योग :  भारताने जगाला दिलेली चिरंतन व अपूर्व देणगी

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातील कायम प्रतिनिधी अशोक मुखर्जी यांनी राष्ट्रसंघात योग दिनासबंधी एक ठराव दिला व तो १७७ राष्ट्रांनी संमत केला. त्यानुसार ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र महासंधाने २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली. २१ जून हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. उत्तरायण संपून दक्षिणायन याच दिवशी सुरू होते. दहा वर्षांपूर्वी योग दिन साजरा करण्याचा प्रारंभ आंतरराष्ट्रीय पातळीवर झाला. या काळात मिळणारी ऊर्जा सर्व प्राणिमात्रांना लाभदायक ठरते. योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य व चिरंतन भेटच आहे.

 आज जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ ऋग्वेदामध्येही, नारदीय सूक्त तसेच भगवद्‌गीतेमद्धेही अनेक वेळा योगाचे उल्लेख आहेत. महाभारताच्या शांतिपर्वामध्येही योगाचे उल्लेख आहेत. अगदी योगाचे मूळ दहा हजार वर्षापर्यंत मागे जाते. योगावर पतंजली मुनींनी इ स पूर्व १५० मध्ये योगसूत्रे लिहली आहेत. प्राचीन मोहंजोदाडो, हडप्पा संस्कृतीमध्ये योग असलेल्या अनेक मूर्ती सापडल्या आहेत. आपली सहा दर्शनशास्त्रे आहेत. त्यातील योग हे सुद्धा एक दर्शनशास्त्र आहे. वेद, उपनिषदे यातही योगाचे संदर्भ मिळतात. पूर्वी केवळ ऋषी मुनी यांच्यापर्यंत सीमित असलेला योग आज अगदी सामान्य लोकांनाही माहित होऊ लागला आहे. आज योगाचा प्रसार व प्रचार करण्याचे महत्वाचे काम गुरू बाबा रामदेव, बी के एस अय्यंगार तसेच स्वामी शिवानंद यांनी सुमारे गेली अनेक वर्षे केले आहे. सर्वसामान्य लोकांना योग त्यांनीच परिचित करून दिला. गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात, योग म्हणजे निव्वळ व्यायाम आणि आसन नव्हे. ते भावनात्मक समतोल आणि त्या अनादी व अनंत तत्वाला स्पर्श करत आध्यत्मिक प्रगतीतील सर्व शक्यतांची ओळख करून देणारे शास्त्र आहे. शरीर व मन यांचा अन्यन्यसाधारण संबंध आहे. मन जर आनंदी निरोगी असेल तरच शरीर व मन आनंदी असते. योग्य साधनेत ते साध्य केले जाते योग हा शब्द संस्कृतच्या युजपासून तयार झाला आहे. युज याचा अर्थ जोडणे असा आहे. यंदाच्या योग दिनाचे घोष वाक्य आहे, Yoga for self and society.  गेली सुमारे दोन वर्षाहून अधिक काळ सारे जग करोना या विषाणूविरुद्ध लढत आहे. या मुदतीत कोरोनाच्या तीन  लाटा येऊन गेल्या. कोरोनाला यशस्वीरित्या तोंड द्यावयाचे असल्यास व आपली प्रतिकार शक्ती वाढवावयाची असल्यास योगासारखा दुसरा उपाय नाही. हेसुद्धा निमित्ताने आपणास पाहावयास मिळाले आहे.

योगातील प्राणायाम, कपालभाती, अनुलोम विलोम तसेच भ्रस्तिका हे प्रकार निरोगी जीवनासाठी व रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आवश्यक आहेत. ध्यानात जाऊन मन एकाग्र करणे यातही समाधान मिळू शकते. मन स्थिर होते. योगाची आठ अंगे आहेत. त्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा व समाधी ही होत. योगाच्या सानिध्यात माणसाला सुख व आनंदाची प्राप्ती होऊ शकते. जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन तयार होतो. आज जगातील अनेक राष्ट्रात व शहरात योग साधना शिकविली जाते. अनेक होतकरू योग शिकण्यासाठी भारतात येत आहेत हीसुद्धा भारतीयांच्या दृष्टीने अभिमानाची व गौरवाची बाब आहे.योग एक पूर्ण विज्ञान आहे. ती एक पूर्ण जीवनशैली आहे. एक पूर्ण चिकित्सा पद्धती आहे. योग आपणास तणावातून आनंदाकडे नकारात्मक कडून सकारात्मकते जाण्याचा मार्ग दाखवितो. जीवात्मा व परमात्मा यांचा संयोग म्हणजे योग होय. आजकाल अनेक शाळातून योगाचे धडे शिकविले जातात. पूर्वी औंध या सातारा जिल्ह्यातील संस्थानामध्ये सूर्यनमस्कार व त्याचे महत्व राजे भवानराव पंतप्रतिनिधींनी गावागावात व अनेक शाळांत रुजविले होते. त्यांचे चिरंजीव व ब्रिटनचे माजी हाय कमिशनर अप्पासाहेब पंत यानीही परदेशात याचा प्रचार केला होता. सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे. आज अनेक ठिकाणी योगाची शिबिरे आयोजित केली जातात. योग ही केवळ एक दिवसात करावयाची बाब नाही, त्यात सातत्य हवे तरच त्याचे परिणाम दिसू लागतात. सध्याच्या धावपळीच्या व गतिमान युगात तसेच करोनासारख्या संसर्गजन्य रोगाशी यशस्वीरीत्या सामना करावयाचा असल्यास योगाची साथ धरावी लागेल. शरीर व मन यांचा संबंध आनंदी व सकारात्मक ठेवावयाचा असल्यास योगाची मदत होते. दररोज योगसाठी काही वेळा राखून ठेवणे व तो नियमितपणे करणे हे केल्यासच त्याचे शारीरिक व मानसिक फायदे मिळू शकतात  काळजी, द्वेष, भीती वाटणे यामुळे शरीरातील संप्रेरके वाढून रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते दैनंदिन जीवनात योगाचा योग्य तो अंतर्भाव केल्यास रक्तातील साखरेच्या नियंत्रणास मदत होते.

तुम्ही युवक असा, की वयोवृद्ध किंवा निरोगी असा, की आजारी असा; योगाभ्यास सर्वासाठी लाभदायक आहे  व तो सर्वांना प्रगतीपथावर घेऊन जातो. योगातील प्राणायामाचे अनेक फायदे आहेत. आपण एक श्वास ५०० एम एल घेतो. तोच प्राणायाम घेताना आपण ४५०० पर्यत जाऊ शकतो. त्यामुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हृदय, फुपफुस व मेंदूचे विकार दूर होतात. कांती येते.  मन शांत व स्थिर होते. आयुष्य वाढते. मनाची चंचलता दूर होते. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात तपस्वी, ज्ञानी आणि कर्मी यापेक्षा योगी अधिक श्रेष्ठ असल्याने तू योगी हो. आजकालच्या जगात सामान्य माणूस वाहत चालला आहे. त्यास माहित नाही की तो कोठे जाणार? जीवनातील अनेक चिंतांनी त्यास ग्रासलेले असते. पैसे आहेत पण सुख नाही अशा अवस्थेत तो व्यसनाकडे वळतो. वाईट सवयी लावून घेतो. प्राणायामसारखा मित्र नाही. माणसाचे आयुष्य मनाच्या स्थितीवर अवलंबून असते. जेव्हा मन प्रसन्न असते तेव्हा तोंडावर हास्य फुलते. मन दुखी असेल तेव्हा अश्रू  येतील. मनाचे संकल्पच आपले आयुष्य ठरवते. श्वासांमध्ये आयुष्याचे गुपित दडलेले आहे. प्राणायामाने आयुष्य उज्ज्वल करता येते. नकारात्मक विचार संपतात व उत्साह येतो विषतत्वे नष्ट होतात. प्रार्थनेने मन प्रसन्न व पवित्र होते. ईश्वर शक्तीचा लाभ होतो. आयुष्य वाढते. सूक्ष्म व्यायाम व आसने केल्याने शरीरातील सर्व भागास रक्त पुरवठा होतो. या  योग दिनाच्या निमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे  येथे योग दिनाच्या निमित्ताने श्रीनगर येथे हजर राहतील. या कार्यक्रमास सुमारे १५००० लोक उपस्थित राहतील असा अंदाज आहे. - शांताराम वाघ 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी