दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
दीर्घायुष्य, आनंदी जीवनाचे मंत्र सांगणारे...इकिगाई
माणसाचं जीवन हे सुख- दुःखांनी, संघर्षांनी भरलेलं असतं. आपलं जगणं चांगल व्हावं म्हणून जो तो प्रयत्न करीत असतो. केले जाणारे प्रयत्न योग्य दिशेने असतील तर आपलं आयुष्य तणावरहित व निरोगी जगता येतं व आपण दीर्घायुषी होतो. जगात दीर्घायुषी व निरोगी जीवन जगणारे जास्तीत जास्त लोक जपान देशात सापडतात. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी स्वीकारलेली जीवन पद्धती व त्यांना सापडलेला त्यांचा इकिगाई. इकिगाई तत्त्वज्ञान सांगणारं व दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य उलगडणारे पुस्तक म्हणजे ‘इकिगाई' हे होय.
‘इकिगाई' हे मूळ पुस्तक हेक्टर गार्सिया व फ्रान्सिस मिरेलस यांनी लिहिले असून त्याचा मराठी अनुवाद प्रसाद ढापरे यांनी साध्या, सोप्या भाषेत केलेला आहे. इकिगाई म्हणजे आपल्या जीवनाचा उद्देश्य. प्रत्येकाने आपला इकिगाई शोधला पाहिजे. ज्याला आपल्या जीवनाचा उद्देश्य म्हणजेच इकिगाई सापडतो, तो माणूस आपल्या आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती असली तरी ती पार करून आनंदी जीवन जगू शकतो. माणसाने तणावरहित आयुष्य कसं जगावं, प्रत्येकाने आपला इकिगाई का व कसा शोधावा याची माहिती या पुस्तकात वाचायला मिळते. लोगोथेरपी, मोरिता थेरपी यांची माहिती पुस्तकात असल्यामुळे लोकांना त्यांच्या जीवनाचा उद्देश्य समजायला मदत होते. त्यांना जगण्याची नवी उमेद मिळते व ते नव्या उत्साहाने समस्यांवर मात करू शकतात.
या पुस्तकात शतायुषी जगणा-या काही लोकांच्या मुलाखती आहेत. क्किगाँग या व्यायाम प्रकाराचे महत्त्वही यात सांगितले आहे. त्याचबरोबर चिंता आणि तणावाचा आरोग्यावर परिणाम न होऊ देता जीवनातील आव्हानांना कसं तोंड द्यावं? हेदेखील सांगितले आहे. एखादा पदार्थ आवडत असेल तर आपण पोट गच्च भरेपर्यंत खातो. हे असे खाणे का चांगले नाही, थोडं रिकामी पोट असणं कसं आपल्याला निरोगी ठेवतं, अशा अनेक गोष्टी जपानी लोकांच्या जेवणाच्या पद्धती सांगून पुस्तकात छान समजावून सांगितल्या आहेत.कायम कार्यरत रहा आणि कधीही निवृत्त होऊ नका, निवांत रहा, चांगला मित्र परिवार जोडा, धन्यवाद द्या, वर्तमानात जगा असे पुस्तकात दिलेले इकिगाईचे दहा नियम आपल्याला चांगलं मार्गदर्शन करतात. क्षणभंगुर, सतत बदलणाऱ्या अशा निसर्गामधील सौंदर्य शोधायची कला वाबी-साबी ही जपानी संकल्पना आपल्याला अपूर्णते मधूनही विकासाची संधी शोधायला मदत करते. इचीगो इचीड ही जपानी म्हण आपल्याला वर्तमानात जगायला आणि समोर येणारा प्रत्येक क्षण आनंदाने जगायला शिकवते. संजय पाटील यांनी पुस्तकाचं मुखपृष्ठ खूपच आकर्षक केलेलं आहे. बेस्ट सेलर ठरलेले हे पुस्तक निरोगी, दीर्घायुषी व आनंदी जीवनाचे रहस्य सांगणारे आहे हे मुखपृष्ठ व मलपृष्ठ वाचून लक्षात येते. सुंदर, गुलाबी रंगातली चेरी ब्लॉसमची फुलं आणि त्याच्या खाली दाखविलेले हिमाच्छादीत पर्वत आपल्या सुंदर, शांत व उत्तुंग आयुष्याचं प्रतिक वाटतात. तत्त्वज्ञान सांगणारे हे पुस्तक असूनही साध्या, सोप्या भाषेमुळे रटाळ होत नाही. विविध प्रकारचे व्यायाम सचित्र दाखविले आहेत. त्यामुळे ते समजण्यास मदत होते.
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात माणसं खूप कठीण परिस्थितीचा सामना करीत आहेत. मानसिक ताणतणाव, नैराश्य प्रत्येकाच ा वाट्याला येत आहे. अशा परिस्थितीत ‘इकिगाई' हे पुस्तक वाचून नक्कीच मनाला उभारी मिळू शकते. सतत काम करीत रहाणं, पौष्टीक.. पण मर्यादीत खाणं, हलका व्यायाम करणं व आपल्या इकिगाई सोबतआयुष्य आनंदान जगणं म्हणजे दीर्घायुषी व निरोगी आयुष्य होय. असं जगण्याचा कानमंत्र देणारं व Art of staying Young while growing Old असं सांगणार हे पुस्तक आनंदी जगण्यासाठी, जीवनात संघर्ष करण्यासाठी कायम प्रेरणा देत रहातं. तेव्हा हे पुस्तक प्रत्येकाने नक्की वाचायला हवं...
इकिगाई लेखक- हेक्टर गार्सिया, फ्रान्सिस मिरेलस अनुवाद प्रसाद ढापरे
प्रकाशक मायमिरर पब्लिशिंग हाऊस पाने- १८७ मूल्य- २८०रूपये - मंगल कातकर