मुशाफिरी

पंचवीस, पच्चीस, ट्‌वेन्टी फाईव्ह या शब्दांना कायम महत्व असते. एखादा सिनेमा एखाद्या चित्रपटगृहात पंचवीस आठवडे चालला तर त्याला ‘सिल्व्हर ज्युबिली' म्हणण्याचा प्रघात आहे. आपण मराठीत त्याला ‘रौप्य महोत्सव' म्हणतो. पंचवीस वर्षे वा त्याहुन अधिक काळ एखाद्या क्षेत्रात किंवा एकाच वेळी विविध क्षेत्रांत मन लावून काम करीत राहणे व त्या कामाला इतरेजनांची दाद मिळत राहणे यासारखे सुख नाही.

दिवस रविवार. तारीख २३ जून २०२४. ठिकाण रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील घराडी गावाकडे जाणारी चढण. वेळ दुपारी बारा नंतरची आणि पावसाचीही. रस्ता पूर्णतः निर्मनुष्य. दूर दूर पर्यंत कुठे दुकान, गॅरेज, पेट्रोल पम्प यांचा मागमूस नसलेला मार्ग. गाडीत मी, पत्नी, धाकटी बहीण. तेवढ्यात आम्हाला एका छत्रीत दोघेजण जाताना दिसतात. गाडी थांबवल्यावर लक्षात येते की यातील एकजण अंध आहे म्हणून. ‘चला'..  म्हणून मी त्यांना सोबत घेतो. दुसऱ्या मुलाला मागील गाडीत घ्यायला लावतो. ‘रेशन दुकानाकडे जाण्याच्या वळणावर मला उतरवा, तिथून समोरच माझे घर आहे मी जाईन' असे ते गृहस्थ सांगतात. त्यांना गाडीत बसवल्यापासून साधारण चार मिनिटांचा तरी प्रवास होतो. त्यानंतर ‘गाडी थांबवा. आता मला इथे उतरवा. माझं घर इथेच आहे.' ते गृहस्थ मला सांगतात आणि गाडीतील आम्ही सारे चाट पडतो. त्यांना हे विचारतोही की ‘ तुम्हाला काहीच दिसत नसतानाही हे तुम्ही नेमकं कसं सांगितलंत ते!' तर ते म्हणतात, ‘कुणी आम्हाला गाडीमध्ये घेतलं की गाडीने किती वेळा, कशी वळणे घेतली, किती वेळ लागला हे गणित आमच्या डोक्यात पक्क बसलेलं असतं. त्यावरुन लक्षात येतं.'

   अशा प्रकारचा अनुभव किती जणांनी घेतला असेल मला माहित नाही. पण माझ्या बाबतीत हे दुसऱ्यांदा घडत होतं. काही वर्षांपूर्वी असाच मी याच ठिकाणी गेलो होतो. तेथील मुला-मुलींशी बाईंच्या सांगण्यानुसार काहीही न बोलता हस्तांदोलन करत होतो. बोललो असतो तर मी कोण हे त्यांनी आवाजावरुन ओळखले असते. ती मुलेही अंदाजे हात पुढे करत होती. तेवढ्यात बाई म्हणाल्या, ‘ओळखा बरं कोण आलंय आपल्याकडे आज? तेवढ्यात एक मुलगी म्हणाली, ‘घरत सर.' आता चकित होण्याची माझी पाळी होती. त्या मुलीने केवळ स्पर्शाने मला ओळखलं होतं. या लेखाच्या नियमित वाचकांनी हे ओळखले असेलच की ते ठिकाण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुवयामधील घराडी या खेड्यातील यश स्नेहा ट्रस्ट संचालित स्नेह ज्योती अंध शाळा होय. २३ जून रोजी या शाळेत दापोली येथील लेखक, गीतकार, संगीतकार श्री. इकबाल शर्फ मुकादम यांच्या हस्ते माझ्या ‘गणपती, गीते आणि गानरसिक' व ‘शिकण्याचं वय' या ब्रेल लिपीतील चोविसाव्या व पंचविसाव्या तसेच सौ. चित्रा बाविस्कर यांच्या ‘भारतीय सण' आणि ‘राष्ट्रीय सण' या सतराव्या आणि अठराव्या पुस्तकांचे प्रकाशन झाले. २००८ पासून ‘माय जगो आणि मावशीही' या पहिल्या ब्रेल पुस्तकाने सुरु झालेला प्रवास पंचवीस पुस्तकांपर्यंत येऊन कसा पोहचला ते माझे मलाच कळले नाही. या सर्व कालावधीत मी किमान पस्तीस-चाळीसहुन अधिक वेळा स्नेह ज्योती अंधशाळेत गेलो असेन. या काळात या शाळेत आलेली व येथून शिकून पुढे गेलेली किमान तीनशे-साडेतीनशे मुले मी पाहिली आहेत. यातील आशिका शेडगे ही मुलगी विशेष मुलांच्या गायन स्पर्धेत राज्यस्तरावरील पारितोषिक विजेती ठरली होती. ती ‘सचिन अ मिलियन ड्रीम' या ‘भारतरत्न' सचिन तेंडुलकर याच्यावर बनवण्यात आलेल्या चित्रपटातही काही वेळ दिसली होती.

   मी स्नेहज्योती अंध शाळेत  जायला सुरुवात केली त्या सुमारास पुस्तक प्रकाशन, वाढदिवस, वर्धापन दिन, विवाहांचे वाढदिवस असे कार्यक्रम तिथे गेटजवळील पटांगणात केले जात असत. २०१४ साली तिथे मागील बाजूस एक चांगले सभागृह बांधले गेले. ‘नयनबिंदु सभागृह' म्हणून त्या वास्तूचे उद्‌घाटन ‘भारतरत्न' सचिन तेंडुलकर याच्याच हस्ते पार पडले होते. यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी खऱ्या अर्थाने ‘व्यासपीठ' मिळाले. आता त्या बंदिस्त सभागृहात कार्यक्रम करण्याची पाहण्याची मजाच काही और. कारण या दृष्टीहीन मुलामुलींचा एक ऑर्केस्ट्राही आहे. तेथे होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या प्रारंभी एकाहुन एक सरस गाणी (कराओके वर नव्हे, तर) संगीत शिक्षक आणि याच मुलांमधीलच प्रशिक्षित वादकांनी वाजवलेल्या सुरावटींच्या साक्षीने सादर केली जात असतात. माझ्या संपर्कात आलेल्या अनेकांना मी सांगत असतो की स्वतःचा, पत्नीचा, मुलाचा, विवाहाचा, संस्थेचा वाढदिवस कुठेतरी महागड्या हॉटेलात, फार्म हाऊसवर, रिसॉर्टवर, वलबमध्ये वगैरे साजरा करताना वारेमाप पैसे उधळण्याऐवजी या शाळेत जा. त्या मुलांसोबत वाढदिवस साजरा करा. त्यांना एकवेळचं जेवण द्या. माझेच ऐकून असे नव्हे, पण अलिकडे लोकांमध्ये बऱ्यापैकी समंजसपणा आलेला दिसतोय. कारण या शाळेला जवळचे असणारे तालुके म्हणजे महाड, चिपळूण, खेड, दापोली, श्रीवर्धन हे असून तेथून अनेकजणांचा ओढा अशा कार्यक्रमांनिमित्त स्नेह ज्योती अंधशाळेकडे वाढला आहे, हेही नसे थोडके ! मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे येथपासून घराडीची ही शाळा बऱ्याच अंतरावर आहे. तिथे जाण्यासाठी रेल्वे उपयोगाची नाही. तिथे एसटी सुध्दा बऱ्याच कमी जातात. ओला, उबेर, मेरु वाले तिथपर्यंत येणार नाहीत. म्हणजे एकतर स्वतःची गाडी तरी हवी किंवा भाड्याने तरी गाडी घ्यायला हवी; तरच तेथवर पोहचता येणार. माझ्यापुरते बोलायचे झाल्यास माझ्यासोबत आजवर माहिती आणि जनसंपर्क संचालक श्री. देवेंद्र भुजबळ, पेण येथील उद्योजक बजरंग पाटील, सुभाष पाटील, जुहुगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय भोईर, शीतल भोईर, सानपाडा येथील ॲड. योगेश मोरे, खारघरचे डॉ. सुदर्शन रणपिसे, कवी अशोक गुप्ते, अभिनेता अशोक पालवे, साहित्यिक अशोक लोटणकर, शिक्षण तज्ञ सुभाष लोटलीकर, नवी मुंबई हायस्कूलच्या शिक्षिका सौ. प्राजक्ता लोटलीकर, प्राध्यापक आणि इंजिनियर दिनेश औटी, स्तंभलेखिका सौ. आसावरी भोईर, सेवानिवृत्त सहनिबंधक राहुल भास्कर, दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शंकर सखाराम यांच्या पत्नी श्रीमती अंजली पाटील, कराओके गायक शरद ननावरे या व यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी या शाळेला भेट दिली आहे, यथोचित मदतही केली आहे. ज्यावेळी यातील अनेकांना इच्छा असून तेथे जाणे न जमल्यास त्यांनी त्यांच्या भेटवस्तू, कपडे, मुलांसाठी खाऊ तेथे नेण्यासाठी माझ्याकडे सोपवला आहे.

   २०१३ साली माझ्या वडीलांचे तर २०१४ साली माझ्या मातोश्रीचे निधन झाल्यावर २०१५ साली वर्षश्राध्दानिमित्त कोणतेही कर्मकांड न करता मी व माझ्या बहिणी व अन्य नातेवाईक या शाळेत पोहचलो व त्या मुलांना अन्नदान केले. आई व वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्या शाळेच्या आवारात आंबा व फणसाची झाडे लावली, जी आता चांगली मोठी होऊन तेथील मुलांना सावली व फळेही देत आहेत. अनेकजण खवचटपणे मला विचारतात, ‘काय रे आंधळ्यांसाठी पुस्तके काढून तुला काय बरे मिळतं? घराडी मंडणगडची एक फेरी एवढ्या लोकांना घेऊन करणं म्हणजे आख्खा दिवस जाणार आणि साताठ हजार रुपये सहज वाया जाणार! नुसता खर्चाचा व्याप, दुसरं काय!'  माझं यावर उत्तर असतं...‘अरे विद्वानांनो, तुम्ही मराठीत लिहिलेलं वाचायला कुणी नसतं. तिथं माझं हे ब्रेल लिखाण नजर नसलेली मुलं वाचू शकतात, यासारखा दुसरा आनंद कोणता? पण तुम्हाला ते सांगून उपयोगाचे नाही; कारण गाढवापुढे वाचली गीता!' बऱ्याचदा  ‘याच्या नात्यात कुणीतरी आंधळं असलं पाहिजे म्हणून याला आंधळ्यांचा एवढा पुळका' असाही विचार करणारे अनेकजण भेटतात. खरेतर  माझ्या दूरदूरच्या नात्यातही  एकही व्यक्ती अंध नाही. पण म्हणून नियतीने असा अघोरी अन्याय केलेल्या लहानग्यांबाबत आपण असंवेदनशील कसे बरे असू शकतो? एखादा हात, पाय, कान, बोट नसणं, टी बी, कॅन्सर, हृदयविकार, किडनीविकार यांनी बाधित असणं वेगळं...कारण तरीही आयुष्य बऱ्यापैकी जगता येऊ शकतं... आणि सारे अवयव धड असूनही स्वतःचं शरीरही आणि सारं जगच पाहता न येणं वेगळं. कारण बऱ्याच अंशी त्यामुळे परावलंबित्व वाढतं. म्हणून अंधांप्रति अधिक कणव, आस्था, सहानुभूती, संवेदनशीलता हवी!

   १९९५ साली पत्रकारितेत प्रवेश केल्यानंतर  यंदा त्याला एकोणतीस वर्ष झाली, १९९९ साली ‘मुशाफिरी' ही लेखमाला सुरु झाल्याला यंदाच पंचवीस वर्षे झाली..आणि आता अंध व्यवतींसाठी ब्रेल लिपीत माझ्या निघालेल्या पुस्तकांची संख्या पंचवीस झाली. खऱ्या अर्थाने ‘रौप्य महोत्सव अर्थात सिल्व्हर ज्युबिली' साजरी होत आहे. आणखी दोन ब्रेल पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. या साऱ्या प्रवासात प्रसार माध्यमकर्मींचे मौलिक सहकार्य लाभले, त्यामुळे असेही काम करता येऊ शकते हे सर्वदूरच्या  वाचकांना समजू शकले. माझ्या अनेक पुस्तकांची कल्पक मुखपृष्ठे घणसोली येथील अक्षरश्रीमंत श्री. विलास समेळ यांनी बनवली; यावेळच्या दोन पुस्तकांची अर्थपूर्ण मुखपृष्ठे खारघर-बेलपाडा येथील मूलनिवासी (सध्या मुक्काम ठाणे) असलेल्या सुलेखनकार श्री. हेमंत घरत यांनी कमीत कमी वेळेत बनवून दिली. आजवरच्या या सर्व वाटचालीत व पुढील प्रवासातही बहुमूल्य योगदान देणाऱ्या प्रत्येकाच्या  ऋणातच रहायला मला आवडेल. सर्वांना दमदार पावसाच्या रौप्य महोत्सवी शुभेच्छा!  

-राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

सण-उत्सवांत प्रयोग नकोच!