दोन टक्के वाचक

संदीप सरदेसाई आपल्या  खुर्चीत येऊन बसला, तोच त्याच्या टेबलावरचा फोन वाजला, संपादक कुलकर्णी त्याला आत बोलावत होते. संदीप संपादकांच्या केबिनमध्ये आला.
‘बस, संदीप, तुला मुद्दाम बोलावलंय मी.
‘बोला सर'
‘संदीप, काल आपल्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये एक विकलांग माणूस आपली म्हणजे अपंगासाठी असते ना, ती स्कूटर पार्क करू पहात होता, त्यावेळी एक श्रीमंत बापाचा मुलगा त्याला गाडी लावू देत नव्हता,तो विकलांग माणूस रडकुंडीला आला, नशीब त्याचे मी तेवढ्यात तेथे आलो, मी त्या श्रीमंत पोराला सुनावले आणि या देशातील दिव्यांगांसंबधी नियम त्याला सांगितले आणि त्या दिव्यांगाला पार्किंग करू दिलं. मी तुला मुद्दाम बोलावलं संदीप, आपल्या पेपरमध्ये आठवड्यातून एक दिवस आपल्या पेपरमधील एक पान दिव्यांगांसाठी ठेवायचं. यात दिव्यांगांचे अधिकार, सरकारी नियम, त्यांच्यासाठी असलेल्या सोयी, आपल्या शहरातील आणि आपल्या राज्यातील त्यांच्यावर उपचार करणारी हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, परदेशात असलेल्या सोयी, परदेशातील उपचार आणि अजून बऱ्याच गोष्टी. याची जबाबदारी तू घ्यावीस संदीप अशी माझी इच्छा आहे. मी आपल्या मालकांशी बोलतो याबद्दल, पण मी म्हटल्यावर ते नाही म्हणणार नाहीत. शेवटी इतक्या वर्षाचा अनुभव आहे माझा हे त्यांना माहित आहे.'

संदीपला अशा जबाबदाऱ्या आवडत असत म्हणजे जबाबदाऱ्या स्वीकारण्याची त्याची वृत्ती होती. त्याने संपादक कुलकर्णीना म्हंटले ‘हो सर, ही फारच चांगली कल्पना आहे. मला वाटते दिव्यांगांसाठी आठवड्यातून एकदा का होईना पण एक पान वापरणारे कदाचित आपण पहिलेच असू'.

‘होय संदीप, ती खरेच मोठी गरज आहे. परदेशात disability लोकांसाठी खास सोयी असतांत, त्याच्यासाठी चांगले नियम आहेत, त्याचेंकरिता वेगळे फुटपाथ असतांत, रेल्वे, विमानात सीट्‌स राखून ठेवलेल्या असतात, भारतात पण तसे नियम आहेत; पण पाळतो कोण? आपल्याकडे नियम मोडायची शर्यत असते. असो, आपण आपल्यापरीने काम करायचे. आपल्या वाचकांपर्यत जरी हें पोहोचले तरी खुप झाले, कोण जाणे आपले पाहून इतर पेपरवाले पण दिव्यांगांसाठी एखादे पान ठेवतील'.

    संदीप आपल्या टेबलावर आला आणि विचार करू लागला, छान आणि आवडीचे काम आहे, जोरात कामाला लागायला हवे. त्याने गुगल सुरु केलं आणि दिव्यांगांबद्दल वाचू लागला. त्याच्या लक्षात आले, जवळपास २१ प्रकारची दिव्यांगे आहेत. त्यातील काही आपल्या आजूबाजूला असतांत काही ववचित दिसतात. दुसऱ्या दिवशीच्या त्यांच्या पेपरमध्ये बातमी आली ‘आता दर शनिवारी वाचा संदीप सरदेसाई यांचा दिव्यांगावर खास लेख'.

संदीपवर जबाबदारी आली. आता हें काम व्यवस्थित करायला हवं. दुसऱ्या दिवशी तो पुण्यातील एका दिव्यांग हॉस्पिटलमध्ये गेला आणि दोन तास त्याने उपचार घेणारे, उपचार करणारे, मदतनीस, नातेवाईक यांच्या भेटीगाठी घेतल्या. शनिवारी त्यांच्या पेपरमध्ये संदीपचा पहिला लेख आला आणि वाचकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. मग संदीपने मागे वळून पाहिले नाही, तो समाजातील सेवाभावी लोकांना भेटू लागला, त्याच्या मुलाखती छापून येऊ लागल्या. मग विविध दिव्यांग व्यक्ती जे बोलू शकतात त्याच्या मुलाखती, त्याचेवर उपचार करणारे डॉक्टर्स, खास अंधासाठी असणारे आश्रम, तेथील परिस्थिती..

संदीप दिव्यांगासाठी काम करणाऱ्या पुण्यातील आणि आजूबाजूच्या अनेक सेवाभावी संस्थांमध्ये जाऊ लागला, या अनेक संस्थात त्याच्या विशेष लक्षात राहिली मुळशी मधील ‘अनुकम्पा संस्था'. त्याची सुरवात उर्मिलाबेन शहा यांनी केलेली, ज्या स्वतः पांगळ्या होत्या, लहानपणी पोलिओने त्यांना पांगळे केले होते आणि व्हिलचेअर वरुन संस्था सांभाळत होत्या. संदीप या संस्थेत वारंवार जाई, तेथे अनेक दिव्यांग व्यक्तींना काही न काही उद्योग दिलेला असे, उदा. कागदाच्या पिशव्या बनवणे, मेणबत्ती बनविणे, काजू फोडून काजू वेगळे करणे. उर्मिलाबेन संदीपवर खूष होत्या, प्रथमच कोणीतरी दिव्यांग या विषयावर लिहू लागलं होतं आणि एका प्रतिष्ठित पेपर मध्ये आठवड्यातून एकदा का होईना, ते छापून यायला लागलं होतं.

दीड वर्षे संदीपचे दर शनिवारचे सदर सुरु होते, त्याला अनेकांची पत्रे, फोन येत होते, अनेक ठिकाणी त्याला व्याख्याता म्हणून बोलावले जात होते.अनेक सेवाभावी संस्था त्याला मार्गदर्शनाला बोलवत होते. आणि..  संपादक कुलकर्णी निवृत्त झाले आणि दुसऱ्या एका वर्तमानपत्रातून संपादक असलेले मोहन जगताप या वर्तमापत्रात संपादक म्हणून आले. आल्याआल्या त्यांनी झाडाझडती सुरु केली. त्यांनी कुलकर्णीच्या काळातील अनेक गोष्टी बदलल्या,  अनेक सदरे बंद केली. त्यानी संदीप सरदेसाईच्या ‘दिव्यांग सदराविषयीं' बोलण्यासाठी त्यानी संदीपला केबिनमध्ये बोलावले.

‘सरदेसाई, मी तुमचे दिव्यांगासाठीचे सदर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.'
संदीप हडबडला. ‘एवढे चांगले चाललेले आणि समाजासाठी उपयोगी सदर बंद करणार? सर असे करू नये, एकतर आपला एकच पेपर दिव्यांगासाठी धडपडतोय. त्याच्या हक्कासाठी आणि समाजाला त्याची जाणीव होण्यासाठी प्रयत्न करतोय, या सदराला मोठा रिस्पाेंस मिळतोय, म्हणून मी आपणास विनंती करतो, आपण आणि मॅनेजमेंटने याचा विचार करावा.'

‘सॉरी सरदेसाई, मला मॅनेजमेंटला उत्तर द्यावे लागते. मॅनेजमेंट रिव्हेनू विचारते, जाहिराती किती मिळतात हें पहाते, शेवटी हा धंदा आहे. शेठजीनी इथे पैसे गुंतविलेत. एवढा सर्व खर्च भगवून प्रॉफिट किती झाला, याचे मला दर सोमवारी उत्तर द्यावे लागते. कुलकर्णीची गोष्ट वेगळी, तो अनुभवी माणूस म्हणून त्याच्याकडे कानाडोळा करत होती मॅनेजमेंट. मला इथे जॉब देताना रिव्हेनू किती देणार, असा प्रश्न विचारून मला इथे घेतले, तू वीस लाखाच्या जाहिराती आणू शकतो काय, त्याचे उत्तर दे.'

‘नाही सर, ही समाजाची गरज आहे, दिव्यांग लोकांना आणि अनेक सेवाभावी संस्थांना हें सदर आपले वाटतं होते, मोठया आशेने ते आपल्या पेपरकडे पहात होते, ते दर शनिवारी आपला पेपर विकत घेत होते'

‘पेपरचा खप वाढला म्हणजे मॅनेजमेंटला फायदा होतं नाही, जाहिरातीवर पेपर चालतो. आणि अशा दोन टक्के दिव्यांगसाठी आपण शनिवारचे एक पान खर्च करू शकत नाही.'
‘दोन टक्के? पण सर हें दोन टक्के आपल्या समाजाचा भाग आहेत ना?आणि एकूण समाजात दिव्यांग दोन टक्के असतील कदाचित पण त्यामुळे लाखो कुटुंबे काळजीत असतांत किंवा डिस्टर्बड होतात त्याचे काय?'
‘सॉरी सरदेसाई, सॉरी, आपण हें सदर ताबडतोब बंद करतोय त्याऐवजी बेबसिरीज आणि परदेशी मालिका यांची माहिती देणारे नवीन सदर सुरु करतोय, तू हे सदर लिहिणार काय?'
  ‘नाही सर, या विषयीचा माझा अभ्यास नाही, ही जबाबदारी दुसऱ्या कुणावर द्या'.

सरदेसाई बाहेर पडला, तो नर्व्हस झाला, या विषयात त्याला रुची मिळू लागली होती, त्याला अजून अनेकांच्या मुलाखती घायच्या होत्या, मोठया शहरातील अनेक आधुनिक उपचारबद्दल लिहायचे होते. पण..नवीन संपादकांना या समाजातील दोन टक्के दिव्यांगांसाठी शनिवारचे एक पान ठेवणे म्हणजे waste of money वाटतं होते? मग दिड वर्षे या सदराने एवढी लोकप्रियता मिळविली, त्याचे काय? अगदी अनिल अवचट, अभय बंग ते अच्युत गोडबोले यांनी फोन करून कौतुक केले त्याचे काय? सर्व गोष्टी पैशात मोजता येतात काय? आपण समाजाचे काही देणे लागतो की नाही? कुठून वीस लाखाच्या जाहिराती मिळतील अशा विषयाला? हे काय आयपीएल आहे की सिनेमा प्रमोशन?

सरदेसाई रोजच्या कामाला लागला, त्याने अजून दुसऱ्या कुठल्या वर्तमानपत्रात हे सदर सुरु करता येईल काय अशी चाचपणी केली, पण समाजातील दोन टक्के वर्गासाठी कुणालाच इंटरेस्ट नव्हता. संध्याकाळ झाली की सरदेसाई चलबिचल व्हायचा, गेली दिड वर्षे तो आणि त्याची पत्नी अनुराधा कुठल्या ना कुठल्या दिव्यांग आश्रमात जात असत किंवा कुणातरी दिव्यांगच्या घरी. त्याच्या घरी जाऊन नवीन उपचारची माहिती देत असत. सरदेसाई बायकोसोबत तसाच अनेक संस्थात जात राहिला.

पेपरमधून हे सदर बंद होताच, त्याला आणि पेपरला अनेकांचे फोन येत होते. संदीप आपली असह्यता व्यक्त करत होता तर संपादक जगताप सरळ सरळ दुर्लक्ष करत होते. ‘अनुकम्पा संस्थे' च्या संस्थापक उर्मिलाबेन शहाचा त्याला फोन आला आणि रविवारी त्याला भेटायला बोलावले.रविवारी तो मुळशीमध्ये गेला, तेंव्हा...
मॅडम -सरदेसाई, तुम्ही तुमच्या पेपरमध्ये disability लोकांसाठी छान सदर चालविल होतं., मला तुमच्याकडून खुप अपेक्षा होत्या.
सरदेसाई - मॅडम, नवीन संपादकना रिव्हेनू पाहिजे, जाहिराती पाहिजेत, या दुर्लाक्षित दिव्यांगसाठी कोण जाहिराती देणार? पूर्वी विजय मर्चंटसारखे एखादे होते उद्योगपती, आता..
मॅडम - ते खरेच आहे, मी गेली पंचवीस वर्षे हा आश्रम चालवतेय, कोण कुठे पैसे देण्यासाठी उत्सुक असतो याची मला कल्पना आहे. ते जाऊदे सरदेसाई, तू आमच्या संस्थेत जॉईन होणार काय? अर्थात इथे पगार मिळणार नाही, तू तुझी नोकरीं चालू ठेव, इतर वेळात मला मदत कर.
  सरदेसाईला ही कल्पना आवडली. त्याने ताबडतोब होकार दिला.

उर्मिलाबेनला पण संदीपसारखा माणूस सोबत मिळाल्याने हुरूप आला, त्या ट्रस्टवर अजून माणसे होती; पण संदीपला जसा दिव्यांग लोकांबद्दल कळवळा होता, तसा इतरांना नव्हता. आश्रमाला मोठया जागेची गरज होती जेणेकरून सर्व प्रकारचे दिव्यांग इथे एका ठिकाणी सामावले जातील, या जागेसाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी संदीपवर दिली.
संदीपने आपल्या वर्तमानपत्रातील ओळखीने अनेकांशी संपर्क साधला, पण यश येत नव्हते. त्याला बातमी लागली की मुळशी मधील एक विधवा स्त्री आहे, तिच्या नावावर साडेतीन एकर पडीक जमीन होती आणि तिला मुलबाळ नसल्याने चांगल्या संस्थेसाठी दान करायची होती.संदीप त्या स्त्रीला भेटला, तिच्या नात्यात एक मतिमंद मुलगी होती, त्यामुळे अशा मुलांना चांगल्या शाळेची किती गरज आहे, याची तिला कल्पना होती, तिने आपली जागा संस्थेला दिली. एवढी मोठी जागा मिळाल्यानंतर त्यावर ट्रस्टची बिल्डिंग बांधायचे ठरले, पुन्हा एकदा संदीप सरदेसाई पुण्याच्या खासदारांना भेटला. त्यानी स्वतः येऊन जागा पाहिली आणि पुण्यातील काही धनीकांना फोन केले. दोन ठिकाणहून इमारत बांधून देण्याचा शब्द मिळाला आणि दोन वर्षात बांधकामाला सुरवातपण झाली.

ट्रस्टच्या इमारतीचे काम सुरु असताना उर्मिलाबेनचे निधन झाले. सर्वाना मोठा धक्का बसला. पण ‘उर्मिलाबेन शहा दिव्यांग ट्रस्ट' हें नाव ट्रस्टला देऊन काम चालूच राहिले, आता ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून संदीप सरदेसाई यांची निवड झाली.

नवीन इमारतीत दिव्यांगच्या वेगवेगळ्या प्रकारासाठी स्वतंत्र जागा मिळाली. अंध, बहिरे, मुके, मतिमंद,पांगळे, बौद्धिक अक्षमता, स्वमग्नता आणि अजून काही. पुण्याच्या खासदारांचे या संस्थेकडे विशेष लक्ष होते. एकदा खासदारांनी सर्व पत्रकारांना बोलावून संस्थेची इमारत दाखवली आणि संस्थेच्या आर्थिक स्थैर्यासाठी आवाहन केले. मग संस्थेकडे पैशाचा पूर आला.

संदीप सरदेसाईने व्यवस्थित नियोजन केले, उत्तम शिक्षक, मार्गदर्शक नेमले. दर शनिवारी दिव्यांग व्यक्तीसाठी समुपदेशक येऊन बोलू लागले, चांगले डॉक्टर्स भेट देऊ लागले. दिव्यांगांच्या नातेवाईकांशी बोलण्यासाठी त्यातील एक्स्पर्ट येऊ लागले. ‘उर्मिलाबेन शहा दिव्यांग ट्रस्ट'चा पुणे  जिल्हात बोलबाला झाला. अनेक पालक तसेच नातेवाईक काही दिव्यांग लोकांना निवासित म्हणून ठेऊ लागले काही त्याना तासांपुरते सोडून संध्याकाळी घरी नेऊ लागले. सरदेसाई सतत कामात अडकलेला असायचा. एकदा त्याचे पहिले संपादक कुलकर्णी येऊन ट्रस्टचे काम पाहून गेले. सरदेसाईने त्यांना नमस्कार केला आणि दिव्यांगांकडे तुमच्यामुळे मी सहनभूतीने पहायला लागू लागलो, असे त्याना सांगताच त्यांनाही त्याचा अभिमान वाटला.

एक दिवस सकाळी दहा वाजता तो ऑफिसच्या कामात अडकलेला असताना, बाहेरील क्लार्क सांगायला आला, सर एक वयस्क व्यक्ती तुम्हांला भेटायला आली आहे'.
वयस्क व्यक्ती असली की संदीप भेट नाकारत नसे. त्यानी त्यांना आत पाठवायला सांगितले. ती व्यक्ती आत येताच त्याने ओळखले, हें आपले संपादक मोहन जगताप, ज्यांनी त्याचे पेपरमधील सदर बंद केले होते. तो पटकन उभा राहिला.
‘सर, तुम्ही?'
‘होय सरदेसाई, तुझे आपल्या पेपरमधील चांगले चाललेले सदर बंद करायला लावणारा मी तुझा संपादक जगताप'.
‘पण सर तुम्ही इथे?'
‘सरदेसाई, फक्त दोन टक्के दिव्यांग लोकांसाठी आपल्या पेपर मधील आठवड्यातून एक पान तू लिहीत होतास, ते मी बंद केले पण नियतीने मला मोठा धडा शिकवला रे'
‘काय झालं सर? कसला धडा?'
‘सरदेसाई, मला एकच मुलगी.. माझी मोठी लाडकी.. तिने तिच्या कंपनीतील सहकाऱ्याशी लग्न केल, तो पण चांगला मुलगा... पण त्यांची दोन्ही मुले मतिमंद निघाली रे..'
‘काय म्हणता सर?'
‘होय रे सरदेसाई, खुप उपचार केले माझ्या नातवांवर, पण काही उपयोग होतं नाही.. मी हरलो रे सरदेसाई.. समाजातील फक्त दोन टक्के म्हणता म्हणता माझ्या घरात शंभर टक्के दिव्यांग आले रे सरदेसाई'
‘सर, शांत व्हा.. तुमचीही काही चूक नव्हती.. जो पर्यत आपल्या घरात अपंग, मुका, बहिरा, मतिमंद नसतो, तोपर्यत याची तीव्रता जाणवत नाही. असा कोणी असला तर मग समजते, अशा व्यक्तीला समाजात वावरणे किती कठीण आहे ते,.. शांत व्हा सर.'
 ‘मी शांतच आहे, मी माझ्या दोन्ही नातवांना तूझ्या हवाली करत आहे, उर्मिलाबेनने सुरु केलेला हा ट्रस्ट आणि तुम्ही चालवत असलेला हा आश्रम, याच्या बातम्या वाचत होतो. आज स्वतः डोळ्यांनी पाहिला.'

जगताप बाहेर गेले आणि आपल्या मुलीला आणि दोन्ही नातवांना घेऊन आले. सरदेसाईने त्या दोन मतिमंद मुलांना जवळ घेतले.
‘तुम्ही काळजी करू नका सर, माझी संस्था या दोघांची काळजी घेईल, दर शनिवारी पालकांची भेट असते, तेंव्हा यांना भेटायला या आणि दोन महिन्यात यांची प्रगती पहा'.
‘सरदेसाई, माझी अजून एक विंनती आहे, आपल्या पेपरचा मी एक डायरेवटर आहे, म्हणून तुला विंनती करतो, आता दर आठवड्यातून दोन वेळा तुझे दिव्यांगावरचे सदर चालू कर.'

‘सर, पण जाहिराती..
‘जाहिरातीचे सोड रे सरदेसाई, माझ्यासारख्या असंख्य दिव्यांगच्या पालकांना आणि नातेवाईकांना तूझ्या सदराची अत्यंत गरज आहे '
‘सर' म्हणत सरदेसाईंनी जगतापना मिठी मारली.
‘सरदेसाई, काही वर्षांपूर्वी मी केलेली चूक सुधारतो आहे, तेपण शंभर टक्के पालकांसाठी'
जगताप डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाले. - प्रदीप केळुसकर  

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

विधवांना सवलती व सहाय्य करून मुख्य समाज प्रवाहात आणणे जरुरीचे !