भारतीय संस्कृतीचा साज  : लोकसंगीत

लोकगीत आणि लोकसंगीतास भारतीय संस्कृतीचा साज म्हणून संबोधले जाते. लोकगीत आणि लोकसंगीतात प्रांतनिहाय विविध प्रकार आढळून येत असले तरी ते मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. यास अनुसरून लोकगीत प्रकार वंशपरंपरेने चालत आलेला दिसून येतो. जात्यावरची गाणी, भारुड, लावणी, अंगाई गीत, भोंडल्याची गाणी,वासुदेवाची गाणी, पोवाडे, होळी गीत, भलरी गाणी, गवळण असे विविध प्रकार पहावयास मिळतात.

लावणी :-
लावणी हा महाराष्ट्रातील लोककलेचा प्रकार आहे. लावणी या शब्दात लावण्य किंवा सुंदर हा शब्द दडलेला आहे. ”लवण” म्हणजे लावण्य यावरुन लावणी या शब्दाचा उगम झाला. असे दिसून येते. लावणीमध्ये श्रृंगार रस ओतप्रोत भरलेला असतो. यात ठसकेबाज अदाकारीदेखील पहावयास मिळते. संतांचे विचार घेऊन शाहिरांनी भक्तीरसासह अनेक विचारधारा घेऊन लावणी सादर केली जाते. साधारणपणे लावणीचे तीनप्रकार मोडतात १. गाण प्रधान लावणी २. नृत्य प्रधान लावणी ३. अदाकारी प्रधान लावणी. या वेगवेगळ्या लावणीचे सादरीकरण देखील वेगवेगळे असते. यात घुंगरु, ढोलकी याचा जास्तीत जास्त वापर केला जातो.

भारुड :-
भारुड हा संत साहित्यातील पद्य वाङमय प्रकार आहे. संतांनी भारुडाचा उपयोग करुन समाज प्रबोधन करण्याचे आणि समाज हितावह संदेश देण्याचे काम याद्वारे केले आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत एकनाथ महाराज यांनी भारुडाच्या रचना केल्या आहेत. भारुड याचा अर्थ धनगर असा घेतला जातो. भारुड बोलीभाषेत केले जात असून त्याचे तीन प्रकार आहेत. १. भजनी भारुड २. सोंगी भारुड ३. कूट भारुड. भजनी भारुड एखाद्या किर्तनाप्रमाणे असते तर कूटभारुडाचा अर्थ लावावा लागतो. अनेकदा दुहेरी अर्थ देखील त्यातून निघतो. लोक शिक्षणासाठी भारुडाची रचना करण्यात आली. विद्यमान स्थितीत महिला देखील भारुडाचे सादरीकरण करतांना दिसून येतात. यामध्ये गंगूबाई जाधव, चंदाताई तिवाडी यांचा समावेश आहे.

पोवाडा :-
पोवाडा हा गीत प्रकार अतिशय प्रख्यात आहे. पोवाडा वीर रसातील लोकगीताचा प्रकार आहे. पोवाडे गायनासाठी पहाडी आवाज अपेक्षीत आहे. हा गीत प्रकार ऐकल्यामुळे स्फुरण आल्यासारखे वाटते. भारतात साधारणपणे सतराव्या शतकात या गीतप्रकाराची उत्पत्ती झाल्याचा दाखला मिळतो. ऐतिहास घटनांची साक्ष देणारा हा गीतप्रकार अतिशय लोकप्रिय आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आदी शूरवीरांच्या पराक्रमांची गाथा यात समाविष्ट असते. आजही विशेष कार्यक्रमात पोवाडा सादरीकरण केले जाते.

भोंडल्याची गाणी :-
नवरात्रीच्या काळात भोंडल्याची गाणी सादर केली जातात. भोंडल्याची गाणी नित्य कामांविषयी, संसाराविषयी तसेच मजेशीरही असतात. पुर्वीच्या काळी महिलांना फारसे घराबाहेर पडता येत नव्हते किंवा आपल्या जीवाभावाच्या मैत्रिणींशी संवादही साधण्याची संधी मिळत नव्हती. या गीत प्रकाराच्या माध्यमातुन विविध रचना सादर करुन आपले मन मोकळे करण्याची संधी त्यांना मिळत असे.

वासुदेवाची गाणी :-
भल्यापहाटे प्रसन्न आणि मंगलमय वातावरणात साऱ्या जगाला उठवणारा वासुदेव सर्वांनाच आठवतो. डोक्यावर मोरपंखांची टोपी, पायघोळ अंगरखा, धोतर, खांद्यावर झोळी घेऊन फिरणारा वासुदेव आता फारसा पहावयास मिळत नाही. आजही खेडेगावात वासुदेव क्वचित प्रसंगी पहावयास मिळतात. पुर्वीच्या काळी वासुदेवांच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराज आपल्या छावणीतील सैनिकांना संदेश पाठवत असत. हेरगिरीसाठी सांकेतिक भाषेच्या माध्यमातुन संदेश वहन होत असे.

पोतराजाची गाणी :-
पोतराज हा महाराष्ट्राच्या कला प्रकारातील एक आहे. सद्यस्थितीत पोतराज म्हणजे चाबूकवाले एवढेच फक्त दिसून येते. पायात चाळ बांधून नाचणारे मरीआईचे भक्त एवढीच फक्त त्यांची ओळख राहिली आहे. देवीची गाणी गात ते दारोदारी जोगवा मागत फिरतात. त्यांचेबाबत फारशा नोंदी कुठे दिसत नाहीत. तरीदेखील अधूनमधून त्यांचे ग्रामीण भागात दर्शन घडते.

भलरी गाणी :-
भारत हा कृषी प्रधान देश आहे. या देशात शेती आणि अनुषंगिक उद्योग मोठ्या प्रमाणावर केले जातात. यामुळे शेतकऱ्यांचा आधुनिक शेतीकडे कितीही कल असला तरी देखील भलरी गाण्यांच आकर्षण मात्र निराळे असते. मराठी लोकगीतातील हा सुंदर असा आविष्कार आहे. शेतात राबतांना खूप कष्ट करावे लागतात. कामाचा थकवा जावा आणि नव्याने ऊर्जा मिळावी यासाठी अशा प्रकारे गाणी गायली जातात.

गोंधळाची गाणी :-
गोंधळ हा परिवारागणिक कुळधर्म कुळाचाराचा एक भाग मानला जातो. या कार्यक्रमादरम्यान देवीदेवतांना प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घालण्याचा कार्यक्रम केला जातो. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी भागात लग्नानंतर हा कार्यक्रम आवर्जून करतात. यासाठी तुणतुणे, संबळ, दिमडी अशा प्रकारची वाद्य वाजविली जातात.

गवळण :-
गवळण हा गीत प्रकार तमाशाचा एक भाग मानला जातो. त्याचबरोबर कोणत्याही भजनाच्या कार्यक्रमात अथवा भक्तिगीतांच्या कार्यक्रमात गवळण गायली जाते. गवळण सादर केल्याशिवाय कार्यक्रमाचे समापन न करण्याची प्रथा आहे. राधाकृष्णाच्या लिलांवर आधारीत हागीत प्रकार केवळ मनोरंजन नव्हे, तर त्यास अध्यात्माची जोड दिली जाते.

जात्यावरली गाणी :-
जात्यावरली गाणी सासर आणि माहेर यांना जोडणारा दुवा म्हणून संबोधले जाते. यात सासरचे, माहेरचे अनुभव तसेच विविध प्रकारच्या आठवणींचे वर्णन केलेले असते. तसेच ओवी हा प्रकार देखील समाविष्ट असतो. जाते फिरवतांना विशिष्ट ऊर्जा आवश्यक असते. त्यामुळे असे म्हणतात की, जात्यावर बसले की, ओवी आठवते.

लोकसंगीताचा विचार करता, या माध्यमातून अनेक सामाजिक आणि अध्यात्मिक विषय हाताळले जातात. यास अनुसरुन ‘मुंबई नगरीबडी बाका, जशी रावणाची दुसरी लंका' तसेच ‘या विठूचा गजर हरीनामाचा झेंडा रोविला' अशा प्रकारच्या गीतांनी लोकसंगीतावर अधिराज्य केले. त्याचबरोबर ‘घनश्याम सुंदरा, श्रीधरा अरुणोदय झाला' ही भूपाळी अतिशय लोकप्रिय झाली. ‘छबीदार सूरत, साजिरी दिसे गोजिरवाणी', ‘लटपट लटपट तूझं चालणं' या लावण्या घराघरात पोहचल्या. ‘माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली ‘फू बाई फू फुगडी फू' या गीतांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले.‘नदीच्या पल्याड बाई झाडी लई दाटं, तिथूनच जाई माझ्या माहेराची वाट' या लोकप्रिय गीतामुळे रचनाकार शाहिर वामन दादा कर्डक माहेरवाशीणींंच्या गळ्यातील ताईत बनले. शाहिर होनाजी बाळा, पठ्ठे बापूराव, शाहिर वि्ील उमप, प्रल्हाद शिंदे तसेच उत्तरेकडील पांडवानी गायिका तीजनबाई आदींनी लोकगीतांच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. त्याचबरोबर लोकसंगीताचा सुवर्णकाळ अधोरेखित केला. -सौ.चित्रा बाविस्कर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

बालगंधर्वांचे आधुनिक अवतार नकोतच