मुशाफिरी

  भाषा आणि लिपी हे मानवाला लाभलेले अमोल वरदान असून त्यामुळेच तो अन्य सजीव प्राण्यांपेक्षा वेगळेपणाने उठून तर दिसतोच; पण बुध्दिमत्तेच्या जोरावर त्याने या दोन घटकांच्या जोरावर अनेक बाबी साध्य करुन दाखवल्या आहेत. पण अनेकदा या भाषा आणि लिपीमुळेच जगात उन्माद माजतो, दंगेधोपे पेटतात, युध्दे होतात, दोन समुहांत राडे होतात. एक भाषा भगिनीचे लोक दुसऱ्या भाषाभगिनीच्या लोकांचा द्वेष करतात. लिखाणावर डांबर ओततात. नावाच्या पाट्या जाळतात. काही मजकूरांची होळी करतात असेही पाहायला मिळत असते. याला कारण म्हणजे टोकाला जाणे होय. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की परिणाम हा घातकच होणार यात शंका नको.

  हल्लीचा जमाना हा सोशल मिडियाचा आहे. त्यामुळे या भाषेला आणि लिपीला व त्यासोबतच्या चित्रांना व ध्वनिफितींना आणि त्यांनी साधलेल्या समग्र परिणामाला खूप महत्व प्राप्त झाले आहे. सध्या ववफ बोर्ड व त्यांना मिळणाऱ्या अमर्याद सवलती यांचा विषय गाजतो आहे. त्या आधी लोकसभा निवडणूकीत भाजपला बहुमत मिळाले तर घटना बदलणार, मंगळसूत्र विकणारे, साडेआठ हजार रुपये महिलांच्या अकाऊंटमध्ये खटाखट खटाखट वगैरे विषयांनी जोर धरला होता. हे सारे भाषा, भाषणे, त्यांचे विविध लिपींतून छापून आलेले वृत्तांत, त्याच्या वृत्तवाहिन्यांवरील ध्वनिफिती, समाजमाध्यमांवरील व्हायरल संदेश यामुळेच तर जनसामान्यांपर्यंत पोहचले. यंदा बकरी ईदच्या आदल्या दिवशी नवी मुंबईत बेलापूर येथे काही दीडशहाण्या मुस्लिम खाटकांनी एका बकरीच्या पाठीवर ‘श्री राम' असा पिवळ्या अक्षरात मजकूर लिहुन तिला बकरी ईदला कापण्याची व त्यातून भारतातील बहुसंख्यांकांच्या भावनांशी खेळण्याची, चिथावण्याची तयारी चालवली होती. काही संघटनांनी लागलीच यावर आक्षेप घेऊन पोलीसांपर्यंत प्रकरण नेले. हे सारे भाषा, लिपी याचा दुरुपयोग करण्याचेच प्रकार नव्हेत काय?

   हा झाला भाषा-लिपीचा टोकाचा, अतिरेकी उपयोग करण्याचा मामला. पण याच्या अध्येमध्येही वेगवेगळ्या प्रकारे भाषा आणि लिपी वापरुन गंमतीजंमती, मजेशीर, गंभीर बाबी घडत असतात. बऱ्याचदा काही नवशिक्षित मंडळी आपल्याला बरेच काही इंग्रजी समजते अशा थाटात इंग्रजी झाडायला बघतात. ‘येस' या इंग्रजी शब्दाकरिता Yeah  असा समांतर शब्द रुढ आहे. त्याचा अर्थ येस, होय, कबूल आहे, बरोबर आहे असाच आहे. याचा उच्चार ‘याह' (यात ‘ह' सायलेण्ट) असा आहे. नवशिक्षित लोक हे ‘या या' झाडत असतात. तुम्ही अनेकांच्या बोलण्याकडे नीट लक्ष द्या. ह्या ‘या या' चा किती अतिरेक होत असतो ते तुमच्या लक्षात येईल. एखाद्या प्रश्नाच्या उत्तरात हे दिवटे इतवया वेळा ‘या या' करतात की आता ‘तुम्ही जा, लागलीच जा' असे त्यांना सांगावेसे वाटते. तोच प्रकार ‘बाय बाय' चा. ‘Bye Bye' याचा अर्थ ‘गुड बाय' हाच आहे. पण काही जण ‘बाय बाय बाय' इतवया वेळा करतात की तेवढ्या वेळात आपण त्यांचा निरोप घेऊन पायी, रिवशाने, बसने, ट्रेने प्रवास करीत आपल्या घरीही पोहचलेलो असतो. अनेकदा हे मोबाईलवरील संभाषणात आवर्जून घडते. काही जणांना स्वतःच्या बोलण्याच्या सुरुवात ‘मी काय बोल्तो' असे करण्याची वाईट खोड असते. ‘तू काय बोलतोस एकदा बोलून टाक ना; मग आम्हाला कळेल, त्या आधीच काय बोलतो हे काय विचारतोस?' असा वाकडा प्रश्न अनेकदा माझ्या तोंडी येतो. पण मी तो महत्प्रयासाने आवरतो..असेही घडले आहे.

   मोबाईल अलिकडे अनेक भूमिका एकाच वेळी निभावत असतो. जन्म-मृत्यूच्या वार्ता, सांत्वनपर संदेश, अपघात, घातपात, दशक्रिया, तेरावे विधी, साठी, एकसष्टी, अमृतमहोत्सव, शतक महोत्सव, निवडणूकीतील विजय, गृहप्रवेशह, वास्तुशांत, परिक्षेतील यश वगैरे वगैरे बाबीत हाच मोबाईल पुढे होऊन त्या त्या प्रकारचे संदेश देतो, घेतो. टेक केअर, गेट वेल सून, भावपूर्ण श्रध्दांजली, प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, विवाहाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, वर्षश्राध्दानिमित्त भावपूर्ण अभिवादन, पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वगैरे वगैरे संदेशांची देवाणघेवाण केली जात असते. हल्ली अनेकांना तीव्र जीवनसंघर्षात एकमेकांसाठी वेळ काढणे कठीण झाले आहे. अशा वेळी ही मोबाईलवरची भाषा आणि लिपी सर्वांच्या मदतीला धावून जाते. ‘बसायला जाणे' अर्थात एखाद्या घरी मयताचा प्रसंग झाला असेल तर त्या दुःखी परिवाराचे ‘सांत्वन करण्यासाठी, चौकशीसाठी' जाणे होत असते. अशा वेळी काय बोलावे, कुणी बोलावे हे कुणी कुणाला शिकवत नसते. जसे लहानपणी आई-वडील आपल्याला देवाच्या, मोठ्या-वडीलधाऱ्या माणसांच्या पाया पडायला सांगतात, पाढे शिकवतात, चालीवर गाणी म्हणायला शिकवतात. पण एखाद्याच्या शेवटच्या आजारपणात, मृत्यूप्रसंगी वा त्या उपरान्त विविध प्रसंगी कसे वागावे, नेमके काय बोलावे याचे कसलेही प्रशिक्षण नसते. ते एकमेकांकडे, वडीलधाऱ्याकडे बघून, त्यांचे अनुकरण करुनच शिकावे लागते. हल्ली जीवनसंघर्ष तीव्र असल्याने अपघाती, आकस्मिक मृत्युंचे प्रमाण तसेच दुखणी, आजारपणही वाढले आहेत. एखाद्या ठिकाणी मयतप्रसंगी जरी जाता आले नाही तरी तीन दिवसांनंतर, दशक्रियेला किंवा उत्तरकार्य (तेरावे विधी) अशा प्रसंगी जावे लागते. मला आठवते..१९८७ च्या सुमारास माझे हायड्रोसिलचे ऑपरेशन झाले होते. त्यामुळे एक आठवडा दवाखान्यात काढण्याची व खाटेवर पडून राहुन रुममधील सिलिंग बघण्याची वेळ माझ्यावर आली होती. नात्यातील अनेकांना ते समजल्यावर कित्येकांनी दवाखान्यात धाव घेतली. पण अनेकजण केवळ आले, माझ्याशेजारी बसले आणि पाच-दहा मिनिटांत उठून चालते झाले. ‘काय आजार आहे, कोणते उपचार सु्‌रु आहेत, त्रास होतो का, डिस्चार्ज केंव्हा मिळणार' असले बेसिक प्रश्नही अनेकांच्या मनात किंवा तोंडात आले नाहीत. हाच प्रकार मी काही मयतघरी अनुभवला आहे. ‘बसायला' जायचे म्हणून मयतघरी अनेक लोक जातात. बसतात. चेहऱ्यावरची माशीही हलणार नाही असे भाव तिथे बाळगतात आणि काही वेळाने उठून चालते होतात.

   ...तर काही ठिकाणी मयतघरी सांत्वनासाठी गेल्यावर एकदम उलट सीन बघायला मिळतो. ‘काय झालं होतं? अचानक कसे गेले? शेवटचे काय बोलले?' वगैरे वगैरे प्रश्नांची सरबत्ती केली जाते. मग घरातील एखादी महिला सांगू लागते..‘काय नाय..सकाळी उठले, संडासला गेले, दात घासले, आंघोळ केली, देवपूजा केली, च्या पिला, भायेर जाऊन येतो बोल्ले नि चप्पल घालायला गेले तर चवकर येऊन पडले. पोऱ्याने चटकन रिवशात घालून दवाखान्यात नेले, डॉक्टरने पस्तीस हजाराचा इंजेक्शन मारला, पण नाय वाचले. तिथंच मान टाकली.' या साऱ्यात जी व्यवती हे जग सोडून गेली..ती नेमकी कशाने, कोणत्या आजाराने गेली ते न सांगता बाकीचा फाफटपसाराच ऐकवला जातो. जो ऐकण्यात तिथे जमणाऱ्यांना काडीचेही स्वारस्य नसते. पण विचारणाऱ्याने काहीतरी बोलायला हवे  म्हणून तो बोलतो आणि सांगणारी काहीतरी सांगायला हवे म्हणून सांगते. ‘खूप चांगला माणूस होता, अजून आयुष्य लाभायला हवं होतं त्यांना, काळजी घ्या, काही लागलं तर सांगा, आम्ही आहोतच' अशी गुळगुळीत वाक्येही अशा ठिकाणी हमखास ऐकू येतात. खरंतर ज्यांना त्या दुःखी परिवारासाठी काही करावंसं वाटतं ते न बोलता करुन मोकळे होतात.  त्या व्यवतीच्या जीवनात त्याच्याशी कधीही नीट न वागलेल्या, त्याच्यावर जळणाऱ्या, त्याचा तिरस्कार करणाऱ्या लोकांकडून असे ‘आम्ही आहोतच' म्हणून ऐकायला मिळणे म्हणजे किती मोठा विरोधाभास ! एवढ्या चांगुलपणाने त्याच्याशी ही माणसं त्याच्या जीवंतपणी वागली असती तर तो आणखी दहा बारा वर्षे नवकीच जगला असता असं मला बऱ्याचदा वाटून जातं.

   बऱ्याचवेळा अंत्यविधीच्या ठिकाणी काहीजणांचा उगाचच आरडाओरडा सुरु असतो. मरण पावलेली व्यवती निपचित पडलेली असते पुन्हा कधीही न उठण्यासाठी ! पण काही अति दुःखी (की अतिउत्साही ?) लोक त्या प्रेताला हलवून हलवून, मिठ्या मारुन रडारड करत असतात. ‘अहो उठाना, अहो मला सोडून जाऊ नका ना, मी आता राहुन काय करु वगैरे वगैरे' स्वगत अशा ठिकाणी हमखास ऐकायला मिळते. ‘तुमचे थोबाड पाहण्याची माझी इच्छा नाही, कधी एकदा जाल नि मी होईन मोकळी' या टाईपची वाक्ये आपल्या नवऱ्याला त्याच्या हयातीत सदान्‌कदा ऐकवलेल्या महिला जेंव्हा चारचौघात अंत्यविधीला त्याचा मृतदेह उचलण्याआधी एकदम ट्रान्स्फर सीन असल्यासारखी हृदयस्पर्शी डायलॉगबाजी करतात तेंव्हा त्या दुःखी गर्दीतही अनेकांना ते ऐकून आता हसावे की रडावे की हिचा गळा आवळावा असे प्रश्न पडत असतात. खरे तर एखाद्याचा/एखादीचा मृत्यु ही अपार वेदना देणारी गोष्ट आहे. पण त्याला/तिला जीवंतपणीही प्रेम लाभायला हवे. ते आपल्या बोली-भाषा-संवाद-कृतीतून व्यवत व्हायला हवे. जवळच्या व्यवतीच्या निधनानंतरचा शोक, दुःख  हा मोठा वेदनादायी अनुभव आहे. तो न बोलताही, मोठमोठ्याने न रडताही ? व्यक्त होतच असतो. पार वेशीवरुन मयतघरापर्यंत बोंबा ठोकत येणे, मोठ्याने रडारड करणे, छात्या पिटणे, आरडाओरडा करीत त्याचे प्रदर्शन मांडणे यापैकी काहीही न करताही दुःखितांचे दुःख, शोक समजला जाऊ शकतो.

   ...पण केवळ करायचे म्हणून एखादे कृत्य करणारच असा पणच कुणी केला असेल तर? तर त्याला तुम्ही आम्ही तरी काय करणार म्हणा!

- राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

पुस्तक परिक्षण