गुंतवणुकीचा मंत्र

वयाच्या २५-२६ व्या वर्षी काहीच उत्पन्न नसणारा सिद्धांत पुढील ४५ व्या वर्षीच सेवानिवृत्त होऊन महिन्याचे १ लाख रुपये उत्पन्न घेऊ लागला. ज्याचा उपभोग आजही त्याची पुढील पिढीदेखील घेत आहे. केवळ सुनियोजित गंतवणुकीच्या जोरावर हे कसे शवय झाले ते या लेखात जरुर वाचा.

नाशिकच्या नामांकित कॉलेजातून एम.कॉमचे शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी पुण्याला गेलेला सिद्धांत केळुस्कर तीन महिने पुण्यातील कंपन्यांचे इंटरव्ह्यू देत राहिला, तरी कुठेही सिलेक्शन त्याचे झाले नाही. सहा महिने उजाडून खूप ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन प्रत्येक ठिकाणी बायोडाटा घेऊन फिरूनही हवी तशी नोकरी आणि हवा तसा पगार न मिळाल्यामुळे सिद्धांत अस्वस्थ होता. पुण्यावरून पुन्हा नाशिकला यायचे म्हटले तर, वडिलांनी खर्चासाठी दिलेले सर्व पैसे संपले होते. पैसे नसल्यामुळे तो मित्रांकडून उधार घेऊन जेवण खावण करत कसे तरी दिवस पुढे ढकलत होता. एके दिवशी असाच नोकरीच्या टेन्शनने नैराश्यात अडकलेला सिद्धांत पायी जात असताना रस्त्याच्या बाजूला उभी असलेली पाववड्याची गाडी बघून भूक अनावर झाली म्हणून तेथे थांबला. तोच त्याला तिथे त्याचा जुना मित्र सुशांत योगायोगाने भेटला. सिद्धांतचे पैसे अर्थात त्यानेच दिले. तेथून सुशांत बरोबर परतताना समोरून येणाऱ्या एका माणसाचा सिद्धांतला धक्का लागला. नोकरीच्या शोधात असणाऱ्या सिद्धांतला राग अनावर झाला. त्यामुळे तिथे मारामारी झाली. हे सगळं सुशांतसाठी नवल होतं. तो जरा आवाकच झाला. आणि विचार करू लागला, अरे हा कॉलेजला असताना शांत असलेला सिद्धांत अचानक एवढा चिडचिडा कधीपासून झाला? तिथून थोडे पुढे येऊन दोघे एका नदी किनारी हवेशीर ठिकाणी बसले. व न राहून अखेर सुशांतने सिद्धांतला झालेल्या प्रकरणाबद्दल विचारणा केली. तेव्हा सिद्धांतने गेल्या तीन महिन्यांपासूनची सर्व हकीकत सांगितली.

सुशांत सिद्धांतच्या खूप जवळचा मित्र होता. तो आधीपासून बऱ्याच वर्षांपासून पुण्यात राहत असल्यामुळे त्याला पुण्याची सर्व माहिती होती. सुशांतने त्याला त्याच्याच कंपनीमध्ये काम करण्याची ऑफर दिली. सुशांत स्टॉक मार्केट ब्रोकिंग कंपनीमध्ये सब ब्रोकरचे काम करत होता. सुरुवातीला सिद्धांतने नकार दिला. पण काही दिवसांनी तो स्वतःच त्याच्या कंपनीत आला. सिद्धांतला शेअर बाजाराबद्दल शून्य नॉलेज होते. सुशांतने त्याला गुंतवणुकीचे एक एक मंत्र सांगण्यास सुरुवात केली. सुशांतला काही पुस्तके तसेच शेअर बाजारात निपुण असणाऱ्या दिग्गज वॉरेन बफेट, राकेश झुनझुनवाला, बिल गेट्‌स यांचे चरित्र वाचण्यास सांगितले. सिद्धांतला त्यातील रस आणखीनच वाटू लागला. त्याला त्यातील नवनवीन गोष्टी शिकण्याची तीव्र इच्छा जागृत झाली. म्हणून सिद्धांतने शेवटी सुशांतची कंपनी दहा हजार पगारावर जॉईन केली. सिद्धांतची नोकरी सकाळी ९ ते ४ सहा तासांची होती फक्त. पण दहा हजारात काही त्याचे खर्च भागत नव्हते. त्यामुळे सिद्धांतला वाटले यासोबत आणखी काहीतरी काम करायला हवे. म्हणून त्याने सुशांतच्या ओळखीने आणखी एक ठिकाणी मार्केटिंगची नोकरी शोधली. ती मार्केटिंगची नोकरी पार्ट टाईमध्ये संध्याकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत करू लागला. त्यातही त्याला दहा हजार पगार मिळू लागला. आता त्याचा महिन्याचा पगार वीस हजार मिळू लागला होता. प्रश्न होता आता पुढे काय? मग सुशांतने गुंतवणुकीचे धडे देत हळू हळू म्युच्युअल फंड बद्दलही त्याला सांगितले. सुशांतने सांगितले, तुला जर चांगले जीवन जगायचे असेल आणि कमी काळासाठी काम करायचे असेल तर तू १० हजार महिना SIP (Systematic Investment Plan) सुरू कर आणि दर महिना दहा हजार असे पुढचे १५ वर्षांसाठी भरत रहा. सिद्धांतला काही त्यामागचे कारण समजत नव्हते. अरे, आधीच आपल्याकडे काही पैसे नव्हते. इथून तिथून आता वीस हजार पगार मिळू लागला आहे, तर त्यात दहा हजार सुशांत आपल्याला SIP मध्ये गुंतवायला सांगतो आहे, पण त्याचा मला फायदा काय? त्याने होणार काय? असे एक ना एक बरेच प्रश्न सिद्धांतला भेडसावू लागले. तो विचार करू लागला, याबद्दल मी सुशांतला विचारू का? पण असे कसे विचारणार त्यानेच मला नोकरी मिळवून दिली आणि मी त्याला चुकीचं समजणं काही बरोबर नाही. आणि तसंही तो मला चुकीचं सांगून माझं नुकसान तर करणार नाही हे पक्कं. या मागे नक्की त्याचा काहीतरी चांगला हेतू असावा. असं मनाशीच बोलून सिद्धांतने सुशांतच्या सांगण्यावरून १० हजार महिना पहिला प्रीमियम भरला.

          थोड्या वेळाने सुशांत त्याचे कामे सर्व आटोपून सिद्धांत जवळ आला. आणि आता सिद्धांतने दहा हजार महिना प्रीमियम चालू केला त्याबद्दल सांगू लागला. हे बघ सिद्धांत, तू हे मी सांगितलं म्हणून दहा हजार महिना प्रीमियम चालू केला. पण हे कशासाठी? याचा तुला किंवा आपल्याला काय फायदा आहे हे तुला समजणं खूप गरजेचे आहे. तर ऐक. आपण बँकेत FD करतो दहा वर्षांसाठी, पाच वर्षांसाठी किंवा पंधरा वर्षांसाठी किंवा अजून कितीही. त्यात आपल्याला वर्षाचा ६ ते ७ टक्के दराने व्याजदर मिळतो. आणि आपले पैसे दुप्पट होतात. पण तेही तुला दहा वर्षांनी मिळणार. परंतु, इथे तसं नाही. तू आता दहा हजार महिना भरतोय, तर त्याचा व्याजदर वर्षाकाठी तुला १५ ते २० टक्के दराने मिळणार आहे. म्हणजे बघ बँकेपेक्षा डबल झाले की नाही? आता हा व्याजदर मिळतो कसा? शेअर बाजारात रोज हजारो कंपन्यांच्या शेअर्सची किंमत खाली वर होत असते. पण ती किंमत शेअर मार्केटच्या सेन्सेक्स वर अवलंबून असते. सेन्सेक्सची किंमत वाढली की इतर कंपन्यांच्या शेअर्सची किंमत वाढणार. सेन्सेक्स कमी झाला की शेअर्सची किंमत कमी होणार. पण या सगळ्यात आपण एकच लक्षात ठेवायचं यदाकदाचित सेन्सेक्सची किंमत कमी झाली तरी ती किंमत कधी ना कधी वाढणार आहेच. आणि जितकी कमी झाली तितकीच पुन्हा कधी ना कधी वाढणार आहे. आणि त्यावरच आपल्या पैश्यांची ही किंमत अवलंबून आहे. सेन्सेक्सची किंमत जसजशी वाढणार तसा तुमच्या खात्यातील पैश्यांवर मिळणारे व्याज वाढणार. यात जरी नुकसान झालेच तरी सेन्सेक्स पुन्हा वर गेल्यावर कव्हर होतेच. आणि आपण पुन्हा फायद्यात राहतो. आता तू दहा हजार महिना प्रीमियम भरतो आहे त्याला शेअर बाजारच्या सेन्सेक्सच्या हिशोबाने वर्षाकाठी १५ ते २० टक्क्यांचे व्याजदर मिळणार. आपण २० टक्के पकडुन चालू तरी तुझे महिना १० हजाराचे १५ वर्षांनी १ करोड रुपये तुझ्या खातात जमा होतील. तुझे १ करोड जमा झाल्यावर तू करायचं काय? की SWP (Systematic Withderawal Plan) पुढील १० वर्षांसाठी चालू करायचे. आणि हो, ज्या वेळेला तुझ्या खात्यात १ करोड रुपये जमा होतील त्याच वेळेस तुला दर महिन्याला ७५,००० रुपये फिक्स उत्पन्न चालू होईल. आता SWP चे खाते उघडल्यानंतर तू तुझी चालू असलेली SIP बंद करायची आणि जी तू १०,००० महिना SIP भरत होता तेवढेच पैसे SIP मधून SWP मध्ये ट्रान्स्फर करायचे. तू SIP मधून महिन्याला १०,००० रूपये काढत असला तरीही SIP मधून मिळणारे तुझे ७५,००० रूपये महिना उत्पन्न चालूच राहील आणि अधिकचे तुझे SWP चे महिन्याचे उत्पन्न सुद्धा चालू होईल. याचाच अर्थ तू मी सांगितल्या पद्धतीने पैशांचे व्यवस्थापन केलेस तर तुला फक्त पुढचे १५ वर्ष पैसे कमावण्यासाठी मेहनत करायची आहे. नंतर तू पुढे आयुष्यभर घरात बसून खाऊ शकशील इतके पैसे तुझ्याकडे असणार आहेत.

          सुशांतच्या बोलण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवून चालू केलेली दहा हजारची महिना SIP पुढील १५ वर्ष सिध्दांतने चालूच ठेवली.  हळू हळू त्याचा मार्केटिंग नोकरीचा पगारही वाढला आणि शिवाय सुशांतच्या कंपनीत काम करत होता तेथील पगारही वाढला. आता त्याला मार्केटिंग नोकरीचा पगार १५,००० आणि सुशांतच्या कंपनीतून १५,००० पगार मिळत होता. त्यातले १०,००० SIP मध्ये जात होते. म्हणजे हातात २०,००० येत होते. हळू हळू शेअर बाजाराचे ज्ञान सिद्धांतला अवगत होत होते. तो प्रगती करू लागला होता. पुढील २ वर्षांनंतर सिद्धांतने सुशांतची नोकरी आणि मार्केटिंग नोकरी सोडून फुल टाईम स्वतःचा शेअर बाजार गुंतवणुकीचा व्यवसाय सुरू केला. तो पुढे १० वर्ष केला. आणि तोपर्यंत त्याची १०,००० ची SWP देखील चालूच होती. आणि १० वर्ष चालू असलेली SWP बंद करून स्वतःच्या व्यवसायातूनही त्याने सेवानिवृत्ती घेतली. कारण SIP मधून महिना ७५,००० आणि काही SWP चे उत्पन्न असे महिना तब्बल १ लाखाचे उत्पन्न सिध्दांतला चालू झाले होते. त्यातच सिद्धांत, त्याची बायको आणि मुले असा संपूर्ण परिवार खूप खुश होता आणि आनंदात जीवन जगात होता. यासगळ्यात सुशांतची सिद्धांतला खूप मदत झाली. त्याबद्दल त्याने सुशांतचे आभारही मानले. म्हणजे वयाच्या २५-२६ व्या वर्षी काहीच उत्पन्न नसणारा सिद्धांत पुढील ४५ व्या वर्षीच सेवानिवृत्त होऊन महिन्याचे १ लाख रुपये उत्पन्न घेऊ लागला. ज्याचा उपभोग आजही त्याची पुढील पिढीदेखील घेत आहे. -  नयन धारणकर, एमबीए फायनान्स, नाशिक  

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा