जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा

ज्ञानी भक्त देहाने सगुणाची भक्ती राखतो.ती सोडून देत नाही. उपासना, नामस्मरण,  श्रवण-मनन-निदिध्यासन ही सर्व साधना तो सुरू ठेवतो. भगवंताचे उत्सव,यात्रा इ.उपक्रम घडवून आणतो. त्यात सहभागीही होतो. पण खरा परमात्मा ह्या सर्वांच्या पलिकडे आहे याची त्याला नित्य जाणीव असते.

मनी लोचनी श्रीहरी तोचि पाहे।
जनी जाणता भक्त होऊनि राहे।
गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा । श्रीराम ४७।

मनुष्यजन्माचे सार्थक करायचे असेल तर आत्मज्ञान करून घ्यावे. म्हणजे आपल्या मूळस्वरूपाचे अर्थात्‌ परमतत्त्वाचे ज्ञान करून घ्यावे. हे कसे करावे ते समर्थ मनाच्या श्लोकातून सांगत आहेत. इथून पुढे दहा श्लोकांमध्ये अशा आत्मज्ञानी पुरुषाचे वर्णन केले आहे. हा महापुरुष केवळ ज्ञानी नाही तर भगवंताचा निस्सीम शरणागत भक्तही आहे. ज्ञानी असूनही अहंकारी नाही तर परमशक्ती पुढे अत्यंत नतमस्तक आहे. ज्या लोकांना स्वतःचे कल्याण कशात आहे, ते कसे साधायचे हे कळत नाही त्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे या शुद्ध हेतूने हा सिद्ध पुरुष साधकाच्या भूमिकेत राहतो, वावरतो. समर्थांनी त्याला सर्वोत्तमाचा धन्य असादास म्हटले आहे. सर्वोत्तम म्हणजे सच्चिदानंद ईश्वर जो सर्व बाजूंनी, सर्व काळी, सर्व स्थळी, सर्व अवस्थांत, सर्व जीवांसाठी उत्तम आहे , त्याच्याहून श्रेष्ठ असे कधीही काहीही नव्हते, आताही नाही, पुढेही असणार नाही, असूच शकत नाही. अशा सर्वोत्तमाचा दास म्हणजे हा भक्त स्वतःसाठी जगत नाही. भगवंताची सेवा म्हणून तो लोककल्याणाचे कार्य करतो. त्याचे जीवन धन्य म्हटले आहे. कारण त्याने आपल्या मानवी जीवनाचे सार्थक करून घेतले आहे. भगवंताला जाणून घेतले आहे. स्वतःचे नित्यानंद स्वरूप ओळखून तो सर्व वासनांपासून, आसक्तीपासून, दुःखापासून, पर्यायाने जन्ममृत्यूच्या चक्रापासून मुक्त झाला आहे. संत-सद्‌गुरू असे सर्वोत्तमाचे धन्य दास असतात. जे आपल्यालाही त्याच मार्गावरून आपले बोट धरून, आपल्या चालीने घेऊन जातात. महान आत्मबोधाचे सानुले घास करून सद्‌गुरुमाऊली आपल्याला भरवते. आपल्याला पचेल, आपले यथायोग्य पोषण होईल अशापद्धतीने सद्‌गुरु आपल्याला बोधामृत पाजतात. स्वतःच्या वर्तनातून आपल्याला शिकवतात.

”आधी केले मग सांगितले” हे त्यांचे ब्रीद असते. ख-या सद्गुरूंच्या ठिकाणी ”क्रियेविण वाचाळता” हा दोष नसतो. म्हणूनच जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात,  ”बोले तैसाचाले त्यांची वंदावी पाऊले”. ज्याची बुद्धी देहाच्या पलीकडे जाऊन आत्मस्वरूपात स्थिर झाली आहे त्याला सदा, सर्वत्र भगवंताचा अनुभव येतो. बाहेर डोळ्यांना सारे जग हे जगन्नाथस्वरूप दिसते. त्यांना कुठेही भेद दिसत नाही. एकच अभेद परमात्मा दिसतो. झाडे- झुडपे, पशुपक्षी, दगड-माती,सोने-रत्ने, तसेच प्रत्येक जीवात परमेश्वर दिसतो. ज्ञनेश्वर माऊली म्हणते, ”जे जे भेटीजे भूत। तेते मानी भगवंत”. संत एकनाथ महाराजांना तहानलेल्या गाढवातला अंतस्थ परमात्मा दिसतो. संत नामदेवांना भुकेलेल्या कुत्र्याच्या अंतर्यामी वसणारा भगवंत दिसतो. आत्मज्ञानी पुरुष अखंड आत्मानुसंधानात मग्न असतो. भगवंताच्या निरंतरस्मरणाव्यतिरिक्त इतर कोणताही विचार त्याच्या मनात नसतो. जी परिस्थिती आहे ती भगवंताची इच्छा, जे कर्तव्य समोर उभे आहे ते भगवंताचे कार्य, त्याच्या प्रसन्नतेसाठीच ते करायचे आहे, ते करण्यासाठी लागणारी शक्ती-बुद्धी देणाराही तोच आहे, कर्ता करविता तोच आहे, हा त्याचा दृढ निश्चय झालेला असतो. त्यामुळे अंतर्बाह्य त्याला श्रीहरीचा अनुभव येत असतो. आत्मज्ञानी पुरुषाला ”मी ब्रह्मच आहे” याचा साक्षात्कार झालेला असतो. मात्र तो जगात वावरताना साधकाच्या भूमिकेत राहतो. निर्गुण हेच अंतिम सत्य हे जाणून सुद्धा तो सगुण भक्तीत रमतो. सगुण भक्तीचा प्रसारही करतो. कारण सर्वसामान्य लोकांना थेट निर्गुणाचे आकलन होणे शक्य नसते. सगुण-साकार भगवंताचे अधिष्ठान देऊन, त्याच्या उपासनेद्वारेच सामान्य मनुष्याला सद्‌गुुरू आत्मकल्याणापर्यंत घेऊन जातात. भक्ताला जरी निर्गुणाचे आकलन झाले नाही तरी ”मी फक्त भगवंताचा आहे, माझे आई-बाप-बंधू-मित्र-आप्त-सखा सर्व काही एक भगवंतच आहेत”, अशा अनन्य भावाने तो नित्य प्रसन्नतेने राहतो. समाधानात राहतो. यातच त्याचे कल्याण साधून जाते.

ज्ञानी भक्त देहाने सगुणाची भक्ती राखतो. ती सोडून देत नाही. उपासना, नामस्मरण, श्रवण- मनन-निधी ध्यासन ही सर्व साधना सुरू ठेवतो. भगवंताचे उत्सव, यात्रा इ. उपक्रम घडवून आणतो, त्यात सहभागी होतो. पण खरा परमात्मा या सर्वांच्या पलीकडे आहे याची त्याला नित्य जाणीव असते. दासबोधात समर्थ म्हणतात, ज्ञान विवेके मिथ्या जाले। परंतु अवघे नाही टाकिले। तरी मग भजनेची काय केले। सांग बापा। श्रीराम । (६-७-१८) ज्ञानविवेकाने जग मिथ्या आहे, सत्य नाही हे समजले. परंतु त्यामुळे भोजन, शयन इ. नित्यकर्म तर मनुष्य टाकीत नाही. मग भजनच तेवढे टाकावे असे का? तेही सुरूच ठेवावे. सिद्धपणाच्या अहंकारात साधन सोडले तर तो पुन्हा बद्धच समजावा. सिद्धाची प्रत्येककृती जाणतेपणाने केलेली, पूर्ण समजून उमजून, विचारपूर्वक केलेली, विवेकयुक्त कृती असते. आपल्या आचरणातून तो लोकांसमोर आपले विचार मांडतो. लोकांचे विचार घडवण्यासाठी, समाजाला सर्व प्रकारे उन्नत करण्यासाठी ज्ञानी पुरुषांचे जीवन समर्पित असते. म्हणूनच परोपकारी संत सद्गुरूंचे जीवन कृतार्थ असते. धन्य असते.। जय जय रघुवीर समर्थ। - सौ.आसावरी भोईर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

वर्षा सहलीचा आनंद लुटा पण ..