दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
बालगंधर्वांचे आधुनिक अवतार नकोतच
भारतानं १३ वर्षांनी वर्ल्ड कप जिंकला आणि त्या आनंदाचं उधाण शिगेला पोचलं असतानाच आधी विराट, पाठोपाठ रोहित आणि जडेजा यांच्या निवृत्तीची बातमी आली आणि समाधान आणि हळहळ अशा संमिश्र भावना रसिकांच्या मनात उफाळून आल्या. नकळत कुठेतरी त्या नटश्रेष्ठाची आठवण झाली. तो रंगमंचावरचा दर्जेदार अभिनय पाहायला मिळाला नाही ह्यासाठी हळहळ व्यक्त करायची की उतारवयाची पुटं अंगावर स्पष्ट दिसत असतांनाही सुरकुतल्या चेहेऱ्याच्या सुभद्रा, रेवती, शारदा ह्या अल्लड भूमिका पहाव्या लागल्या नाहीत याचं समाधान मानायचं हा संभ्रम आजही आमच्या पिढीला आहे.
अर्थात हा अनुभव आमच्या पिढीनं बाकी अनेक क्षेत्रात नको तितका घेतला आहे. अगदी क्रीडा क्षेत्राचं बोलायचं झालं तर पहिला वल्ड कप देशाला मिळवून देणारा कपिल देव हा खरच एकेकाळी भारतीय क्रीडा चाहत्यांचा देवच होता. पण ह्याच देवाला कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात विकेटचं त्रिशतक गाठताना लागलेली धाप आम्ही पाहिली. हा देव खरतर फास्ट बोलर म्हणून मैदान गाजवलेला. पण शेवटी शेवटी स्पिन बोलरपेक्षाही कमी रनअप घेऊन बोलिंग टाकताना आम्ही पाहिलं. एक एक विकेटसाठी अक्षराशः मेटाकुटीला आलेला हा देव मैदानावर पाहणं नकोसं वाटत असे.
तीच कथा दुसऱ्या आपल्या बॅट्समन देवाची. एकेकाळी एकतर्फी मॅच जिंकून देणारा हा छोटा मास्टर; पण कारकिर्दीच्या शेवटी शेवटी एकेका रनसाठी झगडताना सगळ्या चाहत्यांनी पाहिलं. कधी एकदा ते शंभरावं शतक होतंय आणि हे सगळं थांबतंय असं वाटायचं. वयामुळे हालचालींवर आलेलं नियंत्रण, वेगावर आलेलं नियंत्रण आणि त्यामुळे बॅटिंग झाल्यावर फिल्डिंगला न येता बदली सहकाऱ्याला मैदानात उतरवून स्वतः ड्रेसिंग रूममधून हा देव विश्रांती घेत मॅच बघत असलेला आम्ही अनेक वेळा टीव्हीवर पाहिला. फिल्डिंगला उतरायचा तेव्हा स्लिप वगैरे सारख्या मोक्याच्या जागी उभा न राहाता फार धावावं लागणार नाही अशा ठिकाणी उभा राहायचा. खरंखोटं माहीत नाही पण २०११ च्या वर्ल्ड कप नंतर थांबण्याच्या सूचना क्रिकेट बोर्डाकडुन आल्या होत्या, अशा कहाण्या तेव्हा समाजमाध्यमात फिरत होत्या.
कॅप्टनपद भूषवलेल्या आणि नंतर मॅच फिक्सिंगच्या आरोपात अडकलेल्या अझरुद्दीन तर मॅच फिक्सिंगचा खटला दहा बारा वर्षं चालून त्यातून बाहेर आल्यावरही म्हणाला होता, There is a lot of cricket yet to play. काय म्हणायचं ह्याला? कारकिर्दीत खेळाडू ते कॅप्टनपर्यंतचा प्रवास झाला, त्यानंतर दशकभराची वाढ वयात झालेली तरी अजून लॉट ऑफ क्रिकेट खेळायची हौस शिल्लक होतीच. अर्थात त्याची दखल बीसीसीआय घेणं शक्यच नव्हतं. हे फक्त क्रिकेटपुरतं मय्राादित नाही. टेनिसचं कोर्ट डबल्समध्ये गाजवणारा लिएंडर पेस. खरतर टेनिस हा खेळच ताकद, फिटनेसचा कस लावणारा. अनेक दिग्गज खेळाडू एकेरीत कारकीर्द गाजवून हालचालींवर थोड्याफार मर्यादा यायला लागल्या की डबल्सकडे वळतात; अगदीच निवृत्ती घ्यायची नाही म्हणून. सिंगल्सवरुन थोडा गियर कमी करून डबल्स खेळतात आणि निवृत्त होतात.
पेसनं कारकीर्दच सुरू केली ती डबल्समध्ये. पण तिथेही नंतर नंतर पहिलीच मॅच जिंकणं अशक्य झालं. विराट आणि रोहितच्या निर्वृतीला योग्य वेळी आणि पुढच्या पिढीला वाट मोकळी करून देणारा निर्णय असं सर्टिफिकेट देणारे गुगलीफेम राजकरणी स्वतःच्या वयाकडे पाहायला तयार नाहीत. राजकारणाच्या मैदानावर अशा निवृत्तीची गरज नाही ह्यावर ठाम श्रद्धा असावी. एका अर्थी खरंही आहे. राजकारणात कुठे अकराच खेळाडू असतात? त्यामुळे एक निवृत्त झाल्याशिवाय दुसरा आत येऊ शकत नाही अशी परिस्थिती नसतेच. मग निवृत्तीची गरजच काय? पंतप्रधान राहिलेले चन्द्रशेखर नंतर एकदा संसदेत म्हणाले होते, मै तो मेरे पार्टी का अकेला सांसद चुनकर आया हू. पार्टीप्रमाणेच स्वतःही नाकारलं जाण्याची भीती त्यांच्या मनात होती असेल का? रात्ररात्र गाजवून सुरांचा दरबार उभा करणाऱ्या भीमसेनजींच्या शेवटच्या शेवटच्या मैफली आठवा. चॉकलेट बॉय देवानंदचा शेवटीशेवटी बालगंधर्वच झाला होता की. हे सगळे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातले दिग्गज; उत्तम कारकीर्द घडवून स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलेले. त्यांच्याबद्दल आदर आहेच; पण त्यांना एकच गोष्ट जमली नाही; योग्य वेळ ओळखण्याची!
ती वेळ रोहित, विराट आणि जडेजा ह्या त्रयींनी ओळखली. वर्ल्ड कप जिंकणारा कॅप्टन ही पुण्याई रोहितला आणखी एक टी २० वल्ड कप खेळण्यासाठी पुरेशी होती. विराट अजून दोन तीन वर्ष सहज टी २० खेळू शकला असता. जडेजाही अजून फिट आहे. पुढच्या आयपीएल मध्ये हे तिघे दिसतीलही. पण आयपीएल ही पैशांची आरास आहे. तिथे हरले म्हणून देश हरला असं कोणी म्हणणार नाही. इथे प्रश्न आहे तो देशाच्या प्रतिष्ठेचा. आयपीएलच्या लिलावांना महत्व देवून देशाकडून न खेळणारा ख्रिस गेल देशवासीयांच्या टीकेचा धनी झाला होता.
..... आणि इथेच रोहित, विराट, जडेजा वेगळे ठरतात. मैदानावर बघून, नसता तर बरं झालं असतं, असं रसिक म्हणण्यापेक्षा स्टँडमध्ये बघून, असता तर बरं झालं असतं, असं प्रेक्षकांनी म्हणणं केव्हाही चांगलं आणि मानाचं आणि त्यासाठीच वर्ल्ड कप जिंकला तीच वेळ योग्य होती. - अमित पंडित