सण-उत्सवांत प्रयोग नकोच!

होळीच्या दिवशी कचऱ्याची होळी करणे, टाकाऊ पदार्थापासून गुढी तयार करून उभारणे, महाशिवरात्रीला शिवपिंडीवर दूध न चढवता ते लोकांना वाटणे, टाकाऊ पदार्थांपासून गणेशमूर्ती साकारून तिचे पूजन करणे यासारखे प्रयोग केवळ हिंदूंच्या सणांमध्ये हिंदूच करत असतात. मुस्लिमांनी बकरी ईदच्या दिवशी मातीची प्रतीकात्मक बकरी करून तिची कुर्बानी दिल्याचे कधी ऐकले आहे का? ख्रिसमस ट्रीमुळे प्रदूषण होते हे ज्ञात असूनही कोण्या ख्रिस्ती व्यक्तीने ख्रिसमसला ख्रिसमस ट्री आणू नका असे आवाहन केले आहे का?

मानवी जीवनात शिस्त, नीती, नियम या गोष्टींना अनन्यसाधारण महत्व आहे. या गोष्टींचे ज्या ठिकाणी पालन होत नाही त्या ठिकाणी अनाचार माजतो. लहान वयात आपले आईवडील आपणा सर्वांनाच काय करावे, काय करू नये याचे धडे प्रसंगानुरूप पुन्हा पुन्हा देत असतात. प्रसंगी आपल्यावर रागावतात, चिडतात; मात्र चांगल्या सवयी आपल्या अंगवळणी पाडतात. या चांगल्या सवयीचे आणि संस्कारांचे महत्व मोठे झाल्यावर आपल्याला कळते. शिस्त आणि नियम जसे वैयक्तिक जीवनात असतात तसे ते सामाजिक आणि व्यावहारिक जीवनातही असतात. त्यांचेही पालन आपण करत असतो. जशी वाहने नेहमी डाव्या बाजूने चालवावीत, सिग्नल लागल्यावर वाहन थांबवावे, तिकीट काढताना, कोणतेही अर्ज घेताना आणि जमा करताना, बँकेत पैसे भरताना आणि काढताना ज्या ज्या ठिकाणी रांग लावण्याचा नियम आहे त्या ठिकाणी आपण ती शिस्त आणि नियम पाळतो. प्रवास करताना आपण स्वतःहून तिकीट काढतो. पास, पीयूसी, इन्शुरन्स, परवाने यांची मुदत संपली असेल तर ते स्वतःहून रिन्यू करून घेतो. अर्थात हे सर्व नियम नाही पाळले तर काही ठिकाणी दंडाची व्यवस्था करण्यात आलेली असते. याशिवाय इतरांची बोलणी खावी लागतात ती वेगळी. हे सर्व नियम आणि शिस्त पाळण्याबाबत आपली काहीच तक्रार नसते.

शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश घालणे बंधनकारक असते तसे काही शासकीय सेवांमध्ये आणि कार्यालयांमध्ये तर काही खासगी आस्थापनांमध्येसुद्धा कर्मचाऱ्यांना ठरवून दिलेले गणवेश घालणे बंधनकारक असते. हे गणवेषच त्यांची ओळख असते. पोस्टमन, पोलीस, डॉक्टर, वकील, न्यायाधीश, सैनिक यांना आपण त्यांच्या गणवेशावरूनच तर ओळखतो. कर्मचारी मग तो किंवा ती सरकारी सेवेत असो किंवा खासगी क्षेत्रात, ठरवून दिलेले गणवेश घालणे, कामाच्या ठरवून दिलेल्या वेळा पाळणे यामध्ये कोणालाही काहीही तक्रार नसते. व्यवहारिक जीवनात वावरताना आपण प्रत्येक नियम आणि त्यामागील शिस्त यांचे तंतोतंत पालन करत असतो. घरचा टीव्ही बिघडला की टीव्ही दुरुस्त करणाऱ्याकडे जातो, आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जातो, कोणाविरुद्ध तक्रार दाखल करायची असल्यास पोलिसांकडे जातो, न्याय मागण्यासाठी वकिलांची मदत घेतो, मुलांना शिकण्यासाठी शाळेत घालतो. घर बांधण्यासाठी गवंड्याला बोलावतो, फर्निचरचे काम असेल तर सुताराला बोलावतो, साधी चप्पल फाटली असेल तरी आपण ती स्वतः शिवत नाही. थोडक्यात व्यावहारिक जीवनात ज्या ज्या ठिकाणी आपल्याला अडचण किंवा समस्या उद्भवते त्या त्या वेळी आपण त्या क्षेत्रातील तज्ज्ञाकडे जातो आणि ती समस्या सोडवतो. मी कायद्यांचा अभ्यास केला आहे म्हणून माझी केस मी लढू शकत नाही, शस्त्रक्रियेवरील पुस्तके वाचली म्हणून मी कोणाची शस्त्रक्रिया करू शकत नाही या गोष्टी कोणाला सांगाव्या लागत नाहीत. कारण त्या प्रत्येकालाच कळतात.

ज्या ठिकाणी अध्यात्म अथवा धर्मशास्त्र येते त्या ठिकाणी मात्र आम्ही हिंदू मंडळी मलाच जास्त कळते, मी म्हणेल तेच खरे म्हणू लागतो. कामाच्या ठिकाणी पाळल्या जाणाऱ्या वस्त्रसंहितेबाबत आपण कधी तक्रार करत नाही; मात्र राज्यातील काही मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करताच आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आणि आपण त्याविरोधात पेटून उठलो. देवाच्या दारात भेदभाव कसला ? देव मन पाहतो, वस्त्र नाही यासारखे ज्ञान त्यावेळी आपल्यातीलच काही मंडळी पाजळु लागली होती. मंदिरातील वस्त्रसंहिता म्हणजे दडपशाही, अन्याय्य आणि सामान्य भक्तांच्या अधिकारावर गदा आणणारी असल्याचा आटापिटा काही मंडळींकडून त्यावेळी केला गेला. मंदिरात जाताना सोवळे नेसण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे, काही मंदिरांच्या गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेश नाही तर काही मंदिरांत पुरुषांना प्रवेश वर्ज्य आहे. अर्थात हे सर्व नियम आपल्या ऋषी-मुनींनी, अध्यात्मातील जाणकारांनी आपल्या हितासाठीच केले असल्याने त्याचे पालन करायचे सोडून व्हाट्‌सएपच्या पोस्ट वाचून आपण ज्ञान पाजळणे योग्य नाही. मंदिर अधिग्रहण कायद्याच्या अंतर्गत सरकारने अनेक प्राचीन मंदिरे ताब्यात घेऊन त्यांची पर्यटन केंद्रे केली. आजूबाजूचा परिसर सुशोभित केला. परिणामी अशा पवित्र ठिकाणी पर्यटक दर्शनासाठी नव्हे तर मौजमजेसाठी येऊ लागले. तोकड्या कपड्यांनिशी मंदिरात जाऊ लागली. ज्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर परिणाम होऊ लागला, मंदिर परिसराचे पावित्र्य कमी होऊ लागले. यासाठीच मंदिरांना वस्त्रसंहिता लागू करणे भाग पडले.

हल्लीच वटपौर्णिमा सण सर्वत्र उत्साहात साजरा झाला. सौभाग्याच्या रक्षणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी स्त्रिया व्रतस्थ राहून हा सण साजरा करतात. वडाचे पूजन करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. या व्रतामागील सत्यवान सावित्रीची कथा सर्वांनाच ठाऊक आहे.  मात्र इथेही हिंदूनी आपली बुद्धी चालवलीच. बुलढाण्यातील दत्तपूर गावात  या दिवशी सुवासिनींनी अन्य सुवासिनींसोबत तेथील विधवा महिलांनाही कुंकू लावले. विधवा महिलांनीही यावेळी वडपूजन करून वडाला प्रदक्षिणा घातल्या. वटपौर्णिमेचे व्रत हे पतीच्या दीर्घायुष्यासाठी आहे हे या महिलांना ठाऊक नाही का ?  काहीतरी वेगळे करायचे आणि प्रसिद्धी मिळवायची, मग त्यामध्ये धर्मशास्त्र पायदळी तुडवले गेले तरी चालेल ही हिंदूंची वृत्ती इथेही दिसून आली.

पिंपरीतील पिंगळे गुरव या ठिकाणी सुवासिनी स्त्रिया करतात तसे विवाहित पुरुषांनीही वडाचे पूजन करून आणि वडाच्या भोवती प्रदक्षिणा घालून वटपौर्णिमा साजरी केली. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी महाराष्ट्रात ज्याप्रमाणे वटपौर्णिमा साजरी केली जाते त्याप्रमाणे उत्तर भारतात करवा चौथ साजरा केला जातो. यंदाच्या करवा चौथच्या दिवशी एका कुमारिकेने आपल्या प्रियकरासाठी व्रत केले आणि त्याला  व्हिडीओ कॉल करून त्याचे पूजन केले. धर्मशास्त्र विसंगत असे काही विचित्र प्रयोग केले तर लगेचच प्रसिद्धी मिळते, यांचे व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होतात, लोकांकडून ते फॉरवर्ड केले जातात. नास्तिक आणि पुरोगामी मंडळी यांचे कौतुक करते, यांना क्रांतिकारकांची उपमा देते. मात्र असले प्रयोग करून कोणताही अध्यात्मिक लाभ न होता हानी मात्र होते हे या महाभागांना कोण समजावणार ? होळीच्या दिवशी कचऱ्याची होळी करणे, टाकाऊ पदार्थापासून गुढी तयार करून उभारणे, महाशिवरात्रीला शिवपिंडीवर दूध न चढवता ते लोकांना वाटणे, टाकाऊ पदार्थांपासून गणेशमूर्ती साकारून तिचे पूजन करणे यासारखे प्रयोग केवळ हिंदूंच्या सणांमध्ये हिंदूच करत असतात. मुस्लिमांनी बकरी ईदच्या दिवशी मातीची प्रतीकात्मक बकरी करून तिची कुर्बानी दिल्याचे कधी ऐकले आहे का? ख्रिसमस ट्रीमुळे प्रदूषण होते हे ज्ञात असूनही कोण्या ख्रिस्ती व्यक्तीने ख्रिसमसला ख्रिसमस ट्री आणू नका असे आवाहन केले आहे का? मग हिंदूच आपली बुद्धी का चालवतात ?

प्रत्येक सणामागील शास्त्र काय आहे आणि तो कसा साजरा करावा याबाबतचा सखोल अभ्यास आणि लेखन अध्यात्मातील अधिकारी वर्गाने म्हणजेच आपल्या ऋषी-मुनींनी हजारो वर्षांपूर्वी केले आहे. त्यामुळे ते तसे साजरे केल्यानेच आपणाला लाभ होणार आहे. आरंभी उल्लेख केल्याप्रमाणे व्यवहारिक जीवनात आपण त्या त्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींचा सल्ला घेतो; मग धार्मिक बाबतीत बुद्धीचा वापर का करतो? आपल्या अशा प्रयोगाने येणाऱ्या पिढीमध्ये संभ्रम निर्माण होऊन अध्यात्माविषयी आणि आपल्या धर्मशास्त्राविषयी त्यांचा विश्वास डळमळीत होणार नाही का? पाश्च्यात्य देशांमध्ये विज्ञानाने दिलेली सुखाची साधने मुबलक प्रमाणात असली तरी सर्वत्र अनैतिकता बोकाळली आहे, कुटुंबव्यवस्था नष्ट होऊ लागली आहे, मानव निराशेत आणि ताणामध्ये जगत आहे. अशा परिस्थितीत स्वतःचा आणि समाजाचा उद्धार करण्यास शिकवणारी प्राचीन भारतीय संस्कृती, ग्रंथसंपदा आपल्याला आपल्या पुण्याईने लाभली आहे, तिचा लाभ घेऊया. नको तिथे बुद्धीचा वापर करणे टाळूया ! -जगन घाणेकर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

दीर्घायुष्य, आनंदी जीवनाचे मंत्र सांगणारे...इकिगाई