. त्या सर्वांसाठी हा दिवस मोलाचा. लिखाण तसे अनेकजण करतात..पण ते सारेच ‘साहित्य' या संज्ञेत बसतेच असे नाही. बँंकेतले कारकून, सहनिबंधक कार्यालयातील लेखनिक, मुन्शिपाल्टीमधील, विविध सरकारी, खासगी आस्थापना, कंपन्यांमधील डाटा एन्ट्रीवाले सुध्दा काही ना काही कार्यालयीन मजकूर लिहीत असतात, रकाने भरत असतात. पण ते सारे ‘साहित्य' या स्तराला जात नाही. मात्र यातीलच अनेकजण विविध साहित्यिक रचना करुन साहित्यिक पदवीला पात्र ठरतात असेही घडले आहे. जसे सिताराम मेणजोगे यांनी ‘पोस्टातली माणसे' हे पुस्तक लिहिले..जे गाजले. विख्यात साहित्यिक वि.आ.बुवा हे माटुंग्याच्या व्ही.जे.टी.आय मध्ये नोकरी करीत असत. पण त्यांची विनोदी पुस्तके खूप गाजली, आकाशवाणीवर त्यांच्या श्रुतिकांना मोठा श्रोतृवर्ग लाभला होता. कल्याणवरुन आठवले...माझा जन्म जरी मुंबईच्या जे.जे. इस्पितळातला असला व बालपणाची काही वर्षे मुंबईच्या डोंगरी भागात गेली असली तरी इयत्ता तिसरीपासूनचा पुढचा सारा शैक्षणिक प्रवास हा कल्याणमधलाच आहे.
आमच्या घरी आईकडून किंवा वडिलांकडून लेखनाचा कसलाही वारसा नव्हता. नाही म्हणायला माझे मामा कै.कृष्णा बाळाजी पाटील हे डोंगरी येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेवर मुख्याध्यापक होते व ते नाट्य कलावंतही होते. १९६० ते १९७५ दरम्यान विविध नाट्यस्पर्धांमधून ते भाग घेत व त्यात स्त्री पार्ट रंगवीत असत. ‘मुंबईची माणसं' या नाटकातली त्यांची स्त्री भूमिका नावाजली गेली होती असे मला माझ्या लहानपणी कुठल्यातरी संस्थेच्या अहवालात वाचल्याचे स्मरते. शाळेत, महाविद्यालयात असताना बालकवी, कवी बी, केशवसुत, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, बा.सी.मर्ढेकर, नारायण सुर्वे या व अशा अनेक साहित्यिकांच्या रचना मार्क मिळवण्यासाठी अभ्यासल्या. पुढे जाऊन कधी तरी मला मराठी साहित्यात एम. ए. होता येईल, त्यानंतर पुढे पत्रकार होता येईल, संपादक बनता येईल, मुलाखतकार म्हणून वावरता येईल, नारायण मुरलीधर गुप्ते अर्थात कवी ‘बी' यांच्या नातवांशी माझा स्नेह जुळेल, माझेही एखादे पुस्तक महाराष्ट्राच्या तत्कालिन विधानसभा अध्यक्ष यांच्या हस्ते, तर त्याची दुसरी आवृत्ती महाराष्ट्राच्या तत्कालिन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वगैरे प्रकाशित होईल असे कुणी मला सांगितले असते तर मी त्याला वेड्यात काढले असते. कारण सांगतो...या प्रकारचे साहित्यरचनेला पोषक वगैरे वातावरण मला ना जन्मस्थळ मुंबईत लाभले ना कल्याणच्या दीर्घ वास्तव्यात मिळू शकले. माझ्या वडिलांना वाटे की मी इंजिनियर व्हावे नाहीतर एलएलबी-कामगार कायद्यात स्पेशलाईज करुन पर्सोनेल मॅनेजर व्हावे. कारण ते ज्या कंपनीत काम करीत तेथील चिफ इंजिनियर आणि पर्सोनेल मॅनेजरचा रुबाब ते पाहात असत. पण माझ्यात ते गुण अजिबातच नव्हते. त्यामुळे मी तसले काही होऊच शकणार नव्हतो. मात्र माझ्या वडिलांची ती इच्छा त्यांचा मोठा भाचा अशोक गोविंद भगत याने पूर्ण केली. तो प्राध्यापक झाला, इंजिनियर झाला (लग्नाचे वय झाल्यावर रायगडचे माजी खासदार, लोकनेते स्व.श्री.दि.बा.पाटील साहेबांचा जावई झाला..) आणि टाटा कंपनीत प्रदीर्घ आणि प्रामाणिक, निष्कलंक सेवा बजावून २००८ साली निवृत्त झाला.
मी पत्रलेखन करुन, समस्या शब्दबध्द करुन, वेगवेगळ्या लेखांवरील माझे मत विविध वर्तमानपत्रांना पाठवीत राहिलो. १९८३ साली मानसशास्त्र घ्ोऊन बी.ए. व १९८५ साली मराठी साहित्य घेऊन एम. ए. झालो. तिथे मला साहित्याची अंधुकशी पायवाट दिसली. एम.ए. करताना प्रा.डॉ.माधव पोतदार, प्रा.चंद्रशेखर राजे, प्रा. मोहन आपटे, प्रा.सौ. स्मिता चिटणीस यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. पण कल्याण पूर्वेला जिथे राहात होतो, त्या गावात त्या काळी ‘मराठी साहित्य' हा शब्दही कुणाला नीटसा माहित नव्हता. मीच माझी साहित्यिक भूक भागवण्यासाठी सार्वजनिक वाचनालय-कल्याण, दादरचे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय येथे जाऊन बसत असे. आचार्य अत्रे विरुध्द पु.भा.भावे या वादाबद्दल स्वातंत्र्यपूर्व काळातील मराठी वृत्तपत्रे मी दादरच्या त्या ग्रंथालयात जाऊन वाचली. एम. ए. ला ‘पुलं'च्या साहित्यावर लिहिण्याची वेळ आली तेंव्हा बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली, वंगचित्रे, गुण गाईन आवडी, नस्ती उठाठेव, असा मी असामी, हसवणूक, खिल्ली, गोळाबेरीज अशी कैक पुस्तके अधाशासारखी वाचून काढली आणि एका वेगळ्याच विश्वात रमलो. सोबतीला ब.मो.पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती, शिवाजी सावंतलिखित मृत्युंजय, भाऊ पाध्येंची वासुनाका, आचार्य अत्रे यांचे कऱ्हेचे पाणी, व्ही शांताराम यांचे शांतारामा, श्री.कृ.कोल्हटकर, चिं.वि.जोशी, पु.भा.भावे, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, श्री. दा. पानवलकर, श्री.ना.पेंडसे, द.मा.मिरासदार, आनंद यादव, डॉ नरेंद्र जाधव, फ.मुं.शिंदे, उत्तम कांबळे, दया पवार, लक्ष्मण गायकवाड, शरणकुमार लिंबाळे, डॉ. किशोर शांताबाई काळे यांची व विविध साहित्यिकांची कित्येक पुस्तके वाचली. १९९५ साली नवी मुंबईचा रहिवासी झाल्यावर स्थानिक वर्तमानपत्रांसाठी विपुल लेखन केले. त्यामुळेच पुढे जाऊन दै. लोकसत्ता, दै. महाराष्ट्र टाइम्स, दै. सकाळ, दै. पुण्यनगरी, दै. गावकरी अशा वृत्तपत्रांच्या नवी मुंबई पुरवण्यांमधून मोठ्या प्रमाणावर लेख, वार्तापत्रे, बातम्या, मुलाखती यासाठी संधी मिळाली. ‘नवे शहर'मध्ये १९९९ साली सुरु झालेली ‘मुशाफिरी' ही लेखमाला आपण गेली पंचवीस वर्षे वाचत आहात, त्यातील विविध लेख ब्रेल लिपीत रुपांतरीत झाल्याने ते आता अंध मुले मुलीही वाचत आहेत, हा सारा आनंद शब्दापलिकडचा आहे.
पत्रकारिता आणि साहित्य हे एकमेकांच्या साथीने चालतात, चालायला हवेत. अनेक साहित्यिकांना, साहित्याची जाण असलेल्यांना मराठी वर्तमानपत्र विश्वात मानाचे व जबाबदारीचे संपादक पद बहाल करण्यात येत होते, येत असते. आचार्य अत्रे, ह.रा.महाजनी, नीळकंठ खाडिलकर, द्वारकानाथ कर्णिक, विद्याधर गोखले, गोविंद तळवळकर, माधव गडकरी, डॉ. अरुण टिकेकर, कुमार केतकर, उत्तम कांबळे, दिनकर गांगल, ज्ञानेश महाराव, भारतकुमार राऊत, महेश म्हात्रे हे व असे विविध संपादक सांगता येतील.. ज्यांच्यातील अनेकजण विविध पुस्तकांचे लेखक होते, आहेत; नाटककार होते, आहेत; कलावंत अभिनेते-चांगले वक्ते होते, आहेत. यांच्यापैकी अनेकांशी बोलण्याचा योग मला साहित्यप्रेमामुळे आला. दै. ‘सकाळ'चे तत्कालिन संपादक संजीव लाटकर यांनी माझ्या पुस्तकाला प्रस्तावना लिहून दिली. तर ज्ञानेश महाराव यांच्या हस्ते दादरच्या कमला मेहता अंधशाळेत ‘अनमोल जीवन' या ब्रेल लिपीतील माझ्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. साहित्य आणि पत्रकारिता हे हातात हात घालून चालतात असे मला वाटते व त्याच अनुषंगाने मी पत्रकारिता करीत राहिलो. ‘दोन ठार तीन जखमी किंवा रामभाऊंचा सत्कार व सखुबाईवर अत्याचार'छाप वार्तांमध्ये फार अडकून पडलो नाही. सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणप्रिय, सकारात्मक आशयाच्या बातम्या आणि त्या त्या क्षेत्रात सर्वस्व झोकून काम करणाऱ्या व्यक्तीमत्वांच्या कामगिरीचा वेध घेत राहिलो, पराकोटीचे काम करुनही ज्यांच्यावर प्रसिध्दीचे किरणही पडले नाहीत अशांच्या कामांची मुलाखतरुपात दखल घेत राहिलो....आणि मग याही कामाची दखल घेत विविध मंडळे, संस्था, परिषदा, वर्तमानपत्रे यांनी मला सन्मानित केले. हे सारे शक्य झाले साहित्य प्रेमामुळे, साहित्यावरील अविचल निष्ठेमुळे! त्या साहित्यात, विशेषकरुन संस्कृत साहित्यात अतुलनीय कामगिरी करुन अढळपदी बसलेल्या महाकवी कालिदास यांच्या नावे साजरा केल्या जाणाऱ्या ‘महाकवी कालिदास दिना' निमित्त आणि ‘आषाढ मासारंभा'निमित्त तमाम वाचकांना मनःपूर्वक शुभेच्छा!
-राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर